25 January 2020

News Flash

उत्सव विशेष : चातुर्मासाची परंपरा

भारतीय धार्मिक-सांस्कृतिक जीवनात चातुर्मासाला वेगळेच महत्त्व आहे.

चातुर्मासाच्या काळात सृष्टीमध्ये असलेले चैतन्य सामान्य जनजीवनातही संचारते.

विद्याधरशास्त्री करंदीकर – response.lokprabha@expressindia.com
भारतीय धार्मिक-सांस्कृतिक जीवनात चातुर्मासाला वेगळेच महत्त्व आहे. सृष्टीमध्ये असलेले चैतन्य या काळात सामान्य जनजीवनातही संचारते. वेगवेगळ्या प्रथा, परंपरा, व्रतवैकल्ये, सण या सगळ्यांची या काळात रेलचेल असते. या सगळ्यामागे आपल्या पूर्वजांचा नीट विचार आहे.

या वर्षी ख्रिस्ताब्द १२ जुल रोजी चातुर्मासाला प्रारंभ होत असून ख्रिस्ताब्द ९ नोव्हेंबर रोजी त्याची समाप्ती होत आहे. या चार महिन्यांच्या कालखंडास चातुर्मास असे म्हणतात. या चार महिन्यांत एखादा अधिक मास आला तर चातुर्मास पाच महिन्यांचा होतो. असे पुढच्या वर्षी घडणार आहे, कारण पुढच्या वर्षी म्हणजे शके १९४२ (२०२०/२०२१) मध्ये आश्विन महिना अधिक आहे. हे चार महिने व्रतवैकल्य आणि सण, उत्सव यांनी समृद्ध असतात.

धर्मशास्त्रानुसार या काळात देव निद्राधीन असतात. म्हणून आषाढ शुक्ल एकादशीला देव शयनी एकादशी असे म्हणतात तसेच काíतक शुक्ल एकादशीला प्रबोधिनी किंवा देवउठी एकादशी म्हणतात. या चार महिन्यांच्या काळात असुर शक्ती प्रबल होते हा धार्मिक भाग, पण भारतीय ऋतुमानाप्रमाणे हा काळ पावसाचा असतो. या काळात पचनशक्ती कमी होते. त्याने वात विकार वाढतात. यासाठी कमीत कमी तसेच पचण्यास हलके खाणे यासाठी व्रते सांगितली आहेत. धर्मातील असुर याचा अनारोग्य, रोग असा अर्थ घेण्यास हरकत नाही. धर्मशास्त्रात बहुतांश नव्हे सर्वच गोष्टी मानवी आरोग्य तसेच मानवी हित यांचा विचार करूनच सांगितलेल्या दिसतात.

व्रतवैकल्ये असे जोडीने म्हटले जाते. व्रत म्हणजे ‘व्रियते स्वर्ग:’ व्रजति स्वर्गमनेन वा अशी व्रताची व्याख्या केली आहे. ज्यामुळे स्वर्गसुखाची प्राप्ती होते ते व्रत, स्वर्गातील सुख इहलोकात मिळून जीवन समृद्ध व्हावे यासाठी ही व्रते. वैकल्य म्हणजे शरीर कृश करणे किंवा हलके करणे. सध्याच्या काळात यासाठी हजारो रुपये खर्च केले जातात. त्याऐवजी व्रतपालन करून कृश होणे अतिशय चांगले. व्रतांचा दुसरा फायदा म्हणजे संयम निर्माण होतो. यामुळे मन विषयापासून परावृत्त होण्यास मदत होते. बुद्धीचा विकास होतो. ज्ञानतंतूंची वाढ होण्यास मदत होते. रोगपरिहार होऊन आयुष्यवृद्धी होते. ‘अल्पाहार क्षेमकर:’ असे आयुर्वेद सांगतो.

सण, उत्सव आवश्यक आहेत. उत्सवाची व्याख्या ‘नियताल्हादजनकव्यापार’ अशी केली जाते.  ज्यापासून निश्चित आनंद, आल्हाद उत्पन्न होतो तो उत्सव. अमरकोशात उत्सव शब्दाला पर्यायी शब्द मह उद्भव असे दिले आहेत.

चातुर्मासातील सर्वात जास्त व्रते श्रावण महिन्यात येतात. प्रत्येक वाराचे व्रत आहेच आणि इतरसुद्धा अनेक व्रते येतात.

भाद्रपद महिन्यात व्रते आहेत. सर्वाना गणपती उत्सव माहीत आहे. हेसुद्धा एक व्रत आहे. त्याबद्दल अनेक समजुती आहेत. एकदा गणपती आणले तर कायमस्वरूपी आणावे लागतात; असा एक समज आहे. पण हे व्रत आहे. ते जसे एक वर्ष करता येते तसेच अनेक वर्षेही करता येते. सार्वजनिक गणेशपूजन हा उत्सवाचा भाग झाला आहे. अनेकांना असे वाटते की, अनंत चतुर्दशी आणि गणपती यांचा संबंध आहे; पण खरे पाहाता गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशी भिन्न भिन्न आहेत. गणेश उत्सव दहा दिवस केल्याने चतुर्थी ते चतुर्दशी दहा दिवस होतात. अनंत चतुर्दशी हेसुद्धा एक व्रत आहे. याचा लोप करता येत नाही.

भाद्रपद कृष्ण पक्ष म्हणजे महालय किंवा पितृपक्ष. आपल्या कुळातील पितरांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ. महा म्हणजे मोठा, आलय म्हणजे उत्सव. पितरांसाठी उत्सव साजरा करण्याचा काल. यानंतर आश्विन महिन्यात शारदीय नवरात्र प्रारंभ होतो. हा काल अतिशय महत्त्वाचा आहे. मुख्य दोन नवरात्र आहेत- एक वर्षांरंभी चत्र महिन्यात वासंतिक नवरात्र आणि आश्विन महिन्यात शारदीय नवरात्र. एक वसंत ऋतू सुरू होताना, दुसरे शरद ऋतूला प्रारंभ होताना. दोन्ही काल हवामान बदलण्याचे काल असल्याने येथे व्रतस्थ राहून प्रतिकारशक्ती वाढविणे हे फार महत्त्वाचे आहे. येथे याला कुलाचार असे म्हटले आहे. याचा लोप करता येत नाही. याच महिन्यात महिनाअखेर दीपावली येते. काíतक महिन्यात शुक्ल पक्षात प्रबोधिनी एकादशी येते. या दिवशी प्रबोध उत्सव साजरा करतात. त्याची थोडक्यात माहिती घेऊ.

आषाढी एकादशी ते काíतकी एकादशी या ‘चातुर्मास’ काळात ब्रह्मा, इन्द्र, रुद्र, अग्नी, वरुण, कुबेर, सूर्य, चंद्र इत्यादींनी वंदित असे जगत्पालक योगेश्वर भगवान विष्णू क्षीरसागरात शयन करीत असतात, असे मानले जाते. भक्तलोक त्यांच्या शयन परिवर्तन व प्रबोधा (जागृती) साठी लक्षपूर्वक विविध धर्मकृत्ये करीत असतात. त्यापकीच हे प्रबोध व्रत होय. खरे पाहता, परमेश्वर एक क्षणही झोप घेत नाही;  तरी ‘यथादेहे तथा देवे’ मानणारे लोक शास्त्रानुसार धर्मकृत्ये करतातच. काíतक शुक्ल ११ रोजी रात्री हे व्रत केले जाते. झोपलेल्या भगवान विष्णूला दीर्घ निद्रेतून जागे करण्यासाठी- (१) वेगवेगळ्या सुभाषितांचे व स्तोत्रांचे वाचन, पुराणे, भगवत्कथाश्रवण व विविध भजनांचे गायन, (२) शंख, घंटा, मृदंग, नगारा, तंबोरा इत्यादी वाद्य्ो वाजविणे, (३) विविध देवोपम खेळ, लीला, नाच इत्यादी विधी केले जातात. तसेच-

उत्तिष्ठोत्तिष्ठ गोिवद त्यज निद्रांजगत्पते ।

त्वयि सुप्ते जगन्नाथ जगत् सुप्तं भवेत् इदम् ॥

उत्थिते चेष्टते सर्वमुक्तिष्ठोत्तिष्ठ माधव ।

गता मेघा वियच्चव निर्मलं निर्मला दिशा: ।

शारदानि चपुष्पाणि गृहाण मम केशव ।

इत्यादी मंत्र म्हणून विष्णूचे सिंहासन (किंवा मंदिर) विविध पानाफुलांनी, हारतोरणादिकांनी सजवून, ‘विष्णुपूजा’, ‘पंचदेवपूजा-विधान’ किंवा ‘रामार्चन- चंद्रिका’ इत्यादीनुसार योग्य पद्धतींनी पूजा करावी. नंतर ‘यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्।’ ते ‘नाकं महिमान: सचन्त यत्र पूर्वे साध्या: सन्ति देवा: ।’ अशी पुष्पांजली वाहून ‘इयंतु द्वादशी देव प्रबोधाय विनिर्मिता। त्वयव सर्वलोकानां हितरथ शेषशायिना॥’, ‘इदंव्रतं मया देव कृतं प्रीत्य तव प्रभो। न्यूनं संपूर्णतां यातु त्वत्प्रसादाज्जनार्दन॥’ अशी प्रार्थना करून प्रल्हाद नारद, पुंडलिक, व्यास, अंबरीष, शुक, भीष्म, शौनक इत्यादी भक्तांचे स्मरण करून तीर्थप्रसाद वाटावा. नंतर भगवान विष्णूंचा रथ ओढल्यास प्रत्येक पावलाला यज्ञ केल्याचे पुण्य मिळते, असे मानतात. बळीराजास पाताळात दडपून तीन पावले भूमिदान घेऊन वामन परत गेला, तेव्हा दैत्यराज बळीने वामनास रथात बसविले आणि स्वत: रथ ओढला, असे सांगितले जाते. म्हणून ही कृती केल्याने भगवान विष्णू योगनिद्रेचा त्याग करून जागृत होतात, विविध कार्यास प्रवृत्त होतात. म्हणजेच आपले जगाच्या पालन-पोषणाचे व रक्षणाचे कार्य सुरू करतात, असे मानले जाते. प्रबोधिनीचे पारणे फेडण्याच्या वेळी रेवती नक्षत्राचा तृतीय चरण असेल तर त्यात भोजन करू नये, असा प्रघात आहे.  पुराणपरत्वे या उत्सवाच्या विधिविधानात फरक आहे. तथापि काíतक शुक्ल ११ अथवा १२ स त्याला जागे करणे उचित असे मानतात. या उत्सवाला जोडूनच काही ठिकाणी ‘तुलसीविवाह’ करतात.

या काळात अनेक नियम करता येतात. एक वेळच जेवणे, अयाचित म्हणजे न मागता मिळेल तेवढे खाणे, मौन पाळणे, किमान जेवताना तरी मौन पाळणे, हविष्याचे पदार्थ खाणे, एखादी पोथी स्तोत्र वाचणे, रोज एखादा ठरावीक जप करणे असे अनेक नियम अनेक लोक करतात. याचा मन आणि शरीर यांना फायदा होतो. सध्याच्या काळात याची फार गरज आहे.

First Published on August 16, 2019 1:06 am

Web Title: lokprabha festival special 2019 charutmas tradition
Next Stories
1 उत्सव विशेष : उत्सवाला चला..!
2 उत्सव विशेष : उपवास म्हणजे उपासना
3 उत्सव विशेष : सणांचा आरोग्यदायी आहार
Just Now!
X