05 April 2020

News Flash

आडवाटेवरचा महाराष्ट्र : पळशी.. एक सुंदर गाव!

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात असणारे पळशी हे गाव एका दिवसाच्या सहलीसाठी अतिशय सुंदर असे ठिकाण आहे.

(संग्रहित छायाचित्र)

ओंकार वर्तले

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात असणारे पळशी हे गाव एका दिवसाच्या सहलीसाठी अतिशय सुंदर असे ठिकाण आहे. पळशीचा गढीवजा भुईकोट किल्ला, होळकरांचे दिवाण राहिलेल्या पळशीकरांचा सुंदर लाकडी वाडा, ‘राही-रखुमाई’ नावाचे विठ्ठलाचे देखणे मंदिर, हे सारे काही पळशी गावात पर्यटकांच्या स्वागतास उभे आहे. खरेतर महाराष्ट्रात खूप कमी गावे आहेत जी इतिहास तसेच गावातील वास्तुस्थापत्यासाठी ओळखली जातात. अशा गावात इतिहासाचा संपन्न वारसादेखील वास्तूंमधून पाहावयास मिळतो. त्यामुळेच या अशा गावात भटकंतीची सारी रूपे याचि देही याचि डोळा पाहायला मिळतात. या अशा मोजक्या गावांपैकीच एक गाव म्हणजे पळशी. आडवाटेवर असणारे, पर्यटकांच्या गर्दीपासून दूर असणारे आणि अस्सल ग्रामीण ढंगाचे हे गाव पाहणे म्हणजे सुरेख पर्वणीच ठरावे. त्यामुळेच एखाद्या सुट्टीच्या दिवशी सहकुटुंब कुठे जायचे असेल तर पळशी गावाचा सर्वोत्तम पर्याय तुमच्यापुढे असायलाच हवा. पारनेरपासून पळशीपर्यंत चांगला डांबरी रास्ता असल्यामुळे आणि हे गाव तालुक्यात चांगलेच प्रसिद्ध असल्यामुळे चुकण्याची शक्यता तशी कमीच. पुणे-नाशिक महामार्गावरील आळेफाटा -बेल्हे- टाकळी ढोकेश्वर – खडकवाडी माग्रे किंवा पुणे नगर महामार्गावरून शिरुर- राळेगणसिद्धी -टाकळी ढोकेश्वर या माग्रेही पळशी गाव गाठता येते.

देखणा भुईकोट

पळशी गावात पोहोचायच्या अगोदरच दुरूनच पळशीचा भक्कम असा भुईकोट किल्ला तुमचे लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही. येथे एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे पळशी गाव या भुईकोटातच वसले असल्यामुळे या भुईकोटाचा आकार तुमच्या लक्षात येईल. त्यामुळेच चहुबाजूंनी तटबंदीने वेढलेले हे गाव पाहणेच मुळी एक सुंदर आनंदयोग ठरावा. इतके हे गाव टुमदार आहे. हे गाव होळकरांचे दिवाण रामजी यादव-कांबळे पळशीकर यांचे. त्यांच्या मुलाने म्हणजेच आनंदराव पळशीकर याने पानिपतच्या रणसंग्रामात मोठा पराक्रम गाजवला. त्यामुळे त्यांना हे गाव इनाम मिळालं. मग पळशीकरांनी येथे भुईकोट, वाडा आणि मंदिराची उभारणी केली. या भुईकोटामध्ये येण्यासाठी दोन दिशांना दोन भक्कम प्रवेशद्वारे आहेत. यातला मुख्य दरवाजा हा उत्तर दिशेला असून त्या दरवाजाला भक्कम असे दोन बुरूजदेखील दिसतात. याच प्रवेशद्वारावरचे दोन शिलालेख आपली नजर खिळवून ठेवतात. यातील डाव्या बाजूचा शिलालेख पुढीलप्रमाणे-

श्री गणेशाय नम: क पळसी

चे नागरदूर्ग बांधावयास प्रारं

भ शके १७०९ प्लवंगनाम संवत्सरे

श्रवणकृष्ण १३ त्रयोदेसीस कक

सिद्ध जाले शके १७१९ पांगलनाम

संवत्सरे मार्गशीर्ष शुद्ध १३ त्रयोदसीस

हा शिलालेख देवनागरीत असल्यामुळे तो सहज वाचतादेखील येतो आणि त्याचा अर्थही लगेच कळतो. यामध्ये शके १७०९ मध्ये पळशी या गावात या गढीच्या/किल्ल्याच्या बांधकामास सुरुवात झाली त्या वेळची मराठी तिथीही दिलेली दिसते. तसेच १७१९ साली काम पूर्ण झाल्याचीही माहिती मिळते. याच प्रवेशद्वारावरील उजव्या बाजूचा शिलालेखही असा

श्री अंबाचरणी तत्पर राम

राव आपाजी निरंतर शाखा

आश्वलायन गोत्र वसिष्ठ उ

पनाम कांबळे कक वृत्ती कुळक

णि जाहागीरदार सा आंबाल

यानी काम केले कक सन १२०७

हा माहितीच्या आणि अभ्यासाच्या दृष्टीने थोडा महत्त्वाचा शिलालेख आहे. या लेखातून थोडी विस्तृत माहिती मिळते. ती म्हणजे किल्ल्याचे बांधकाम रामराव अप्पाजी कांबळे – कुलकर्णी या जहागीरदारांनी केल्याचे समजून येते. दोन्हीही शिलालेख अगदी सुस्पष्ट आहेत. फक्त यावर गावकऱ्यांनी रंगरंगोटी केलेली दिसते. हे वाचूनच आत प्रवेश करायचा. प्रवेशद्वाराला पहारेकऱ्यांच्या देवडय़ाही दिसतात. हे पाहून पुढे आलो की गावाची वस्ती दिसायला सुरुवात होते. आतमध्ये बरीच घरे आहेत. मंदिरे, बाजारपेठ दुकानेही दिसतात. पण यात सर्वात जास्त लक्ष वेधून घेते ते महादेवाचे मंदिर. मंदिराचं हे वास्तुस्थापत्य मात्र आवर्जून पाहण्यासारखंच. संपूर्ण दगडात बांधलेल्या या मंदिराचा सभामंडप म्हणजे एक आश्चर्यच आहे. गोलाकार छत असलेल्या या मंडपात एकही खांब नसावा हे खरोखरीच अद्भुत वाटते. गाभाऱ्यात सुरेख शिविपडी आहे. मंदिराच्या भिंतीतील खिडक्याही आकर्षक मांडणीच्या आहेत. हे मंदिर बहुधा पेशवाईच्याच काळात बांधले गेले असावे. या सुरेख शिल्पाचे दर्शन घेऊन आपला मोर्चा वळवावा तो पळशीकरांच्या वाडय़ाकडे.

लाकडी वाडा

महादेव मंदिराच्या जवळच पळशीकरांचा देखणा वाडा आहे. हा वाडा बहुकोटाच्या दक्षिणेस बांधलेला आहे. याच बाजूला किल्ल्याचे दक्षिणद्वार आहे. लाकडात बांधला गेलेला हा वाडा म्हणजे काष्ठशिल्पाचा अद्भुत आणि उत्कृष्ट आविष्कारच आहे. हा वाडा पूर्वी चार मजले होता असे इथले ग्रामस्थ सांगतात, पण सध्या येथे तीनच मजले दिसतात. वाडय़ाचे प्रवेशद्वार देखणे आहे. त्यानंतर पहारेकऱ्यांच्या देवडय़ाही दिसतात. या देवडय़ा पार करून डाव्या बाजूने आत गेलो की वाडय़ाचा मुख्य चौक लागतो. आणि आपण आता वाडय़ाच्या मध्यभागी असतो. चहुबाजूंनी वाडय़ाचा रंगमंच जणू काही फेर धरून आपल्याभोवती गोलाकार नाचतो की काय असेच क्षणभर वाटून जाते. ही कुशल कारागिरी आहे मात्र लाजवाबच. ती काष्ठशिल्पे पाहून आपण अक्षरश: स्तंभितच होऊन जातो. इतकं नाजूक नक्षीकाम पाहून आपल्याला त्या अनामिक कारागिरांचे कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. यातली आवर्जून उल्लेख करावी लागतील अशी शिल्पे म्हणजे अननसाच्या पानासारखी खांबावर असणारी नक्षी, अंबारीसह हत्ती देवदेवतांच्या मूर्ती, यामधली फुलांची परडी तर हॅट्स ऑफच! वाडय़ाच्या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जिनेही आहेत. वरच्या मजल्यावर जाता येते. वर गेल्यावर जाणवते की वाडा आता जीर्ण झालाय. ठिकठिकाणच्या भिंती ढासळल्यात. एवढय़ा सुंदर वास्तूची ही अवस्था पाहून वाईटही वाटते. वाडय़ाच्या खालच्या मजल्यावरचे देवघरही पाहण्यासारखे आहे. जुन्या पद्धतीचे देवघर, त्याची मांडणी, छत आणि लाकडी सजावट पाहातच राहावीशी वाटते. वाडय़ाचे मालक पळशीकर सध्या इंदूरला वास्तव्यास असतात असे कळते. पण या वाडय़ात सध्या एक कुटुंब राहते. तेच या वाडय़ाची देखभाल करते. वाडा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना ते पूर्ण सहकार्यदेखील करतात. असो, वाडय़ाची ही भटकंती आपल्याला समाधान मात्र देऊन जाते, पण वाडय़ाला संवर्धनाची गरज आहे हेही जाणवत राहते.

राही रखुमाई आणि विठ्ठल मंदिर

वाडा पाहून झाला की मग पळशीतच नव्हे तर महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या राही रखुमाई मंदिराकडे वळायचे. हे मंदिर मात्र भुईकोटाच्या बाहेर म्हणजेच दक्षिण दरवाजाच्या जवळच आहे. वाडय़ाच्या जवळूनच दक्षिण दरवाजातून या मंदिराकडे जाण्यासाठी वाट आहे. छोटय़ाशा ओढय़ाजवळील एका बंधाऱ्याजवळ हे मंदिर बांधलंय. त्यामुळे येथे बारमाही पाणी असते. दुरूनच पाण्याशेजारचं हे मंदिर आपल्याला आकर्षति करते. मंदिराला सुरेख असे प्रवेशद्वार आणि त्यावर नगारखानाही दिसतो. तसेच मंदिराला चहुबाजूंनी तटबंदीसदृश बांधकामही दिसते. तसेच या तटबंदीवर आणि नगारखान्यावर जाण्यासाठी दगडी जिनेही आहेत. मंदिराची रचना सभामंडप आणि गाभारा अशी आहे. मंदिर विलक्षण प्रेक्षणीय आहे. संपूर्ण दगडात घडवलेल्या या मंदिरांच्या भिंतीवर अनेक आकर्षक शिल्पे कोरलेली दिसतात. तसेच अनेक देवदेवतांच्या मूर्तीही येथे चितारल्या आहेत. सभामंडप हा १८ दगडी आणि नक्षीदार खांबांनी तोलून धरलेला दिसतो. हे खांब गोलाकार आणि सुंदर असून यावरचे नक्षीकामही पाहण्यासारखे आहे. गाभाऱ्यातील विठ्ठलाची मूर्ती काळ्या पाषाणात घडवलेली दिसते. ही मूर्ती कृष्णरूपातील विठ्ठलाची आहे असे अभ्यासकांचे मत आहे. कारण या मूर्तीच्या तळपट्टीवर गायीची शिल्पे कोरलेली दिसतात. तसेच विठुरायाच्या दोन्ही बाजूंना राही आणि रखुमाईच्या संगमरवरी मूर्ती बसवलेल्या दिसतात. पण या दोन्हीही मूर्ती विठ्ठलाच्या मूर्ती स्थापनेनंतरच्या कालावधीतील असाव्यात. मंदिराच्या बाहेर छोटीशी पुष्कर्णीही दिसते. या पुष्करणीत उतरण्यासाठी पायऱ्याही केलेल्या दिसतात. मंदिराच्या शेजारील बंधाऱ्याच्या पलीकडे राजघराण्यातील व्यक्तींच्या समाधी आणि मंदिरे आहेत. तिथे जाण्यासाठी पुष्करणीशेजारून वाट आहे. एकंदरीतच हे मंदिर पळशी भेटीतील सर्वोच्च बिंदू ठरावे.

खूप कमी गावांना असे वैभव वारशातून मिळाले आहे. पळशी हे देखणे गाव त्यामुळे भाग्यशाली आहे. हे गाव पाहताना आपण एका वेगळ्याच दुनियेत वावरतोय असे जाणवत राहते.

response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2020 1:22 am

Web Title: lokprabha palashi beautiful village abn 97
Next Stories
1 खेळ : मैदानावरचे तारे
2 भीती आणि स्थिती
3 करोनाइतक्याच अफवा भयंकर!
Just Now!
X