‘अकलेचे दिवाळे’ हा सलमान प्रकरणावरील मथितार्थ (२२ मे) वाचला. ह्य़ा सगळ्या प्रकरणात न्यायव्यवस्था कशी काम करते त्याचे अनेक पैलू लोकांना माहीत झाले. परंतु आपली एकूणच व्यवस्था कशी आहे याचे अनेक पैलू आहेत. जे फारसे चर्चिले जात नाहीत. सलमान नशेत होता आणि त्याने अपघातस्थळावरून पलायन केले याचे समर्थन होऊच शकत नाही, तो गुन्हाच आहे. पण असे काहीही नसतानादेखील केवळ आपल्या व्यवस्थेतल्या अनेक उणिवांमुळे अनेक गोष्टी घडत असतात. म्हणजे एखाद्या सामान्य माणसाकडून कुठल्याही नशेत नसताना केवळ रस्त्यावरील अनेक दिव्ये पार करत वाहन चालवताना असाच अपघात झाला असता तर कोण दोषी ठरणार?
रस्ते आणि वाहतूक नियंत्रण यांचा बोजवारा उडाल्यामुळे आज सामान्य वाहनचालकांना अनेक धोके रोजच चुकवावे लागतात. स्वत:ची काहीही चूक नसताना अपघात झाला तरी दोष कायम वाहनचालकालाच देण्याची प्रवृत्ती असते. काही फुटांवर पादचारी पूल किंवा झेब्रा क्रॉसिंग असताना कित्येक लोक कुठेही, कसाही रस्ता ओलांडतात. वाहन चालवताना मोबाइल फोन वापरणे हा गुन्हा आहे, पण रस्ता ओलांडताना असेच मोबाइल फोन वापरत निष्काळजीपणाने चालणे हा गुन्हा नाही. रस्ता दुभाजकाला मध्येच एखादी दुचाकी जाऊ  शकेल असे भगदाड पाडणे, त्यामधून अचानक दुचाकीधारक किंवा पादचारी दत्त म्हणून प्रकट होणे, हे गुन्हे नाहीत. पण त्यामुळे चलबिचल होऊन वाहनचालकाचा ताबा सुटला तर मात्र ते बेदरकार वर्तन! अतिशय रहदारीच्या रस्त्यालगत दुतर्फा बेकायदा वस्ती उभी राहू देणे हा गुन्हा नाही. पण त्या वस्तीमधील रस्त्यावर कुठेही पळणारी लहान मुले सुरक्षित राहतील याची दक्षता घेण्याची जबाबदारी करदात्या वाहनचालकांवर! रस्ते कसेही खणून आणि काही तरी थातूरमातूर काम करून बुजवणे हा गुन्हा नाही. पण त्यामुळे रस्त्यावर राहिलेल्या छोटय़ा-मोठय़ा दगडांवरून एखादी मोटारसायकल घसरून पादचाऱ्याला दुखापत झाली तर दोष अर्थातच दुचाकीस्वाराचा! रस्त्याच्या उलट बाजूने दुचाकी भरधाव वेगात नेणे हा गुन्हा नाही पण त्यामुळे एखाद्या चारचाकी वाहनचालकाचा गोंधळ उडून पादचाऱ्याला अपघात झाला तर दोष त्या चारचाकी वाहनचालकाचा! ही यादी कितीही लांबवता येऊ  शकते.
शहर आणि रस्ते वाहतुकीचे नियोजन ज्यांनी करायला हवे त्यांनी फक्त भ्रष्टाचार करायचा; त्यामुळे कुठल्याही नशेत नसताना जरी अपघात झाले तरी वाहनचालकाला बेदरकार म्हणायचे आणि शक्यतोवर तिथेच बाचाबाची करीत परस्पर चोप द्यायचा, अशी ही ‘व्यवस्था’ देशाच्या आर्थिक राजधानीला अजिबात शोभत नाही. पण लक्षात कोण घेतो?
प्रसाद दीक्षित, ठाणे, ई-मेलवरून

मराठी चित्रपटांचे पीक
lp08सध्या मराठी चित्रपट वारेमाप बनत आहेत. त्यांच्या निर्मितीने त्यांना चित्रपटगृह मिळणे मुश्कील झाले आहे. भरपूर चित्रपटांच्या प्रदर्शनाने कोणते चित्रपट पाहण्यास योग्य आहेत ते कळत नाही. पूर्वीसारखे थेटरच्या अभावी चांगले चित्रपट फार काळ टिकत नाहीत. प्रेक्षकांना चांगले चित्रपट पाहायला मिळत नाहीत.
सरकारी अनुदानामुळे जो उठतो तो चित्रपट काढतो. स्टँडर्डचे चित्रपट निर्माण होत नाहीत. त्यामुळे खर्चाचा पण अपव्यय होतो. काही चित्रपटांचे दर्जेदार असूनही चीज होत नाही.
एक मात्र चांगले आहे ते म्हणजे चित्रपटांच्या विषयातील विविधता, चांगल्या दर्जेदार चित्रपटांची निर्मिती होते. विषयातील तोचतोचपणा कमी होत आहे. मराठी चित्रपटातील अश्लीलतापण कमी झाली आहे.
अनुदान मिळते म्हणून चित्रपट बनवायचा हे टाळले पाहिजे, तरच प्रेक्षक चांगले चित्रपट पाहू शकतील. संख्या कमी व्हायला पाहिजे. कमी चित्रपट निर्मितीमुळे त्यांना थिएटर्सपण उपलब्ध होतील. काही वेळा प्रेक्षकाला मल्टिप्लेक्स थिएटरचा दर परवडत नाही. अशा वेळी साध्या चित्रपटगृहात त्याला चित्रपट पाहता आला तर चित्रपटाची प्रसिद्धीपण वाढेल.  टी.आर.पी. वाढेल.
चित्रपटांची संख्या कमी व्हावी व चांगल्या दर्जेदार चित्रपटाना थिएटर उपलब्ध असावे, म्हणजे सामान्य माणूस पुन्हा एकदा थिएटरकडे वळेल. दूरदर्शनची मक्तेदारी संपेल.
नंदकुमार नामजोशी, कोल्हापूर.

वाळवणासंबंधी एक आठवण
lp09दि. २९ मेच्या ‘रुचकर विशेष’ या अंकातील ‘वाळवणांचे दिवस’ हा लेख वाचून मलाही माझ्या बालपणीची एक आठवण आली.
आम्ही नवी दिल्लीतील त्या वेळच्या थॉमसन रोडवरील रेल्वेक्वार्टर्समध्ये राहत होतो. माझे त्या वेळचे वय साधारण सहा-सात वर्षांचे असावे. त्या क्वार्टर्सच्या सर्व इमारती दोन मजली होत्या सर्वात वरच्या मजल्यावर गच्ची होती. वाळवणाचा मोसम आला की इमारतीमधील स्त्रिया दुपारच्या वेळेस आपापल्या गच्चीवर जमत आणि मग सुरू होई चिकाच्या पापडय़ांचा कारखाना. दोन बिऱ्हाडांच्या मध्ये भिंतीचे पार्टिशन असे. त्या भिंतीला लागून एक चूल पेटविली जाई. तिच्यावर एका पातेल्यात पाणी उकळत ठेवले जाई. तयार करून आणलेला गव्हाचा चीक एक चमचाभर घेऊन तो एका थाळीच्या पृष्ठभागावर पातळ पसरला जाई.
मग ती चिकाची बाजू उकळत्या पाण्याच्या वर येईल अशा बेताने पातेल्यावर ठेवली जाई. अंदाजाने एक ते दोन मिनिटांनी पापडी शिजताच थाळी पातेल्यावरून काढून थंड पाण्यात (एका परातीमध्ये) ठेवून सुईच्या टोकाने ती शिजलेली पापडी एखादी बाई किंवा मुलगी अलगद काढीत असे.
आणि आम्हा मुलांकडे देत असे. आम्ही ती पापडी खाटेवर पसरलेल्या चादरीवर ठेवीत असू. कधी कधी ती पापडी सुईने काढताना फाटत असे. मग त्या बायका उदारपणे ती फाटलेली पापडी आम्हाला खायला देत असत. तीच आमची बक्षिसी.
एका चुलीवरचे काम चालू असतानाच आमचा मोर्चा कधी कधी भिंतीचे पार्टिशन ओलांडून शेजारच्या बिऱ्हाडातल्या चुलीकडेही वळायचा. दुपारभर आमचा हाच कार्यक्रम चाले. भरपूर पापडय़ा खाऊन होत.
सुधीर देवरुखकर, नालासोपारा

संग्राह्य़ रुचकर
रुचकर विशेषांक फार आवडला. विशेष म्हणजे खडीवाले वैद्य यांनी सांगितलेले ग्रीष्म ॠतूमध्ये उपयोग पडणारे पदार्थ वापरून हा कठीण काळ आनंदात घालवता येईल. शिवाय वैद्य जवळगेकर यांनी व्यक्त केल्याप्रमाणे तक्रप्राशन केल्यास सोन्याला सुगंध म्हणतात तसे खरच आहे. एकंदरीत हा अंक जपून ठेवावा असाच आहे. – चंद्रकांत लेले, भोपाळ, ई-मेलवरून.

नोंद
’    ‘लोकप्रभा’च्या १२ जूनच्या अंकातील ‘माईंड प्रोग्रॅमिंग – मन कराया प्रसन्न’ या पुस्तकाचा परिचय करून देणाऱ्या लेखात पुस्तकाचे अनुवादक म्हणून डॉ. श्रीकांत चोरघडे यांचे नाव डॉ. श्रीकांत घोरपडे असे लिहिण्यात आले आहे.  स्नेहप्रभा पिटकर, मुंबई आणि अनुराधा जामदार, भोपाळ यांनी ही बाब निदर्शनास आणून देणारी पत्रं पाठवली आहेत.
’    ‘लोकप्रभा’च्या २९ मे च्या रुचकर विशेषांकातील ‘मायक्रोवेव्ह रेसिपीज’ या लेखात खमण ढोकळा या पदार्थाच्या साहित्यामध्ये एक वाटी इनो फ्रूटसॉल्ट असा उल्लेख अनवधानाने झाला आहे. तेथे त्याऐवजी एक टेबल स्पून फ्रूटसॉल्ट असे वाचावे. नीला तांबे यांनी ही बाब निदर्शनास आणून देणारं पत्र पाठवलं आहे.    – कार्यकारी  संपादक

पेसीचं अभिनंदन
lp10मी ‘लोकप्रभा’ची नियमित वाचक आहे. करिअर विशेषांकातील ‘होणार का पेसी’ हा लेख आवडला. करिअरच्या वेगवेगळ्या वाटा दाखवताना सवरेत्कृष्टतेचा ध्यास कसा असतो अणि मेहनत व सातत्य याचे महत्त्व सांगितले, ते खूप महत्त्वाचे आहे. मुंबईतील त्या उत्कृष्ट छायाचित्रकारासारखी माणसं आजच्या काळात कमीच असतात. त्यांना मनापासून अभिवादन!
मेधा जोशी, नाशिक, ई-मेलवरून.

कायदा सर्वासाठी समान नाही
सलमानच्या निमित्ताने अकलेची लिटमस टेस्ट! (२२ मे) चिंतनीय आहे. ‘अकलेचे दिवाळे’ विनायक परब यांचा मथितार्थ वस्तुनिष्ठ आहे.
कायदा सर्वासाठी समान हे सलमान प्रकरणामुळे पटत नाही. अवघ्या २० मिनिटांत सलमानला बेल मिळतो.
जयललिताही निदरेष सुटल्या. अठरा वर्षांनंतर हाही निकाल समोर आला. जयललितांची संपत्ती जगजाहीर आहे. नटी तसेच मुख्यमंत्री म्हणून त्यांनी संपत्ती मिळवली असेल. काहीही असो न्यायालय कठोर शिक्षा देते आणि न्यायालयच पूर्णपणे निदरेषत्वही बहाल करते.
तरुणपणी दाखल केलेल्या घटस्फोटाचा निकाल म्हातारपणी, कधी कधी मेल्यावरही मिळतो. तारीख पे तारीखमुळे हे घडत असते. ही व्यवस्था भारतीय नाही, ब्रिटिशकालीन आहे. स्वतंत्र भारताला ६८ वर्षांत भारतीय न्यायव्यवस्था स्थापन करता आली नाही.
सलमानसारखे कायद्यापेक्षा मोठे लोक सत्तेतील आणि विरोधातली राजकारणी मंडळी, बँक बुडवे, देश बुडवे, काळा पैसा असलेले श्रीमंत देशद्रोही या सर्वाना या देशात कोणताही कायदा लागू असू नये. कोणताही गुन्हा करण्याची त्यांना मोकळीक असावी. अशा मोठय़ा मंडळींवर चुकून काही कारवाई झाल्यास कारवाई करणाऱ्या पोलिसांना शिक्षा करावी.
आर. के. मुधोळकर, विजयनगर, नांदेड</strong>

सल्लू मियाँ नो उल्लू बनाईंग
दि. २२ मेच्या ‘लोकप्रभा’मधील ‘सलमान’ कव्हरस्टोरी अकलेची लिटमस् टेस्ट आहे. एकंदर सलमानची केस सर्वाचेच पितळ उघडे पाडणारी आहे. भारतीय संविधानामध्ये न्यायदेवतेच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली असते. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. राजनीतीची दबंगगिरी बघून सर्वसामान्यांची तर मती गुंग होते. कोण खरे, कोण खोटे, साक्षीपुरावे खटले १३ वर्षांची केस व फक्त दोन तासांत बेल, जामीनही मंजूर होते. आपण सर्व बघतच राहणार. आता हे बजरंगी भाईजान दुबईला उड्डाण करून कधीच पसार झाले.
देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कहाँ उड गया सलमान.
– अनिल प्रल्हाद पाठक, विरार