घराची रचना नेमकी कशी असावी, दक्षिणेला दरवाजा असावा की नसावा, घरातल्या एखाद्या विशिष्ट भागात तुम्हाला अस्वस्थ का वाटत राहतं.. अशा अनेक प्रश्नांची उत्तरं भारतीय वास्तुशास्त्राने सांगितली आहेत.
आजकाल वास्तुशास्त्राचा बोलबाला सगळीकडे बराच पाहायला मिळतो. बाजारात यावर पुस्तकेही अनेक उपलब्ध आहेत. योग्यायोग्यता तपासण्याची कोणतीही यंत्रणा उपलब्ध नसल्याने कोणीही बाजारातून एखादे पुस्तक आणतो, वाचतो व सरळ वास्तुतज्ज्ञ म्हणून पाटी लावून सल्लाकार्य सुरू करतो. लगेचच स्वत:च्या नावे एक पुस्तक प्रसिद्ध करून लेखक म्हणून मिरवायला लागतो; पण त्यामुळे प्रत्येकाचे स्वतंत्र वास्तुशास्त्र निर्माण झाल्याने अनेकांना प्रश्न पडतो की, हा खरा की तो खरा? अर्थातच गोंधळ निर्माण झाल्याने या शास्त्रावर टीकाही होणे साहजिकच!
गुरुवर्य य. न. मग्गीरवार यांनी मला वास्तुशास्त्राच्या अभ्यासाला लावले. त्यांनी सुरुवातीलाच तंबी दिली की, आजकालची पुस्तके वाचू नका. एवढेच नव्हे, तर त्यांनी त्यातली पूर्वीच्या काळची वाचायला हवीत अशी बरीचशी पुस्तके मिळवून दिली. आज लक्षात येते की, आजकालच्या वास्तुपुस्तकांत व जुन्या मूळच्या ग्रंथांत किती फरक आहे तो! वास्तुशास्त्र शिकविताना सुरुवातीलाच सांगतो की, अलीकडच्या शे-दीडशे वर्षांतील वास्तुशास्त्राचे एकही पुस्तक पाहायचे नाही. मुळातलेच ग्रंथ पाहू या, कारण अलीकडच्या वास्तुपुस्तकांत असलेला अंतर्वरिोध जुन्या ग्रंथात नाही. बरे हे हजारो वर्षांपूर्वीचे ग्रंथ आजही उपयोगाचे कसे आहेत हे आजकालच्या बांधकामांच्या जमवलेल्या जवळपास १४०० स्लाइड्सवरून हे सर्व विषय विशद करतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अर्थातच ते आजही लागू पडतात.
या लेखातील मुद्दे या अशा मूळच्या ग्रंथांच्या आधारे आहेत. त्या अलीकडच्या वास्तुसल्लागारांना पटणाऱ्या नसतील. या मूळ ग्रंथांतून वास्तुपुरुषमंडल नावाचा एक प्रकार आहे. अलीकडच्या वास्तुपुस्तकांतून याचा उल्लेखही नसायचा. तो त्यांनी नंतरच्या आवृत्त्यांमधून केलेला आढळतो. त्या वास्तुपुरुषमंडलामध्ये जी देवतांची स्थाने आहेत त्या स्थानांशी त्या त्या ‘देवतांस्वरूप असलेल्या ऊर्जाचा’ विचार करावा लागतो आणि त्या देवतांचा अभ्यास करण्यासाठी वेद, उपनिषदे व पुराणांचाही अभ्यास करावा लागतो. या प्रकारे केलेल्या सखोल अभ्यासाचा पुरेपूर अनुभव येतो.
कठोपनिषद हे एक असे उपनिषद आहे ज्यामध्ये नचिकेताला प्रत्यक्ष भगवान यमराजाने मृत्यूचे रहस्य सांगताना पृथ्वीतलावरील मानवाला कल्याण करून घेण्याचा व समाधानाचा एक खूप छान मंत्र दिलेला आहे.
श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेत
स्तौ सम्परीत्य विविनक्ती धीर:।
श्रेयो हि धीरोऽभि प्रेयसो वृणीते
प्रेयो मन्दो योगक्षेमाद वृणीते॥
सर्व भारतीय तत्त्वज्ञान हे श्रेयस (म्हणजे हितकारक) काय असेल त्याला महत्त्व देते. तुम्हाला ते आवडेल की नाही, हा प्रश्न नाही. तुमच्या हिताचे, कल्याणाचे जे असेल तेच अट्टहासाने सांगते. आयुर्वेदाचे नियम किंवा अनेक धार्मिक गोष्टी पाहाल, तर कळेल. तर आजचे आधुनिक विज्ञान प्रेयस (म्हणजे सुखकारक) काय असेल ते सांगते. इथे तुमच्यासाठी ते चांगले आहे की नाही हे तुम्ही पाहायचे! म्हणजे केवळ चांगले दिसणे (म्हणजे सुखकारक) याला आपल्याकडे दुसरा क्रमांक आहे. पहिल्या क्रमांकावर ते आपल्यासाठी कल्याणप्रद आहे की नाही हे आहे.
वास्तुशास्त्रातील दिशा  वास्तुशास्त्रामध्ये दिशांना महत्त्व खूप आहे. शंकू व त्याच्या सावलीवरून दिशा पाहण्याचे तंत्र वास्तुग्रंथांमधून दिसते. ती पद्धत काहीशी किचकट व वेळखाऊ आहे. मात्र आजकाल बाजारात मिळणाऱ्या कंपास अर्थात होकायंत्राने हे सहज पाहता येते. मुख्य प्रश्न असतो ती दिशा कशी पाहायची. वास्तुग्रंथातून याचे सरळ उत्तर येते. ‘गेहान्निर्गमतो..’ घरातून बाहेर पडताना दिसेल ती दिशा. दरवाजाच्या आत (खरे तर मध्यस्थानात) उभे राहून बाहेर पाहा. ती दिशा आपल्या घराची अर्थात दरवाजाचीही!
दक्षिणेचा दरवाजा
दक्षिणेचा दरवाजा चालत नाही. खूप संकटे येतात, असा पूर्वापार चालत आलेला (गर)समज. थेट घर बदलायचाच सल्ला दिला जातो. घरात जरा काही अशुभ घडले, की या दक्षिण दरवाजामुळेच, अशी दहशत बसविली गेली होती; पण जुन्या कोणत्याही ग्रंथांमधून दक्षिण दरवाजाचा निषेध दूरान्वयानेही केलेला नाही. लोकांच्या मनातील असे वास्तुशास्त्राबद्दलचे गरसमज दूर करण्यासाठी गावोगावी शेकडो व्याख्याने दिली. सुरुवातीला लोकांनी विचारले, ‘तुमच्या घराचा दरवाजा कोणत्या दिशेचा?’ तेव्हा तो दक्षिणेचा नव्हता. मनात आले, लोकांना आपण मोठमोठय़ाने सांगतोय; पण स्वत:च अनुभव का घेऊ नये? माझ्या फ्लॅटला असा दरवाजा करण्यासारखी स्थिती होती. म्हणून आत्ता जिथे राहतो त्या घराला मूळचा नसलेला असा दक्षिणेला तो करून घेतला! मग काही तथाकथित तज्ज्ञांचे मत पडले की, दक्षिण दरवाजा हा सुरुवातीची सात-आठ वष्रे खूप चांगला असतो, नंतर मात्र तो खूप उतरती कळा देतो. दक्षिण दरवाजाच्या या घरात आता १४ वष्रे पूर्ण झाली. भारतीय स्टेट बँकेत जेमतेम २३ वष्रे नोकरी झाली असताना स्वेच्छानिवृत्ती घेऊनही आता याच घरात सात-आठ वष्रे झाली. असा कोणताही वाईट अनुभव नाही. उलट जे काही मिळाले त्यात आम्ही सगळे खूप समाधानी आहोत.
दक्षिण दरवाजा चालत असल्याचे अनेक श्लोक या मूळ ग्रंथांतले देऊ शकतो. त्यातली खरी मेख अशी आहे की, ज्यांना वास्तुशास्त्राचे बाकी सखोल ज्ञान नसते, ते फक्त दरवाजापाशीच अडकून पडतात आणि वास्तुशास्त्रामध्ये दरवाजाशिवाय पाहण्याच्या बाकी किती तरी गोष्टी असतात.
वास्तुशास्त्रामध्ये कोणत्या वस्तू वा सुविधा घरात कोठे असाव्यात, हे सर्वसामान्यांना ढोबळमानाने पाहण्यासाठी खालील दोन आकृत्या उपयोगी ठरतील.

(वरील आकृती क्र. १ पाहणे)
वरील आकृती क्रमांक १ मध्ये घराच्या दिशांनुसार वायव्य ते आग्नेय अशी एक तुटक रेघ आखलेली आहे. त्यामुळे या आकृतीचे दोन त्रिकोणांत रूपांतर होते आहे. जो ईशान्येकडील त्रिकोण आहे त्याला आमच्या भाषेत चार्जिग युनिट (charging unit) म्हणतात. या विभागात मानवी शरीराला पोषक अशा गोष्टींची रचना करायची असते. सर्व प्रकारचे मानसिक आणि शारीरिक सेवन (physical or mental in-take) या प्रभागात अपेक्षित असतो. म्हणजे जेवण बनविणे, जेवणे, वाचन, मनन, चिंतन, व्यायाम, प्राणायाम, ध्यानधारणा, अभ्यास इ. गोष्टी या ईशान्येकडील प्रभागात करता आल्या तर उत्तम असते.
दुसरा जो नर्ऋत्येकडील भाग येतो त्याला आम्ही डिस्चार्जिग युनिट (discharging unit) म्हणतो. या प्रभागात ईशान्येच्या विरुद्ध म्हणजे टाकण्यासारख्या, डिस्चार्ज झाल्याने बरे वाटेल अशा व्यवस्था आणायच्या असतात. जसे की, घरातील स्वच्छतागृह, बाथरूम, झोपण्याची व्यवस्था, अडगळीची खोली इ. या प्रभागात अभ्यासिकेचा फारसा उपयोग होत नसतो.
दुसरी पद्धत आहे ती पंचमहाभूतांप्रमाणे. भारतीय तत्त्वज्ञानाचा मूळ पायाच आहे की संपूर्ण चराचर सृष्टी ही पंचमहाभूतांपासून बनलेली आहे. अशी पंचमहाभूतात्मक मांडणी वास्तुशास्त्रातही आहे. पुढील आकृती क्र. २ वरून ते आपल्या लक्षात येईल.

(वरील आकृती क्र. २ पाहणे)
वरील आकृतीमध्ये एकूण पाच प्रभाग येतात. यांची थोडीफार माहिती घेतली तरी सर्वसामान्यांना त्याची प्रचीती घेता येईल.
१) ईशान्य भाग : ईशान्य भागाकडील या प्रभागात देवघर असावे. या भागात अभ्यास, वाचन, मनन, चिंतन, प्राणायाम, ध्यानधारणा इ. अवश्य करावी. देवघर येथे घेणे शक्य नसेल तर निदान जपजाप्य, पोथीवाचन, ध्यान इ.गोष्टींसाठी येथे यावे. त्याचा निश्चित फायदा होतो. घरातील पिण्याच्या पाण्याचा साठा येथे उत्तम. तो शक्य नसेल तर एखादे कारंजे, इनडोअर फाऊंटन किंवा फिश टँक इ. माध्यमातून पाण्याचा लहानमोठा साठा असेल अशी व्यवस्था येथे करणे फार उत्तम असते. घरात जितका वेळ आपण असू त्यातील जास्तीत जास्त वेळ या प्रभागात थांबण्याविषयी आम्ही आग्रह करीत असतो. कारण हा प्रभाग सर्वात जास्त शुभऊर्जावान असल्याने शुभफलदायी आहे. काही जण येथे घराचा मुख्य दरवाजा कोपऱ्यात घ्यायला सुचवितात. पण मूळ ग्रंथांप्रमाणे ते चूक आहे.
२) आग्नेय प्रभाग : आग्नेयेमध्ये स्वयंपाकघर असावे याबद्दल कोणाचे दुमत नाही. बडोद्याच्या ओरिएंटल इन्स्टिटय़ूटने प्रकाशित केलेल्या ‘अपराजित पृच्छा:’ या ग्रंथाच्या प्रस्तावनेत १९५० च्या दशकातले एक ज्येष्ठ इंजिनीअर पी. ए. मंकड यांनी या आग्नेयेतील स्वयंपाकघराबद्दल खूप छान मुद्दे दिले आहेत. इन्फ्रा रेड किरणांचा फायदा घरातील महिलांना मिळावा अशी कदाचित सोय असल्याचे त्यांनी त्यात पटवून दिले आहे. आग्नेयेमध्ये स्वयंपाकघराशिवाय लहान मुलांची (ब्रह्मचारी) झोपण्याची व्यवस्था करणे हे त्यांच्या शरीरसंपदा व बौद्धिक संपदा वाढविण्याच्या दृष्टीने खूप उपयुक्त ठरते. तसेच शारीरिक व्यायामासाठीही हा भाग चांगला असतो.
३) नैर्ऋत्य प्रभाग : घरातील मुख्य माणसाची झोपण्याची व्यवस्था ही या प्रभागात करावी असे आहे. खरे तर दक्षिण नैर्ऋत्य भागात बेडरूम असावी. ही मुख्य माणसाची झोपण्याची व्यवस्था याचा अर्थ व्यावसायिक ठिकाणीही मुख्य माणसाची बसण्याची जागा असा अर्थ सर्रास सगळे घेतात. मूळ वास्तुशास्त्र व वास्तुपुरुषमंडल नीट अभ्यासले तर हे चूक असल्याचे दिसते.
घरात मुख्य माणसाची झोपण्याची व्यवस्था म्हणजे ती जोडप्याची आहे. ही व्यवस्था करताना त्या दोघांमधील एकोपा कसा राहील हे पाहणेच फार महत्त्वाचे असते. नवरा-बायकोंमधील वाद कमी करण्यासाठी बेडरूम करेक्शनवर भर देणे फार आवश्यक असते. यासाठी येथे अनेक नियम सांगितले गेले आहेत.
४) वायव्य प्रभाग : घराच्या या विभागात पाहुण्यांची खोली, घरातील उपवधूंची खोली, कारखान्यातील पक्का माल इ. व्यवस्था करता येते. पश्चिम-वायव्येला शौचकूप व्यवस्थाही उत्तम ठरते.
५) मध्य भाग : घराचा हा भाग शक्यतो बांधकामविरहित असणे सर्वोत्तम असते. पण आजकालच्या फ्लॅट संस्कृतीमध्ये असे शक्य नसते. त्यातल्या त्यात हा भाग व ईशान्य भाग येथे अडगळ वा जड सामान असू नये. नुसते एवढे जरी पाळले तरी खूप काही साध्य होते.
 जिओपॅथिक स्ट्रेस व आधुनिक साधने वास्तुशास्त्राच्या ऊर्जा आणि आधुनिक वास्तुशास्त्राचा अभ्यास एकत्रितपणे करणे अतिशय आवश्यक आहे. १९५० ते १९६० दरम्यान हर्टमन या शास्त्रज्ञाने शोध लावला. जमिनीच्या पृष्ठभागावरती आणि जमिनीच्या विशिष्ट खोलीपर्यंत नसíगकरीत्या आपोआप त्या त्या विभागानुसार इलेक्ट्रो-मॅग्नेटिक वॉल किंवा ट्रीज तयार होतात. हे इलेक्ट्रो-मॅग्नेटिक वॉल किंवा लाइन यांच्यामधून एक विशिष्ट प्रकारचे करंट पास होतात. १९५० ते १९६० मध्ये तेच सांगितले जे आमच्याकडे हजारो वर्षांपूर्वी सांगितले. आमच्या वास्तुपुरुष मंडलात वर्णन केलेल्या शिरा किंवा नाडी यांच्यामध्ये ऊर्जेचे प्रवाह असतात ते बाधित होता कामा नये, असे सांगितले आहे. आपल्याकडे मर्मस्थाने सांगितली या ठिकाणी त्यांनी ‘हर्टमन नॉट’ सांगितली. ज्या ज्या ठिकाणी मर्मस्थाने आहेत त्या त्या ठिकाणी हर्टमनची नॉट आलेली आहे.
दुसरा जो भाग आहे तो महानाडय़ा, अतिसंवेदनशील नाडय़ा ज्या तिरप्या जातात त्यांच्या ऊर्जा काही तरी वेगळ्या प्रकारच्या आहेत. सन १९६० ते १९७०च्या दरम्यान करी या शास्त्रज्ञाने करी लॉ दिला आणि या नाडय़ा पूर्व दिशेला ४५० डिग्रीमध्ये जमिनीवरती आपोआप निर्माण होतात आणि त्या दोघांमध्ये ते जे अंतर आहे ते एकसारखेच राहते, म्हणजे दोन नाडय़ांमधील अंतर हे एकसारखे राहून त्या नाडय़ा इलेक्ट्रो-मॅग्नेटिक लाइन आपोआप नसíगकरीत्या तयार करतात, हा नियम करी शास्त्रज्ञ सांगतो. म्हणजे हार्टमननी सांगितलेला नियम हा मुख्य दिशेला समांतर तर करीने सांगितलेला नियम उपदिशेला समांतर पद्धतीचा. वास्तुशास्त्रातील वास्तुपुरुष मंडलामध्ये आम्हाला याच गोष्टी पाहायला मिळतात.
आताच्या जगात कमीतकमी जागेवर उंच उंच इमारती बांधून अनेक फ्लॅटस्ची रचना करण्यात येते. वास्तुशास्त्रानुसार रचना देणे प्रत्येक फ्लॅटला अशक्य झाले आहे. परंतु हेच उपाय बिल्डरच्या मदतीने संपूर्ण प्लॉटलाच वास्तुपुरुष मंडल आखून त्या जमिनीलाच जर दिले तर त्या संपूर्ण स्कीमलाच त्याचा फायदा होतो. मुळात वास्तुशास्त्राला मर्यादा आहेत. त्यातही फ्लॅट सिस्टीममध्ये तर त्या खूपच येतात.
वास्तुशास्त्राची निर्मिती झाली तीच मुळी मनुष्याच्या कल्याणासाठी. आजकाल प्रत्येकाला मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य हवे असते. आजकाल अनेकांकडे अमाप पसा आहे परंतु मानसिक स्वास्थ्य नाही. तसेच बहुतांश घरांमधून शारीरिक स्वास्थ्य हरवले गेले आहे. दुर्बलता आलेली आहे.
वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे शल्य किंवा हाडे ही ५-१० फूट जमीन खोदून त्यातून काढून टाकणं हे कदाचित शक्य असते, परंतु त्याही खाली दोन-दोन हजार फुटांपर्यंत ज्या निरनिराळ्या प्रकारच्या पोकळ्या तयार झालेल्या असतात. त्या पोकळ्यांमधून अनेक प्रकारचे वायू वाहत असतात. या वायूबरोबर अनेक प्रकारचे घातक रेज हे जमिनीच्या स्तरांच्या वरती येत असतात. त्यांना आजकाल नॉक्शियस रेज या नावाने संबोधले जाते. हे माणसांच्या शरीराच्या सान्निध्यात आले की, त्यांना विशिष्ट व दुर्धर असे आजार होतात. हे नेमके काय आहे यांचा शोध जिऑपॅथॉलॉजीमध्ये जियोस्ट्रेस किंवा जिओपॅथिक स्ट्रेस या नावाने केला जातो. हा जिओपॅथिक स्ट्रेस एकाच ठिकाणी नसतो तर त्याच्या अनेक वाहिन्या असतात. त्याला आम्ही जीएस वाहिन्या वा जीएस लाइन असे म्हणतो. सर्वात जास्त त्रासदायक ठरणारा जीएस म्हणजे पाण्याचे प्रवाह. कॅन्सरचे एकूण प्रमाण तपासले असता त्यांच्यापकी ८० टक्के लोकांना वास्तूतील अशा जीएसमुळे तो झाल्याचे पाश्चात्त्य जगात संशोधनाअंती दिसून आलेले आहे. हा जीएस जसा जसा भूगर्भातून भूभागावर (भूपृष्ठावर) येऊ लागतो तसा मनुष्याला त्यांचा त्रास होऊ लागतो. त्याचा पहिला आघात हा आमच्या नव्‍‌र्हस सिस्टीमवर होत असतो. त्यातून आम्हाला अस्वस्थता, नराश्य, मानसिक ताण या गोष्टी व्हायला लागतात. हा त्रास जसजसा वाढत जाईल तसतसे अनेक रोगांना बळी पडण्याच्या शक्यता वाढू लागतात. या जीएसचा मुख्य भाग म्हणजे या लाइन्स जिथे असतात त्याच भागावर त्यांचा परिणाम होतो. आजूबाजूला नाही. ज्या ठिकाणी जीएस लाइन आहेत त्याच भागामध्ये त्याचा परिणाम पाहायला मिळतो. त्यापासून दोन फूट जरी बाजूला झालो तरी तो त्रास दिसत नाही. त्यामुळे भूमीपरीक्षण आणि भूलक्षण या वास्तुशास्त्रातील प्रकारांबरोबरच या पद्धतीनेसुद्धा जमिनीचे परीक्षण करणे आजकाल गरजेचे झालेले आहे. तुमचा फ्लॅट कोणत्याही मजल्यावर असो, जर त्या जमिनीमध्ये जीएस असेल तर त्याचा परिणाम व्हर्टकिली अपवर्ड होत होत वपर्यंत जातो. त्याचा अभ्यास तळमजल्यावरूनही करता येतो आणि नवव्या-दहाव्या मजल्यावरूनही करता येतो.

भिंतीवरचा टीव्ही सांगतो तुमचा स्वभाव
वास्तुशास्त्राप्रमाणे सल्ला देताना हॉल म्हणजे बठक व्यवस्था किंवा दिवाणखान्याची व्यवस्था कशी असली पाहिजे यावर आजकाल फार काही सखोल सांगावे लागत नाही. मूळच्या वास्तुशास्त्रात नसलेली एकच गोष्ट वास्तुशास्त्राचे इतर नियम लक्षात घेऊन ठेवली की सगळे कामच होऊन जाते. ती वस्तू म्हणजे टीव्ही! त्याचे काही गमतीशीर असे खास अनुभव आहेत.
आपल्या घरातला टी व्ही ‘ज्या दिशेच्या िभतीवर’ आहे यावरून त्या टीव्हीवर साधारणपणे कोणते चॅनेल्स जास्त करून चालू असतील याचा अंदाज घेता येतो. अगदीच वीस-पंचवीस मिनिटे चालू असेल तर अनुभव येणार नाही. पण घरातील जे सदस्य जास्त वेळ पाहात असतील त्यांच्या बाबतीत हे अनुभव येतील. म्हणजे तुमचा टीव्ही जर दिवसाकाठी ३-४ तास चालत असेल तर त्यातील निम्म्यापेक्षा जास्त वेळ जी चॅनेल चालू असतील त्याची जंत्री पुढे देत आहे. पाहा गंमत आणि कळवा जे काही वाटले ते. जाहीर व्याख्यानातून सुमारे ६०-७० टक्के लोक याला संमती देतात.
पूर्व : या दिशेवरच्या टीव्हीवर मुख्यत्वे करून अभ्यास, खेळ, बातम्या असे ज्ञानवर्धक कार्यक्रम चालू असतात. आस्था, संस्कार इ. योग, प्राणायाम शिकविणारी चॅनेल्स तसेच आजतक, झी न्यूज, बीबीसी न्यूज, इ. सर्व बातम्यांची चॅनेल्स, तसेच निखळ खेळ असलेले उदा. – स्टार स्पोर्ट्स, टेन स्पोर्ट्स इत्यादी. ज्ञान देणारे चॅनेल्स उदा.- डिस्कव्हरी, अ‍ॅनिमल प्लॅनेट, नॅशनल जिओग्राफिक इत्यादी.  निरनिराळी भाषणे, अनेक चर्चासत्रे इ. सर्व कार्यक्रम पाहून त्यातले फक्त चांगले घेऊन बाकी मनोरंजन म्हणून घेण्याची वृत्ती घरात असते. टीव्ही लावण्यावर स्वयंनियंत्रण असते.
आग्नेय : या घरात एरव्हीही वादविवादाचे प्रसंग जास्त असतात. कोणाचे ना कोणाचे डोके सतत गरम असते. व्यायामाचे कार्यक्रम प्राधान्याने पाहिले जातात. त्यातही थोडे भडक खेळ. स्टार स्पोर्ट्स, टेन स्पोर्ट्स इ. खेळाची चॅनेल्स. विशेषत: भयंकर हाणामारीचे कार्यक्रम. जसे अस्मिता, सीआयडी, क्राइम पेट्रोल, डब्ल्यूडब्ल्यूई ( CID, Crime Petrol, WWE). या घरात टीव्हीवरचे कार्यक्रम पाहून सगळे सोडून दिले जात नाही. अहंकार जोपासण्याची व उघड उघड राग व्यक्त करण्याची तयारी होते. प्रत्यक्ष करतील किंवा नाही ते अन्य घटकांवर अवलंबून असते. कार्यक्रमाबाबतच्या चर्चा या एकमेकांच्या ‘घराण्याच्या उद्धारा’पर्यंत जातात.
दक्षिण : सासू-सुनांचे कार्यक्रम वा तत्सम अतिभडक व फिल्मी स्टाइलचे (जे कधी व्यवहारात येऊ शकणार नाही) असे कार्यक्रम सतत चालू असतात, ज्यामध्ये नात्यातील गांभीर्याचा अभाव आहे व हळुवारपणापेक्षा सूड, खुन्नस यावर भर आहे असे कार्यक्रम चालू असतात. या कार्यक्रमात फार गुंतून जातात. त्याचा स्वत:वरही परिणाम करून घेतात. एखादा एपिसोड बुडाला तरी खूप काही गमावले अशी भावना होते. या घरात काही काळानंतर ‘भानगडी, लफडे याशिवाय आयुष्य असू शकते’ यावरचा विश्वास उडू लागतो. त्यातील पात्रांचे आयुष्य आपल्याशी जोडत जोडतच कार्यक्रमाबाबतच्या चर्चा वेगळ्याच रंगाने रंगतात.
नर्ऋत्य : दक्षिणेप्रमाणेच याही दिशेची स्थिती असते. त्यापेक्षा गांभीर्य जास्त असते. भीतिदायक कार्यक्रम पाहण्यावर भर असतो. उदा.- फिअर फाइल्स इ. तसेच इंग्रजीतली भडक, भयानक आणि हाणामारीची, कोणतेही चांगले संस्कार नसलेली व अवास्तव असेही कार्यक्रम पाहिले जातात. त्या नकली हिरो/ हिरॉईनमध्ये स्वत:ला पाहतात आणि चांगल्या वाईटाचे विधिनिषेध राहिले नाही तर हातून गंभीर चुका होऊ शकतात. घरात दक्षिण वा नर्ऋत्य दिशेच्या िभतीवर टीव्ही असेल तर माणसांच्या हातात टीव्ही राहात नाही तर घरातली माणसे टीव्हीच्या अधीन होतात. टीव्हीवरील कार्यक्रमाप्रमाणे आपले वेळापत्रक बदलतात.
पश्चिम : या दिशेवरचा टीव्ही खूप वेळ चालू राहतो. बाहेर जाताना बंद करायचा हमखास राहून जातो. गंमत म्हणजे टीव्ही चालू असला तरी समोरचा बसलेला माणूस टीव्हीच पाहात असेल असे नाही. आवडीचाच कार्यक्रम लागला असेल असेही नाही. वेळ वाया घालविणारे चॅनेल्स उदा.- कार्टून फिल्म्स्, पोगो, कार्टून नेटवर्क, डिस्ने इत्यादी. मनोरंजन असावे पण किती वेळ? मोठी माणसेही अशा चॅनेल्समध्ये रमलेली असतात! कॉमेडी नाइटसारखे विनोदी कार्यक्रमही चालू असतात. कार्यक्रमाबाबतच्या चर्चा केल्या नाही तर आपण मागासलेले आहोत की काय अशी भावना होत असते. कालच्या मुद्दय़ावरून आजची चर्चा चालू होते. अगदीच काही नाही तर ‘टीव्हीवरचे कार्यक्रम कसे बघण्यासारखे नाहीत’ यावर तासन्तास चर्चा चालते! हो. पण तरीही टीव्ही चालूच असतो!!
वायव्य : सतत चॅनेल्स बदलणे हे लहान मुलांचे बाबतीत समजू शकतो. पण या टीव्हीसमोर कोणीही बसा-टीव्हीपेक्षा टीव्हीचा रिमोट जास्त वेळ चालतो! चॅनेल कोणतेही असोत पण कार्यक्रम मात्र ट्रॅव्हलइंडिया, भटकंती असे प्रवासाचे, कम्युनिकेशन वा मार्केटिंग स्कील वाढविणारे कार्यक्रम, शॉपिंग चॅनेल्स इ. चर्चा करायच्या म्हटल्या तरी त्या अर्धवट राहणार. अर्धवट राहिल्या तरी विशेष फरक नाही. कारण त्यामुळे आयुष्य बिघडत नाही हा विश्वास!
उत्तर : मुख्यत: शेअर बाजाराशी संबंधित चॅनेल्स उदा.- सीएनबीसी आवाज, एनडीटीव्ही प्रॉफिट इ. किंवा सगळ्या जगाची इकॉनॉमी सांगणारे कार्यक्रम. ज्ञान देणारे उदा.- डिस्कव्हरी, अ‍ॅनिमल प्लॅनेट, नॅशनल जिओग्राफिक इत्यादी. तसेच सर्व प्रकारची न्यूज चॅनेल्स. कम्युनिकेशन वा मार्केटिंग स्कील वाढविणारे कार्यक्रम, शॉपिंग चॅनेल्स इ. नोकरी-व्यवसायाचे शिक्षण देणारे. उगाचच प्रेमबिम असल्या गोष्टी फारशा पाहिल्या जात नाहीत. प्रत्येक गोष्टीचे ‘मोल’ माहीत असल्याने ‘कार्यक्रम पाहायला आधी वेळ घालवा आणि पुन्हा त्यावरच चच्रेतही वेळ घालवा. हे तोटय़ाचे गणित आहे’ यावर ठाम विश्वास असतो.
ईशान्य : आस्था, संस्कार असे चॅनेल्स. ज्ञान देणारे उदा.- डिस्कव्हरी सायन्स, अ‍ॅनिमल प्लॅनेट, नॅशनल जिओग्राफिक इत्यादी. निरनिराळी भाषणे, चर्चासत्रे इ. कार्यक्रम विशेषत: धार्मिक व सामाजिक स्वरूपाची. निखळ विनोदी कार्यक्रम. या िभतीवरचा टीव्ही गरजेपुरताच लावला जातो. घरातले लोक स्वत:वर संयम ठेवू शकतात. जे चांगले पाहिले त्यावर घरात आपापसात चर्चासत्रे चालतात. आदानप्रदान छान चालू असते. एखाद्या दिवशी टीव्ही नाही पाहिला तर बिघडत नाही यावर विश्वास असणारे लोक!
एकंदरीत काय तर टीव्हीची सत्ता आपल्यावर चालवू न देता आपली सत्ता टीव्हीवर चालवायची असेल तर तो उत्तर, ईशान्य किंवा पूर्व भिंतीवर लावा व पाहा काय फरक होतो तो. आपण टीव्हीसाठी नाही तर टीव्ही आपल्यासाठी आहे हे समजेल व आयुष्यातील बराचसा काळ सत्कारणी लावता येईल.


आपआपल्या घरांमध्ये सहज जरी पाहिले तर लक्षात येईल की एखाद्या विशिष्ट जागी आपल्याला बसवत नाही. तिथे उगाच अस्वस्थ वाटायला लागते. एखादा कुत्रा विशिष्ट जागेत बांधला तर तो विचित्र ओरडतो आणि बाजूला जायला मागतो. बेडवेटिंग हा जीएस समजण्याचा चांगला असा मार्ग आहे. लहान मुलांच्या बाबतीत असे प्रकार क्षणभर बाजूला ठेवू शकतो. परंतु जेव्हा मोठय़ांनासुद्धा बेडवेटिंग व्हायला लागते तेव्हा तिथे खाली जीएस असल्याचे ते एक मोठे लक्षण समजले जाते.
 या गोष्टी आधुनिक तंत्रज्ञानाने मोजता आल्या पाहिजे. त्यासाठीची यंत्रे पुढीलप्रमाणे –
१) पेन्डय़ुलम – पेन्डय़ुलम म्हणजे लोलक. डाऊिझग या नावाने प्रचलित असलेले हे तंत्र जुनेच असले तरी यावर पाश्चात्त्य जगतात अनेक प्रयोग झालेले आहेत. अत्यंत साधे, सोपे व कोणालाही थोडय़ा सरावाने जमू शकेल असे हे तंत्र आहे. पुढील सर्वच यंत्रांचे मूळ काय असेल तर तो लोलक.
२) एल रॉड – हा लोलकाचाच दुसरा प्रकार आहे. याच्या साहाय्याने शेतातील पाणी शोधणे सोपे जाते. तसेच जीएस लाइनही शोधता येते.
३) लिकर अँटिना – यांच्या साहाय्याने जीएसची अगोदरची ताकद आणि नंतरची ताकद व्यवस्थित मोजता येते. त्याशिवाय निगेटिव्ह व पॉझिटिव्ह अशा शक्तीचा माग काढता येतो. हे एक उत्तम असे डाऊिझगचे प्रगत यंत्र आहे.
४) ईएम मीटर – इलेक्ट्रो-मॅग्नेटिक मीटर- अशा स्वरूपाचे हे यंत्र कुठेही नुसते ऑन केले तरी त्या विभागात जीएस किती आहे ते डिजिटल स्वरूपात समजते.
५) के टू (ङ2) – मोबाइल टॉवर किंवा हाय टेन्शन वायर यांच्यामुळे आतमध्ये होणारे घातक परिणाम हे मनुष्याला त्रासदायक ठरतात. ते शोधण्याचे काम हे यंत्र करते.
६) स्पिऑन – या यंत्रातून ऑडिओ ग्रॉफ मिळतो. या ग्राफवरून कोणत्या दिशेला किती तीव्रतेचा हा त्रास आहे हे समजते. या यंत्रामुळे घरातल्या अन्य शक्तींचा अभ्यास सहजच करता येतो.
७) लेझर हंटर- एकाच जागी उभा राहून आपल्यासमोर मागे, खाली, वरती एखाद्या पोकळीत असलेली जीएसची तीव्रता यांच्या साहाय्याने मोजता येते. त्या पोकळीत असलेल्या वायूचे तापमानसुद्धा या यंत्राद्वारे मोजता येते. तुमच्या शरीराचीही उष्णता अभ्यासता येते.
८) ई स्मॉग मीटर – यांच्या साहाय्याने मॅग्नेटिक, इलेक्ट्रिक व टेल्युरिक अशा तीनही शक्तींचा मागोवा घेता येतो.
९) युनिव्हर्सल स्कॅनर – भारताच्या अणुशक्ती विभागातून निवृत्त झालेल्या मूर्ती यांनी शोधलेले हे यंत्र. अन्य सर्व यंत्रांपेक्षा या यंत्राने वरील गोष्टी सहज शोधता येतात. या यंत्राचे व्यक्तिगत असे अन्यही अनेक उपयोग आहेत.
या सर्व यंत्रांच्या बाबतीत एक अडचण अशी आहे की, ही बहुतेक यंत्रे आयात करावी लागतात. त्यांच्या किमती फार असतात. शिवाय त्याच्या अनुषंगाने करावे लागणारे वास्तुउपायही खूप खर्चीक ठरतात. त्यातील अनेक वस्तूसुद्धा आयात कराव्या लागतात.
 भारतातील मूळच्या अशा वास्तुशास्त्रावरील ग्रंथांचा अभ्यास व अनेक आधुनिक यंत्रांचा प्रत्यक्ष वापर केल्यानंतर असे ठामपणे सांगू शकतो की, आपल्या जुन्या ऋषीपरंपरेतील उपाय हे कमी खर्चाचे असू शकतात. तसेच ते चांगले परिणामदायीही ठरतात.
एकंदरीत मानसिक शांती आणि शारीरिक स्वास्थ्य हवे असेल तर आपल्याला प्राचीन वास्तुशास्त्राचा आणि त्यासंबंधीच्या अनेक तंत्रज्ञानाचा अभ्यास करणे गरजेचे आहे.

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lokprabha special article on indian architecture
First published on: 26-12-2014 at 01:55 IST