नव्याने झालेल्या पुनर्रचनेमध्ये ठाणे जिल्ह्य़ात लोकसभेच्या चार, तर विधानसभेच्या एकूण २४ मतदारसंघांची निर्मिती झाली आहे. मुंबई, ठाण्यात मिळून लोकसभेच्या दहा तर विधानसभेच्या ६० जागा मोडतात. त्यामुळे या परिसराला राज्याच्या राजकारणात एक वेगळे महत्त्व आहे. तसे पाहिले तर मतदारसंघांची ही पुनर्रचना शिवसेना-भाजप युतीच्या पथ्यावर पडणारी. मोजके अपवाद वगळता ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा एकेकाळचा बालेकिल्ला. शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे, गणेश नाईक यासारख्या नेत्यांनी हा जिल्हा ताकदीने बांधलेला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मानणारा मोठा वर्ग जिल्ह्य़ाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये विखुरला आहे. रामभाऊ म्हाळगी, राम कापसे, प्रकाश परांजपे अशा उच्चविद्याविभूषित खासदारांमुळे हा जिल्हा नेहमीच चर्चेत राहिला. मात्र, चुकीचे धोरण आणि निर्णयांनी शिवसेनेच्या नेतृत्वाने ठाणे जिल्ह्य़ातील पक्षाचे अढळस्थान गमावले आहे. एकनाथ िशदे यांच्या रूपाने शिवसेनेत एकमेव जिल्हा नेतृत्व कार्यरत असले तरी त्यांच्याही राजकीय मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. इथे राष्ट्रवादीने बऱ्यापैकी बाळसे धरल्याचे दिसून येते. मागील विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्य़ातून शिवसेनेला जेमतेम सहा जागांवर विजय मिळवता आला. कल्याण, डोंबिवली परिसर हा युतीचा एके काळचा बालेकिल्ला. या भागातून डोंबिवली आणि अंबरनाथ अशा अवघ्या दोन जागांवर युतीचे आमदार निवडून आले. चुकीच्या उमेदवारांची निवड आणि पक्षबांधणीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे शिवसेनेला या भागात मोठा फटका सहन करावा लागला. लोकसभा निवडणुकीतही ठाणे जिल्ह्य़ातील चार जागांपैकी कल्याणची एकमेव जागा युतीलाजिंकता आली. तेथून निवडून आलेले खासदार आनंद परांजपे यांनी पुढे शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्याने जिल्ह्य़ातील एकमेव खासदारही युतीला गमवावा लागला. या पाश्र्वभूमीवर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोठे आव्हान युतीपुढे आहे.

जुन्या ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून प्रकाश परांजपे तब्बल चार वेळा निवडून आले. त्यांच्या अकाली निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने त्यांचा मुलगा आनंद यांना निवडणुकीच्या िरगणात उतरवले. आनंद यांनी तब्बल ९० हजार मतांच्या फरकाने संजीव नाईक यांचा पराभव केला. कल्याण, डोंबिवली यांसारख्या शहरांमधील मतदारांनी त्या वेळी परांजपे यांच्या पारडय़ात भरभरून मतांचे दान टाकले. त्यामुळे पुनर्रचनेनंतर ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाइंदर या तीन शहरांपुरत्या मर्यादित झालेल्या नव्या ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेना पुन्हा आनंद परांजपे यांनाच उमेदवारी देईल, अशी अटकळ होती. मात्र संजीव नाईक यांच्यासमोर शिवसेनेने नवी मुंबईतील वादग्रस्त उमेदवार विजय चौगुले यांना िरगणात उतरवले. यामुळे संतापलेल्या ठाणेकरांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पारडय़ात मतांचे दान टाकत शिवसेनेला अद्दल घडवली. त्यामुळे पुन्हा या मतदारसंघावर भगवा फडकविण्याचे मोठे आव्हान शिवसेनेला यंदा पेलावे लागणार आहे. गेल्या पाच वर्षांत संजीव नाईक यांनी हा मतदारसंघ अक्षरश: िपजून काढला आहे. नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर या दोन मतदारसंघांमध्ये नाईक यांची मोठी ताकद आहे. २० लाख लोकसंख्येच्या या मतदारसंघात सुमारे साडेदहा लाख मतदार नवी मुंबई, मीरा-भाईंदर येथील आहेत. त्यामुळे नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर येथून मोठे मताधिक्य मिळावे, यासाठी नाईक प्रयत्नशील आहेत. शिवसेनेने या मतदारसंघातून आमदार राजन विचारे यांना िरगणात उतरवले आहे. ठाणे परिसरात एकनाथ िशदे यांची मोठी ताकद असली तरी आपल्या चिंरजीवाच्या प्रचारासाठी सध्या ते कल्याणमध्ये व्यस्त आहेत. संघटन-कौशल्यासाठी फारसे प्रसिद्ध नसलेल्या विचारे यांची यामुळे मोठी अडचण झाल्याचे चित्र असून त्यांच्या प्रचारात िशदे समर्थकांची उणीव मोठय़ा प्रमाणावर जाणवू लागली आहे. स्व-पक्षातून हव्या त्या प्रमाणात सहकार्य मिळत नसल्याने विचारे यांचे भवितव्य भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या हवेवर अवलंबून आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या मतदारसंघातून शिवसेनेतून आयात केलेल्या अभिजीत पानसे यांना उमेदवारी दिली असली तरी पानसे यांच्या शिडात हवा भरण्याचे मोठे आव्हान खुद्द राज ठाकरे यांनाच पेलावे लागणार आहे.

ठाण्यापाठोपाठ कल्याण लोकसभा मतदारसंघात बंडखोर खासदार आनंद परांजपे यांच्या पराभवासाठी शिवसेनेने ही निवडणूकप्रतिष्ठेची केली आहे. या मतदारसंघातून स्वत: एकनाथ िशदे यांनी निवडणूक लढवावी यासाठी ‘मातोश्री’वरून त्यांच्यावर दबाव होता. मात्र, ठाण्यातील राजकारणात रममाण झालेले िशदे दिल्लीचे विमान पकडण्यास काही तयार नव्हते. नेतृत्वाचा दबाव वाढतो आहे हे लक्षात येताच त्यांनी आपले चिरंजीव डॉ. श्रीकांत िशदे यांना निवडणुकीच्या आखाडय़ात उतरविले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद लक्षात घेता परांजपे यांच्याशी दोन हात करणे तसेच कठीण नव्हते. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने येथून मनसेचे आमदार रमेश पाटील यांचे बंधू राजू पाटील यांना उमेदवारी दिल्याने शिवसेनेसाठी ही निवडणूक आव्हानात्मक बनली आहे. या मतदारसंघात आगरी, ब्राह्मण, मुस्लीम समाजाची एकगठ्ठा मते असून या मतांच्या ध्रुवीकरणासाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रयत्न चालविले आहेत. कळवा-मुंब्रा मतदारसंघात आमदार जितेंद्र आव्हाड यांची ताकद असून या ठिकाणाहून परांजपे यांना अधिकाधिक मताधिक्य मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. मनसेचे राजू पाटील हे आगरी समाजाचे असून धनशक्ती असलेला तगडा उमेदवार िरगणात आल्याने मुलाला उमेदवारी देण्याची खेळी एकनाथ िशदे यांच्या अंगलट येते की काय, असे चित्र आहे. पाटील यांच्या उमेदवारीमुळे कल्याणातून मान वर काढणेही िशदे यांना कठीण होऊन बसल्याने ठाण्यात विचारे यांचीही घुसमट होऊ लागली आहे.
भिवंडी मतदारसंघात विद्यमान खासदार सुरेश टावरे यांना उमेदवारी नाकारून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अतिशय आग्रहाने कुणबी समाजाचे नेते विश्वनाथ पाटील यांना पक्षात घेऊन त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली आहे. टावरे यांच्या कामाविषयी मतदारसंघात तीव्र अशी नाराजी होती. मुख्यमंत्र्यांनी ती हेरली आणि सतत आंदोलनाशी नाळ जोडलेले पाटील यांना पक्षात घेतले. गेल्या लोकसभा निवडणुकीत पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवून तब्बल ७४ हजार मते खेचली होती. या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीतून आयात केलेले कपिल पाटील यांना उमेदवारी दिली असून मनसेने सुरेश ऊर्फ बाळा म्हात्रे यांना िरगणात उतरवले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत बाळा म्हात्रे शिवसेनेतून निवडणूक लढले आणि तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. यंदा त्यांनी पक्षांतर करून लोकसभेचा विडा उचलला आहे. या मतदारसंघात आगरी, कुणबी, मुस्लीम अशा वेगवेगळ्या समाजाचे एकगठ्ठा मतदार असून या मतांचे कसे ध्रुवीकरण होते यावर निकाल अवलंबून आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या कपिल पाटील यांना शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांना आपलेसे करण्याचे मोठे आव्हान पेलावे लागत असून राष्ट्रवादीतील एक मोठा गट त्यांच्या पराभवासाठी विश्वनाथ पाटील यांच्यामागे एकवटल्याचे चित्र दिसू लागले आहे. भिवंडीत मोठय़ा प्रमाणावर असलेल्या मुस्लीम समाजाच्या मतांचे ध्रुवीकरण करण्यात विश्वनाथ यांना यश आल्यास कपिल पाटलांची भाजपवारी फळाला येणार नाही, असेच चित्र आहे.
पालघर लोकसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांच्यासाठी काँग्रेसने यंदा लाल गालिचा अंथरला आहे. या मतदारसंघात विकास आघाडीचे बळीराम जाधव खासदार असून त्यांनी ही निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढवावी, असा सुरुवातीला काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा आग्रह होता. मात्र, मुख्यमंत्र्यांची ही विनंती हितेंद्र ठाकूर यांनी अव्हेरली. त्यामुळे काँग्रेसने येथून राज्यमंत्री राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली. उमेदवारी जाहीर होऊन आठवडा उलटत नाही तोच गावित यांची कर्मभूमी असलेल्या पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने एकतर्फी विजय मिळवला. यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली. भारतीय जनता पक्षाने या मतदारसंघातून आमदार चिंतामण वनगा यांना उमेदवारी दिली असून मागील निवडणुकीत जेमतेम २० हजार मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला होता. या मतदारसंघात काँग्रेसची तोळामासा अवस्था पाहता मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा हितेंद्र ठाकूर यांना साकडे घातले आणि अखेरच्या क्षणी गावितांना माघार घेण्याचे आदेश आले. सध्या काँग्रेसने येथून ठाकूर यांना पाठिंबा दिला असून यामुळे काँग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी आहे. स्वत: गावितांचे समर्थक नाराज असून काँग्रेसचे हक्काचे मतदार ठाकूर यांच्या मागे उभे राहतात का, याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. वसई, विरार, नालासोपारा, बोईसर या पट्टय़ात ठाकूर यांचे मोठे वर्चस्व असून या भागातील आमदार विवेक पंडित यांची भूमिकाही या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे.

amol kolhe marathi news, shivajirao adhalarao patil marathi news
“उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी शिवाजी आढळराव पाटील पराभूत झाले!”, ‘त्या’ विधानावरून अमोल कोल्हेंचा टोला
election
प्रचाराची सांगता; लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा, विदर्भातील पाच मतदारसंघांत उद्या मतदान
BSP, Nagpur, Ramtek, BSP Nagpur,
नागपूर, रामटेकमध्ये बसपाच्या मतांना ओहोटी, गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत…
One pistol with 17 live cartridges seized from Buldhana near Madhya Pradesh border
बुलढाणा : लोकसभेच्या धामधुमीत पिस्तूलसह १७ काडतूस जप्त