05 April 2020

News Flash

मेक टू ऑर्डर : जाहिरातींना भुलू नका – डॉ. नितीन मोकल

दिवाळी २०१४ सौंदर्यवर्धनासाठी केल्या जाणाऱ्या काही उपचारांमध्ये चरबीचा वापर केला जातो. त्यामुळे भविष्यात शरीरातील चरबीला महत्त्व येण्याची शक्यता आहे.

| November 26, 2014 01:08 am

lp41दिवाळी २०१४
सौंदर्यवर्धनासाठी केल्या जाणाऱ्या काही उपचारांमध्ये चरबीचा वापर केला जातो. त्यामुळे भविष्यात शरीरातील चरबीला महत्त्व येण्याची शक्यता आहे.

सा धारणत: पहिल्या महायुद्धाच्या आसपास विकसित पावलेल्या प्लास्टिक सर्जरीच्या विद्याशाखेत आजदेखील अनेक नवनवे शोध लागत आहेत. आज प्लास्टिक सर्जरीचा मोठा वापर हा आपल्या आवडीप्रमाणे आपल्या शरीरात बदल करण्याकडे म्हणजेच मेक टू ऑर्डरकडे झुकत आहे. त्याचा आपल्या देशातील आढावा घेताना अनेक बदल समोर येतात. डॉ. नितीन मोकल हे देशातील तज्ज्ञ प्लास्टिक सर्जन अशाच अनेक प्रयोगांमध्ये सक्रिय असतात. त्यांच्याशी संवाद साधल्यावर मेक टू ऑर्डरच्या प्रक्रियेतील खाचाखोचा तर कळतातच, पण असं काही करण्यापूर्वी नेमकी भूमिका काय असावी हेदेखील लक्षात येतं.
सौंदर्यवर्धनासाठीच्या शस्त्रक्रियांमध्ये वजन कमी करायच्या शस्त्रक्रियांचाही समावेश होतो का, या संदर्भात सांगताना डॉ. मोकल यांनी वेगवेगळे मुद्दे मांडले. ‘‘आपलं वाढलेलं वजन व्यायाम, आहार नियंत्रण अशा उपायांनी कमी होत नाहीये हे लक्षात आलं की लोक लायपोसक्शन करण्यासाठी येतात. भारतातील स्त्रियांच्या बाबतीत शरीराच्या बेंबीखालच्या भागात चरबी साठण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे लायपोसक्शनसाठी महिलांकडून बरीच मागणी असते. त्या तुलनेत लायपोसक्शनसाठी पुरुष फारसे येत नाहीत. त्यांना आम्ही अन्य उपाय सांगतो. स्थूलत्वाचं प्रमाण फारच असेल तर ते स्टेपिलग करून घेतात, पोटाची बायपास सर्जरी करून घेतात. बेरिअ‍ॅट्रिक सर्जरी करूनही हल्ली स्थूलत्व कमी केलं जातं. पण चरबी काढल्यामुळे ढिली पडलेल्या त्वचेखाली घाम साचून गजकर्णासारखे दुष्परिणाम होतात. मग ही त्वचा प्लास्टिक सर्जरी करून काढावी लागते. म्हणजे आणखी एक शस्त्रक्रिया. म्हणजेच बेरिअ‍ॅट्रिक सर्जरी. ही मेक टू ऑर्डरकडे घेऊन जाणारी आहे.’’
वजन कमी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया जशा वाढताहेत तसेच गालाला खळी करून घेणे, नाक तरतरीत करणे या शस्त्रक्रियांचा वापरदेखील खूप वाढला आहे. डॉ. नितीन मोकल सांगतात, ‘‘सध्या गालाला खळी पाडून द्या, असं सांगत येणाऱ्या मुलींचं प्रमाण खूप आहे. पण चेहऱ्याच्या ठेवणीत आमूलाग्र बदल करवून घेण्याची उदाहरणं मात्र कमी आहेत. म्हणजे ओठ मोठे करायचे, खळी करायची, नाकाची ठेवण बदलायची, हनुवटी पुढे आणायची वगरे सगळं एकाच वेळी करून चेहऱ्याची ठेवणच बदलणारे लोक कमी आहेत. अशा वेळी आम्हाला त्यांच्याकडून अंडरटेकिंग घ्यावे लागते. ही शस्त्रक्रिया करताना आम्ही इम्प्लान्ट वापरतो. उद्या ही ठेवण नको असं त्यांना वाटलं तर ती पूर्ववत करणं शक्य व्हावं हा हेतू त्यामागे असतो.’’
विस्तीर्ण होत चाललेला भालप्रदेश हादेखील अनेकांच्या काळजीचा विषय असतो. आजकाल असे लोक केशरोपण करून घेताना दिसतात. त्याबद्दल डॉ. नितीन मोकल म्हणतात, ‘‘केशरोपण करून घेणं हे आजकाल खूपच कॉमन झालं आहे. ही प्रक्रिया साधारण भाताची लावणी करतात तशीच असते. सामान्यत: आपल्या डोक्याच्या बाजूचे आणि मागचे केस गळून जात नाहीत. ते नसíगकरीत्या टिकून राहतात. त्या ठिकाणी भोक पाडून त्यांची मुळं किंवा मोठी एक पट्टी काढली जाते. मायक्रोस्कोपखाली त्यांची छोटी युनिट्स तयार केली जातात. मग गरजेनुसार ती केस नसलेल्या जागी लावली जातात. काही महिन्यांनी लावलेले ग्राफ गळून पडतात. पण मूळ राहतं. साधारण तीन महिन्यांच्या कालावधीत त्यातून केस येऊ लागतात. साधारण आठ-नऊ महिन्यांच्या काळाने पूर्ण केस येतात. आज केशरोपण केलं आणि उद्या केशसंभार वाढला असं होत नाही.’’
केस हा शरीराच्या सौंदर्यात भर घालणारा घटक असल्यामुळे केस गळून टक्कल पडणं हा काही जणांसाठी संवेदनशील भाग असतो. त्यामुळे ते या शस्त्रक्रियेकडे वळताना दिसतात. स्त्रियांच्या बाबतीत केसांइतकाच संवेदनशील घटक म्हणजे स्तन. स्तनांचा आकार लहान असणं किंवा मोठा असणं हे काही जणींच्या बाबतीत आत्मविश्वासावर परिणाम करणारं असतं. मनोरंजन क्षेत्रातल्या सेलिब्रिटी महिला प्लास्टिक सर्जरी करून स्तनांचा आकार बदलून घेतात, हे सर्वसामान्य स्त्रियांना माहीत असतं. त्यामुळे त्याही याकडे वळू पाहतात. त्याबद्दल डॉक्टर मोकल सांगतात, ‘ब्रेस्ट इम्प्लान्ट हा त्यासाठी पर्याय असला तरी गेल्या चार-पाच वर्षांत आपल्याकडे फॅट इम्प्लान्टच्या माध्यमातून स्तनांना आकार देण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. पोटातील चरबी काढून ती स्तनांच्या खालच्या स्नायूमध्ये आणि आजूबाजूच्या आवरणामध्ये इंजेक्शनच्या माध्यमातून सोडली जाते. त्यामुळे एकाच वेळी अनावश्यक चरबी कमी होते आणि स्तनांना आकार देण्याची गरजदेखील पूर्ण होते.’’ डॉ. मोकल यांच्या मते भविष्यात शरीरातील चरबी हा सर्वात मोलाचा घटक ठरणार आहे.
वय वाढल्यावर जशी केसांत चांदी दिसायला लागते तसेच चेहऱ्यावर सुरकुत्या पडायला लागतात. काही जणांना या सुरकुत्या फार अस्वस्थ करतात. अमक्या नटाने या सुरकुत्या घालवल्या, तमकीचा चेहरा आणखी तरुण दिसायला लागलाय, हे ऐकलं की आपणही तसंच करावं असं वाटायला लागतं. त्यामुळे फेसलिफ्टिंगची शस्त्रक्रियाही लोकप्रिय आहे. अर्थात त्यामध्ये वापरले जाणारे बोटॉक्स अथवा इम्प्लान्टमुळे चेहरा ओढल्यासारखा दिसतो. त्यामुळेच आता त्यासाठीदेखील चरबीचा वापर केला जात असल्याचे डॉ. मोकल नमूद करतात. ‘‘पण त्यासाठी चरबीचा वापर केला तर त्याला गोलाई येते आणि चेहरा ओढल्यासारखा न दिसता नसíगकरीत्या असतो तसा दिसतो. व्रण बुजविण्यासाठी तसेच सुरकुत्या कमी करण्याची सर्जरी करताना आधी त्वचेखालच्या भागात चरबी इंजेक्ट केली जाते. त्याला लेझरच्या माध्यमातून पॉलिश केलं जातं. त्यामुळे त्याला एक चांगली गोलाई येते. यालाच आम्ही फ्री फॅट ग्राफ म्हणतो. हे आपल्याकडे गेल्या चार-पाच वर्षांपासून सुरू झालं असून ते नियमितपणे केलं जातं.’’
पोट, मांडी आणि नितंब या शरीराच्या तीन भागांतून मुख्यत: अनावश्यक चरबी मिळवता येते. गेल्या एक-दोन वर्षांत चरबी मिळवणे आणि ती वापरणे यामध्ये आणखी सुधारणा झाली आहे. या प्रक्रियेत चरबी एका मशीनमध्ये घालून त्यातील स्टेम सेल्स वेगळ्या केल्या जातात. त्या स्टेम सेल्स दुसऱ्या चरबीत एकत्र केल्या जातात त्याला स्टेम सेल अ‍ॅक्टिवेटेड फॅट ट्रान्सप्लान्ट- स्टेम सेल एनरिच फॅट ग्राफ म्हणतात. त्याचा फायदा म्हणजे टिकाऊपणा वाढतो. आम्ही जेव्हा नुसती चरबी वापरतो तेव्हा त्यातील ३० टक्के पेशी मरतात. मग पुढच्या सीटिंगमध्ये त्या पेशी भरून काढण्यासाठी पुन्हा उपचार करावे लागतात. म्हणजे दोन-तीन टप्प्यांत ही प्रक्रिया चालते. पण तेच स्टेम सेल एनरिच फॅट ट्रान्सप्लान्ट वापरलं तर मात्र एक किंवा दोन सीटिंगमध्ये काम होतं. म्हणूनच मला असं म्हणावंसं वाटतं की, यापुढच्या काळात चरबीला खूप महत्त्व येणार आहे.’’
आपल्याकडे गरज म्हणून विविध शस्त्रक्रिया करणारे आणि स्वत:ला असंच दिसायला हवं म्हणून करणारे हे प्रमाण ५०-५० टक्के असल्याचं डॉ. मोकल नमूद करतात. ‘‘एखाद्याच्या नाकाची ठेवणच निसर्गत: अशी असते की त्यामुळे त्याला श्वसनाला त्रास होत असतो. तो दूर करण्यासाठी त्याला ऱ्हायनोप्लास्टी करावी लागते. अशा कारणासाठी नाकाच्या शस्त्रक्रिया करून घेणारे आपल्याकडे अनेकजण आहेत. त्याबरोबरच चांगलं दिसणं ही काही जणांसाठी व्यावसायिक गरजदेखील असते. मॉडेल्सना चांगलं हास्य, नाकाचा विशिष्ट आकार, चेहऱ्याची आकर्षक ठेवण, स्तनांचा योग्य आकार हे सगळं व्यवसायाची गरज म्हणून बदलून हवं असतं. सामान्य माणसाला जर यातील काही करायचं असेल तर त्याच्यासाठी सरकारी इस्पितळातील प्लास्टिक सर्जरी विभागात जावं. मी स्वत: जीटी हॉस्पिटलमध्ये आहे. तेथे सर्वात चांगलं फॅट ग्राफ हार्वेस्ट मशीन आहे. पण लोकांच्या मनात सरकारी इस्पितळाबद्दल न्यूनगंड असतो.
मेक टू ऑर्डरबाबत धोक्याची घंटा वाजवताना डॉक्टर सांगतात, गेल्या काही वर्षांत अशा अनेक शस्त्रक्रिया करून शरीरात आपल्याला हवे तसे बदल करून घेण्याचं प्रमाण बरंच वाढलं आहे. म्हणूनच ही सर्जरी करून घेणाऱ्यांनी नेमकी काय खबरदारी बाळगावी याबद्दल डॉ. मोकल सांगतात, ‘‘प्लास्टिक सर्जरी फक्त प्लास्टिक सर्जननेच करायला हवी, कारण तो ज्या नाजूकपणे पेशी हाताळतो तशी हाताळणी इतरांना शक्य नसते.’’ दुसरं असे की, या प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या इम्प्लान्टचा संसर्ग होऊ शकतो. कारण दुसरीकडून आणलेल्या पेशी तुमच्या शरीरात कशा सरावतील हे सांगता येत नाही. अगदी त्याच माणसाच्या शरीरातल्या इतर भागांतील या पेशी असतील तरी त्या या दुसऱ्या ठिकाणी शरीर स्वीकारेल का, ते त्यांना कसा प्रतिसाद देईल ते सांगता येत नाही.’’ असे डॉ. मोकल आवर्जून सांगतात. त्याचबरोबर शस्त्रक्रियेनंतर त्या संदर्भात काळजी घेणं आवश्यक असतं. पण हल्ली सर्वानाच घाई असते. या संदर्भात नेमकं काय करावं यावर सांगताना डॉ. मोकल म्हणतात, ‘‘लायपोसक्शन केल्यानंतर सहा महिने पट्टा वापरावा लागतो. एखाद्या सेलिब्रिटीने आज चरबी काढली आणि तिला उद्या आयटम साँग करायचे आहे किंवा सामान्य माणसाने आज चरबी काढली आणि उद्या लगेच काही धावपळीचे काम निघाले म्हणून पट्टा लावला नाही तर मात्र त्रास होऊ शकतो. तसंच मेगा लायपोसक्शन केलं तर हिमोग्लोबिन कमी होणं अशासारखा त्रास होऊ शकतो.’’ अर्थात प्रत्येक शस्त्रक्रियेच्या मर्यादा आणि पथ्यं यांचा विचार मेक टू ऑर्डरमध्ये सर्वानीच केला पाहिजे हेच यातून अधोरेखित होते.
डॉक्टर मोकल आणखी एका बाबतीत सर्वानाच सजग करतात की या सौंदर्यवर्धनाच्या शस्त्रक्रियांसंदर्भातील जाहिरातींना भुलू नये. त्यातून अवाच्या सवा अपेक्षा तयार होतात. आणि अंतिमत: त्यातून निराशा पदरी पडण्याची शक्यता असते. हल्ली मेक टू ऑर्डरमध्ये सुरुवातीस आपल्यात होणारा बदल संगणकावर दाखविण्याची सुविधा सॉफ्टवेअरच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. मात्र तसच्या तसं दिसेल अशी अपेक्षा कधीच धरू नये, हे पक्क लक्षात ठेवावे. संगणकीय सॉफ्टवेअरसंदर्भात बोलताना ते सांगतात की ‘‘आम्ही इंजिनीअर नाही आहोत. आराखडय़ाबरहुकूम बांधकाम करण्यासाठी आम्ही काही सिमेंट, विटा, मातीवर काम करत नाही, तर आम्ही जिवंत पेशींवर काम करणारे डॉक्टर आहोत. हे सर्वानी लक्षात घ्यावे लागेल.’’
मेक टू ऑर्डरचं भवितव्य काय असेल, याबद्दल भाष्य करताना डॉक्टर मोकल म्हणतात, अमेरिकेसारख्या विकसित देशात हे सगळे प्रकार सर्रास केले जातात. त्यात आíथक घटक महत्त्वाचा आहे. अर्थात आपल्याकडेदेखील हे प्रमाण बरेच वाढत आहेत. त्यामुळे मागणी वाढेल तसं तसं खर्च कमी होणं हेच तत्त्व इथंदेखील लागू पडेल. आज जशी वैद्यकीय सुविधांची पॅकेजेस देणारी बडी हॉस्पिटल्स आहेत, तशीच उद्या शरीराच्या अवयवांमध्ये हवे तसे बदल करून देण्याची पॅकेजेसदेखील मिळतील, अशी शक्यता नाकारता येत नाही.
थोडक्यात काय, तर आपण सुंदर दिसावं यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने धडपडत असतो. त्यात आता या शस्त्रक्रियांचा मार्गही काहीजण अनुसरायला लागले आहेत. पण त्या मार्गाने जाताना त्याच्या मर्यादा आणि धोकेदेखील आधी समजून घेतले पाहिजेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2014 1:08 am

Web Title: looking beautiful 4
टॅग Diwali,Lifestyle
Next Stories
1 मेक टू ऑर्डर : आमच्याकडच्या सर्जरी वैद्यकीय गरजेनुसारच – डॉ. विनिता पुरी
2 मेक टू ऑर्डर : ‘दिसण्या’साठी जन्म आपुला..!
3 कोयना : अभियांत्रिकी चमत्काराचा हीरक महोत्सव प्रकाशलक्ष्मी कोयना
Just Now!
X