01dattaदत्तात्रेयांचा दुसरा अवतार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नृसिंहसरस्वती यांनी आपल्या तीर्थाटनात अनेक ठिकाणी वास्तव्य करून तपाचरण केलं. अशा ठिकांणांना दत्तमाहात्म्याचे अधिष्ठान लाभले आणि आज ही स्थानं दत्त क्षेत्रं म्हणून ओळखली जातात. त्यापैकी औदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूर या तीन महत्त्वाची स्थाने आहेत. तसेच दत्तावतारी सिद्धपुरुष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वामी समर्थाचे स्थान असणारे अक्कलकोटदेखील दत्तभक्तांमध्ये प्रसिद्ध आहे.

कृष्णाकाठचे औदुंबर

Akkalkot, guru purnima, devotees,
अक्कलकोटमध्ये गुरूपौर्णिमेसाठी लाखाहून जास्त भाविक दाखल
Narendra Modi In Radhika- Anant Ambani Wedding
नरेंद्र मोदी यांनी नीता अंबानींना वाकून केला नमस्कार? फोटो पाहून लोक म्हणतात, “मालकिणीसमोर तर..”, वाचा खरं काय
uttarakhand self proclaimed baba built temple
“देवीनं स्वप्नात येऊन मला आदेश दिले”, म्हणत स्वयंघोषित बाबानं उत्तराखंडमध्ये १६५०० फुटांवर बांधलं मंदिर; पवित्र कुंडाचा स्वीमिंग पूल…
Horse arena in Tukoba palanquin ceremony Pune print news
‘रिंगण सोहळा पाहिला म्या डोळा’; तुकोबांच्या पालखी सोहळ्यात अश्वांचे रिंगण
After departure of palanquins tawang again on water of Indrayani vigilance teams unaware
पालख्यांचे प्रस्थान होताच इंद्रायणीच्या पाण्यावर पुन्हा तवंग, दक्षता पथके अनभिज्ञ
calves of Tadobas empress Kuwani enjoyed the greenness of the first rains
Video : ताडोबाची सम्राज्ञी ‘कुवानी’च्या बछड्यांनी लुटला पहिल्या पावसातील हिरवळीचा आनंद
Indrayani River Foams Again, Indrayani River, CM Eknath Shinde s Pollution Free Promise of Indrayani River, Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala 2024, alandi,
आळंदी: इंद्रायणी पुन्हा फेसाळली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही तासांपूर्वी दिलं होतं ‘हे’ आश्वासन
Alandi, Dnyaneshwar Mauli,
आळंदी: संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती, टाळ- मृदंगाच्या गजरात वारकरी तल्लीन

नृसिंहसरस्वती आपल्या तीर्थाटनादरम्यान नृसिंहवाडीच्या आधी औदुंबर क्षेत्री राहिले होते. १४२१ सालच्या चातुर्मासात त्यांचा निवास कृष्णातीरावरील या मनोहारी वनात होता. याच ठिकाणी त्यांनी औदुंबर वृक्षाचा महिमा सांगितला. औदुंबर वृक्षात माझा नित्य वास राहील असं त्यांनी सांगितलं. तीर्थाटनादरम्यानचं चातुर्मास्य अनुष्ठान नृसिंहसरस्वतींनी याच ठिकाणी केलं आणि त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेलं हे lp15औदुंबराचं वन आज दत्त क्षेत्र औदुंबर म्हणून प्रसिद्ध आहे. गुरुचरित्राच्या १७ व्या अध्यायात येथील वास्तव्यादरम्यानच्या नृसिंहसरस्वतीच्या कार्याचं वर्णन केलं आहे.

कृष्णेच्या ऐलतीरावर भिलवडीजवळ भुवनेश्वरीचं प्राचीन शक्तिपीठ आहे. येथे तपस्वी जनांची वस्ती नेहमीच असे. वृक्षांच्या गर्दीमुळे अनुष्ठानासाठीचा पवित्र असा एकांत आपोआपच तयार झाला होता. त्याला जोड मिळाली पैलतीरावरील नृसिंहसरस्वतींच्या पुनीत वास्तव्याची. त्यांनी औदुंबरच्या महिमा विशद करून या स्थानाचं महत्त्व अधोरेखित केलं आणि दत्तप्रभूंच्या क्षेत्रात औदुंबराचं महत्त्व वाढलं. १९०४ साली ब्रह्मानंदस्वामी हे गिरनार पर्वती असणारे सत्पुरुष येथे आले आणि त्यांनी हे क्षेत्र प्रकाशात आणलं. कृष्णातीरावरील विस्तीर्ण घाट आणि औदुंबराचं वन यामुळे हे क्षेत्र साधनेसाठी प्रसिद्ध होत गेलं.

सांगली या जिल्ह्य़ाच्या ठिकाणापासून केवळ ३० किलोमीटरवर असणाऱ्या या क्षेत्री जाण्यासाठी नियमित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. तर पुणे, कोल्हापूर रेल्वे मार्गावरील भिलवडी स्थानकापासून सात किलोमीटरवर औदुंबर आहे.

भारतीय संस्कृतीकोशानुसार औदुंबरचा आणखीन एक संदर्भदेखील सापडतो. पंजाबातील बियास, सतलुज व रावी यांच्यामधील प्रदेशातील जनपद असणारे हे लोक होते. स्वत:ला ते विश्वामित्राचे वंशज म्हणवतात. तिथे सापडलेल्या नाण्यांवर विश्वामित्राचं चित्र आढळून आलं आहे. त्या औदुंबराचं राज्य प्रजासत्ताक असावं असा उल्लेख आहे.

नृसिंहवाडी – दत्तप्रभूंची राजधानी

दत्तप्रभूंचे दुसरे अवतार म्हणून ज्यांना ओळखले जाते अशा नृसिंहसरस्वतींच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्राला दत्तभक्तांमध्ये दत्तप्रभूंची राजधानी म्हणून स्थान आहे. वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबेस्वामींनी भारतभ्रमण केल्यानंतर येथे वास्तव्य केलं आणि नृसिंहवाडीला दत्तप्रभूंची राजधानी असे संबोधले आहे. १३७८ मध्ये कारंजा येथे नृसिंहसरस्वतींचा जन्म झाला. १३८८ मध्ये त्यांनी संन्यास दीक्षा घेतल्यानंतर ते तीर्थाटनास निघाले. त्यादरम्यान १४२१ साली त्यांचा मुक्काम औंदुबरी क्षेत्री होता, तर १४२२ मध्ये कृष्णा पंचगंगा संगमानजीकच्या गावात होता. नृसिंहसरस्वतींनी येथे तब्बल बारा वर्षे तपश्चर्या केली. या पवित्र संगमस्थळी तपसाधना केल्यानंतर १४३४ मध्ये त्यांनी येथे औदुंबर वृक्षातळी मनोहर पादुका आणि अन्नपूर्णा जान्हवीची स्थापना केली आणि आपण येथे वास करू अशी ग्वाही भक्तजनांना दिली व गाणगापुरी प्रस्थान ठेवले.

lp17

नृसिंहसरस्वतींच्या पावन वास्तव्यामुळेच या क्षेत्राला नृसिंहवाटिका म्हणून ओळखले जाऊ लागले. हीच आजची नृसिंहवाडी अथवा नरसोबाची वाडी होय. कृष्णा पंचगंगेच्या नयनरम्य तीरावर वसलेलं हे तीर्थस्थळ आज दत्तभक्तांसाठी दत्तप्रभूंची राजधानी म्हणून ओळखलं जातं. नृसिंहसरस्वती यांच्यानंतर अनेक महान विभूतींनी येथे वास्तव्य केलं आहे. साधना, उपासना भक्ती यासाठी अनुकूल अशा या स्थानी तीन त्रिकाळ दत्तभक्तीचा जागर सुरू असतो. नदीतीरामुळे परिसरास लाभलेली समृद्धता, वातावरणातील भरून राहिलेला भक्तिभाव, गुरुचरित्रात उल्लेख असणारे पैलतीरावरील अमरेश्वर, कृष्णेचं विस्तीर्ण पात्र अशा या दत्तभक्तीच्या रम्य तीर्थक्षेत्री दत्तभक्तांचा अष्टोप्रहर राबता असतो.

पहाटे तीनपासून ते रात्रौ दहा वाजेपर्यंत दत्तभक्तीचा जागर येथे सुरू असतो. काकड आरती, पंचामृत अभिषेक, महापूजा, पवमान पठन, धूपदीप आरती, दत्तगजरात होणारा पालखी सोहळा आणि शेजारती असा नित्यक्रम अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने आजही सांभाळला जात आहे. दत्तांची विविध कवने आणि पदांचा lp18उच्चरवात होणारा हा जागर आणि रोजचा पालखी सोहळा खास अनुभवण्यासारखा असतो. वर्षभरातील विविध उत्सव, नृसिंहजयंती, रामनवमी व इतर सनकादीक पुण्यतिथ्या व सण नियमित साजरे केले जातात.

नदीकिनारीच मंदिर असल्यामुळे महापुराचे पाणी पादुकांना स्पर्श करते, तेव्हा त्या प्रचंड वेगवान पाण्याच्या प्रवाहात दक्षिणद्वाराचं पुण्य घेण्यासाठी भाविक मोठय़ा संख्येने येतात. मंदिरात पाणी शिरले तरी पुराच्या पाण्यातून जात सारे नित्य सोपस्कार पार पाडले जातात. पादुकांपर्यंत पाणी आल्यावर मात्र उत्सव मूर्ती टप्प्याटप्प्याने हलवली जाते. अर्थात दरवर्षीच्या या नित्य कार्यक्रमाचं पालन येथे काटेकोरपणे होतं.

साधारण पंधरा-वीस वर्षांपूर्वी नृसिंहवाडीचा विस्तार तुलनेनं मर्यादित होता. गर्दीदेखील मर्यादित होती. विस्तारासाठी नैसर्गिक मर्यादा असल्या तरी आज खूप मोठय़ा प्रमाणात धर्मशाळा, भक्तनिवास, प्रसादालय, वेद उपासनेच्या सुविधा यामुळे क्षेत्र बाराही महिने गजबजलेले असते. नदीकिनारी बांधलेल्या विस्तीर्ण घाटामुळे मंदिर परिसर भव्य झाला आहे. २००५ च्या महापुरात जवळपास संपूर्ण गावालाच पाण्यानं वेढलं होतं.

वाडीतील दत्त मंदिराबाबत सांगितली जाणारी माहिती मात्र आश्चर्यकारक अशीच आहे. जरी हे हिंदूंचं स्थान असलं तरी विजापूरच्या आदिलशाहने आपल्या मुलीची दृष्टी परत यावी म्हणून प्रार्थना केली होती. त्याला सकारात्मक फळ आल्यामुळे आदिलशहाने मंदिराचे बांधकाम करून दिले. त्यामुळे त्याला कळस नाही.

या क्षेत्री पोहोचण्यासाठी सांगली २२ कीलोमीटरवर आहे. तर नजीकचे रेल्वे स्टेशन मिरज हे १५ किलोमीटरवर आहे. तर कोकणातून, कर्नाटकातून येताना कोल्हापूरहून जयसिंगपूर अथवा इचलकरंजीमार्गे येता येते. नृसिंहवाडीच्या नजीकच दोन किलोमीटरवर असणारे कुरुंदवाड संस्थानकालीन ठाणं आहे. कृष्णा पंचगंगेच्या संगमानंतर कर्नाटकच्या दिशेने जाणाऱ्या कृष्णेच्या तीरावरील संस्थानिकांनी बांधलेला घाट व विष्णू मंदिर पाहण्यासारखं आहे. तर आवर्जून पाहावं असं इतिहासकालीन कोपेश्वराचं मंदिर असणारं खिद्रापूर २५ किलोमीटरवर आहे.

lp19

गाणगापूर

lp20दत्तभक्तीचा प्रसार दक्षिण भारतात अनेक ठिकाणी झाला. महाराष्ट्राच्या सीमेजवळील कर्नाटकातील गाणगापूर हे क्षेत्र हे त्यापैकीच एक. नृसिंहसरस्वतींनी येथे तब्बल २३ वर्षे असं दीर्घकाळ वास्तव्य केलं आहे. नृसिंहवाडीहून प्रस्थान ठेवल्यानंतर ते गाणगापूर क्षेत्री आले. भीमा आणि अमरजा या नद्यांच्या संगमावरील नृसिंहसरस्वतींच्या या दीर्घकालीन वास्तव्यामुळे या स्थानास दत्तभक्तांमध्ये फार महत्त्व प्राप्त झाले आहे. श्रीगुरुचरित्रात गाणगापूरचा उल्लेख गाणगापूर, गाणगाभवन, गंधर्वभवन आणि गंधर्वपूर या नावांनी येतो. नृसिंहसरस्वती सुरुवातीस संगमावरच राहत असत. नंतर गावातील मठात त्यांचा निवास होता. आज या मठातच त्यांच्या पादुका आहेत. येथील पादुकांना निर्गुण पादुका असं संबोधण्यात येते. हा मठ / मंदिर गावाच्या मध्यभागी आहे. पादुकांच्या गाभाऱ्याला द्वार नाही, चांदीने मढवलेल्या लहान झरोक्यातून पादुकांचे दर्शन घ्यावे लागते.

नृसिंहवाडीप्रमाणेच येथील नित्योपासना पहाटेपासून सुरू होतात. निगुर्ण पादुका चांदीच्या आवरणात ठेवलेल्या असून पूजेच्या वेळी अष्टगंध व केशराचा लेप दिला जातो. जलाभिषेक होत नाही. दर गुरुवारी पालखी असते. येथील नित्योपासनेत सर्वाधिक महत्त्व आहे ते दुपारच्या माधुकरी मागण्यास. येथे येणाऱ्या प्रत्येक यात्रेकरुने ही माधुकरी मागावी अशी प्रथा आहे. नृसिंह सरस्वतींनी येथून प्रस्थान ठेवण्यापूर्वी दिलेला संदेशाचा गुरुचरित्रातील उल्लेख ही यामागची भूमिका असल्याचं नमूद केलं जातं. दुपारच्या या माधुकरी मागण्यामध्ये नृसिंहसरस्वती अर्थात दत्तच कोणत्याही रूपात वावरत असतील हा ही माधुकरी मागण्यामागचा संदर्भ आहे. त्यामुळे दुपारच्या महानैवेद्यानंतर सेवेकरी, येथे निवासाला आलेले गांजलेले पीडित भक्तगण ही प्रथा नित्यनेमाने पाळताना दिसतात. माध्यान्याच्या समयी मी येथे वास करेन हे lp21नृसिंहसरस्वतींचे गुरुचरित्रातील निर्देश ही त्यामागची श्रद्धा. त्यामुळेच गाणगापूर क्षेत्री अनेक भक्तांचा राबता कायम असतो.

गावाजवळच मैलभर अंतरावरच्या संगमानजीक भस्माचा डोंगर आहे. प्राचीन काळी यज्ञभूमी असावी आणि अनेक यज्ञांतील राख एकत्र टाकल्यामुळे हा डोंगर तयार झाला असावा अशी आख्यायिका सांगितली जाते. गाणगापूर आणि संगम परिसरात सुमारे आठ तीर्थाची नोंद आहे. यात्रेकरूंमध्ये या तीर्थाच्या यात्रेचं महत्त्व खूप आहे. षट्कुल तीर्थ, नरसिंह (मनोहर)तीर्थ, भागीरथी तीर्थ, पापविनाशी तीर्थ, कोटितीर्थ, रुद्रपादतीर्थ, चक्रतीर्थ आणि मन्मथतीर्थ अशी ही आठ र्तीथ आहेत. गाणगापूर क्षेत्री उत्सवांमध्ये दत्तजयंती आणि नृसिंहसरस्वती पुण्यतिथी हे दोन उत्सव महत्त्वाचे आहेत.

मुंबई -बेंगलोर लोहमार्गावर गाणगापूर रोड स्टेशनवरून २० किलोमीटरचे अंतर कापून गाणगापूर क्षेत्री जाता येते. तर सोलापूर, बीड, उस्मानाबाद, अक्कलकोट अशा ठिकाणांहून थेट बससेवा आहे. गुलबर्गा हे जिल्ह्य़ाचे ठिकाण ३० किलोमीटरवर आहे.

अक्कलकोट – दत्तावतारी सत्पुरुषांचे स्थान

दत्तसंप्रदायाच्या अर्वाचीन इतिहासात अक्कलकोटचे आणि अक्कलकोट स्वामींचे स्थान महत्त्वाचे आहे. स्वामी समर्थ महाराज हे एक अवतारी सिद्धपुरुष म्हणून ओळखले जात. १८५७ मध्ये ते अक्कलकोट येथे वास्तव्यास आले आणि अखेपर्यंत तेथेच राहिले. उन्मुक्त लीला आणि चमत्कारांनी त्यांचे चरित्र भरले असल्याचा उल्लेख भारतीय संस्कृतीकोशात आहे. स्वामी समर्थाच्या पूर्वजन्माविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. ते फारसे त्याबद्दल बोलत नसत. त्यामुळे अक्कलकोटचे स्वामी महाराज अशीच त्यांची ख्याती पसरली. त्यांना एकदा कोणीतरी विचारले आपण कोठून आलात? तर त्यावर त्यांनी आम्ही कर्दळीवनातून आलो आणि विविध तीर्थक्षेत्रांच्या यात्रा करून येथे आलो असे सांगितले. १४५८ मध्ये कर्दळीवनात गेलेले lp22नृसिंहसरस्वतीच स्वामींच्या रूपाने पुनश्च अवतरले असे दत्तभक्तांना वाटले आणि अक्कलकोटला दत्तस्थानाचे महत्त्व आले. एका उल्लेखानुसार कर्दळीवनातून बाहेर पडलेले स्वामी तीर्थाटन करत मंगळवेढय़ास १२ वर्षे राहिले आणि तेथून ते अक्कलकोटला आले.

सोलापूरनजीकच्या अक्कलकोटचे मूळ नाव प्रज्ञापुरी होते. या गावी स्वामी समर्थाचा सुमारे दोन तप निवास होता. त्यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकात दत्तोपासनेचा प्रसार मोठय़ा प्रमाणात केला. त्यांची शिष्यपरंपरा मोठी आहे. गुरुसंप्रदाय त्यांनी मोठय़ा प्रमाणात वाढविला. अक्कलकोटमध्ये स्वामींच्या वास्तव्याच्या खुणा अनेक ठिकाणी दिसून येतात. अक्कलकोटला स्वामी कायम वटवृक्षाखाली निवासास असायचे. त्याचबरोबर गावातील अनेक ठिकाणी महत्त्वपूर्ण दत्तस्थाने आहेत.

दत्तात्रेयांचा दुसरा अवतार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नृसिंहसरस्वती यांनी आपल्या तीर्थाटनात अनेक ठिकाणी वास्तव्य करून तपाचरण केलं. अशा अनेक ठिकाणांना दत्तमाहात्म्याचे अधिष्ठान लाभले आणि आज ही स्थानं दत्त क्षेत्रं म्हणून ओळखली जातात. त्यापैकी औदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूर या तीन महत्त्वाच्या स्थानांचा हा परिचय. तसेच दत्तावतारी सिद्धपुरुष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वामी समर्थाचे स्थान असणारे अक्कलकोटदेखील दत्तभक्तांमध्ये प्रसिद्ध आहे.

माहिती संदर्भ :
देवस्थानांच्या वेबसाइट आणि भारतीय संस्कृतीकोश
छायाचित्र स्र्ोत :
देवस्थान वेबसाइट व फेसबुक पेज
संकलन : सुहास जोशी