scorecardresearch

श्री दत्त विशेष : दिगंबरा, दिगंबरा…

भजनं, आरत्यांमध्ये दत्तगीतं भक्तिभावाने गायली जातात. अशा काही मोजक्या दत्तगीतांविषयी-

श्री दत्त विशेष : दिगंबरा, दिगंबरा…

01dattaभजनं, आरत्यांमध्ये दत्तगीतं भक्तिभावाने गायली जातात. अशा काही मोजक्या दत्तगीतांविषयी-

दुपारची उन्हं नुकतीच कलून गेल्येत..गावातल्या त्या पुरातन आणि प्रशस्त मंदिराच्या सभामंडपात महिलावर्गाची लगबग सुरू झाल्ये. सतरंज्या अंथरणं, वाद्यांची जुळवाजुळव आदी कामं रोजच्या सवयीनुसार आपोआप होतायत. आवश्यक गणसंख्येच्या पलीकडे गर्दी होते आणि बरोबर चारच्या ठोक्याला भजनाचा दैनंदिन सोहळा सुरू होतो, एका लयीत, एका सुरात.. ‘धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरू रायाची, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची..’ विशेष म्हणजे, यात कोणीच प्रमुख गायिका नसते, म्हटलं तर सगळ्याच प्रमुख व म्हटलं तर सगळ्याच समूह गायिका, मात्र त्या एकत्रित गायनाचा आविष्कार असा काही असतो की येणाऱ्या-जाणाऱ्यांची पावलं नकळत थबकतात. या प्रकाराला संगीतातली ताकद म्हणा किंवा दत्तगुरूंच्या भक्तीचा महिमा म्हणा..ऐकणाऱ्याची ब्रह्मानंदी टाळी लागतेच.

महिलांच्या भजनी मंडळांचं हे चित्र अर्थातच सांप्रत काळातलं नाही, तर तीस-चाळीस वर्षांपूर्वीचं आहे. आता भजनी मंडळांची संख्याही कमी झाली आणि सगळ्यांचाच एकंदरीत सामाजिक वावरही संकुचित झाला. तरीही, दत्तगुरूंच्या त्या भजनांनी व आरत्यांनी भक्तांच्या मनाचा एक कोपरा आजही व्यापला आहे. या सांगीतिक भक्तीला खतपाणी घातलं ते आकाशवाणीने. त्या काळी मुंबई ‘ब’वरून रामप्रहरी प्रसारित होणारं भक्तिसंगीत ऐकणं हा एक आनंदाचा व मन:शांतीचा भाग होता. दत्तगुरूंवरील गीतं आणि आर. एन. पराडकर या एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या. त्यांचा आवाज तर एवढा सात्त्विक व सोज्वळ की एखादा संतच गातोय, असं वाटावं. त्या बहुतांश गीतांचे संगीतकारही तेच, त्यांचे गीतकारही ठरलेले, कवी सुधांशू. ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा (‘कजरा रे कजरा रे, तेरे काले काले नैना’ हे गीत ऐकल्यावर ‘दिगंबरा दिगंबरा’ची आठवण होते, मात्र ही कमाल यमन रागाची) दत्त दिगंबर दैवत माझे, दत्ता दिगंबरा या हो, दिगंबरा..’ न संपणारी सूची आहे ही. पराडकरांनी यमन, दरबारी कानडा, पहाडी, भरवी अशा परिचित रागांच्या सुरावटीने ही भजनं सजवली आहेत. अर्थात, ही भक्तिगीतं असल्याने यात सुरावटीपेक्षा शब्दांना अधिक महत्त्व असायला हवं आणि तसं ते राखलंही गेलं आहे. ‘दत्तदिगंबर दैवत माझे’ या गाजलेल्या गीतात कवी सुधांशू यांनी साध्यासोप्या शब्दांमध्ये दत्तगुरूंची महती सांगितली आहे. ‘दत्तदिगंबर दैवत माझे, हृदयी माझ्या नित्य विराजे..’ पहिला अंतरा पाहा, ‘अनसुयेचे सत्त्व आगळे, तिन्ही देवही झाली बाळे, त्रमूर्ती अवतार मनोहर, दीनोद्धारक त्रिभुवनी गाजे..’ याच्याच आधीच्या प्रसंगावरही एक गीत आहे..‘अनसुयेच्या धामी आले, त्रलोक्याचे स्वामी, आले त्रलोक्याचे स्वामी..गुलाल उधळा, उधळा सुमने, जयजयकारे घुमवा भुवने, पूर्णब्रह्म हे आले भूवर धर्मरक्षण्याकामी..’ हे सारं ऐकताना आठवण होते ती गीतरामायणाची. गीतरामायण जेवढं सुश्राव्य आहे, तितकीच ही गीतंही प्रासादिक व अजरामर आहेत. दुसरं म्हणजे, आजवर अनेक देवतांवर अनेक कलाकारांनी गाणी रचली, आजही रचली जातायत, मात्र संख्येचा विचार केला तर दत्तगुरूंवर जेवढी गीतं निर्माण झाली आहेत, तेवढी खचितच अन्य देवतांवर झाली असतील. त्यांचे जे विविध अवतार मानले जातात, त्या संतांवरील रचना तर आणखी वेगळ्या.

पराडकर यांची परंपरा अजित कडकडे चालवताना दिसतात. कडकडे यांनी गेल्या तीस वर्षांत दत्तगुरूंवर सुमारे चाळीस-पन्नास अल्बम केले आहेत, यातल्या बहुतांश रचना कवी प्रवीण दवणे यांच्या आहेत तर संगीत नंदू होनप यांचे आहे. ‘निघालो घेऊन दत्ताची पालखी, अलौकिक दत्तात्रेय अवतार’ आदी त्यांची गाणी भक्तप्रिय ठरली आहेत. दत्तगुरूंवरील अन्य रचनांपैकी ‘त्रिगुणात्मक त्रमूर्ती दत्त हा जाणा’ ही पारंपरिक आरती तर घरोघरी म्हटली जाते. ‘मला हे दत्तगुरू दिसले’ हे आशा भोसले यांचं गीतही (आम्ही जातो आमच्या गावा) अजरामर आहे आणि रघुनाथ साळोखे यांनी गायलेलं ‘दत्त दर्शनाला जायाचं, जायाचं, आनंद पोटात माझ्या माईना’ हे गीतही आगळंवेगळं आहे.

या सर्व गीतांची मोहिनी आजही ओसरलेली नाही, मंदिराचा सभामंडप रिकामा दिसत असला तरी ‘दिगंबरा, दिगंबरा’ आणि अन्य भजनांच्या शब्दसुरांनी तो व्यापलेला आहेच.

पराडकर टॉप टेन

* दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा..
* दत्त दिगंबर दैवत माझे..
* दत्ता दिगंबरा या हो..
* धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरू रायाची..
* आज मी दत्तगुरू पाहिले..
* जय दत्तराज माऊली.
* माझी देवपूजा पाय तुझे..
* अनुसुयेच्या धामी आले..
* दत्तगुरूंना स्मरा..
* पुजा हो दत्तगुरू दिनरात..

मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2014 at 01:17 IST

संबंधित बातम्या