01youthगेल्या दोन-चार वर्षांमध्ये लिनोवोने भारतीय बाजारपेठेत चांगलेच पाय रोवले आहेत. सुरुवातीस बाजारात आलेल्या के९०० ने त्यांनी पाय रोवण्यास सुरुवात केली. त्यानंतर इतरांच्या तुलनेत स्वस्त आणि त्याच वेळेस स्मार्टही असलेल्या मोबाइल उपकरणांनी लिनोवोला मुसंडी मारता आली. त्यानंतर आलेल्या कॉलिंग टॅब्लेटने सॅमसंगलाही स्पर्धा निर्माण केली. आता हा ब्रॅण्ड रास्त किमतीतील स्मार्टफोनमध्ये पूर्णपणे स्थिरावण्याच्या बेतात आहे. त्याचे स्मार्ट डिझाईन, उत्तम कॅमेरा आणि चांगली बॅटरी हे त्याचे विशेष आहेत.

आता बाजारात आलेला एस८६० हे मॉडेल यंदाच्या वर्षी मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये लिनोवोने दाखल केले होते. तब्बल ४००० एमएएच बॅटरी हे त्याचे खास वैशिष्टय़ आहे. अलीकडे थ्रीजीचा वापर वाढल्यामुळे बॅटरी लवकर खर्ची पडते, असा अनुभव आहे. त्या पाश्र्वभूमीवर मोबाइल वापरकर्ते अशा सक्षम बॅटरीच्या शोधात होते. काळ्या— करडय़ा रंगाची अ‍ॅल्युमिनिअम बॉडी आणि समोरच्या बाजूस ५.३ इंचाचा मोठय़ा आकाराचा डिस्प्ले असे याचे रूप आहे. हे उपकरण दिसायलाही स्मार्ट असेच आहे. बॅटरी आतमधल्या बाजूस, ती बाहेर काढण्याची सोय नाही. त्यासाठी सपोर्ट सेंटरमध्येच जावे लागेल. वरच्या बाजूस हेडफोन जॅक आहे. उजवीकडे वरच्या बाजूस आवाज कमी-अधिक करण्याची सोय आणि त्याखाली lp49ऑन-ऑफ बटण आहे. डावीकडे सिम स्लॉट असून खालच्या बाजूस दोन स्पीकर्स आहेत, तर मधोमध मायक्रो यूएसबी स्लॉट आहे. अलीकडे स्मार्ट मोबाइल असे म्हटले की, कमी वजनाचा आणि हलका असे त्याचे स्वरूप अपेक्षित असते. मात्र लिनोवो एस८६०चे वजन तब्बल १९० ग्रॅम्सचे आहे. मात्र अर्थात त्यामुळे त्याच्या देखणेपणात कोणतीही बाधा येत नाही.

मागच्या बाजूस तब्बल – मेगापिक्सेलचा कॅमेरा असून समोरच्या बाजूस असलेला कॅमेरा -मेगापिक्सेलचा आहे. मागच्या बाजूस कॅमेऱ्याच्या बरोबर खाली एलईडी फ्लॅशही देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनचे कव्हर काढून पुन्हा घालता येण्यासारखे नाही. त्यामुळे त्यात एक्स्टर्नल मेमरी कार्डाची सोयदेखील नाही, केवळ इंटर्नल मेमरी असून ती १६ जीबीची देण्यात आली आहे. त्यातील १४.५ जीबी मेमरी आपल्याला वापरासाठी उपलब्ध असते. मात्र केवळ मेमरीची सोय पाहून काही कुणी मोबाइलचा वापर करत नाही. सध्याच्या जमान्यात १६ जीबी मेमरी म्हणजे काहीच नाही, अशी अवस्था आहे, हे लक्षात घेऊनच लिनोवोने क्लाऊडची सोय या मोबाइलसोबत उपलब्ध करून दिली असून ती अमर्याद स्वरूपाची आहे.
lp51

डिस्प्ले

लिनोवोच्या या स्मार्टफोनचा डिस्प्ले ५.३ इंचाचा आणि ७२० ७ १२८० रिझोल्यूशन पिक्सेल्सचा आहे. त्यामुळे दृश्य पाहताना फारसा फरक पडत नसला तरी यापेक्षा चांगले पिक्सेल्स असलेले स्मार्टफोन्स बाजारात उपलब्ध आहेत. परस्परविरोधी रंगसंगती पाहाताना मात्र दृश्यरूपात काहीसा फरक जाणवतो.

ऑपरेटिंग सिस्टीम

सध्या तरी यामध्ये ४.२ ही अँड्रॉइडची जेली बीन ऑपरेटिंग सिस्टीम लोड करून देण्यात आली आहे. त्यामध्ये अपग्रेडची सोय असून फोन वापरण्यास सुरुवात केल्यानंतर तुम्ही ४.४ ही अँड्रॉइडची नवी आवृत्ती डाऊनलोड lp50करू शकता. या नव्या आवृत्तीमध्येही हा फोन चांगल्या प्रकारे काम करतो, असे रिव्ह्य़ूदरम्यान लक्षात आले.

या स्मार्टफोनसाठी १.३ कोर्टेक्स- ए- सेव्हन चिपसेट क्वाडकोअर मिडिआटेक प्रोसेसर वापरण्यात आला असून तब्बल २ जीबी रॅम वापरण्यात आले आहे. त्यामुळे फोन वापरताना फारसा त्रास पडत नाही.

लिनोवोने अँड्रॉइडमध्येच त्यांचा यूजर इंटरफेस मात्र स्वतला हवा तसा कस्टमाइज्ड करून घेतला आहे. त्यामुळे तुम्ही किटकॅट व्हर्जन वापरत असलात तरी त्याचा फील मात्र निश्चितच वेगळा असतो. पॉवर मॅनेजमेंट करण्यासाठी त्यांनी युजर इंटरफेसमध्ये काही बदल केले आहेत. काही गोष्टी एकाच प्रकारच्या एका वेगळ्या फोल्डरमध्ये दिल्या आहेत. त्यामुळे कनेक्टिव्हिटीसाठी लागणाऱ्या गोष्टी एकत्र, गुगल अ‍ॅप्स एकत्र असे सारे पाहायला मिळते.

कॅमेरा

समोरच्या बाजूस असलेला कॅमेरा १.६ मेगापिक्सेल क्षमतेचा आणि तेवढा चांगला नसला तरी मागच्या बाजूस असलेला कॅमेरा हा ८ मेगापिक्सेलचा आणि चांगला आहे. घराबाहेर काढलेले सर्व फोटो हे चांगले येतात आणि कमी प्रकाशातील छायाचित्रे मात्र तेवढी चांगली येत नाहीत, असे रिव्ह्य़ूमध्ये लक्षात आले. मात्र त्यात असलेला आयएसओ वापरण्याचा पर्याय निवडून त्यावर चांगल्या पद्धतीने मात करता येते. स्पर्धेत असलेल्या इतर स्मार्टफोन्सच्या तुलनेत याचा कॅमेरा अधिक चांगला आहे. कॅमेरा सेटिंग्जही वापरण्यासाठी अतिशय सोयीची अशीच आहेत.
lp52

यात मॅक्रो, पॅनोरमा, पीआयपी, इव्ही ब्रॅकेट, फेस ब्युटी मोडस् असे पर्यायही देण्यात आले आहेत.

कमी प्रकाशातील चित्रण करताना आयएसओ सेट केल्यानंतर चांगले रिझल्ट्स मिळतात, असे दिवाळीतील कंदीलाच्या चित्रणावरून लक्षात आले.

बॅटरी क्षमता

या स्मार्टफोनचे सर्वात मोठे असे शक्तिस्थळ म्हणजे त्याची बॅटरी. ती तब्बल ४००० एमएएच क्षमतेची आहे. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार थ्रीजीसाठी २४ तास सलग वापर करण्याची या बॅटरीची क्षमता आहे. बॅटरीची क्षमता चांगली असल्याचे रिव्ह्य़ूदरम्यानही लक्षात आले. शिवाय एक महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे बॅटरीच अधिक क्षमतेची आहे, एवढेच नाही तर या बॅटरीचा वापर करून तुम्ही इतर डिव्हायसेसही चार्ज करू शकता म्हणजेच पोर्टेबल चार्जर म्हणूनही या स्मार्टफोनचा वापर करता येऊ शकतो.

निष्कर्ष

या स्मार्टफोनच्या खोक्यावर त्याची किंमत २२ हजार रुपये अशी लिहिलेली असली तरी बाजारात तो १८ हजार रुपयांच्या आसपास उपलब्ध आहे. एवढी चांगली बॅटरी क्षमता इतर कोणताही स्मार्टफोन या किमतीत देत नाही. शिवाय उपकरण म्हणून त्याचे असलेले क्वाड कोअर प्रोसेसर, २ जीबी रॅम हे पॅकेजही चांगले आहे. कॅमेराही उत्तम आहे. शिवाय तो डय़ुएल सिम आहे. त्यासाठी मायक्रो सिम वापरावे लागते. रास्त दरातील स्मार्टफोन म्हणून हा विकत घेण्यास काहीच हरकत नाही!