28 May 2020

News Flash

चर्चा : मॅगी, कुरकुरे आणि आई…

मॅगीवरची बंदी चर्चेला आमंत्रण देऊन गेली तशीच विचारांनाही प्रवृत्त करून गेली. गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या सगळ्यांच्याच जीवनमानात जो बदल होत गेला आहे त्याकडे डोळसपणे बघण्याची

| August 7, 2015 01:29 am

lp40मॅगीवरची बंदी चर्चेला आमंत्रण देऊन गेली तशीच विचारांनाही प्रवृत्त करून गेली. गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या सगळ्यांच्याच जीवनमानात जो बदल होत गेला आहे त्याकडे डोळसपणे बघण्याची गरज या बंदीने अधोरेखित केली आहे.

आज घराघरात पोचलेले मॅगी, कुरकुरे आणि सेरेलॅक हे पदार्थ. मुलांची आवड, जाहिरातींचा प्रभाव, त्याला बळी पडणारी मुले आणि कटकट न करता काही तरी पोटभरणीचे खाणे मुले खात आहेत यात समाधान मानणाऱ्या आया- त्यांनी सोडलेला नि:श्वास! आज हे जग इतके गतिमान बनलेले आहे की, कोणी ते थांबवू म्हटले तर एकतर तो फरफटून पडेल किंवा परिघाबाहेर फेकला जाईल. सर्वसामान्य जुन्या पिढीच्या म्हणजे आज जे सत्तर-पंच्याहत्तरच्या आसपास आहेत त्यांना त्या वेगाने भोवंडून जायला होतं. स्त्रियांवर होणारे अत्याचार, त्यात त्यांची होणारी घुसमट, त्यांच्यावर होणारा अन्याय या साऱ्यातून स्त्रियांना बाहेर काढून त्यांना मोकळा श्वास घ्यायला मिळावा म्हणून महात्मा फुले, कर्वे-रानडे यांनी स्त्रीशिक्षणाचा हिरिरीने पुरस्कार केला. म्हणून आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया आघाडीवर दिसत आहेत; पण स्त्रीने अर्थार्जनासाठी बाहेर पडावे हा हेतू त्या कोणाही पुरस्कर्त्यांच्या मनात नव्हता. पण आजचे शिक्षण फक्त अर्थार्जनासाठीच घेतले जाते. तो दृष्टिकोनच चुकीचा आहे. व्यक्तिमत्त्व विकास, मनोविकास दुसऱ्यांना समजून घेण्याएवढी विशाल दृष्टी आणि जर खरोखरच गरज भासली तर अर्थार्जन हा हेतू स्त्रीशिक्षणामागे होता. पण स्त्रिया केवळ ‘अर्थार्जन’ हा हेतू डोळ्यासमोर ठेवून शिकल्या. त्यामुळे बी.ए., बी.कॉम. झालेल्या मुली पण त्या शिक्षणाच्या जोडीला एखादा बारीकसा अभ्यासक्रम करून कमी पगाराच्या पण नोकरीत रमू लागल्या. कारण घरात राहिलो तर अधिक काम करावे लागेल. ज्या कामाचे मोल कदर केली जात नाही, आणि दुसरे घराबाहेर पडायला रोज नवीन कारण शोधावे लागेल त्यापेक्षा नोकरी बरी. पण त्यामुळेच अनेक समस्या वाढायला लागल्या आहेत. त्यामुळे स्त्रीशिक्षणाचा जो मूळ हेतू तोच नष्ट होऊ लागला आहे, त्यामुळे स्त्रिया शिकल्या पण जे स्वातंत्र्य, जो मान, जी सुरक्षितता अपेक्षित होती ते स्वप्न पूर्ण झाले का? आजही फक्त काही घरातच मुलगा-मुलगी असा लिंगभेद नाहीसा झाला. पण मुली वाढवताना आम्ही त्यांना मुलांसारखे वाढवले असे अभिमानाने सांगतात का? ती मुलगी आहे ना, मग मुलीसारखेच वाढवा ना? कारण यातून आपणच मुलाचे महत्त्व वाढवतो. विचार स्वातंत्र्य, निर्णय स्वातंत्र्य-मानसिक सक्षमता शिक्षणाबरोबरच तिच्यात येणे आवश्यक आहे. सहनशीलता पण शिकवूया पण ‘मुकी बिचारी कुणी हाका’ अशी नको. अन्यायाला प्रतिकार करण्याचे सामथ्र्य तिच्यात येणे महत्त्वाचे. पण आज त्यांना मुलांसारखे वाढवल्याने स्त्रीमधील संसाराला आवश्यक गुणांची-तडजोड, दुसऱ्याला समजून घेणे, सहनशीलता यांची पायमल्ली झाली. पूर्वी हुंडाबळी जात असत. आज एवढे स्वातंत्र्य असूनही डॉक्टर, इंजिनीअर, सी.ए., वकील अशा उच्चशिक्षित बायकांचे ‘होंडा’ किंवा ‘ब्लॉक’ बळी जातच आहेत. का?
कारण शिक्षणाचा उपयोग फक्त पैसे मिळविण्यासाठीच करायचा एवढेच त्या सर्वाच्या मनावर बिंबवले गेले आहे. बुद्धीची प्रगल्भता, मनाची संवेदनशीलता अभ्यासाने निर्माण होणारी साहसी वृत्ती याचा वापर करण्याचे कौशल्य कोणत्याही अभ्यासक्रमात येत नाही. त्यामुळे स्त्रिया कितीही शिकल्या तरी त्यांची कुतरओढ थांबलेली नाही. उलट खूप पूर्वीच्या काळापेक्षा अधिक वाढलेली आहे; कारण पूर्वी पुरुष जे आणून देतील ते तिने शिजवायचे. तिने उगीचच घराबाहेर पडायचे नाही. आणि आज? आणायचे तिनेच, शिजवायचे तिनेच, मुलांचा अभ्यास तिनेच घ्यायचा आणि सहन पण तिनेच करायचे. आजच्या पिढीतले पुरुष घरकामात स्त्रियांना मदत करताना दिसतात, पण त्यांना स्वयंपाकघरातले कितपत जमते माहीत नाही. ते विकतचे आणून देतील. कारण अभ्यास व नोकरी करताना स्वयंपाक घरातील प्राथमिक गोष्टी पण शिकायच्या राहून जातात. आज मुलींची अवस्था पण तीच आहे. पण कोणाच्याही पोटाची भूक कमी झाली आहे का, किंवा जिभेचे चोचले कमी झाले? आजही मुलांची-वृद्धांची खाण्यापिण्याची काळजी कशी घ्यायची, त्यांना काय खायला द्यायचे याचे मार्गदर्शन अनेक मासिकातून-वर्तमानपत्रातून होत असते. त्यात कुठेही मॅगी, वेफर्स, बिस्किटे, पाव यांचा उल्लेख नसतो. तर घरी बनवलेले पदार्थच असतात. पूर्वी लहान मुलांना (तान्ह्य़ा) मूगडाळ, तांदूळ, नाचणी, गहू यापैकी एक दोन घटक धुऊन, वाळवून, भाजून-दळून त्याची लापशी दिली जात असे. सेरेलॅक हे त्याचेच सुधारित (पण महाग) रूप आहे. आजही मार्गदर्शन करणारे तेच सांगतात. घरच्या गृहिणीने शक्य असेल तर पुरुषानेसुद्धा-विविध तऱ्हेचे खाद्य पदार्थ बनवून खायला घालण्यातून अनेक हेतू साध्य होतात. आईने-आजीने हे आपल्यासाठी बनवले आहे, कारण आपण तिचे लाडके आहोत या भावनेने मुले आनंदी राहतात. ज्या आनंदी वृत्तीची वाढीसाठी गरज आहे. एकत्र बसून चवीने-प्रेमाने-गप्पा मारत खाणे खाल्ले तर ते अंगी लागते. परस्परांमधील प्रेमभावना वाढीस लागते. संवाद वाढतो, ज्याच्या अभावी आज अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत ते नक्की कमी होतील. आज ज्या भावनांकामुळे-पालकांमुळे अनेक समस्या निर्माण होतात त्या नक्की कमी होतील.
इरावती कर्वे-दुर्गा भागवत-रमाबाई रानडे या पण शिकल्या. त्यांनीही अनेकांना विविध तऱ्हेचे अन्नपदार्थ बनवून खायला घातले, त्यात संशोधन केले. पण शिकल्या म्हणून नोकरीचा हट्ट धरला नाही. (अर्थात त्यांचा काळच वेगळा होता.) आजच्या शिक्षणात शिकताना कोणत्याही अभ्यासक्रमात कृतज्ञता-आदर-विश्वास-जपणूक शिकवली जात नाही. आम्ही शिकलो आहोत तेव्हा आम्हाला आता कोणी मार्गदर्शन करण्याची गरज नाही ही वृत्ती वाढली. एका हातावर परदेशातील बातम्या असतात. आज अनेकांना परदेशाचे आकर्षण आहे. अनेक जण इथल्या व्यवस्थेला कंटाळून परदेशी स्थलांतरित होतात. पण दहा जण एकत्र येऊन त्या व्यवस्थेत बदल घडवण्याचा प्रयत्न करत नाहीत. भ्रष्टाचार निपटून काढणे-व्यवस्थेत बदल करणे इतके सोपे नाही हे मलाही माहीत आहे. पण आज शिक्षण घेतले म्हणजे घराबाहेर पडलेच पाहिजे-अर्थार्जन केलेच पाहिजे हा विचार बळावला आहे. मला पैसे मिळतात किती, त्यासाठी मी दगदग किती करते, किती जणांवर अवलंबून lp39राहाते. त्यासाठी खर्च किती करते. त्यामुळे मला खरोखरच समाधान मिळते का, या कशाचाही विचार केला जात नाही. त्यापेक्षा मूल ९-१० वर्षांचे होईपर्यंत घरात राहावे. मग आपल्या आवडत्या कामात स्वत:ला झोकून द्यावे. अर्थात याचे नियोजन कसे करायचे ते कोणत्याही अभ्यासक्रमात शिकवले जात नाही. पोटाची गरज भागल्याशिवाय कोणतेही कार्य मनाजोगे होऊ शकत नाही. ती गरज कोणी भागवायची? निसर्गाने स्त्री-पुरुष हा जो भेद निर्माण केला आहे त्यामागे काहीतरी उद्देश नक्की असणार. तो भेद का आहे ते जाणून घेणे महत्त्वाचे. आजही ‘बाळंतपण’ ही स्त्रीचीच मक्तेदारी आहे. विज्ञानाने ढवळाढवळ केली नाही तर माणसाचा सरळ मार्गाने जन्म होण्यासाठी नऊच महिने लागतात तेव्हा ते सर्व समजून घेऊन वागणे गरजेचे आहे.
आजही नोकरी न करणाऱ्या ४० टक्के स्त्रिया तरी आहेत पण त्याही घरात टुकीने संसार करताना दिसत नाहीत. काही जणी नाइलाज म्हणून नोकरी करत नाहीत, काही नोकरीची हौस-आवड नाही म्हणून नोकरी करत नाहीत. पण आपण नोकरी करत नाही तर नोकरीसाठी द्याव्या लागणाऱ्या वेळेपैकी अर्धा वेळ जरी रोज घरासाठी दिला तर आज जे विकतच्या वस्तूंचे माहात्म्य वाढले आहे ते कमी होईल. आणि घरचे-ताजे-प्रेमाने मिळाल्याने तब्येती पण चांगल्या राहतील. फक्त या सर्वासाठी एक डोळस वृत्ती हवी. अजूनही लग्न करताना मुलीपेक्षा सर्वच बाबतीत वरचढ नवरा पाहिला जातो, पण आपण त्याच्यापेक्षा डाव्या आहोत, कमी आहोत या भावनेला धक्का लागलेला चालत नाही. आपली मुलगी शिकलेली आहे तेव्हा ती तडजोड करणार नाही. सेवा करणार नाही, या भावनेतून आई-वडिलांनी तिला वाढवलेले असते. त्यातून अनेक प्रश्न उभे राहतात. आजही आपली एखादी मैत्रीण जर गरज म्हणून नोकरी करत असेल तर तिला कष्टाने मदत करायला काय हरकत आहे? पण आज तेही होताना दिसत नाही. कारण कोणासाठी सहजपणे काही करायचे ही भावनाच लुप्त झाली आहे.
आज सर्वाचीच मुले एकेकटी असतात. चार-पाच मैत्रिणींनी मिळून आलटून पालटून ती मुलं एकत्र संभाळली तर त्यातून अनेक गोष्टी सहजपणे साध्य होतील. मुलांना एकत्र राहण्याचा, खेळण्याचा आनंद मिळेल, मुले देवाण-घेवाण शिकतील. मुले घेऊन जाऊन जी कामे करता येत नाहीत ती कामे सर्वानाच सहजपणे करता येतील. सगळ्यांचीच सहनशक्ती वाढेल. आपल्या मुलाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलेल. कारण सगळी मुलं सारखीच हुशार-बेशिस्त-भांडखोर असतात. तेव्हा आपल्या मुलाबद्दल न्यूनगंड किंवा अहंगड राहणार नाही. मुले तडजोड शिकतील. सहजीवनाचा आनंद घेतील, त्यातून त्यांची मन:स्थिती सुधारेल. पण आज सहजपणे कोणासाठी काही करण्याची कोणाचीच तयारी नसते. मग घरात एकेकटी राहून एकलकोंडी-आत्मकेंद्रित होतात. टी.व्ही., कॉम्प्युटर-टॅब्लेट-मोबाइलची गुलाम होतात. कारण त्याच्या नादी लागल्याने आईला त्रास देत नाहीत. तिच्या कामात व्यत्यय आणत नाहीत. मग ती मुले प्रश्नचिन्ह बनतात (ढ१ु’ीे ूँ्र’)ि. अर्थात सगळीच तशी होतात असे नाही, पण आज लहान मुलातील विकृती ज्या वाढीस लागल्या आहेत, त्याचा पाया असाच कुठेतरी असतो.
त्यापेक्षा शिकले म्हणजे नोकरी केलीच पाहिजे या वृत्तीतून मुलींनी व त्यांच्या पालकांनी बाहेर पडले पाहिजे आणि आपले मूल दहा-अकरा वर्षांचे झाले की स्त्रीने आपला आवडता-जमणारा उद्योग सुरू करावा म्हणजे तिलापण आपण काही करत नाही या भावनेतून ती बाहेर पडेल. कोणी कितीही शिकले, गरीब असले, श्रीमंत असले तरी पोटाची भूक कमी झाली का? की, चवीपरीने खाणे बंद झाले? नाही ना? मग ते काम कोणीतरी करायलाच हवे ना? स्त्रिया बाहेर पडल्या आणि जागोजाग ‘भाजी-पोळी’ केंद्रे निर्माण झाली. पण ती व्यापारी वृत्तीने. त्यामुळे स्वैपाक करताना त्यात थोडे ‘हृदय’ घाल हा ‘आजीचा सल्ला’ आपोआप दूर सारला गेला. पण अन्न खाणे-मिळणे जसे गरजेचे आहे तसेच ते प्रेमाने, वेळच्या वेळी मिळणेपण गरजेचे आहे. पण आई खूप वेळ घराबाहेर राहिल्यामुळे मुलांना-नवऱ्याला समजून घेण्याएवढा वेळ व सहनशक्ती दोन्ही तिच्याजवळ राहात नाही. स्वत:ला समजून न घेतल्याची खंतपण तिच्याजवळ असतेच. तेव्हा स्त्रियांनी शिकत असताना थोडा संसाराचापण विचार करावा. कारण नोकरीनंतर प्राधान्यक्रमाने लग्न, नंतर मूल हे ओघानेच येते. एकतर पूर्वापारच्या संस्कारातून ते ‘जीन्स’ तिच्याकडे उपजतच असतात. तेव्हा आज जो मुलांच्या भावनांकाचा प्रश्न जटिल झाला आहे तो कदाचित कमी होईल. त्यासाठी खाजगी-सरकारी ठिकाणी स्त्रियांचे नोकरी मिळवण्याचे वय वाढवावे लागेल. किंबहुना लग्नानंतर पहिली आठ-दहा वर्षे तिचा नोकरीतला हक्क अबाधित ठेवून तिला बिनपगारी रजा द्यावी. तिनेपण नोकरी नसली तरी संपर्कसाधनांच्या साहाय्याने स्वत:ला नोकरीत असताना सारखेच सक्षम ठेवावे. त्यातून अनेक प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.
आता हे सारं ‘स्त्री’नेच का? कारण पुरुषप्रधान संस्कृती असूनही आपले घर आईभोवतीच फिरत असते. त्यामुळे सेवा, तडजोड, सहनशक्ती हे गुण स्त्रीजवळ उपजतच असतात. आज स्त्रियांच्या नोकऱ्यांमुळे काही पुरुषही नोकरीपासून वंचित राहात असतील. वाढत्या गुन्हेगारीचे ते एक कारण असू शकते. हे सगळं बदलायला कधीतरी कुठेतरी सुरूवात व्हायला हवी. एक पाऊल पुरूषांनीही पुढे टाकायला हवे. त्यासाठी जिथे स्त्रीची नोकरी प्राधान्याची गृहीत धरली जाते तिथे पुरुषाने जरूर तडजोड करावी, पण आजही आपल्याकडे पुरुषाची नोकरी प्रथम, स्त्रीची दुय्यम हीच परिस्थिती आहे. तेव्हा कोणी घरात थांबायचे तो प्रश्न आपापसात सोडवावा. माझ्या माहितीत एक-दोन पुरुषांनी हा पर्याय स्वीकारला आहे, पण तो नगण्यच आहे. मुलांचे भवितव्य महत्त्वाचे असेल तर एकाला माघार घ्यायलाच हवी. आयांनीपण मुलांवर संस्कार करताना बायकोची नोकरी अधिक महत्त्वाची असेल तर तू घर सांभाळलेस तर आम्हाला आवडेल असा संस्कार करावा.
आजच्या युगात ‘माहिती-तंत्रज्ञानाच्या’ क्षेत्रात किंवा इतरत्रही सर्वानाच भरपूर पगार मिळतो तेव्हा त्या पगारावर पाणी सोडणे इतके सोपे नाही, पण मनोधारणा तशीच बनवली तर कठीण काहीच नाही. खरे तर अध्र्याहून अधिक गृहिणी ‘दुसरे घर’ दोन-दोन गाडय़ा, फार्म हाऊस, अद्ययावत साधनांनी युक्त घर यासाठीच नोकरी करतात. आज सर्वाचीच मानसिकता कष्टाचे काम न करण्याची झाली आहे. याला कोणताही ‘वर्ग’ अपवाद नाही. त्यामुळे महिलांच्या नोकरीमुळे घरात पूर्णवेळ कामासाठी बायका ठेवाव्या लागतात. त्यापण हल्ली ‘साक्षर’ नसल्या तरी ‘सज्ञान’ असतात, त्यामुळे गृहिणीच्या पगाराचा अंदाज त्यांना असतोच, त्यामुळे त्यापण ‘अवाच्या सवा’ पगार मागतात. ‘गरजवंताला अक्कल नसते’ या उक्तीप्रमाणे त्या कामगार स्त्रीला तेवढा पगार देऊन कामावर ठेवले जाते. या साऱ्यात सुक्याबरोबर ओलेपण जळते. त्यामुळे कमी ऐपत असलेल्या गरजवंत स्त्रीला तो जास्तीचा पगार कबूल करावाच लागतो. बरे, यात ‘प्रेमाने-आपुलकीने’ काम होतेच असे नाही. ठरलेल्या वेळेच्या बाहेर तिला थांबावे लागले तर तिची कुरकुर चालू होते. त्यातूनच पगारवाढ, महागाईवाढ सुरू होते.
विकतचे खाणे कुरकुरे-वेफर्स हे खूप मोठय़ा प्रमाणावर बनते, त्यामुळे घरगुती खाणे बनवून घेण्यापेक्षा ते स्वस्त मिळते, ते जिभेलापण चुरचुरीत व छान लागते, पण अंती पचनाला ते वाईटच असते. पण एकदा मुलांना त्याचीच सवय लागली की, घरातले कमी चुरचुरीत-कमी खमंग मुलांना नको वाटते. माझ्याच नातीने मला सांगितले ‘आजी, घरी केलेला केक मला नको हं!’ अशा सवयी एकदा लागल्या की त्या मोडणे दुरापास्तच असते. आयापण असा विचार करतात. ‘खातेय, खातोय ना सुखाने मग राहू दे’ या सगळ्यामागची सर्वाचीच मानसिकता बदलणे खूप गरजेचे आहे. मुलांना आईची गरज आहे तोपर्यंत आईने ‘नोकरीतला हक्क’ ठेवून रजा घ्यावी. त्याचबरोबर आजी-आजोबांशी सलोख्याचे संबंध ठेवून तडजोड करावी. त्याचबरोबर मुख्य म्हणजे त्या म्हाताऱ्यांना-ज्येष्ठ नागरिकांना आपल्या वृद्धपणाच्या काळजीतून आश्वस्तता-विश्वासार्हता मिळणे खूप गरजेचे आहे. पण आज तसे चित्र फारसे कुठे दिसत नाही. त्यातूनच पाळणाघरे, वृद्धाश्रम आणि घरकाम करणाऱ्यांची दादागिरी वाढू लागली. ज्या आयांनी आपली मुले नीट वाढवली त्या नातवंडाचे नीट करणार नाहीत का? पण त्यांच्यावर विश्वास टाकला जात नाही. दर तास-दोन तासांनी फोन करून जेवला का, झोपला का? काय खाल्ले? किती खाल्ले? याची ऑफिसमधून चौकशी करतात. त्या चौकशीमुळे आई-सासू दुखावल्या जातात आणि त्यांना मूल सांभाळणे नको वाटते. अशा कितीतरी गोष्टी आहेत. परस्पर विश्वास-सांमजस्य-तडजोड-मोकळेपणा, विचारांचे आदान-प्रदान या गोष्टी जर घराघरात असतील तर घराघरातले कुरकुरे-मॅगी-सेरेलॅक यांचे राज्य आपोआप कमीच होईल, तो सुदिन असेल. मुलांचा भावनांक वाढण्याची गरज आज बालरोगतज्ज्ञ सतत सांगत असतात. त्या भावनांक कमी होण्यामागे मुलांचे घरात एकेकटे राहणे, सतत टी.व्ही., मोबाइल, संगणकाच्या आहारी जाणे हेच आहे. आजी-आजोबा-आईबाबा यांच्या सहवासात मुले वाढली तर पुढचे अनेक प्रश्न सुटतील.
आज व्यक्तिस्वातंत्र्याचे खूप स्तोम माजले आहे. प्रत्येकाला स्वत:ची स्पेस हवी. त्यासाठी कोणाशीच तडजोड नको. हे सर्व कुठपर्यंत जाणार आहे माहीत नाही. पण पूर्वीच्या काळापेक्षा अधिक संपन्नतेत असूनही आज स्त्रिया अधिक असुरक्षित झाल्या आहेत. त्याला वयाचेही बंधन नाही आणि लहान मुले अधिकाधिक विकृत होत चालली आहेत. त्याला आर्थिक परिस्थितीचे बंधन नाही. श्रीमंताघरची मुलेपण अधिक पैशासाठी कोणत्याही थराला जातात. बारा-तेरा वर्षांची मुले आपल्याच सोबत्याचा क्षुल्लक कारणांनी खून करतात, यामागची मनोभूमिका काय असावी? प्रसारमाध्यमांचा वाढता प्रभाव, त्याला कोणीच पायबंद घालू शकत नाहीत. नकार न पचवण्याची मुलांची वृत्ती, पालकांच्या पूर्ण न झालेल्या अपेक्षांचे मुलांवर नकळत येणारे ओझे-चैनीची चटक-वाढत्या प्रमाणातील नशेचे आकर्षण. या साऱ्यामागे संवादाचा अभाव, मुलांचा एकटेपणा, मनमोकळे बोलण्यासाठी, शाळेतल्या गमती सांगण्यासाठी, त्या ऐकण्यासाठी कोणाला वेळ नसणे. त्यातून येणारी उदासीनता. मग तात्कालिक प्रेम करणारांच्या आहारी जाणं हे चक्र असेच वाढत जाते. समाज हा अनेक माणसे मिळून बनत असतो. अशी अनेक निराश-उदासीन-विकृत माणसे एकत्र आली की, तो समाज विधायक कार्य कसे करणार? अजूनही वेळ गेलेली नाही. आपण सर्वानीच यावर उपाय शोधायचा आहे. मला सुचला जो उपाय तो मी मांडला. घरातले वातावरण बदलणे स्त्रीच्या हातात असते. स्त्रियांनीच का माघार घ्यायची असाही प्रश्न या लिखाणातून निघू शकतो. पण कशाही परिस्थितीत टिकून राहण्याचे बळ स्त्रीमध्ये उपजत असते. एका पुरुषाला स्त्री बदलू शकते, पण स्त्रीला बदलणे तसे कठीणच आहे. कोणत्याही कठीण परिस्थितीत खंबीर राहून, काबाडकष्ट करून ती मुलांना वाढवते, सुसंस्कारित करते तेव्हा स्त्रियांनीच यातून मार्ग काढायचा आहे. ‘कोणतेही काम कमीपणाचे नाही’ या मनोवृत्तीतून सर्वजण बाहेर पडतील तेव्हाच यात बदल झाला तर शक्य आहे, अन्यथा याहून बिकट परिस्थितीला सर्वानाच तोंड द्यावे लागेल.

तयार पदार्थाची चटक का निर्माण झाली?
मॅगीवरील बंदी घराघराला हलवून गेली. मुळात मॅगी किंवा हवाबंद डब्यातील अन्नाची इतकी गरज व चटक का निर्माण झाली त्याचा विचार करताना दोन-तीन मुद्दे प्रामुख्याने डोळ्यासमोर येतात. पहिला गरज- असो-नसो बहुसंख्य स्त्रिया नोकरीसाठी बाहेर पडतात. आरोग्यविषयक जागरूकता थोडय़ाफार प्रमाणात निर्माण झाल्यामुळे, घरात बनवलेले अधिक खाल्ले जाते, विकतच्या सारखे मोजक्या प्रमाणात घरात बनवणे जमत नाही आणि कोणालाच कष्ट फारसे करायला नकोत. त्यापेक्षा विकतचे आणले की, थोडे पुरते. पसारा पडत नाही. दुसरे, घरातील खाणारे एका वेळी हजर असतीलच असे नाही आणि खाणारांची तोंडेपण कमी झाली. शेजारी-पाजारी संबंध कमी झाले, त्यामुळे देवाण-घेवाण कमी झाली. त्याचबरोबर आजच्या पिढीवरच्या आर्थिक जबाबदाऱ्या आमच्या पिढीपेक्षा कमी झाल्या. त्यामुळे पैसा भरपूर असतो, त्यामुळे ज्या गोष्टी प्रकृतीला अनिष्ट त्या पटूनही स्वत:ला त्यापासून दूर करणे जमत नाही, त्यातून हे सारे निर्माण झाले.
उषा टोळे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2015 1:29 am

Web Title: maggi kurkure and mother
टॅग Charcha,Maggi,Mother
Next Stories
1 कुस्तीगीर मालामाल होतील, पण..!
2 नोंद : झाडय़ा जमात
3 चायनीज कॉइन्स
Just Now!
X