आपल्या आगळ्यावेगळ्या जादूने अवघ्या तरुणाईला भुरळ घालणारा जादूगार डायनामो नुकताच मुंबईत आला होता.

जादू म्हटलं की एखादी स्वप्नवत दुनिया डोळ्यासमोर येते. जिथे सर्व काही आपल्या मनासारखं होतं. आपण म्हणू तेव्हा चमचमीत खाणं आपल्यासमोर येणार, म्हणू तेव्हा बाहुला-बाहुली समोर नाचणार, हवं तेव्हा नावडत्या व्यक्तीची फजिती होणार. सगळं कसं मस्त मस्त. काहीच कटकट नाही, कोणाचा ओरडा नाही. अभ्यास नाही ना काही काम. लहानांपासून मोठय़ांपर्यंत प्रत्येकाला या जादूच्या दुनियेचं आकर्षण असतं. हे आकर्षण इतकं वाढत जातं, की अलादिनच्या हातातला जादूचा दिवा मिळावा म्हणून आपण आजूबाजूच्या सगळ्या बागा पालथ्या घालतो आणि अलीबाबाच्या गुहेचा पत्ता सापडेल म्हणून गावातल्या घरातील सगळ्या बंद खोल्या वेळा पिंजून काढतो. पण काहीच सापडत नाही.
वर्षांमागून र्वष निघून जातात आणि ती जादूची स्वप्नं मनाच्या एका बंद खोलीत कुठेतरी दडून राहतात. मग अचानक कधीतरी टीव्हीच्या रिमोटची बटणं खटाखट दाबत असताना एका चॅनेलवर कोणी एक जादुगार पुन्हा तेच जादूचे खेळ दाखवत असतो. नकळतपणे तो आपल्या मनातली ती कुतूहलाची खोली हळूच उघडतो. जादुगार म्हटला की ते रंगीत कपडे, डोक्यावर पगडी, हातात काठी आणि तोंडात ‘आबरा का डबरा’ असा काहीसा मंत्र असं एक चित्र आपल्या डोळ्यापुढे उभं राहायचं. हळूहळू त्याची जागा सुटाबुटातील आणि डोक्यावर लांब हॅट घातलेल्या मॅजिशियनने घेतली.
आताच्या या फास्ट फॉरवर्ड दुनियेत या मॅजिशियनचं रूपसुद्धा पालटलंय. तो आता चित्रविचित्र कपडे घालत नाही. त्याला सादरीकरणासाठी स्टेजच पाहिजे अशीही अट नाही. तो तुमच्या आमच्यात येऊन रस्त्याच्या कडेला किंवा एखाद्या दुकानात त्याच्या करामतींना सुरुवात करू शकतो. त्याला दरवेळी भरपूर सामानांची गरज नसेल, आपल्याकडे असलेली एखादी गोष्ट घेऊन त्यातूनच तो काहीतरी जादू करून दाखवू शकतो. या अवलिया मॅजिशियनचं नाव आहे ‘डायनामो’.
त्याचं मूळ नाव, ‘स्टिव्हन फ्रायन’, पण तो त्याच्या ‘डायनामो’ या टोपणनावाने जगप्रसिद्ध आहे. लंडनच्या ब्रॉडफोर्ट नामक छोटय़ाशा गावातून आलेला स्टिव्हन जादूची कला त्याच्या आजोबांकडून शिकला. ‘जगात कुठलीही गोष्ट कोणत्याही कारणाशिवाय होत नाही. त्यामुळे आज जर मला या कलेची देणगी लाभली आहे, तर तिचा दुरुपयोग माझ्याकडून होणार नाही, याची काळजीसुद्धा मी घेतली पाहिजे.’ यावर डायनामोचा ठाम विश्वास आहे. वयाच्या अकराव्या वर्षांपासून जादूच्या करामती करणाऱ्या या अवलियाने सध्या संपूर्ण जगाला त्याच्या जादूने मोहिनी घातलेली आहे. फेसबुकवरील त्याच्या फॉलोअर्सचा तब्बल ३० लाख ८६ हजार ७५० हा आकडा त्याच्या मोहिनीची महती सांगून जातो. नुकताच डायनामो भारताच्या सफरीवर आला होता. वाराणसीमध्ये रंगपंचमीच्या दिवशी आपल्या जादूची उधळण केल्यानंतर २१ मार्चला तो मुंबईच्या भेटीस आला होता. येथेही त्याच्या काही प्रसिद्ध जादूच्या करामती करून त्याने आपल्या चाहत्यांना थक्क केलं. थेम्स नदीवरून चालणं, ब्राझीलच्या क्रिस्थ डे रेमेडीच्या पुतळ्यासमोर हवेत उडणं, इमारतीच्या भिंतीवरून चालत येणं या त्याच्या प्रसिद्ध करामतींसाठी तो ओळखला जातो. पत्त्यांच्या जादूमध्ये तर तो निष्णात आहे. हिस्ट्री चॅनेलवरील त्याच्या ‘डायनामो- मॅजिशन इम्पॉसिबल’ या शोला फक्त परदेशातच नाही तर भारतातसुद्धा प्रचंड प्रतिसाद मिळत आहेत.
डायनामोचे शोज कधी स्टेजवर होत नाही. तो गर्दीत लोकांमध्ये जाऊन त्यांच्यासमोर छोटय़ा-छोटय़ा करामती करून दाखवतो. कधी रिकाम्या पाकिटातून कँडीज बाहेर काढतो, तर कधी फक्त एका पत्त्याचा वापर करून वाईन ग्लास फोडतो, कधी लॉटरीच्या कागदापासून पैसे तयार करतो, तर कधी बास्केटबॉलच्या बॉलचा आकार बदलतो. त्याच्या प्रत्येक जादूनंतर समोर उभा असलेला माणूस हे नक्की कसं झालं याचा विचार करत राहतो. आणि याचाच फायदा घेत डायनामो गर्दीतून गायब होतो. त्याला लोकांशी बोलायला, नवीन ओळखी बनवायला आवडतं. त्याच्या लोकांमध्ये समरसून जाण्याच्या गुणामुळे तो कित्येकांचा जीव की प्राण बनला आहे. आणि यंदाच्या त्याच्या भारतभेटीनंतर त्याने त्याच्या चाहत्यांच्या वर्गात भर टाकली आहे हे मात्र नक्की.

डायनामोबद्दल त्याच्या शोला उपस्थित मुलांच्या प्रतिक्रिया

धवल भिंद्रा
त्याचे शोज टीव्हीवर पाहत आलो आहे आणि त्याला प्रत्यक्ष पाहून भारावून गेलो. मी आतापर्यंतच्या त्याच्या सर्व सिरीज पाहिल्या आहेत. आणि जेव्हा तो इथे येणार हे कळलं तेव्हा माझ्या उत्साहाला पारावार नव्हतं. त्याला प्रत्यक्ष समोर जादू करताना पाहण्याची मजा काही औरच आहे.

ईशान छेडा
मी त्याचे बहुतेक सगळे एपिसोड्स पाहिले आहेत. त्याने मला जादू, मॅजिक अशा गोष्टी जगात आहेत या गोष्टीवर विश्वास ठेवायला लावलंय. त्याच्या जादूने मोहून जायला होतं. त्याच्या पत्त्यांच्या ट्रिक्स चक्रावून टाकतात.

रिध्वी शहा
मला खरं तर डायनामोबद्दल जास्त माहीत नव्हतं. माझा नवरा त्याचे शोज बघतो. तो इथे येणार म्हणून मी त्याचे काही एपिसोड्स युटय़ूबवर पाहिले. आधीतर मी फक्त त्याच्या लोभस चेहऱ्याची चाहती होती, पण आता त्याच्या जादूचीही चाहती झाली आहे. घरी जाऊन नेटवर मी त्याचे सगळे शोज बघणार आहे.

मनाली सोनावणे
तो स्वत: मॅजिकल आहे. अमुक एका गोष्टीमुळे तो मला आवडतो असं मी खरंच नाही सांगू शकत. पण ज्या पद्धतीने तो जादू सादर करतो ते मला खूप आवडतं. तो एखाद्या मित्राप्रमाणे वाटतो. थेम्स नदीवरून चालताना त्याला पाहून मी थक्कच झाले होते. तो खरोखर पाण्यावरून चालला होता.. आणि ते पण वाहत्या पाण्यावरून. कुठेतरी बनवलेल्या सेटवरून तो चालत नव्हता, खरी नदी होती ती.

सई जोशी
तो मला आवडतो. का ते मी सांगू शकत नाही, पण आवडतो. तशा मी त्याच्या खूप ट्रिक्स पाहिल्या आहेत, पण त्यातली एक म्हणजे त्याची हवेत तरंगण्याची ट्रिक. सगळ्या लोकांसमोर काही क्षणात कुठल्याही स्टिकचा वापर न करता त्याने हे कसं केलं हे मला समजलंच नाही.

सागर चाटला
मी काय सांगू त्याच्याबद्दल. एकच सांगतो, उद्या माझी परीक्षा आहे आणि तरी मी आज शोला आलोय. यावरूनच तुम्हाला कळेल मी किती मोठा चाहता आहे त्याचा. टीव्हीवर तर त्याला रोज पाहतो, पण एकदा तरी त्याला भेटायला मिळावं अशी खूप दिवसांपासून इच्छा होती. आज ती इच्छा पूर्ण झाली. आज तो प्रत्यक्ष माझ्यासमोर होता हे अजूनही माझ्या मनाला पटत नाही आहे. कदाचित हासुद्धा त्याच्या जादूचाच एक भाग असावा.