04 July 2020

News Flash

प्रयोग : उजेडाची पेरणी!

‘अ‍ॅक्टिव्ह टीचर फोरम’ हा राज्याच्या कानाकोपऱ्यातल्या काही शिक्षकांचा समूह शिक्षणक्षेत्रात विविध प्रयोग करतो आहे. उद्याची पिढी घडवणाऱ्या या प्रयोगांची विविधता पाहिली की ‘केल्याने होत आहे

| June 20, 2014 01:22 am

‘अ‍ॅक्टिव्ह टीचर फोरम’ हा राज्याच्या कानाकोपऱ्यातल्या काही शिक्षकांचा समूह शिक्षणक्षेत्रात विविध प्रयोग करतो आहे. उद्याची पिढी घडवणाऱ्या या प्रयोगांची विविधता पाहिली की ‘केल्याने होत आहे रे’ या उक्तीची आठवण होते.

ही गोष्ट साधारण तीन वर्षांपूर्वीची असेल. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने संपादित केलेल्या ‘उपक्रम – वेचक, वेधक’ या पुस्तकात महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील यशोगाथा प्रसिद्ध झाली होती. त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे तत्कालीन राज्य प्रकल्प संचालक नंदकुमार यांनी या शिक्षकांच्या उपक्रमांची माहिती घेण्यासाठी मुंबई येथे २४ फेब्रुवारी २०११ रोजी एका कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत नंदकुमार यांनी महाराष्ट्रातील उपक्रमशील शिक्षकांचा एक कार्यगट स्थापन करण्यात यावा व त्याद्वारे शिक्षण क्षेत्रातील चांगल्या गोष्टींची देवाणघेवाण व्हावी अशी अपेक्षा केली होती.
नंदकुमार यांच्या कल्पनेला मूर्त स्वरूप देत नगर जिल्ह्य़ातील बहिरवाडी या बहुचर्चित शाळेतील प्रयोगशील शिक्षक भाऊसाहेब चासकर यांनी महाराष्ट्रातील असंख्य शिक्षक व शिक्षण कार्यकर्ते यांची एकत्र मोट बांधून ‘अ‍ॅक्टिव्ह टीचर फोरम’ ची स्थापना केली. त्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणाचा बट्टय़ाबोळ झालाय अशी आवई उठवणाऱ्यांना भाऊसाहेब चासकर यांनी शिक्षणातील विधायक कामांचा दाखला देत सडेतोड उत्तर दिले आहे. त्यांच्या याच सकारात्मक भूमिकेवर या फोरमची उभारणी झाली होती.
फेसबुक आणि व्हाट्स अ‍ॅप या सोशल मीडियाद्वारे शैक्षणिक विचार व अनुभवांची देवाणघेवाण हा फोरम करत होता. स्वत: नंदकुमार, नामदेव माळी, तृप्ती अंधारे, प्रतिभा भराडे हे अधिकारी तसेच काही संपादक, पत्रकार, पर्यावरण व लैंगिक शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते आणि असंख्य शिक्षक यांचा समावेश असलेल्या या फोरममध्ये शिक्षणविषयक बाबींची अतिशय सुसंगत व प्रगल्भ अशी चर्चा होत होती. यातील कित्येक सदस्यांनी एकमेकांना कधीही पाहिले नव्हते; तरीदेखील समान जाणिवेतून या सर्वामध्ये ‘बिनचेहऱ्यांचे ऋणानुबंध’ निर्माण झाले होते. एकमेकांना प्रत्यक्ष भेटता यावे, अनुभवता यावे आणि पुढील वाटचालीची दिशा ठरवावी या हेतूने चासकर यांनी रचनावादी शिक्षण संमेलनाची संकल्पना मांडली. सर्वानाच ती खूप आवडली. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांच्यामुळे या संकल्पनेला सुंदर आकार मिळाला. विषयनिवडीपासून ते प्रत्यक्ष कार्यवाहीपर्यंत फोरममधील प्रत्येक सदस्य अनामिक ऊर्जेने आणि अंत:स्थ प्रेरणेने झटत होता.
संमेलनाच्या पहिल्या सत्रात किशोर दरक यांनी पाठय़पुस्तकांचा इतिहास व निर्मिती प्रक्रिया याविषयी आपले चिकित्सक विचार मांडले. पाठय़पुस्तकात आजपर्यंत स्थान न मिळालेल्या समाजघटकांना पाठय़पुस्तकात स्थान दिले पाहिजे, तसेच पाठय़पुस्तकाला घटनेच्या मूल्यांची चौकट असावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
संजय टिकारिया, नागेश वाईकर, वैशाली गेडाम, अनिल सोनुने, प्रल्हाद काटोले, फारूक काझी, जे.के.पाटील, राम सालगुडे व सुजाताताई पाटील या उपक्रमशील शिक्षकांचे ज्ञानरचनावादावर आधारित विविध शैक्षणिक प्रयोग आणि अनुभव सर्वाच्याच कौतुकाचे धनी ठरले.
‘माझी शाळा’ टीमचा सुमित्रा भावे आणि इतर सदस्यांसोबत रात्री साडेनऊ वाजेपर्यंत वार्तालापाचा कार्यक्रम रंगतच गेला.
दुसऱ्या दिवसाची सुरुवात नीलेश निमकर यांच्या ‘भाषा विषयातील गुणवत्ता व शिक्षण’ या व्याख्यानाने झाली. सर्वसाधारणपणे अवघड समजला जाणारा गणित हा विषय विविध शैक्षणिक साधनांद्वारे सहजसोपा कसा करावा हे नवनिर्मिती फाऊंडेशनचे विवेक माँटेरो आणि गीता महाशब्दे यांनी प्रात्यक्षिकाद्वारे दाखवून दिले.
‘वाढत्या वयातल्या मुलांच्या समस्या आणि शिक्षण’ या विषयावर ‘पालकनीती’च्या संपादिका संजीवनी कुलकर्णी यांनी महत्त्वपूर्ण विचार मांडले. विवेक सावंत यांनी विद्यार्थ्यांसाठी प्रगत तंत्रज्ञानाच्या वापराची आवश्यकता व्यक्त केली. फोरमचे दीपस्तंभ असणाऱ्या नंदकुमार यांनी शिक्षण खात्यातून बदली होऊनसुद्धा केवळ शिक्षण आणि शिक्षकांवरील प्रेमापोटी या संमेलनाला स्वत:च्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून संपूर्ण दिवसभर हजेरी लावली.
आपल्या मनोगतामध्ये त्यांनी नर्मविनोदी शैलीने सर्वासोबत सहजसंवाद साधला. अ‍ॅक्टिव्ह टीचर फोरमचे सार्वत्रिकीकरण होऊन जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत हा फोरम पोहोचला पाहिजे आणि त्यातून महाराष्ट्रात गुणवत्तेची शैक्षणिक चळवळ उभी राहिली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संमेलनस्थळी असलेल्या पुस्तकांच्या विविध स्टॉलवर वाचकांचा चांगला प्रतिसाद लाभला. शिक्षणविषयक पुस्तकांना आणि मासिकांना विशेषकरून मागणी असल्याचे जाणवले.
संमेलन केवळ निमंत्रितांसाठीच होते, त्यामुळे याची पूर्वप्रसिद्धी शक्यतो टाळली होती पण तरीदेखील अभूतपूर्वक असा प्रतिसाद आणि उत्साह मिळाल्यामुळे हे एसएम जोशी सोशिअलच्या छोटय़ा हॉलपुरतेच मर्यादित असलेले हे संमेलन अलिबागपासून चंद्रपूपर्यंत आणि नंदुरबारपासून ते कोल्हापूरच्या दख्खनी टोकापर्यंत सर्वदूर पसरले. रचनावादी शिक्षणाच्या दिशेने आणखी भक्कम पावले टाकण्याच्या प्रयत्नांना यामुळे निश्चितच बळ मिळू शकेल. शिक्षण क्षेत्राविषयी जाणीवपूर्वक निर्माण केलेल्या नकारात्मक चित्रणाच्या पाश्र्वभूमीवर हे संमेलन म्हणजे उजेडाचीच पेरणी आहे असे म्हणावे लागेल. नंदकुमार यांनी कधीकाळी रुजवणूक केलेल्या या संकल्पनेला मूर्तिमंत रूप देण्याचे महत्त्वाचे काम भाऊसाहेब चासकर यांनी केले आणि सर्व सदस्यांनी यामध्ये सक्रिय कार्यकर्त्यांची भूमिका निभावली, म्हणून तर हे संमेलन पुढील वाटचालीसाठी आत्मविश्वास, ऊर्जा व प्रेरणा देणारे ठरले.
अ‍ॅक्टिव्ह टीचर्स फोरममध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क : bhauchaskar@gmail.com

यशोगाथा प्रकाशयात्रींची.. 

प्रयोगशील शाळा
भाऊसाहेब सखाराम चासकर – अकोले तालुक्यात आदिवासी भागात असणारी बहिरवाडी या जिल्हा परिषदेच्या शाळेत भाऊंची नेमणूक झाली तेव्हा ही शाळा खूपच मागास होती. भाऊंनी ग्रामस्थ, पालक यांच्या माध्यमातून शाळेच्या परिस्थितीचा आढावा घेऊन लोकवर्गणी जमा केली आणि थेट तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि सीडॅकचे डॉ. विजय भटकर यांना पत्र लिहून शाळेबद्दल आणि आपल्या भावी योजनांबद्दल कळवले. त्यानंतर मनुष्यबळ खात्याच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शाळेला संगणक मिळाले, शाळा डिजिटल झाली शाळेत आदिवासी मुलांसाठी शिक्षण प्रक्रिया आनंददायी बनविण्यासाठी शिक्षण त्यांच्या जीवनाशी जोडण्यासाठी अनेक उपक्रम सुरु झाले. राज्यातील एक प्रयोगशील शाळा म्हणून शाळेची ओळख झाली. दुर्गम भागात शाळा असूनदेखील कसे बदल करता येतात याचे हे उत्तम उदाहरण आहे. शिक्षणातील हेच बदल सर्वच ठिकाणी पोहचावे म्हणून त्यांनी पुढाकार घेऊन अ‍ॅक्टिव्ह टिचर्स फोरमची निर्मिती केली.

ज्ञानरचनावादाचा प्रसार 
प्रतिभा भराडे- विस्तार अधिकारी, सातारा त्यांनी ज्ञानरचनावादी शिक्षणासाठी आपल्या शाळांची मनोवैज्ञानिक जडणघडण केली आहे. त्यांच्या बीटमधील शाळा मार्च महिन्यातच नव्या शैक्षणिक वर्षांसाठी सज्ज होतात. मुलांना विविध खेळ शिकवले जातात. यासाठी बाके काढून टाकलेली आहेत. गेल्या वर्षीची पुस्तके शाळेतील अभ्यासासाठी तर नवी कोरी पुस्तके घरी अभ्यासासाठी. दफ्तराच्या ओझ्याचा प्रश्नच नाही. विविध क्षमतांसाठी चार महिन्यात मुलांना तयार करून घेतले जाते. शाळेत मुलांना खेळण्यासाठी मोकळी भरपूर जागा आहे. हात व डोळे यांच्या समन्वयातून पुढे कसे जायचे याचे चित्रण त्यांनी केले आहे. ज्ञानरचनावाद वास्तवात कसा आणावयाचा यासाठी कोणकोणते उपक्रम आहेत या सर्वाची त्यांनी जंत्रीच तयार केली आहे. मुलांच्या क्षमता कशा विस्तारत न्यायच्या याचे काही आराखडे त्यांनी तयार करून विकसित केलेले आहेत.

कार्यानुभवाला प्राधान्य
जयगोंडा पाटील (जि. प. शाळा केंजळ, ता. भोर, जि. पुणे)- ज्या शाळेत काही दिवसांत ४२ लाखांचा एनर्जी पार्क तयार होतो आहे किंवा हा मजकूर प्रसिद्ध होईपर्यंत तयारही झालेला असेल अशा शाळेचे हे शिक्षक आहेत. शाळेत त्यांनी कृतिकेंद्रित शिक्षणावर भर दिला आहे. विद्यार्थ्यांना दोन संबंधित विषयांमधील अंतराचा अडसर वाटत नाही. आपलं मूल्यमापन होत आहे हे त्यांना कुठे समजतच नाही इतकी शाळा मोकळीढाकळी आहे. या शाळेत जर सर्वोत्तम काही असेल तर कला, कार्यानुभव व शारीरिक शिक्षण, की जे अनेक ठिकाणी काहीसे दुर्लक्षित असतात वा केले जातात तेच विषय या शाळेत बलस्थान आहे. मुलांच्या सहली तसेच प्रात्यक्षिके ही या शाळेची बलस्थाने आहेत.

संजय टीकारिया- वाईचे नागेश वाईकर यांच्या भक्कम साथीने संजय (जि. जालना) यांनी प्रयोगपेटी किंवा विज्ञानपेटी विकसित केली आहे. याची विशेषता म्हणजे ही सहजच काखेत घेऊन फिरता येते. समजा फुगा जर फुगवला तर हवा जागा व्यापते हे सिद्ध होते. तोच फुगा जर ग्लासात फुगवला तर? एका प्रयोगातून दुसरा प्रयोग असे पंचतंत्रातील कथांसारखे १०० प्रयोग यातून करता येतात. आजवर या प्रयोगपेटीला अनेक पारितोषिके प्राप्त झालेली आहेत. या प्रयोगपेटीला नागेश वाईकरांच्या भक्कम मदतीचा टीकारिया उल्लेख करतात.

वेळ वाचवण्याचे तंत्र
राम सालगुडे (जि. प. शाळा माळवाडी, जि. सातारा) –  crcmardi.blogspot.com  ही निर्मिती आहे या काटोले सरांची. शिक्षकाचा वेळ जास्तीत जास्त अध्यापनातच जायला हवा. पण हे खरे असले तरी गुरुजींचा वेळ जातो कागदपत्रे गोळा करण्यात. परिपत्रके मिळवताना तर दमछाक होते. यावर एक खास उपक्रम तयार केला तो या शिक्षकांनी. यामुळे सर्वाचा वेळ तर वाचतोच, पण हा वेळ अध्यापनासाठी सत्कारणी लावता येतो. सालगुडे सर यांच्यावर उपशिक्षक पदासह केंद्रप्रमुख पदाची जबाबदारी पडली. अनेकांचे सल्ले होते की अंगावर जास्त कामे घेऊ नकोस, सगळ्यांच्या ओझ्याचा गाढव होशील. मात्र यांनी सगळा डाटा एका संकेतस्थळावर टाकला. पंचायत समितीला संगणकाची सवय लावली. तालुक्याच्या खेपा वाचवल्या. संगणकाची किमया कशी असते ते त्यांनी प्रशासनासह शिक्षकांना दाखवून दिले.

तंत्रकुशल शिक्षक
अनिल सोनुले- (जि. प. शाळा निमखेडा, जि. जालना) यांना महाराष्ट्र शासनाची सर्वोत्तम संकेतस्थळासाठीची पारितोषिके मिळालेली आहेत. www.baljagat.com हे संकेतस्थळ अवघ्या बच्चेकंपनीला आवडलेलं आहे. शाळा तंत्रयुक्त कशी करावी हे शिकावं ते सोनुले सरांकडूनच. २०१० व २०१२ साली त्यांनी देशाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केले आहे. प्राग व केपटाऊन येथे त्यांनी मायक्रोसॉफ्टतर्फे आयोजित शैक्षणिक स्पध्रेत धडा अध्यापन या विषयावर सादरीकरण केले. दोन वर्षांनी केपटाऊनला वर्गातील इंटरअ‍ॅक्टिव्ह फळा तयार केला. जि. प. शाळेतील शिक्षक सातासमुद्रापार झेप घेतो ही बाब सर्वाना अभिमानास्पद आहे. त्यांनी स्वत: शिकून वेबसाइट तयार केली आहे. विविध तंत्रे त्यांनी अगोदर स्वत: आत्मसात केली. प्राग शहरात त्यांनी तयार केलेला क्लासमेट पीसी हा प्रकल्प विलक्षण रोमांचक होता. भारत देशाचे प्रतिनिधित्व करणारे हे शिक्षक तंत्रकुशल तर आहेतच, पण ज्ञानाला तंत्राच्या मुशीत घालण्याचा मंत्रही त्यांनी आत्मसात केला आहे.

‘आंतरभारती’ची उभारणी
सुजाता पाटील (सृजन आनंद विद्यालय, गाव कुरूल, ता. अलिबाग, जि. रायगड)- या बाईंच्या शाळेत निम्म्या भारत देशातील मुले शिक्षण घेतात. चहूबाजूंनी विस्तारित होत असलेल्या अलिबाग शहरात परगावातून व राज्यातून येत असलेल्या स्थलांतरित व नोकरीनिमित्ताने वा पोटापाण्यासाठी आलेल्यांच्या मुलांना बाईंच्या शाळेचा आसरा असतो. साने गुरुजींची आंतरभारती बाईंच्या शाळेतच साकार झालेली आहे. काय नाही बाईंच्या शाळेत? रचनावादी वर्ग आहेतच, पण मुलांना भयमुक्त वातावरणात शिक्षण मिळते. बाईंनी चित्रकलेचा खुबीने वापर बालविकासासाठी केला आहे. वर्गात वारली चित्रे आहेतच, पण अध्यापनातील व अध्ययनातील आशय त्या चित्रातून जिवंत करतात. बालस्नेही वातावरण शाळेत असे आहे की मुलांना बाईंची वा गुरुजींची भीती वाटत नाही. कला व कार्यानुभव हे विषय त्यांनी आपल्या शाळेत चालते-बोलते केले आहेत. शाळेतील प्रत्येक िभतीवर त्याची साक्ष बघायला मिळते. केवळ िभतीवर नव्हे तर वर्गात आपणाला सिमेंटच्या वाया गेलेल्या पिशव्यांपासूनची बसकटे बघायला मिळतील. पाण्याचे फुगे किंवा रांगोळी अशा विविध कलाकुसरीतून त्यांचा वर्ग जिवंत होतो. यासाठीच भाषा भिन्न असली तरी ही अठरापगड जातीची व बहुभाषिक मुले कधी परस्परांत मिसळतात ते त्यांनाही कळत नाही. सारे भारतीय माझे बांधव आहेत ही प्रतिज्ञेतील ओळ बाईंच्या शाळेत जिवंत होते. सामाजिक भान, सौंदर्यदृष्टी, खिलाडूवृत्ती या गोष्टी पाहायच्या असतील तर आपणाला अलिबागच्या या विद्यालयाला भेट द्यायला हवीच.

शिक्षकांचं सोशल नेटवर्क
प्रल्हाद काटोले (जि. प. शाळा घाठाळवाडी, ता. वाडा, जि. ठाणे.) – यांनी शिक्षक अभ्यास मंडळ स्थापन केले. व्यवसाय बंधूंना एकत्र आणत त्यांनी वैचारिक देवाणघेवाणीचा संवाद-सेतू उभारला. शिक्षक अभ्यास मंडळ हे याला नाव दिले गेले आहे. शिक्षकांच्या अशा उपक्रमात त्यांनी सोशल नेटवर्कच उभे केले आहे. विविध शिक्षक या उपक्रमाला धन्यवाद देतात. शिक्षकांच्या ज्ञानाची भूक भागवण्याचे काम करतात.

डिजिटल शाळा
संदीप गुंड (जि. प. शाळा पष्टेपाडा जि. ठाणे) – ठाणे जिल्ह्यतील शिरपूर तालुक्यातील पष्टेपाडा इथल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील संदीप गुंड या शिक्षकाने तंत्रज्ञानाची आणि आधुनिकतेची जोड गावातील मुलांच्या शिक्षणाला द्यायची ठरवली आणि खडू-फळाविरहित ‘माझी डिजिटल शाळा’ हा अभिनव उपक्रम सुरू केला. आज चार वर्षांनंतर ही झेडपीची संपूर्ण शाळा डिजिटल झालीय. सातत्यपूर्ण र्सवकष मूल्यमापनातील सर्व अभिलेखे विद्यार्थीनिहाय फोल्डर तयार करून त्यात ठेवली जातात. त्यामुळे रेकॉर्ड हरवण्याची किंवा शिक्षण अधिकारी आल्यावर रेकॉर्डची शोधाशोध करण्याची गरज पडत नाही.
जानेवारी २०१० साली लोकवर्गणी उभारून संदीप गुंड यांनी शाळेत या उपक्रमाची सुरुवात झाली. एका संस्थेकडून संगणकाची मदत मिळवली आणि पारंपरिक खडू-फळा पद्धतीला छेद देण्याचा यशस्वी प्रयोग या शाळेत केला गेला.
लोकसहभाग, शिक्षकांची मदत, लोकप्रतिनिधींची मदत यांच्याशिवाय इतका मोठा निधी गोळा करणं अशक्यच होतं. पण उपक्रमाची निकड ओळखून समाजातील प्रत्येक घटकाने सढळ हस्ते मदत केली आणि अखेर ही आदर्श शाळा उभी राहिली. शाळेला भौतिक सोयीसुविधायुक्त करण्यासोबतच चाइल्ड थिएटर क्लासरूम ही संकल्पनाही प्रत्यक्षात उतरवली गेली. या संकल्पनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आवडणारे विविध कार्टून्स िभतीवर रंगवण्यात आले. छतावर वैशिष्टय़पूर्ण तारांगण रेखाटलं गेलंय. यामुळे मुलांना अवकाशात स्वच्छंदी फिरण्याचा भास होत होता.
लोकसहभागातून पहिल्या डिजिटल वर्गाच्या खोलीत लोकवर्गणीतून उपलब्ध झालेल्या एलटीडी टीव्हीला प्रोजेक्टर जोडून अध्यापनाला सुरुवात झाली, तर चाइल्ड थिएटर क्लासरूममध्ये संगणक, प्रोजेक्टर तसंच अध्ययन अध्यापनात वापरलं जाणारं आजचं स्मार्ट तांत्रिक साधन म्हणजे इंटरअ‍ॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड या महागडय़ा साधनाचा समावेश करण्यात आला.
विद्यार्थ्यांचा कृतिशील सहभाग मिळवण्यासाठी घटकासंबंधी विविध कृतिमुक्त अनुभव स्मार्ट बोर्डवर सोडवले जातात. वर्षभर विद्यार्थ्यांने सोडवलेल्या अ‍ॅक्टिव्हिटी त्याच्या नावाच्या फोल्डरमध्ये सेव्ह केल्या जातात. त्या फोल्डरलाच डिजिटल संचालिका असं संबोधलं जातं. या पुराव्यातूनच त्या विद्यार्थ्यांचं वर्षभराचं मूल्यमापन केलं जातं.
लहान मुलांना पाटीवर लिहिताना जो आनंद मिळतो, वाटतो त्यापेक्षाही जास्त आनंद स्मार्ट बोर्डवर लिहिताना मिळतो. तसंच या तंत्रामुळे मुलं स्वतहून स्वयंध्ययन करू लागली आहेत. वेगवेगळ्या अ‍ॅक्टिव्हिटी सोडवू लागली आहेत. मोबाइल पाठ, सॅटर्डे फिल्म, इंटरअ‍ॅक्टिव्ह चित्रकला, बालमित्र अ‍ॅक्टिव्हिटी यासारखे दैनंदिन डिजिटल उपक्रम या शाळेतील मुलं स्मार्टबोर्डच्या आधारे सोडवू लागली आहेत. या स्मार्टबोर्डमुळे नेहमीचा रटाळवाणा खडू, फळा बाजूला सरला आणि या पाडय़ावरची ही चिमुकली माहिती तंत्रज्ञानाधारित शिक्षण घेऊ लागलीय. गेल्या शैक्षणिक वर्षांत ई-बुक या शैक्षणिक साहित्यात ठाणे जिल्ह्याने प्रथम क्रमांक मिळवला आहे.
मुलांना डिजिटल शाळेसोबातच संदीप गुंड यांनी फिरता डिजिटल शैक्षणिक आणि प्रशिक्षणात्मक कार्यक्रम, थ्रीडी शैक्षणिक शो, डिजिटल इंटरअ‍ॅक्टिव्ह सॉफ्टवेअरद्वारे या उपक्रमांची माहिती आणि त्याची उपयुक्तता सर्व राज्याला पुरवण्याचा प्रयत्न केला आहे. आज या छोटय़ाशा पाडय़ावरील शाळेला पाहण्यासाठी राज्यातील अनेक शिक्षणप्रेमी, मंत्री, राजकारणी आवर्जून भेट देत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2014 1:22 am

Web Title: maharashtra active teacher forum
टॅग Study,Teacher
Next Stories
1 शंभरावी माळ!
2 नोंद : गुज्जूगोष्टी
3 स्वास्थ्य : स्वास्थ्याकरिता ऋतुचर्या- जुलै महिना
Just Now!
X