10 July 2020

News Flash

क्रीडा : मोटारस्पोर्ट्समध्ये मराठी झेंडा!

वाऱ्याच्या वेगावर स्वार होणाऱ्या कार्सच्या थरारावर आता मराठी नावही कोरलं जायला लागलं आहे. कारण मोटारस्पोर्ट्समध्ये भाग घेणाऱ्या मराठी मुलांची संख्या वाढायला लागली आहे.

| November 21, 2014 01:25 am

lp39
वाऱ्याच्या वेगावर स्वार होणाऱ्या कार्सच्या थरारावर आता मराठी नावही कोरलं जायला लागलं आहे. कारण मोटारस्पोर्ट्समध्ये भाग घेणाऱ्या मराठी मुलांची संख्या वाढायला लागली आहे.

मोटारस्पोर्ट्स म्हणजे वेगाचा थरार, सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि मानवी कौशल्य यांचा अनोखा मिलाफ. सुसाट वेगाने झपकन निघून जाणाऱ्या कार म्हणजे मोटारस्पोर्ट्स. २०११ ते २०१३ या तीन वर्षांत भारतीय चाहत्यांनी फॉम्र्युला-वनचा थरार अनुभवला. त्यानंतर या खेळाला ‘अच्छे दिन’ येणार, अशी चर्चा सुरू झाली; पण या खेळाला भारतीय सरकारने दिलेला मनोरंजनपर खेळाचा दर्जा तसेच करसवलत नाकारणे आणि फॉम्र्युला-वन शर्यतीसाठी भारतात येणाऱ्या पदाधिकाऱ्यांना व्हिसा मिळवण्यात येणाऱ्या अडचणी यामुळे भारतातून फॉम्र्युला-वनची उचलबांगडी करण्यात आली. आता सर्व सोयीसुविधा असतानाही पुन्हा भारतात फॉम्र्युला-वन शर्यत होईल का, हे कुणीही सांगू शकणार नाही.

गेल्या काही वर्षांत मोटारस्पोर्ट्स खेळातील मराठी टक्का अगदी नगण्य होता. हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच ड्रायव्हर्स मराठीचा झेंडा फडकवत होते; पण फॉम्र्युला-वनच्या पदार्पणामुळे या खेळाकडे वळणाऱ्यांची संख्या वाढली. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा झेंडा अभिमानाने फडकवणारे अनेक मराठी ड्रायव्हर्स आता पुढे येऊ लागले आहेत. महाराष्ट्रात कोणत्याही सोयीसुविधा नसतानाही मराठी ड्रायव्हर्सनी मोटारस्पोर्ट्स या खेळात मोठी झेप घेतली आहे. अमेय वालावलकर, पार्थ घोरपडे, कृष्णराज महाडिक, अमित मेटे, समीर धनवडे यांसारख्या मराठी ड्रायव्हर्ससह महाराष्ट्रातून चित्तेश मंदोडी, अमेय बाफना, स्नेहा शर्मा (महाराष्ट्रातील एकमेव महिला ड्रायव्हर), नयन चॅटर्जी, राहील नूरानी, गौरव मेहता, अंशूल शाह, अंतरिक्ष शर्मा, आर्य गांधी आणि प्रदीप शर्मा आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या चमकत आहेत.

मुंबईनंतर कोल्हापूरमध्ये रेसिंगचा ट्रॅक उघडल्यानंतर तरुण पिढीची पावले या ट्रॅककडे वळली नसती तर नवलच म्हणावे लागले असते. कृष्णराज महाडिकही त्यापैकीच एक. ध्रुव मोहिते या लहानपणीच्या मित्राच्या वडिलांनी कोल्हापूरमध्ये ट्रॅक उघडल्यानंतर ध्रुवने कृष्णराजला शर्यत पाहण्याचे निमंत्रण दिले. वेगाचा थरार पाहून कृष्णराज मंत्रमुग्ध झाला आणि त्याने या खेळात नशीब अजमावण्याचा प्रयत्न केला. सचिन मंदोडी यांच्याकडून प्रशिक्षणाचे धडे गिरवत त्याने मोटारस्पोर्ट्समध्ये करिअर घडवण्याचा निर्णय घेतला. मोटारस्पोर्ट्स खेळ खर्चीक असल्यामुळे घरच्यांनी मला पैशांच्या बाबतीत कमतरता पडू दिली नाही. त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी मोटारस्पोर्ट्स खेळात यशस्वीपणे झेप घेऊ शकलो. कोल्हापूर, हैदराबाद, दिल्ली, कोइम्बतूर या देशातील ट्रॅकवर गुणवत्तेची छाप पाडणाऱ्या कृष्णराजने मलेशिया आणि पोर्तुगालमध्येही देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. मलेशियामध्ये कृष्णराजने २०१३ साली सेपांक कार्ट चॅलेंज चॅम्पियनशिपमध्ये जेतेपद पटकावले आहे. त्याचबरोबर २०१३ मध्ये त्याने जेके टायर ज्युनियर रोटॅक्स कार्ट चॅलेंज स्पर्धा जिंकली होती. पोर्तुगाल आणि अमेरिकेतील कार्टिग स्पर्धामध्येही त्याने देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. आता फॉम्र्युला-वनमध्ये मजल मारण्याचे आणि यशस्वी ड्रायव्हर म्हणून कारकीर्द घडवण्याचे त्याचे स्वप्न आहे.

अमित अंबादास मेटे हा औरंगाबादमधील धाडसी तरुण. लहानपणापासूनच कारदुरुस्तीचे काम करण्याचे व्यसन जडले. वडिलांच्या गॅरेजमध्ये जाऊन तो कारच्या दुरुस्तीसह कारच्या भागांचा बारकाईने अभ्यास करू लागला. त्यानंतर त्याला मोटारस्पोर्ट्स या खेळाची गोडी लागली. वयाच्या १२व्या वर्षांपासून कार चालवायला सुरुवात केल्यानंतर त्याने मोटारस्पोर्ट्स या खेळात उडी घेतली; पण घरातून सुरुवातीला त्याला पाठिंबा मिळत नव्हता. मोटारस्पोर्ट्स या जीवघेण्या खेळात कारकीर्द घडवू नकोस, ही त्याच्या कुटुंबीयांची मानसिकता होती; पण घरातल्या मंडळींना योग्य पद्धतीने समजावल्यानंतर अखेर अमितला ग्रीन सिग्नल मिळाला; पण या खेळात कारकीर्द कशी घडवायची, याची कल्पना नसल्यामुळे त्याने इंटरनेटवरून या खेळाची माहिती घेतली. महाराष्ट्रात सरावासाठी ट्रॅक नसल्याची खंत अमितला जाणवते. महाराष्ट्रात ट्रॅक उपलब्ध झाला, तर अन्य राज्यांत जाऊन सराव करण्याचा आमचा खर्च वाचेल, असे अमितला वाटते. अमित हा मोटारस्पोर्ट्स या खेळात सध्या नवखा असला तरी मोठी झेप घेण्याचे उद्दिष्ट त्याने आखले आहे. पुढील पाच वर्षांत भारतात मोटारस्पोर्ट्स खेळाला चांगले दिवस येतील, अशी आशा अमितला वाटते.

कोल्हापूरच्या चित्तेश मंदोडी याच्या वडिलांचाही कारचा व्यवसाय; पण लहान असताना कारची आवड नसलेला चित्तेश एकदा कोल्हापूरच्या कार्टिग ट्रॅकवर गेला आणि त्याचा या खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. सुरुवातीला आशुतोष काळे यांच्याकडून सरावाचे धडे गिरवल्यानंतर चित्तेशने मोटारस्पोर्ट्स खेळात भरारी घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर अकबर इब्राहिम यांनी चित्तेशला शर्यतींमध्ये कशी कामगिरी करायची, याचे प्रशिक्षण दिले; पण आर्थिक गणित जमू न लागल्यामुळे चित्तेशने वर्षभरासाठी या खेळातून माघार घेतली होती. त्यानंतर त्याला मोहिते रेसिंग टीमने आधार दिला. कार्टिग फोर स्ट्रोकपासून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या चित्तेशने आतापर्यंत रोटॅक्स, फॉम्र्युला रोल-ऑन, फॉम्र्युला एलजीबी, फॉम्र्युला बीएमडब्ल्यू या प्रकारांत लक्षणीय कामगिरी केली आहे. कार्टिगमध्ये २००७ मध्ये ज्युनियर आणि २०११ मध्ये सीनियर जेतेपदावर त्याने नाव कोरले. एलजीबी आणि बीएमडब्ल्यू या प्रकारात तिसरे स्थान पटकावल्यानंतर आता त्याला राष्ट्रीय जेतेपद पटकावण्याचे वेध लागले आहे. शनिवार, रविवारी शर्यतींमध्ये सहभागी झाल्यानंतर अन्य दिवशी युवा, प्रतिभावान ड्रायव्हर्सना प्रशिक्षण देण्याचे त्याचे काम सुरू आहे.

मोटारस्पोर्ट्स या खेळावर पुरुषांची मक्तेदारी; पण पुरुषांच्या खांद्याला खांदा भिडवून मुंबईची स्नेहा शर्मा सर्वाचे आकर्षण ठरली आहे. मोटारस्पोर्ट्स या खेळात महिलांची संख्या फारच कमी; पण अलिशा अब्दुल्लानंतर भारतीय मोटारस्पोर्ट्समध्ये चमकणारी स्नेहा ही दुसरी महिला ड्रायव्हर ठरली आहे. मुंबईकर स्नेहा शर्मा ही व्यवसायाने पायलट. १७व्या वर्षी अमेरिकेत जाऊन पायलटचे प्रशिक्षण घेतल्यानंतर ती सध्या इंडिगो एअरलाइन्समध्ये पूर्णवेळ नोकरीत रुजू आहे; पण आकाशात उंच भराऱ्या घेतानाच रेसिंग ट्रॅकवर सुसाट वेगाने गाडी चालवण्याचा तिचा छंद आहे. हौशी ड्रायव्हर म्हणून कार्टिग स्पर्धामध्ये यश मिळाल्यानंतर स्नेहाने मोटारस्पोर्ट्स खेळात नशीब अजमावण्याचा प्रयत्न केला. सध्या पायलट आणि मोटारस्पोर्ट्स या दोन गोष्टींकडे लक्ष केंद्रित केल्यामुळे स्नेहाला कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि मित्रमंडळी तसेच बाकीच्या गोष्टींसाठी वेळही मिळत नाही. दिवसातील २४ तास तिने फक्त वेगाचा ध्यास घेतला आहे. मुंबई, कोल्हापूर, गोवा, कोइम्बतूर, हैदराबाद येथे कार्टिगचे धडे गिरवणाऱ्या स्नेहाला नोकरीमुळे सरावासाठी वेळही मिळत नाही. त्यामुळे सराव न करताच ती स्पर्धामध्ये सहभागी होते; पण कारवरील तिचे नियंत्रण आणि बेधडक वृत्ती वाखाणण्याजोगी आहे. याच गुणांमुळे तिने मोटारस्पोर्ट्स खेळात आपले स्वत:चे अस्तित्व निर्माण केले आहे. आता एलजीबी-४ या प्राथमिक टप्प्यातून मार्गक्रमणा करत फॉम्र्युला-३ बनण्याचे तिचे ध्येय आहे.

नोएडातील बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर फॉम्र्युला-वनचा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर राज्याचे तत्कालीन मंत्री छगन भुजबळ यांनी मुंबई आणि आसपासच्या परिसरात रेसिंग ट्रॅकसाठी जागेची चाचपणी केली होती. अहमदनगर जिल्हय़ातही रेसिंग ट्रॅक उघडणार, अशी चर्चा आहे. महाराष्ट्रात सध्या ट्रॅक आणि अन्य सोयीसुविधांची वानवा आहे; पण या सोयीसुविधा राज्यातच उपलब्ध झाल्या, तर येत्या काही वर्षांत मराठी ड्रायव्हर्सची संख्या कित्येक पटींनी वाढेल, हे निश्चित.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2014 1:25 am

Web Title: maharashtrian in car racing game
टॅग Krida,Sports
Next Stories
1 गांगरलेली मुलं आणि गोंधळलेले पालक
2 परखड शास्त्रीय माहितीची गरज
3 चित्रपटांतून उलगडणारं ‘त्यांचं’ भावविश्व
Just Now!
X