09 March 2021

News Flash

स्मरण : साबरमती आश्रमात ‘भेटलेले’ गांधीजी

३० जानेवारीच्या गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष विभाग-

महात्मा गांधी

जयप्रकाश झेंडे – response.lokprabha@expressindia.com

इतर जातीधर्माचा पराकोटीचा द्वेष, दुसऱ्यांबद्दल शत्रुत्वाची भावना, िहसेला प्राधान्य, सततची स्पर्धा.. सगळं जगच आज अशा वातावरणात वावरत आहे की गांधीविचारांची पूर्वी कधी नव्हती इतकी गरज जाणवते आहे. ३० जानेवारीच्या गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष विभाग-

नुकताच हिमालयाची सफर करायला गेलो होतो. हिमालयाचे अगम्य, कधीही तृप्ती न होणारे भव्य, मनोहारी परंतु तितकेच चंचल रूप पाहून मन वेगळ्याच विचारांनी भारावून गेले होते. हिमालयाच्या या सर्व गोष्टी साधेपणाने माणसाच्या आयुष्यात उतरल्या तर काय होईल, या विचाराने मनात काहूर उठवले होते. ‘तर पृथ्वीवर स्वर्ग अवतरेल’ असे साधे सरळ उत्तर देऊन मन मोकळे झाले. मात्र अंतर्मन त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली होती. सकाळी आमची जीप अहमदाबाद इथे महात्मा गांधींच्या साबरमती आश्रमाच्या दारात येऊन थांबली. त्या पवित्र भूमीत माझ्या मनात चमकलेला पहिलाच विचार होता. ‘एका नि:शस्त्र पण जगावेगळे सामथ्र्य असणाऱ्या माणसाने त्या काळातील सर्वात सामथ्र्यवान ब्रिटिश सरकारशी रक्ताचा थेंबही न सांडता यशस्वी लढा दिला आणि भारतभूमीला पारतंत्र्याच्या साखळदंडातून मुक्त केले.’ त्यांच्या त्या अद्वितीय लढय़ाची आठवण ताजी झाली. ‘साबरमती के संत तुने कर दिया कमाल’ हे गाणे गुणगुणतच जगाला अहिंसा आणि असहकार ही अनोखी शस्त्रे बहाल करणाऱ्या या जगावेगळ्या माणसाबद्दलच्या विलक्षण कौतुकाने मी आश्रमात प्रवेश केला.

साबरमती आश्रम सफर

पांढरा शुभ्र झब्बा आणि पायजमा घातलेले, चेहऱ्यावर शांतता आणि प्रसन्न हास्य असलेले एक सद्गृहस्थ रस्त्यावरील एक गोगलगाय आपल्या कॅमेऱ्यात पकडण्याचा प्रयत्न करीत होते. गंमत वाटली म्हणून, त्यांचा परिचय करून घेण्यासाठी पुढे झालो. बोलता बोलता त्यांनी, आपण होऊनच, आम्हाला साबरमती आश्रमाची सफर करून आणण्याची तयारी दर्शवली. अशा प्रकारे आमची साबरमती आश्रमाची सफर गिरीश गुप्ता यांच्याबरोबर सुरू झाली. त्यांच्या साक्षीने आश्रमाच्या पाश्र्वभूमीवर महात्मा गांधींच्या जीवनातले अनेक भावपूर्ण प्रसंग उलगडत होते. त्यांचे सखोल ज्ञान, गांधीजींबद्दलचे नितांत प्रेम आणि गांधी तत्त्वज्ञानाबद्दलची बांधिलकी त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती. शेजारीच धीरगंभीर परंतु शांत वाहणारा साबरमतीचा प्रवाह दिसत होता. तर बरोबरच्या गुप्ताजींच्या तोंडातून, नव्हे हृदयातून महात्माजींचा सारा जीवनपटच शब्दरूप घेत होता.

महात्मा गांधींचे आवाहन

‘माझे आयुष्य हाच माझा संदेश आहे’ हे अतिशय साधे आणि सोपे पण महत्त्वाचे वाक्य पुढे आले. याच प्रवासात पुढे ‘अशी व्यक्ती पृथ्वीच्या पाठीवर प्रत्यक्ष अवतरली होती, यावर पुढील पिढय़ांचा विश्वास बसणे अवघड वाटते.’ हे अल्बर्ट आईनस्टाईन या महान शास्त्रज्ञाचे वाक्यच समोर आले. त्यानंतर लक्ष वेधून घेणारे वाक्य होते ‘माझे आयुष्य इतके सार्वजनिक आहे, की त्यात इतरांना माहिती नाही असे काही अभावानेच असेल.’ प्रचंड आत्मविश्वास आणि पारदर्शकतेचा पुन्हा एकदा अनुभव आला. गांधीजींचा असाच आत्मविश्वास आणि खंत अजून एका भित्तिचित्रात चित्रित केली होती. ‘माझा दृढ विश्वास आहे, की आपल्या संस्कृतीत आहे तेवढे समृद्ध भांडार कुणाकडेही आढळणार नाही. आपण आपल्या संस्कृतीला ओळखले नाही, आपल्या संस्कृतीप्रमाणे वागलो नाही तर ती एक सामाजिक आत्महत्येकडे नेणारी वाटचालच ठरणार आहे.’ आपल्या देशबांधवांना जागे करून त्यांनी संस्कृतीपालनाचे हे आवाहनच केले आहे.

लोकशाहीत कसे वागायला हवे

लोकशाहीत कसे वागायला हवे? किंबहुना लोकशाही म्हणजे नेमके काय, याचे मार्गदर्शन गांधीजींच्या एका भव्य भित्तिचित्रातून होत होते. त्यात स्पष्टता होती. ‘बहुजन समाजाच्या बहुतांशी हितावर माझा विश्वास नाही. यातील नग्न सत्य असे आहे, की ५१ टक्के जनतेच्या समाधानासाठी, हितासाठी ४९ टक्के जनतेच्या आशा-आकांक्षांचा बळी द्यायचा ही तर हृदयशून्य शिकवण आहे. (खरे तर हृदयावर दगड ठेवणारी) मानवतेचे खरे नुकसान तर याच शिकवणुकीने झाले आहे. मानवतेचा आदर करणारी फक्त आणि खरी शिकवण म्हणजे सर्वाचेच भले.’

जगाला आदर्श वाटणाऱ्या महात्मा गांधी या मानवतेच्या पुजाऱ्याच्या या पवित्र शिकवणीचा आदर आपण, त्यांचेच वंशज किती प्रमाणात अमलात आणतो, ही शिकवण आचरणात आणण्यासाठी काय करायला हवे, यावर विचार आणि चिंतन त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथी यांच्या निमित्ताने व्हायला नको का?

साबरमती आश्रमातील हा चार-पाच तासांचा प्रवास त्यांच्याविषयीच्या अनेक भावनांना, त्यांच्या तत्त्वज्ञानाचा पुनर्विचार करायला लावणारा, निराश करणारा आणि तरीही विचारांना दिशा देऊन नवीन उमेद निर्माण करणारा ठरला. गांधीजींनी १८९० मध्ये दक्षिण आफ्रिकेत काढलेले हे उद्गार पाहा. ‘‘ग्राहक ही आपल्या भेटीला येणारी सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे. ते आपल्यावर अवलंबून नाहीत तर आपण त्यांच्यावर अवलंबून आहोत. ते आपल्या कामात बाधा नाहीत तर ते आपल्या कामाचा हेतू, उद्देश आहेत. ते आपल्या व्यावसायात तिऱ्हाईत, बाहेरचे  नाहीत. ते आपल्या व्यवसायाचा एक भागच आहेत. त्यांची सेवा करून आपण त्यांच्यावर उपकार करीत नाही तर ते आपल्याला सेवेची संधी देऊन आपल्यावर उपकार करीत आहेत.’’ आजच्या स्पर्धात्मक आणि ग्राहकांचे वर्चस्व मानणाऱ्या युगाचा प्रभावी सामना करण्यासाठी गांधीजींचे विचार आणि तत्त्वज्ञान आजही आपल्याला फार उपयोगी पडणारे आहे. मात्र यासाठी त्यांच्या विचारांकडे आपण नवीन दृष्टीने बघायला पाहिजे.

साबरमती आश्रमातील आमचा प्रेरणादायी प्रवास पुढे शब्दबद्ध केला आहे.

साबरमती आश्रमातील प्रमुख गोष्टी  

मगन निवास

गांधीजींचे पुतणे मगनलाल गांधी हे त्यांचे सच्चे अनुयायी होते. दक्षिण आफ्रिकेतील फोनिक्स आश्रमापासून ते महात्माजींच्या बरोबर होते. साबरमती आश्रमाचे शिल्पकार आणि कार्यक्षम व्यवस्थापक म्हणून त्यांचे नाव घेता येईल. गांधीजी त्यांना ‘आश्रमाचे हृदय’ म्हणून संबोधीत असत. चरख्याच्या अनेक सुधारित प्रतिकृतींना त्यांनी जन्म दिला. चरखा गांधीजींच्या महान क्रांतीचे सुचिन्ह ठरले. त्यातूनच खादी चळवळीचा जन्म झाला. १९२८ साली मगनभाईंच्या मृत्यूनंतर ‘मी विधवा झालो’ असे उद्गार गांधीजींच्या मुखातून बाहेर पडले.

उपासना मंदिर 

‘प्रार्थना म्हणजे आत्म्याचे अन्न’ असेच गांधीजी मानत होते. प्रार्थनेची मदत त्यांना अनेक वैयक्तिक आणि राष्ट्रीय निर्णय घेताना झालेली दिसते. त्यामुळे सकाळी कामाला सुरुवात करण्यापूर्वी आणि संध्याकाळी ते या ठिकाणी सर्व आश्रमवासीयांबरोबर प्रार्थनेसाठी सामील होत असत. इथे नियमितपणे भजन गायले जाई. अधूनमधून याच ठिकाणी श्रीमद्भगवतगीता, कुराण आणि बायबल या ग्रंथातील उताऱ्यांचे वाचनही होत असे.

हृदयकुंज

हे आश्रमातील गांधीजींचे निवासस्थान होते. काकासाहेब कालेलकरांनी याचे नामकरण ‘हृदयकुंज’ असे केले होते. शरीराच्या सर्व ताकदींचा स्रोत जसा हृदयापासून निघतो तशीच या वास्तूत निर्माण होणारी सर्व ऊर्जा या मध्यवर्ती खोल्यांतूनच उत्पन्न होत होती. १९१८ ते १९३० पर्यंत गांधीजींचे वास्तव्य इथेच होते. जणू काही भारतमातेचे हृदय या वास्तूतच स्पंदत होते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या व्यक्तींची ये-जा येथेच होत होती. भारतभूमी स्वतंत्र होईपर्यंत या वास्तूत परत येणार नाही अशी शपथ घेऊनच १९३० साली गांधीजींनी ही वास्तू सोडली.

विनोबा-मीरा कुटीर

सत्याशी असलेल्या संपूर्ण बांधिलकीमुळे विनोबा भावे यांना गांधीजींचे पहिले शिष्य होण्याचा मान मिळाला. त्यांचे वास्तव्य या खोलीत १९१८ ते १९२१ या वर्षांत होते. त्यानंतर त्यांनी भूदान चळवळीत उडी घेतली. ‘भूदान’ या अनोख्या आणि क्रांतिकारी आंदोलनामुळेच भारताचे स्वातंत्र्य अबाधित हे मात्र खरेच आहे. १९८३ ला विनोबांना ‘भारतरत्न’ हा किताब त्यांच्या मृत्यूनंतर बहाल करण्यात आला.

पुढे मेलेडियन स्लेन या ब्रिटिश अ‍ॅडमिरलच्या कन्या, आपले कुटुंबच नाही तर मायभूमीचा त्याग करून साबरमतीच्या आश्रमात दाखल झाल्या. गांधीजींच्या तत्त्वज्ञानाने त्यांना संपूर्णपणे भरून टाकले होते. त्यांनी मानवाच्या विकासासाठी आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले आयुष्य वाहून घेतले होते. त्यांचा हा अपूर्व त्याग आणि मानवाच्या विकासावरील निष्ठा बघून गांधीजी त्यांना मीरा म्हणून संबोधीत असत. १९२५ ते १९३३ या काळात या मीरेचा वास विनोबा राहात असलेल्या कुटिरातच होता. त्यामुळे ही वास्तू ‘विनोबा-मीरा कुटीर’ म्हणूनच ओळखली जाऊ लागली. १९८२ साली या मीरेला ‘पद्मभूषण’ ही पदवी देण्यात आली.

नंदिनी अतिथिगृह

नंदिनी हे आश्रमातील अतिथिगृह होते. देशातील अनेक नेते आणि आंतर्देशीय संस्थांच्या अनेक प्रमुख व्यक्तींच्या वास्तव्याचे भाग्य या इमारतीला लाभले आहे. या सर्व व्यक्तींनी आश्रमातील आपले वास्तव्य अगदी सर्वसामान्य आश्रमवासीयांप्रमाणे जगले होते आणि यातून स्वत:ला साधेपणाची आणि नैतिकतेची शिकवण दिली होती. या आचरणामुळेच गांधीजींसारख्या असामान्य व्यक्तिमत्त्वाचा परीसस्पर्श त्यांना होऊ शकला, अनुभवता आला.

उद्योग मंदिर 

१९१८ला म्हणजेच अहमदाबाद येथील गिरणी कामगारांच्या ऐतिहासिक संपाच्या काळात उद्योग मंदिराची स्थापना झाली. सुरुवातीच्या काळात या भवनातील एका छोटय़ाशा खोलीतच गांधीजींचे वास्तव्य होते. कामगारांची स्वयंनिर्भरता आणि श्रमांना दिलेली प्रतिष्ठा यांचेच हे प्रतीक आहे. खादीच्या माध्यमातून स्वराज्याचा मंत्र संपूर्ण देशभर निनादला तो या वास्तूतूनच.

सोमनाथ छात्रालय

आपल्या वैयक्तिक आयुष्याचा त्याग करून सामाजिक कार्यासाठी वाहून घेतलेल्या आश्रमवासीयांसाठी एकच स्वयंपाकघर असणाऱ्या आणि एकाच छत्राखाली हे विश्वची माझे घर मानणाऱ्या मंडळींसाठी ही निवासाची व्यवस्था होती. देशकार्यास वाहून घेतलेल्या एकत्र कुटुंबाप्रमाणे बांधून ठेवणारा हा गांधीजींचा भव्य आणि उमदा प्रकल्प होता.

शिक्षक निवास

गांधीजींबरोबर काम करणारी सारी मोठी माणसे या निवासात राहत असत. यात काकासाहेब कालेलकर, महादेव देसाई, नरहरी पारिख, पंडित ना. मो. खरे, लक्ष्मीदास आशर आदी नामवंतांचा समावेश होता.

गांधी स्मारक संग्रहालय

या संग्रहालयाच्या आधुनिक इमारतीची उभारणी आणि रचना जगप्रसिद्ध वास्तुशिल्पकार चार्लस कॉरी यांनी केली आहे. या संग्रहाची सुरुवात १९६३ साली करण्यात आली. यात प्रामुख्याने तीन दालने आहेत.

अ) अहमदाबादमधील गांधी  

अहमदाबादमध्ये घडलेल्या गांधीजींच्या आयुष्यातील ठळक घटना या विभागात मांडण्यात आल्या आहेत. यासाठी फोटो, चित्रे, लहान-लहान उतारे, प्रतिकृती यांचा फार कल्पक वापर केलेला आहे. यात आश्रमाची स्थापना, नवजीवन प्रेस, गुजराथ विद्यापीठ, खादी, चरख्याची चळवळ, परदेशी कापडावरील बहिष्कार आणि सर्व जगाचे लक्ष भारतीय स्वातंत्र्याकडे वेधून घेणारी अद्वितीय दांडी यात्रा इत्यादी घटना या दालनात जिवंत आणि अजरामर झालेल्या दिसतात.

ब) चित्रांचे दालन  

या दालनात गांधीजींची आठ अतिशय भव्य चित्रे मांडलेली आहेत. गांधीजींच्या जीवनातील महत्त्वाच्या छटाच यातून चित्रित केल्या आहेत. ध्यानमग्न गांधीजी, उच्चभ्रू हिंदू समाजात झालेला गांधीजींचा विवाह समारंभ, भारताचे भवितव्य घडविताना इतर सहकाऱ्यांबरोबर विचार-विनिमयाचे प्रसंग, अस्पृश्यता निवारण्याची चळवळ यासारख्या गोष्टी अगदी आत्ताच घडत आहेत अशा पद्धतीने चित्रांतून मांडलेल्या आहेत.

क) ‘माझे आयुष्य हाच माझा संदेश’ 

या दालनाची सुरुवातच गांधीजींच्या हस्ताक्षरातील या वाक्याने होते. त्यांनी आपल्या आयुष्याचे तत्त्वज्ञान सांगताना शेवट असा केला आहे की, ‘माझे आयुष्य हाच माझा संदेश’ त्यांचे बहुआयामी आणि ज्वलंत आयुष्य सत्य आणि केवळ सत्याने भरलेले होते. गांधींजी किती निर्मल आणि साधेपणाने राहात असत याची प्रचीती या दालनात क्षणोक्षणी येत होती. किती पारदर्शकता होती त्यांच्या आयुष्यात. त्यांच्या जीवनाला वळण देणारे आणि भारताचा इतिहास घडवणारे प्रसंग यात उभे केलेले आहेत. जगभरातील संदेश मागणाऱ्यांना ते हाच संदेश देत असत.

वाचनालय आणि दस्तावेज         

महात्मा गांधी या युगपुरुषाला खालील गोष्टीतून, माध्यमातून साठवून ठेवण्याचा प्रयत्न येथे दिसतो. या विभागात ३४ हजार हस्तलिखिते, १५० हून अधिक सन्मान, सहा हजारांच्या आसपास फोटो निगेटिव्ह, २०० फाइल्स आहेत. ३५ हजारांच्या आसपास पुस्तके वाचनालयात आहेत. गांधीजींच्या जीवनाचा आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी तर हा खजिना म्हणजे मौलिक ठेवाच आहे. गांधीजींचे आणि त्यांच्यावरचे साहित्य, पुतळे, किचेन्स, पेन्स आदी प्रचार साहित्यदेखील विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्यात आता सीडीज, व्हीसीडीज् आणि चित्रफिती, ध्वनिफिती यांचीही भर पडली आहे.

या सर्व इमारतीबाहेरील वातावरणदेखील साधे पण नेटके आणि वेधक वाटले. बाहेरच्या सुरेख हिरवळीवरचे दोन पुतळे आपले लक्ष वेधून घेतात. पहिला गांधीजींचा ध्यानमग्न पुतळा गांधीजी समक्षच ध्यानात बसले आहेत असा भास निर्माण करतो. दुसरा पुतळ्याचा समूह ‘बुरा मत सुनो’, ‘बुरा मत देखो’ आणि ‘बुरा मत कहो’ हा संदेश देणारी आणि संपूर्ण जगाला आपलीशी झालेली तीन माकडे.

भारतभूमीवर प्रेम करणाऱ्या आणि तिच्याबद्दल आस्था असणाऱ्या प्रत्येक माणसाने आयुष्यातील काही तास या पुण्यभूमीवर घालवायलाच हवेत. आजच्या प्रचंड वेगवान आणि स्पर्धात्मक युगात गांधीजींचे तत्त्वज्ञान उपयुक्त आहे. आवश्यकता आहे, त्याच्याकडे नव्या दृष्टिकोनातून बघण्याची. सरकारने हा आश्रम, त्यांचे तत्त्वज्ञान आणि विचार अगदी नेटकेपणाने जपले आहेत. या आश्रमातील हा फेरफटका खूप प्रेरक आणि तितकाच अंतर्मुख करणारा ठरला.

(छायाचित्र : विकिपीडिया)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2021 7:06 am

Web Title: mahatma gandhi sabarmati ashram smaran dd70
Next Stories
1 स्मरण : थिएटर ऑफ रिलेव्हन्स नेतृत्वनिर्माणाची भूमी!
2 राशिभविष्य : २२ जानेवारी ते २८ जानेवारी २०२१
3 जगातील सर्वांत जुने गुंफाचित्र इंडोनेशियात
Just Now!
X