येत्या २३ जुलै रोजी सुप्रसिद्ध विनोदी अभिनेता मेहमूद यांच्या निधनाला दहा वर्षे पूर्ण होत आहेत. मेहमूदची आठवण जागवण्याचा प्रश्नच नाही, कारण त्याला विसरताच येत नाही..

विनोदी अभिनेत्याचे सर्वात मोठे दु:ख म्हणजे त्याला कोणत्याच संदर्भात कोणीच गंभीरपणे घेत नाही. विनोद करणे हा अभिनयातील सर्वात सोपा प्रकार मानला जातो व अशा कलाकाराच्या खासगी आयुष्यातही सगळे असे हसत-खेळत चालले आहे असे मानले जाते.. त्याचे सगळेच हसण्यावारी नेले जाते.
वस्तुस्थिती मात्र खूप वेगळी असते. मेहमूद याबाबत सर्वोत्तम उदाहरण ठरावे.
हिंदी चित्रपटसृष्टीच्या एकूणच इतिहास व वाटचालीतील मेहमूद हा सर्वात यशस्वी, लोकप्रिय व अनेक प्रकारच्या व्यक्तिरेखांचे मुखवटे घेत वावरलेला अभिनेता आहे. २३ जुलै हा त्याचा दहावा स्मृतिदिन आहे. (मृत्यू २३ जुलै २००४ व तोदेखील अमेरिकेत पेनिसिल्व्हानिया येथे) मेहमूदचा जन्म २९ सप्टेंबर १९३२ सालचा. म्हणजे तो ७२ वर्षे जगला.
विनोदवीर ही या मेहमूदची ‘भूमिका’ झाली, तर दु:खमय, क्लेशकारक आयुष्य ही मेहमूदची भावना झाली. त्याचा ‘खेळ’ तसा रंगला, तसा घडला.
‘अभिनेता मेहमूद’ हा मुमताज अली यांच्या आठ मुलांपैकी एक! बॉम्बे टॉकीजच्या ‘किस्मत’ या चित्रपटात त्याने अशोककुमारच्या बालपणी पाकीटमार करणाऱ्या मुलाची भूमिका साकारली. काही काळ तो पी. एल. संतोषी (दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांचे वडील) यांच्या गाडीचा चालक होता. वयात येताच त्याने ‘सी.आय.डी.’, ‘दो बिघा जमीन’, ‘प्यासा’ अशा चित्रपटांतून छोटय़ा भूमिका साकारल्या. पण ‘अष्टपैलू विनोदवीर’ असा त्याचा विलक्षण जम बसला, त्यात त्याची प्रामुख्याने धुमाळ व शुभा खोटेसोबत (चित्रपट ‘जिद्दी’, ‘लव्ह इन टोकियो’) जोडी जमली. विशेषत: ‘महेश’ हे त्याचे हुकमी रुपेरी नाव ठरले. शुभा खोटेसोबत जमलेल्या जोडीतून त्याने नंदू खोटेनिर्मित व दिग्दर्शित ‘या मालक’ या मराठी चित्रपटातूनही भूमिका साकारली. १९६४ सालच्या या चित्रपटाला यंदा ५० वर्षे झाली. मेहमूद नायक असणाऱ्या या चित्रपटात विजू खोटे, शुभा खोटे, धुमाळ, भारती, शंकर घाणेकर, सरोज बोरकर, रणजीत बुधकर इत्यादींच्या भूमिका होत्या. साठ व सत्तरच्या दशकात मेहमूदचे अस्सल विनोदाचे नाणे खणखणीत वाजले. ‘छोटे नवाब’, ‘जिंदगी’, ‘चित्रलेखा’, ‘पत्थर के सनम’, ‘गुमनाम’ (यामध्ये तो हेलनसमवेत ‘हम काले है तो’ या गाण्यावर नाचला), ‘नीलकमल’, ‘दो कलियां’, ‘हमजोली’, ‘भूतबंगला’, ‘साधू और शैतान’, ‘जोहर मेहमूद इन गोवा’, ‘जोहर मेहमूद इन हाँगकाँग’, ‘प्यार किये जा’, ‘पडोसन’ (यामधील त्याचा तामिळ ब्राह्मण संगीत शिक्षक तर अप्रतिम..), ‘देस परदेस’, ‘छोटे नवाब’.. मेहमूदच्या हास्यस्फोटक चित्रपटांची नावे बरीच आहेत, पण मेहमूद चित्रपटात आहे म्हणजे तो नक्कीच भरपेट हसवणार हा तेव्हाच्या चित्रपट रसिक पिढीचा विश्वास सतत अधोरेखित होत गेला. मेहमूदनेही कधीच निराश केले नाही. मेहमूदचा फार मोठा आधार मिळतोय म्हणून काही नायक दिग्दर्शकाला त्याचे नाव आवर्जून सुचवायचे ही त्याची सर्वात मोठी जमेची बाजू, पण हाच मेहमूद काही प्रसंगांत सहजी आपल्याला भारी पडतोय व एकूणच चित्रपटावर आपला प्रभाव पाडतोय अशा जाणिवेने त्याच ‘नायकां’नी मग ‘आपल्या चित्रपटात मेहमूद नको’ असा सावध पवित्रा घेतला हे त्याचे दुर्दैव! उत्तम अदाकारी साकारूनदेखील कधी-कधी असा अन्याय होऊ शकतो हे दु:ख कसे पचवायचे? मेहमूदला सुदैवाने त्याच टप्प्यावर काही चित्रपटांतून नायकाच्या भूमिका मिळाल्या (‘हंगामा’, ‘लाखों में एक’) या काळात अरुणा इराणी त्याची हुकमी नायिका ठरली (‘दो फूल’), तर काही चित्रपटांतून त्याला मध्यवर्ती भूमिका मिळाली (‘मै सुंदर हूँ’). आपले श्रेष्ठत्व व अस्तित्व दाखवायला त्याला हे पुरेसे होते. नंतरच्या पिढीतील विनोद मेहरा नायक असणाऱ्या ‘वरदान’ (नेकीरामची धमाल भूमिका), ‘सबसे बडा रुपय्या’ अशा चित्रपटांतून मेहमूदला झक्कास वाव मिळाला. ‘दो फूल’मधील पुट्टन व मणी अशा दुहेरी भूमिकेतील मेहमूदने आपल्यावर सहजी मात केल्याचे दु:ख वा खेद विनोद मेहराने बाळगले नाही. मेहमूद काही भूमिकांमध्ये खूप झक्कास मोकळेपणाने खुलायचा. ‘दो फूल’मध्ये ‘मुत्तुकोडी कवाडी हडा’ गाण्यात तो छान नाचला. अर्थात, दिग्दर्शकाने त्याला तेवढे स्वातंत्र्य द्यायला हवे होते. ते कर्तबगार माणसांनाच सहजी मिळते. जीतेन्द्र व लीना चंदावरकरची भूमिका असणाऱ्या ‘हमजोली’मध्ये ते दिग्दर्शक रामन्ना याने दिले व मेहमूदने त्यात कपूर खानदानाच्या तेव्हाच्या तीन पिढय़ांची (पृथ्वीराज कपूर, राज व रणधीर कपूर) झक्कास नक्कल करून वाहव्वा मिळवली.
आपल्या अभिनयाच्या अनुभवातून तो चित्रपट निर्माता व दिग्दर्शकही झाला. ‘छोटा नवाब’पासून त्याने सुरुवात करताना आपल्याला संगीताचाही उत्तम कान आहे हे सिद्ध केले. तत्कालीन संगीतात ‘तारुण्याची झिंग’ आणण्याचे श्रेय मिळवणाऱ्या राहुल देव बर्मन (‘छोटे नवाब’) व काही वर्षांनी राजेश रोशन (‘कुंवारा बाप’) यांना पहिली संधी मेहमूदने दिली. त्याच्या दिग्दर्शनातील सर्वात भावुक व प्रभावी चित्रपट म्हणजे ‘कुंवारा बाप!’ त्यात त्याने आपल्या पोलिओग्रस्त मॅकी याच्याभोवती कथानक रचताना हा विकार व सायकल-रिक्षा खेचणाऱ्या पित्याचे बरे-वाईट आयुष्य याची उत्तम गुंफण घातली. गीत-संगीत-नृत्यातून ही कथा खुलवताना त्याने आपली संगीताची जाण सुस्पष्ट केली. चित्रपटाच्या सुरुवातीलाच हा सायकल-रिक्षा चालवणारा नायक (अर्थात मेहमूद) ‘मैं हू घोडा, यह है गाडी’ असे उत्स्फूर्तपणे गातो. ‘एक रुपया भाडा, पॅसेंजर इतना जाडा.. मला नको रे नको’ असे म्हणत हसत-खेळत एखाद्याची खिल्ली उडवणाऱ्या या पित्याने गाडीच्या पाठच्या बाजूलाच आपल्या तान्हुल्याला कपडय़ात गुंडाळून ठेवलेले असते. हा मुलगा त्याला एकदा देवळाबाहेर सापडतो आणि त्याचे खरे माता-पिता न सापडल्याने या मुलाच्या पोषणाची जबाबदारी त्याच्यावर येते. त्याच्यासाठी तो लोरीदेखील गातो (आ..री आ जा निंदिया) तर त्याच्या घरात तान्हुला असल्याने तृतीयपंथीदेखील ‘सज रही गली मेरी..’ गात-नाचत येतात. या नृत्यासाठी मेहमूदने आपले पिता मुमताज अली यांना संधी दिली, तर या ‘सापडलेल्या मुला’वरून मेहमूदचे आपल्या पत्नीशी (तामिळ अभिनेत्री मनोरमा) होणाऱ्या वादविवादातून विनोद निर्माण होतो. मुलगा पोलिओग्रस्त असल्याचे डॉक्टरकडून (संजीवकुमार) समजताच हा घोडागाडीवाला हादरतो, पण त्याचे पालनपोषण करण्याशिवाय पर्याय नसतो. मुलगा थोडा मोठा होताच तो देवदर्शनाला जातो. (जय भोलेनाथ जय हो प्रभू). तेथे त्या मुलाचे खरे माता-पिता (विनोद मेहरा-भारती) यांचा शोध लागतो, पण आपण वाढवत असलेल्या मुलाला त्यांच्याकडे देण्यास हा घोडागाडीवाला तयार होत नाही.. अतिशय भावनिक कथानक रचताना मनोरंजनही होईल याचे भान मेहमूदने ठेवले यातच त्याची दिग्दर्शनीय दृष्टी स्पष्ट दिसते. त्याने कारुण्यात विनोद शोधला. राजेश रोशनला संगीत पदार्पणाची संधी देताना त्याने विविध प्रकारची गाणी व चाली त्याच्याकडून करून घेतल्या. अनुभवी गीतकार मजरुह सुलतानपुरीसोबत त्याची जोडी जमवली. हिंदी चित्रपटातले पहिले ‘तृतीयपंथी गीत’ देण्याचे श्रेय या चित्रपटाला आहे. मेहमूदच्या या यशात छाया-दिग्दर्शक प्रभाकर निकळंकर व संकलक भगवंत देशपांडे यांचाही वाटा आहे. मेहमूदच्या एकूण कारकिर्दीतील ‘कुंवारा बाप’ महत्त्वाचा टप्पा व वेगळा अनुभव ठरला. १९७४ साली दक्षिण मुंबईतील ऑपेरा हाऊसला ‘रोटी कपडा और मकान’ पहिल्याच खेळापासून यशस्वी ठरल्यावर त्याच्या पुढील शुक्रवारीच अगदी जवळच्या रॉक्सीत ‘कुंवारा बाप’ झळकला व ‘रोटी कपडा..’च्या तगडय़ा स्पर्धेतही आपल्या गुणवत्तेवर टिकला व ज्युबिली झाला. तो काळ मुख्य चित्रपटगृहाला खूपच महत्त्व असणारा होता, त्यानुसार याच रॉक्सीत मेहमूदने दिग्दर्शिलेले ‘जिनी और जानी’ व ‘एक बाप छे बेटे’ हेदेखील स्वानुभवावरचे व आपल्याच मुलाना त्यात संधी देणारे चित्रपट झळकले, पण स्वत:च्या कथा-व्यथा साकारण्यात मेहमूद यात अपयशी ठरला. हा त्याला मोठाच सेटबॅक होता. त्यातून सावरण्यासाठी त्याने ‘जनता हवालदार’ या चित्रपटावर लक्ष केंद्रित केले, तेव्हा नेमका राजेश खन्नाचा ‘पडता काळ’ असल्याने व हेमामालिनी अन्य चित्रपटांतून बिझी असल्याने हा चित्रपट खूप रखडला. त्यात रंगत आणण्यासाठी मेहमूदने त्यात तृतीयपंथींना बराच वाव दिला, पण तो एकूणच निष्प्रभ ठरला. तरी आपल्याला संगीताचा कान आहे हे त्याने ‘हम से क्या भूल हुई’ या गाण्यातून सिद्ध केले. बऱ्याच काळानंतर त्याने ‘दुश्मन दुनिया का’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. त्या चित्रपटाच्या फिल्मालय स्टुडिओतील सेटवर मेहमूदला भेटताना त्याच सूर हरवल्यासारखे वाटले. आपल्या दादा कोंडके यांनी ‘आगे की सोच’मध्ये मेहमूदला संधी दिली व इंगवली येथील चित्रीकरणाच्या वेळी मुंबईतील आम्हा काही निवडक सिने पत्रकारांना नेले, तेव्हा दादांनी मेहमूदसोबत गप्पांचा झक्कास फड जमवला. तेव्हा ‘फ्लॅशबॅक’मध्ये जात मेहमूदने या चित्रपटसृष्टीतील काहींचे अहंकार, खत्रूड वृत्ती वगैरे बऱ्याच गोष्टी सांगितल्या. अर्थात, त्यात त्याने त्याची बाजू मांडली, आपल्या गुणांना भरपूर वाव मिळाला, तसेच ते गुण दाबण्याचेही प्रयत्न झाले, हा त्याचा सूर होता. एव्हाना बदललेली चित्रपटसृष्टी व त्याची मानसिकता यावरचे त्याचे भाष्य खूप अंतर्मुख करायला लावणारे होते. राजकुमार संतोषी दिग्दर्शित ‘अंदाज अपना अपना’ हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला.
मेहमूदला पहिली पत्नी मधू हिच्यासोबतच्या संसारात चार, तर दुसरी पत्नी ट्रॅसी हिच्यासोबतच्या संसारात दोन मुले व एक मुलगी होती. या साऱ्यांना त्याने बालपणीच चित्रपटाच्या विश्वात आणले. त्यापैकी लकी अली गायक (‘कहो ना.. प्यार है’ची हिट गाणी) व नायक (‘सूर’मध्ये गौरी कर्णिकचा होता) म्हणून मोठेपणी नावारूपाला आला, तर मासूम अलीने ‘दुश्मन दुनिया का’ या चित्रपटाची निर्मिती करताना त्यात नायक होता, पण मेहमूदच्या खासगी आयुष्याबाबत (अगदी त्याच्या काही व्यसनांबाबत) गॉसिप मॅगझिन्सनी बरेच काही लिहिले. त्यात तथ्य किती व अफवा कोणत्या हे मेहमूद दुर्दैवाने कधीच स्पष्ट करू शकला नाही अथवा त्याच्या त्या समस्येचा अपेक्षित अर्थ घेतला गेला नाही. तो खासगी आयुष्यात खूप दु:खी आहे, म्हणूनच तो आपल्या काही नायिकांत (विशेषत: अरुणा इराणीत) गुंतत वा अडकत गेला अशा प्रकारच्या गोष्टी खूप पसरल्या. सिनेमाचे जग बऱ्याचदा तरी वस्तुस्थितीपेक्षा हवेतील गोष्टीच्या दिशेने विचार करते व खुद्द कलाकाराच्या हाती काहीच राहत नाही. मेहमूदचे बंगलोरला भव्य फार्म हाऊस आहे. तो व्यसनी झाला आहे अशाही किती तरी गोष्टींची सतत भर पडत राहिली, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे आहे तो त्याच्या अफाट गुणवत्तेने ओळखला जातो. त्याच्याइतकी क्षमता, विविधता व टायमिंग सेन्स असणारा ‘दुसरा विनोदवीर’ झाला नाही (होणारही नाही). तो मात्र अनेकांचा आदर्श आहे, हे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे.
मेहमूद एकच असू शकतो, तो एकच होता.

BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
pune dispute within congress marathi news
पुणे काँग्रेसमधील मानापमान नाट्य सुरूच
kannada producer Soundarya Jagadish found dead
घरात मृतावस्थेत आढळले प्रसिद्ध चित्रपट निर्माते, काही दिवसांपूर्वी त्यांच्या पबविरोधात दाखल झाला होता गुन्हा
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!