शीर्षक वाचून तुमच्या चेहऱ्यावर बेरकी स्मित उमटलं असेल आणि लिहिणाऱ्याचा हा पब्लिसिटी स्टंट आहे असा अंदाज बांधून एव्हाना तुम्ही त्याकडे दुर्लक्षही केलं असेल. अर्थात हा काही तुमचा दोष नाही, कारण आज अगदी आत्तापर्यंत स्त्रियांवरील बलात्कारांच्या (शारीरिक) भारंभार बातम्या तुम्ही वर्तमानपत्रांमध्ये वाचल्या असतील. त्यातील बलात्कारांची विश्लेषणं (केवळ शारीरिक आणि पुरुषांना दोषी धरणारी) तुम्हाला मुखोद्गतही झाली असतील. व्यक्तिश: माझा स्त्रियांवरीलच नव्हे तर जगू पाहणाऱ्या प्रत्येक जीवावरील कोणत्याही प्रकारच्या बलात्कारांना (अनैसर्गिक कृतींना) जेवढा विरोध आहे; तेवढाच विरोध बलात्कारांच्या केवळ शारीरिक विश्लेषणांना आहे आणि म्हणूनच पुरुष नव्हे तर एक जगू पाहणारा जीव म्हणून तुम्हा-आम्हा सगळ्यांना माहीत असूनही माहीत नसलेल्या पुरुषांवरील बलात्कारांच्या निमित्ताने हा लेखनप्रयत्न.

कोणताही पुरुष हा काही स्वत:च्या मर्जीने ‘पुरुष’ म्हणून जन्माला येत नाही. निसर्गत: तो माणसाचं शरीर धारण केलेला प्राणी म्हणून या जगात येतो. तिथून पुढे त्याच्याही खूप आधीपासून अस्तित्वात असलेली इथली पुरुषसत्ताक समाजव्यवस्था लिंगभेदावर आधारित स्त्री किंवा मग पुरुष अशी लेबलं त्याच्यावर लावते. पुरुष लिंग असेल तर त्याला वंशाचा दिवा बनवते. पुढे याच लेबलांचा भाग आणि वंशाचा दिवा म्हणून त्या मातीच्या गोळ्याला विशेष पुरुषी वागणूक दिली जाते. जी खरंच त्याला हवी असते की पुढच्या पुरुषसत्ताक परंपरेची बीजं पेरण्याचं काम त्या विशेष वागणुकीने केलेलं असतं?
थोडंसं वयात आल्यावर याच पुरुषाला त्यानं पुरुष आणि सत्ताधारी म्हणून समाजात विशेषत: त्याच्या विरुद्ध लिंग असणाऱ्या स्त्रियांशी कसं विशेष अंतर राखून वागायला आणि वावरायला हवं हे शिकवलं जातं. अर्थात ह्य शिकवणीची वेळोवेळी परीक्षा घेण्याची सोय व्यवस्थेने केलेली आहेच. या परीक्षेत जो पास तो पुढे पुरुष म्हणून लग्नाच्या मार्केटमध्ये उभा राहायला पात्र. आणि जो समानता किंवा मानवतावादी मूल्याने समाजातील स्वत:चं सत्ताधारीपण विसरून नापास होईल तो लग्नाच्या मार्केटमध्येच नव्हे तर आयुष्यात उभा राहायला कायमचा अपात्र. अर्थात ही पास-नापासाच्या पात्रतेची टांगती धारदार तलवार वयात येऊ पाहणाऱ्या प्रत्येक पुरुषाच्या मानगुटीवर.
एकीकडे व्यवस्थेने मानगुटीवर ठेवलेली ही टांगती धारदार तलवार तर दुसरीकडे वयानुरूप होत चाललेल्या मानसिक, शारीरिक बदलांसंबंधी गाढं असं अज्ञान. शिवाय व्यवस्थेकडून लैंगिक शिक्षणाला बंदी. मुळात जी व्यवस्था लैंगिकतेवर आधारलेली आहे; तीच लिंगावर बोलणं टाळते. गंमत आहे मोठी. अर्थात वयात येण्याच्या किशोरावस्थेसाठी ही एकूणच गोंधळलेली गोंधळाची अवस्था. याचाच परिणाम म्हणून अल्पवयीन मुलांकडून (पुरुषांकडून) केले गेलेले बलात्कार व्यवस्थेत जगणारे तुम्ही-आम्ही उघडय़ा डोळ्याने पाहतो. त्यांची ना शहानिशा होते, ना सारासारविचार. अखेरीस त्या अल्पवयीनांना फाशी देण्याची शिफारस होते. त्यांचं जगणं तीच व्यवस्था नाकारते. असो.
पुरुषसत्ताक व्यवस्था बळकट करायची असेल, परंपरा प्रसवायची असेल, वंश वाढवायचा असेल तर प्रत्येक पुरुषाने पुढाकार घेऊन लग्न केलं पाहिजे. मुळात इथल्या प्रत्येक पुरुषाला लग्न करायचंच असतं का? पुन्हा या लग्नाला जो नकार देईल त्या पुरुषाच्या पुरुषत्वावर आणि एकूणच जगण्यावर भलं मोठं प्रश्नचिन्ह इथली पुरुषसत्ताक व्यवस्था उभा करते. म्हणजे पुरुषांची सत्ता असलेल्या व्यवस्थेने पुरुषांना लग्नाशिवाय दुसरा पर्यायच शिल्लक ठेवलेला नाहीये. मग नाइलाजाने का असेना इथल्या पुरुषाला लग्न करावंच लागतं. सत्ताधारी असल्यामुळे लग्नानंतर आपसूकच कुटुंबप्रमुखाचा शिक्का त्याच्यावर बसतो. अर्थात ह्य शिक्क्याने मिळालेल्या अधिकारांपेक्षाही अधिक जबाबदाऱ्या पुरुषानेच निभावाव्यात; असं व्यवस्था सांगते.
अख्ख्या कुटुंबाच्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, इत्यादी-इत्यादी मुलभूत गरजा त्यानेच भागवाव्यात. त्या कशा? ते व्यवस्थेला ठाऊक नाही. त्यानेच वंशाला दिवा मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत. कुटुंबात कुणी सरणावर चढलं तरी त्याने अश्रू ढाळू नयेत. स्वत:चा, स्वत:च्या कुटुंबाचा आणि एक पुरुष म्हणून त्याला धारण करणाऱ्या समाजाचा आर्थिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, इत्यादी विकास साधण्याची जबाबदारी त्याच्याच शिरावर. कुटुंबप्रमुख आणि सत्ताधारी म्हणून या समग्र जबाबदाऱ्या पार पाडण्यात तो अपयशी ठरला तर पुरुष म्हणून जगण्यास तो सर्वार्थाने नालायक.
एकूणात गोळाबेरीज काय? तर पुरुषसत्ताक व्यवस्थेने घालून दिलेले नियम एक पुरुष म्हणून त्याने पाळलेच पाहिजेत. कारण सत्ताधाऱ्यानेच नियम पाळले नाहीत तर मग व्यवस्थेचं काय? हे नियम पाळताना पुरुष असूनही त्याच्यावर मानसिक, आर्थिक, सांस्कृतिक, वैचारिक बलात्कार झाले तरी व्यवस्थेला त्याच्याशी देणं-घेणं नाही. नीट डोळे उघडे ठेवून पाहिलं तर गेल्या कित्येक वर्षांपासून असे बलात्कार झालेले असंख्य रक्तबंबाळ पुरुष स्वत:ला अ‍ॅडजस्ट करून आपल्या आजूबाजूला जगणं सावरताना दिसतील, तर दुसरीकडे हेच अ‍ॅडजस्ट करणं न जमून पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात असे लाखो बलात्कारित पुरुष आत्महत्या करून मरताना दिसतील. आणि त्यावर उपाय म्हणून महाराष्ट्रातील पुरुषसत्ताक लोकशाही सरकारं लाखोंची पॅकेजेस वाटत सत्तेवर येता-जाताना दिसतील.
प्रश्न (पुरुषवादी-स्त्रीवादी नव्हे तर मानवतावादी) एवढाच आहे की; केवळ स्त्रियांवरच नव्हे तर पुरुषांवर बलात्कार करणारी, त्यांना आत्महत्या करायला लावून त्यांचा खून करणारी, ठार मारणारी ही पुरुषसत्ताक समाज व्यवस्था आणखी किती दिवस जगवायची?
विजय पाष्टे – response.lokprabha@expressindia.com

in Relationships Your self-esteem is in your hands
नातेसंबंध : आपला आत्मसन्मान आपल्या हाती!
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
What do you do when someone is choking in front of you
तुमच्यासमोर श्वास गुदमरल्याने एखादी व्यक्ती तडफडत असेल तर तुम्ही काय कराल? डॉक्टरांनी सांगितले हे महत्वाचे उपाय
Does Achar Really Go Bad If Women In Periods Touch
मासिक पाळीत लोणच्याला हात लावला तर खरंच खराब होतं का? जया किशोरीचं स्पष्ट उत्तर, पाहा दोन्ही बाजू