scorecardresearch

Premium

हनुमानउडी

मला आठवणारी सरितादीदी होती कॉलेजमधली. ती घरी यायची ते एक वेगळीच एनर्जी घेऊन.

हनुमानउडी

आजची डायरी लिहिताना मनात एक वेगळीच जाणीव येतेय. वादळात उद्ध्वस्त झाले तरी चालेल, पण वादळापूर्वीच हरायचे नाही. आपला मार्ग आपण शोधायचा नाही तर तो बनवायचा.

लिहू की नको या संभ्रमात डायरीचे पान मागे-पुढे पलटत होते. तेवढय़ात आई आली. ‘‘काय गं, कसला एवढा विचार करतेस?’’ तिच्या आवाजाने संभ्रमाचा बुडबुडा एकदम फुटला आणि भानावर आले. ‘‘काही नाही गं..असंच जरा बसलेय.’’ ‘‘आता काय ए रात्रीचं तुझं? झोप लवकर. उद्या ऑफिसला जायचंय आणि मोबाइल बाजूला ठेव. बस्स कर. दिवसभर त्या कॉम्प्युटर स्क्रीनसमोर बसून आणि घरी आल्यावरपण तेच. डोळ्यांना आराम दे जरा.’’ प्ले-पॉज अशी सगळी बटण स्वयंचलित असलेली आईची रेकॉर्ड वाजली कधी आणि बंद कधी झाली तेही कळलं नाही. रोजचंच असावं म्हणून असेल कदाचित पण आज माझंच लक्ष नव्हतं कशात. सरितादीदीशी बोलल्यापासून सारखा तिचा चेहरा आणि तिचं बोलणंच घोंघावत होतं मनात. दिवसभरातल्या बऱ्याच गोष्टी आपण पाटी पुसावी तशा लख्ख विसरून जातो आणि काही मात्र अगदी नकळतपणे पर्मनंट मार्करने मनात कोरल्यागत राहतात.

Marriage partnership or transaction In front of the girls
लग्न सहकार की व्यवहार?
teacher teach me science
मला घडवणारा शिक्षक : विज्ञाननिष्ठ दृष्टी मिळाली!
rakhi sawant
Video: आता ड्रामा क्वीन राखी सावंतवर येणार बायोपिक; स्वतः केलं जाहीर, म्हणाली, “आलिया भट्ट आणि विद्या बालन…”
ganpati bappa at actress dnyanada ramtirthkar home
गणरायावरचा विश्वास महत्त्वाचा – ज्ञानदा रामतीर्थकर

मी ऑफिसमधून घरी आले तर शेजारची सरितादीदी कधी नव्हे ते आमच्या घरी आली होती, सहज म्हणून गप्पा मारायला. तिला पाहिल्यावर वेगळंच वाटलं. एकतर तिला बऱ्याच दिवसांनी पाहत होते. ही सारी आपल्या फ्लॅट संस्कृतीची कृपा. घरांमध्ये फक्त एका िभतीचं अंतर असूनही कित्येक महिने एकमेकांचं तोंडही पाहू न शकण्याची जादू तीच करू जाणे. पण ती न दिसण्याचं अजून एक कारण म्हणजे तिचं ऑफिस. सकाळी आठला निघालेली सरितादीदी रात्री अकरा-साडेअकराला घरी यायची अन् वीकेंडला तर ती घराच्या बाहेरच पडायची नाही. आणि आज चक्क आठ वाजता आमच्या घरी? तेही गप्पा मारायला? नोकरी वगरे सोडली की काय हिने? माझा चेहरा फार बोलका असावा किंवा माझी उत्सुकता माझ्या चेहऱ्यापेक्षाही बोलकी असावी; पण कसं कोण जाणे तिला माझी शंका कळलीशी वाटली. कारण माझ्याकडे पाहून ती लगेच म्हणाली, ‘‘घाबरू नकोस अगं. काढून नाही टाकलंय मला जॉबवरून. सुट्टी घेतलीये मी दहा दिवसांची म्हणून आज दिसतेय इथे तुला.’’ मला तर अगदीच खजील झाल्यासारखं वाटलं. यापुढे माझा चेहरा आणि माझी उत्सुकता दोघांनाही आवर घालावा लागेल. दीदी आईला कसलीशी रेसिपी विचारत होती. मीसुद्धा त्यांच्याबरोबरच सोफ्यावर लॅपटॉप घेऊन बसले. बरंच काम पेंिडग होतं, म्हटलं घरी जाऊन निवांत करू. सरितादीदीने माझ्याकडे आणि लॅपटॉपकडे एकवार नजर फिरवली आणि म्हणाली, ‘‘काय गं रोज आणतेस की काय ऑफिसचं काम घरी?’’ आता हाच प्रश्न जर आईच्या एखाद्या मत्रिणीने किंवा तत्सम काक्या-मावशांनी विचारला असता तर मला राग आला असता. त्यांना काय माहीत कामाचं प्रेशर, परफॉर्मन्सचा स्ट्रेस, पद्धतीसुद्धा बदलल्या आहेत कामाच्या, उगाच नको तिथे नाक खुपसतात, पण आता गोष्ट वेगळी होती.

हा प्रश्न माझ्याच पिढीतल्या माझ्यासारखंच आणि माझ्याइतकंच किंबहुना बरंच जास्त काम करणाऱ्या सरितादीदीने विचारला होता. ती, या घरी काम घेऊन येण्याच्या पद्धतीला नवखी असेल असं वाटलं नव्हतं मला. माझा झालेला भ्रमनिरास या वेळी मात्र मी नीट लपवला. नाहीतर पुन्हा फजिती मघासारखी. ‘‘नाही गं दीदी. तसं रोज नाही; पण कधीकधी. खूप काम असलं की. आता जरा वर्कफ्लो वाढलाय गं, म्हणून म्हटलं करू घरून.’’ ‘‘एक सांगू का तुला?’’ तिच्या त्या प्रश्नात परवानगीपेक्षा रहस्यच जास्त होतं. जणू काही बंद गुहेसमोर आम्ही दोघी उभ्या आहोत आणि आता माझा हात पकडून ती मला आत नेणार आहे. तिनं तसं विचारल्यावर मी तिच्याकडे निरखून पाहायला लागले. दीदीची रया पार बदलून गेलेली. डोळ्यांखालची वर्तुळं काळी म्हणण्याइतकी गडद झालेली. डोळे तारवटलेले. वजन काहीसं वाढलेलं. अंगावर झूल पांघरल्यासारखी सूज आलेली. एक सुस्तपणा तिच्या एकूण वागण्याबोलण्यात जाणवत होता.

मला आठवणारी सरितादीदी होती कॉलेजमधली. ती घरी यायची ते एक वेगळीच एनर्जी घेऊन. बहुतेकदा यायची ते कोणत्याशा स्पर्धाबद्दल सांगायला. आज ती या फेस्टला गेली, उद्या अमुक, परवा तमुक असं काहीबाही. वीकेंडला न चुकता ट्रेकिंगला जाणारी सरितादीदी एकदम लख्ख डोळ्यांसमोर उभी राहिली. तेवढय़ात तिने माझ्या हातावर हात ठेवला. माझ्यासमोर बसलेल्या सरितादीदीने मनातल्या त्या प्रतिमेला कापरासारखं केव्हाच उडवून लावलं. ‘‘हे बघ मला माहितेय नवा जॉब आहे तुझा आणि तुला खूप काम करायचंय वगरे. सगळं मान्य. पण हे करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेव. जेव्हा तू घरी काम आणतेस तेव्हा त्याच्याबरोबर ऑफिसचा सगळा स्ट्रेस, टेन्शन्ससुद्धा घरात घेऊन येतेस. त्यामुळे ऑफिस अवर्समध्येच काम संपवण्याचा प्रयत्न कर. घरी नको आणत जाऊस. आय नो तू म्हणशील की ही बाई स्वत: अकरा- साडेअकराला घरी येते आणि मला सांगतेय की ऑफिस अवर्समध्ये काम संपव. पण अनुभवावरूनच सांगतेय माझ्या. मी अडकलेय यात, तू नको अडकूस.’’

‘‘अडकलेय म्हणजे ?’’ ‘‘काही नाही गं, ही नोकरी करायची म्हणून करतेय मी आणि तुला कॉर्पोरेट लाइफबद्दल वेगळं सांगायची गरज नाही. शेतमजुराकडून जसा तो जमीनदार प अन् प वसूल करण्याच्या हिशेबाने काम करवून घेतो तसंच माझंही काहीसं.. फक्त जरा सोफिस्टिकेटेड शहरी मार्गाने. कधीकधी तर घरी आल्यावर एक सुन्नपणा यायचा. रडावंसं वाटायचं, पण इतके दमलेले असायचे ना दिवसभर की डोळ्यांना त्या रडण्याचा भार पण सहन नाही व्हायचा. सोडून का देत नाहीस जॉब? तुला आवडेल ते का नाही करत आहेस ? तुझ्या मनातले सगळे प्रश्न कळताहेत मला. मलापण वाटतं अगं. पण हे नोकरीचं ना एक चक्रव्यूह असतं अगं. तुम्ही आत तर जाता, पण बाहेर येताना मात्र आपला पार अभिमन्यू होतो. अनेक पाय एकमेकांत अडकलेले असतात गं, मी काढता पाय घेतला की माझ्यामुळे चार-पाच जण पडणार हे माहितेय मला म्हणून सोडवत नाहीये नोकरी. आई-बाबांची जबाबदारी माझ्यावर आहे. आणि आता ती जबाबदारी की माझी आवड अशा दोन्हीपकी एकाची निवड करायची पाळी आल्यावर मी गपगुमान आदर्श भारतीयाप्रमाणे जबाबदारीची निवड केली. तुला माहितेय ना मला वक्ता बनायचं होतं. खूप आवड होती भाषणं करायची, ऐकायची आणि लिहायची. कॉलेजच्या सगळ्या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन मी करायचे. मनापासून एन्जॉय करायचे. त्याच्या तयारीसाठी रात्ररात्र जागायचे. पण थकायचे नाही. उलट मजाच यायची. गम्मत बघ ना आज मला रात्ररात्र काम केल्याचा ओवरटाइम मिळतो, समाधान मात्र नाही.’’

आज पहिल्यांदा सरितादीदीला मी इतकं बोलताना पाहत होते. ती बोलत नव्हती, सांगत होती स्वत:ला. ‘‘दीदी, अगं मग सोड ना नोकरी. दुसरी बघ, ज्यात तुला फावला वेळ मिळेल. त्यात तुझी आवड जोपास.’’ तिने एक कुत्सित कटाक्ष टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातल्या हतबलतेनेच त्याला पार वेढून टाकलं. ‘‘हे बघ, बी प्रॅक्टिकल. माझी पॅशन मी परस्यू करणार वगरे वगरे. असं काही होत नसतं रिअल लाइफमध्ये. जे जसं समोर येईल ते निमूटपणे स्वीकारावं लागतं, नाहीतर तेही हिसकावून घ्यायला कोणी ना कोणी तयार असतं. नोकरी तर शोधतेच गं मी. पण ती याहून फार वेगळी असेल असं वाटत नाही. म्हणून तर मी ही सुट्टी घेतली. १० दिवसांच्या पॅरोलवर सुटलेय म्हण ना. त्यानंतर आहेच की कैदखान्याची सजा.’’ असं म्हणत ती हसायला लागली. तिचं ते हसणं किती तकलादू आणि खोटं आहे हे सांगायला तिला माझ्या चेहऱ्याकडे पाहायची गरज पडली नाही. तिचं तिला आपसूक कळलं. शेवटी जाता जाता म्हणाली, ‘‘तुला सांगू का शेवटी आपण जितक्या लवकर गोष्टी अ‍ॅक्सेप्ट अन् अडॅप्ट करतो ना तितकं सुसह्य़ होतं सगळं. थोडीशी रिस्क घेऊन उडी मारण्यात काय वाईट आहे, असं बरेचदा वाटलं ग. पण त्या उडीने आकाशाला हात लागण्याच्या आशेपेक्षा जमिनीत गाडलं जाण्याची भीतीच जास्त वाटतेय.’’ तिच्या त्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहताना, वादळ नसतानाही उद्ध्वस्त झालेली एक बाईच दिसली मला. विचित्रच सगळं.

वयाच्या २५-२६व्या वर्षी आपल्या अंगात तरुण सळसळतं रक्त असतं असं म्हणतात. मग असं काय घडतं ज्याने त्या सळसळत्या रक्ताला कायमची ओहोटी लागते? खरंतर आयुष्याचा हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा. आयुष्याचा जीपीएसच म्हणा ना. पुढची दिशा दाखवणारा. पण असं एकाएकी काय होतं की जीपीएसच भांबावतं अन् आपण कुठेतरी दुसरीकडेच पोहोचतो आणि आपल्याला इथेच पोहोचायचं होतं हे मानून मोकळेही होतो. आपल्याला जे आवडत नाही त्यात काम करायचं याला लॉजिकली काही अर्थ नसतो मात्र प्रॅक्टिकली असतो हे कसं ते मात्र न उलगडलेलं कोडंच आहे. आपली स्वप्न ही कधीच प्रॅक्टिकली नसतात, ती इमोशनल असतात. आणि मनाशी जोडलेली कोणतीही गोष्ट करायला घेतली की त्यात आपण प्राण ओततो हे वाक्य पुस्तकात वाचून विसरून कसे जातो आपण?

लहान मुलांना विचारलं की तुम्ही मोठे होऊन कोण होणार? कंडक्टर, पोस्टमन, आजकालचं नवीन म्हणजे पोकेमॉन, डोरेमॉन..त्यांची ही उत्तरं मजेशीर वाटतात मात्र ती त्यांनी मनापासून दिलेली असतात. नंतर त्या लहान मुलांची प्रॅक्टिकल माणसं होतात आणि सगळं मग हवेत विरून जातं.

आजच्या आपल्या अत्यंत व्यग्र भासणाऱ्या आयुष्यात आपण ‘इज इट वर्थ’ हा प्रश्न का नाही विचारत? कदाचित उत्तराच्याच भीतीमुळे. नावडणारी नोकरी चक्रव्यूह कधीच नसते, ते असतं आपणच आपल्याभोवती विणलेलं जाळं. जे शेवटी आपल्यालाच त्याच्या फासात अडकवते, किंबहुना आपणच अडकतो. नोकरी आपल्यासाठी असते आपण नोकरीसाठी नाही हे आपल्याला बऱ्याच उशिरा कळतं. खूप पशाच्या नादात आपण प्रचंड समाधान मात्र गमावलेले असते. जी माणसं त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करताना दिसतात त्यांना आपण हसतो. ‘‘याचं काही नाही होणार रे, हातची नोकरी सोडून घरी बसला. एवढी रिस्क कशाला घ्यायची?’’ या बोलण्यात आपली असूयाच जास्त दिसून येते. कॉलेजमध्ये सदान्कदा आपल्यातले गट्स दाखवण्याची हुक्की येणारे आपण नंतर करिअरच्या बाबतीत मात्र गटांगळ्या खातो.

आजची डायरी लिहिताना मनात एक वेगळीच जाणीव येतेय. वादळात उद्ध्वस्त झाले तरी चालेल, पण वादळापूर्वीच हरायचे नाही. आपला मार्ग आपण शोधायचा नाही तर तो बनवायचा. हनुमानउडी घ्यायलाच हवी, फारात फार जमिनीवर आदळेन पण उडी पोहोचलीच तर मात्र पार सोन्याच्या लंकेत जाईन.
प्राची साटम – response.lokprabha@expressindia.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनस्वी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Make your own path

First published on: 07-10-2016 at 01:06 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×