कीटकनाशकांच्या बेसुमार फवारणीचा फटका यंदा फळांच्या राजाला, आंब्यालाही बसला आणि त्याला युरोपची दारं बंद झाली. या पाश्र्वभूमीवर कीटकनाशक न वापरता कीड कशी रोखायची याच्या काही टिप्स-

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मी ज्येष्ठ नागरिक आहे. कोकणामध्ये आमचे घर व आंब्याची काही झाडे आहेत. मी गेली ६० वर्षे कोकणामध्ये होणारे प्रचंड नुकसान हताशपणे पाहात आहे. विज्ञान एवढे प्रगत झाले आहे की, अनेक अस्मानी संकटांवर काही उपाय/ तोडगे सापडले आहेत. परंतु हा आंब्याच्या मोहोराचा व त्यामध्ये असणाऱ्या कणीच्या नाशाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही.
दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये हापूस, रायवळ या झाडांवर कोकणामध्ये मोहोर येतो. या आंब्यांच्या झाडांवर संबंधित मालक व बागाईतदार हे वेगवेगळय़ा औषधांची फवारणी करतात. परंतु जानेवारी/ फेब्रुवारी/ मार्च या काळात कोकणात पडणाऱ्या धुक्यामुळे, पावसामुळे व मळभ येत असल्यामुळे झाडांवर आलेला मोहोर व त्यातील कणी दूषित होते, खराब होते व ते सर्व गळून पडते व झाडांच्या मुळाशी एक प्रकारचा काळपट-चिकट द्राव व पदार्थ पडतो. त्यामध्ये त्या आंबा झाडाची पानेही असतात. (त्याला आम्ही पातेरी म्हणतो) हे अस्मानी संकट गेल्या ६० वर्षांपासून आहे व त्या अगोदरही चालूच होते. कोकणामध्ये कलमांची लागवड गेल्या ७५-८० वर्षांपासून सुरू आहे व आता ते एक प्रमुख (सीझनल क्रॉप) मोसमी पीक आहे. मात्र या संकटामुळे या झाडांवरील फळांचे म्हणजे फळे तयार व्हायच्या अगोदरच बनणाऱ्या त्या कणीचे प्रचंड नुकसान होते व त्यामुळे पुढे फळे वाढत नाहीत. जी फळे बदामाएवढी, सोललेल्या सुपारीएवढी झालेली असतात, तीसुद्धा गळून पडतात व झाडावर शिल्लक राहिलीच तर पाच ते दहा टक्के एवढीच कोवळी फळे उरतात. फारच थोडी झाडे या संकटातून बचावतात. परंतु त्यांच्यावरील उतारा (यिल्ड) हा खूपच कमी असतो.
पूर्वी असे अनुभवास यायचे की हापूसपेक्षा रायवळ फळांचे नुकसान कमी असे. परंतु आता तसे काही राहिलेले नाही. सर्वच झाडे संकटात सापडतात.
(सूचना : हे सर्व सविस्तर लिहिण्याचा उद्देश हाच की, जे लोक या भागात फिरलेले नसतील, त्यांना थोडे दृश्य स्वरूप समजावे.. असो.)
आणखी एक निरीक्षण असे की समुद्रापासून सुमारे पाच किलोमीटर्स- अंतरापर्यंत हा त्रास जास्त जाणवतो. पुढे सह्यद्रीकडे पायथ्याशी जसे जावे तसा हा परिणाम कमी होत जातो. यालाही काही अपवाद आहेतच.
या विषयावरील प्राथमिक माहिती लिहिल्यावर आता मूळ प्रश्नावर उत्तर शोधावयाचे आहे.
सर्व संबंधित शेतकी संस्था यावर संशोधन करीत असतील, केलेही असेल. तसेच संबंधित लोकांना त्याची माहिती या संस्थांनी दिलीच असेल. आम्ही सर्व सामान्य नागरिक व जनता. त्यामुळे आम्हाला त्याची काहीच कल्पना नाही व नसते. असा प्रश्न निर्माण झाला की लोक काळजी करायला लागतात. कारण तो सर्व देशाचा प्रश्न असतो व सर्व नागरिक हे त्याच्यावर उपाय शोधायला किंवा तो प्रश्न सुटायला हवा, यासाठी उत्सुक असतात.
या पुढील भागात काही निरीक्षणे व करता येण्यासारख्या उपाययोजना लिहिल्या आहेत. हे सर्व यापूर्वी संबंधित लोकांनी केलेलेही असेल.
गेल्या काही वर्षांपासून कल्टार नावाचे संप्रेरक वापरतात. त्यामुळे कलमांना जोर येऊन फळे येतात. यामुळे दोन गोष्टी होतात.
अ) कलमांचे आयुष्य कमी होत असावे. तसेच त्याची रोगप्रतिकारक शक्तीही कमी होत असावी. त्यांच्यावर बसणारे तुडतुडे किंवा अन्य उडते कीटक किंवा सूक्ष्मजिवाणू यांच्याशी लढण्यासाठी त्या कलमातील प्रतिकारशक्ती कमी पडत असावी. मात्र एक गोष्ट आहे की सर्वच बागाईतदार ‘कल्टार’ वापरत नाहीत. तरीसुद्धा त्या कलमांवरील फळांचे नुकसान होतच आहे.
ब) कलमांवर येणारा मोहोर वाचवण्यासाठी व फळ गळून जाऊ नये यासाठी नोव्हेंबरपासून हल्ली त्या झाडांवर फवारे मारतात. ती औषधे प्रसिद्ध औषध कंपन्यांची बनवलेली असल्यामुळे त्यांच्याबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. मात्र ज्यावर फवारे मारले जातात ते वातावरण व ते जिवाणू यांच्यावर अधिक संशोधन व्हायला हवे. कारण एक तर त्या वातावरणाचा रेटा इतका जास्त असावा की, ही औषधे कमी पडत असावीत किंवा या जिवाणूंचे जीवरसायन वेगळेच असावे किंवा ती औषधे जरुरीपेक्षा जास्त स्ट्राँग म्हणजे मारक असावीत व तीच त्या मोहोराला खलास करत असावीत. अ‍ॅसिडिक किंवा अल्कालाइन इफेक्ट म्हणजे तो मोहोर व कणी भाजून जात असावी. असो. तरी हे सर्व तर्क आहेत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे. या झाडांवर व आजूबाजूला पसरणाऱ्या फवाऱ्यातील तीव्र रसायनामुळे, परागीभवन करणारे चांगले सूक्ष्म जंतूही मरून जात असावेत व त्यामुळे कणी धरत नसावी. मात्र खरे कारण, मोहोराचे सँपल घेऊन तसेच खाली पडलेल्या रापाचे सँपल घेऊन शोधून काढायला हवे.
मला दिसल्या त्या सर्व शक्यता मी येथे लिहिल्या आहेत.
यापूर्वीच यावर संशोधन झालेले असणार, परंतु आम्हाला जनतेला काही माहिती मिळत नसल्यामुळे अशा शंका उपस्थित होतात, असो.
उपाययोजना- भाग १
मी यावर एक सोपा उपाय सुचवीत आहे. त्यासाठी वेगळय़ा-भागातील दहा झाडे किंवा कलमे (जवळ जवळची) निवडून, त्यावर खालील प्रयोग करावा-
अ) दरवर्षी त्या कलमांना खालील मिश्रणाची फवारणी करावी. एक बादली पाणी घेऊन त्यात २० ते ३० मिलिलिटर गोडेतेल मिसळावे. (दोन चमचे) नंतर त्यात ३० ग्रॅम मीठ (साधे) मिसळावे, नंतर त्यात पिवळा गंधक १० ते १५ ग्रॅम मिसळावा. हा गंधक सहजासहजी मिसळत नाही. त्यामुळे ते पाणी नीट घुसळावे. हे पाणी नंतर पंपाने व पी.व्ही.सी. पाइपद्वारा अगदी उंचापर्यंत पोहोचेल असे वापरून झाडाच्या मोहोर येणाऱ्या फांदीपर्यंत फवारे मारावे. या पाण्यामधील मिठाचे प्रमाण वाढवण्यास हरकत नाही. दरवर्षी नोव्हेंबर अखेरीस हे फवारे करावेत.
फायदा : या मिश्रणाचा मुख्य घटक गोडेतेल आहे. काही लोक एरंडीचे तेल वापरू शकतात. ते जंतुनाशकसुद्धा आहे. मात्र ते जाड असल्यामुळे ते फवारणीस जरा अडचणीचे होईल. गोडेतेलाच्या चिकटपणामुळे मोहोर येणाऱ्या फांदीवरून हे मिश्रण लगेच खाली गळून जाणार नाही. चिकटून राहील. मोहोरावरसुद्धा हे मारण्यास हरकत नाही. कारण ते संपूर्णपणे सुरक्षित आहे. मिठामुळे जंतुनाशकाचे काम होईल. हे शेकडो वर्षांपासून लोकांना माहीत आहे.
तिसरा घटक म्हणजे पिवळा गंधक. ५०-६० वर्षांपूर्वी गंधक स्प्रे पंपाने झाडांवर फवारला जात असे. त्याचा धूर होत असे व त्यामुळे तुडतुडे व अन्य सूक्ष्म जिवाणू यांच्या वाढीला आळा बसे. नंतर प्रभावी औषधे निघाली व गंधक वापरणे बंद झाले. पण गंधकाचे महत्त्व आहेच. मी माझ्या औषधात तोच वापरा असे सांगत आहे. हे मिश्रण नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत वापरावे. आठवडय़ातून एकदा फवारणी करावी. मोहोर आल्यावर तर त्यावर हा फवारा अवश्य मारावा. माझी खात्री आहे की या मिश्रणाचा अवश्य फायदा होईल. मात्र त्या वेळी अन्य कोणतीही फवारणी या झाडावर करू नये.
उपाय भाग- २
प्रयोगासाठी घेतलेल्या झाडांच्या मुळाशी प्रत्येकी एक लादी म्हणजे २५ किलो बर्फ (झाडाचा विस्तार किती आहे त्यावर बर्फाचे प्रमाण अवलंबून असते) मात्र २० ते ३० किलो मोठय़ा झाडाला पूर्ण हवा. कलमाच्या मुळापासून आठ इंच जागा सोडून हा बर्फ मोठय़ा ढेकळांच्या स्वरूपात असावा. पेरूच्या आकाराचा असावा. या सर्व ढेकळांना जमिनीच्या खाली थोडी माती खणून आठ इंचावर घालावा व त्यावर माती लकटावी म्हणजे तो बर्फ सावकाश वितळेल. बर्फ झाडाच्या मुळापासून आठ इंच अंतरावर घालावा.
फायदा : कलमावर पुन्हा मोहोर येणे व त्यासाठी झाडांच्या मुळांचे तपमान नियमित राहणे यासाठी मुळांजवळ थंडपणा हवा. म्हणून ही बर्फाची योजना आहे.
आंबा उत्पादनाची बापट पद्धती!
झाडे जेव्हा कुडकुडतात तेव्हा मोहोर येतो. या बर्फाचे पाणी जेव्हा हळूहळू खाली जाईल तेव्हा मुळे थंड होत जाऊन झाडाला फायदा मिळेल. बर्फ एक दिवशी सायंकाळी पाच ते सात या वेळात घालावा म्हणजे सावकाश वितळेल. लागोपाठ तीन दिवस सायंकाळी बर्फ घालावा. हे माझे वैयक्तिक संशोधन आहे.
या विषयातील अन्य संशोधन :
काही लोकांनी या बाबतीत संशोधन करून उपाय शोधले आहेत. त्यांचे निष्कर्ष सर्वाना माहीत नाहीत. त्या निष्कर्षांची/ परिणामांची सर्वाना बातमी असेलच असे नाही. मात्र काही लोक, (गाई/ म्हशीचे मूत्र) जनावरांचे मूत्र जमवून, ते पाण्यात मिसळून (कदाचित १० ते २०% असावे) त्याची फवारणी करतात. त्यामध्ये अन्य कोणता पदार्थ मिसळतात याबद्दल समजलेले नाही. मात्र आमच्या मते, तोही प्रकार करून पाहण्यास हरकत नाही. मात्र आमच्या मिश्रणातील घटक पदार्थ हा आमचा विचार आहे व त्याचा फायदा जरूर व्हावा. खर्चाच्या दृष्टीने पाहता हा खर्च अन्य महागडय़ा औषधांपेक्षा खूपच कमी आहे. एक मोठा खर्च म्हणजे बर्फाचा होय. तो खर्च व पाणी आणि फवारा पंप व पी.व्ही.सी. पाइप्स व मजुरीचा खर्च होय. तो खर्च अन्य फवारणीलासुद्धा येतो.
मुळांना थंड हवामान हवे असते. थंड हवेमुळे झाडांना थंडी वाजते. झाडे कुडकुडतात व त्यांना मोहोर येतो असे म्हटले जाते.
आम्ही सुचवलेले वरील उपाय निरुपद्रवी, स्वस्त व मागाहून कोणताही दुष्परिणाम न करणारे असे आहेत. काहींच्या मते, त्या विभागात निर्माण झालेले जंतू व ते वातावरण कमी ताकदीच्या उपाययोजनांना दाद देणार नाही. परंतु ते खरे नाही कारण प्रत्येक नवी उपाययोजना ही त्यांचे (जंतूंचे) दृष्टीनेही प्रथमत: त्यांना नाशकारकच असते व आमचे मिश्रण हे झाडांना लाभदायकच ठरेल. कारण ते तीव्र नाही. गंधकामुळे व तो गोडय़ा तेलामुळे झाडांचा मोहोर व बाजूची फांदी यांना चिकटल्यामुळे, त्याचा परिणाम जास्त काळ राहील. तोच फायदा मिठामुळे होईल. या तीनही गोष्टी पाण्यात टाकून, त्यावर दाब दिल्यामुळे एक प्रकारचा थोडा फेसही निर्माण होईल व तो मोहोराच्या बाजूला, जलकणांच्या स्वरूपात हवेत पसरेल. त्यामुळे त्या वातावरणातले जंतू त्या जलकणांद्वारे खाली जमिनीवर येतील. म्हणजे वातावरणसुद्धा जंतूविरहित होण्यास मदत होईल. गोडय़ा तेलामुळे येणारा बुळबुळीतपणा हेच आमचे प्रमुख संशोधन आहे. गोडय़ातेलाचे प्रमाण फार वाढू नये. कारण त्यामुळे कणीवर त्या द्रावाचे वजन येऊ नये. असा एकंदरीत सर्वागीण विचार करून आमची पद्धती मांडली आहे. तिचा वापर केल्यास शेतकरी, बागाईत बंधूंचा फायदा होईल. फळांचे नुकसान खूपच कमी होईल. अशी खात्री वाटते.
आणखी काही मुद्दे :
आंब्याच्या झाडाच्या मुळाशी बर्फाची ढेकळे घालताना एक काळजी घ्यायची ती अशी-
मोहोर आल्याशिवाय बर्फ घालू नये. नाहीतर त्या थंड पाण्याच्या प्रभावामुळे झाडांना पुन्हा पालवी येईल. अनुभव असा आहे की, ज्या वर्षी पाऊस उशिरापर्यंत थोडा-थोडा पडतो, त्या वर्षी झाडांना पालवी येते. म्हणजे मोहोर कमी येतो. तेव्हा प्रत्येक झाडांचे निरीक्षण करून मगच बर्फ वापरावा.
अगदी मुळात बर्फ घालू नये. आठ इंच अंतर मुळाच्या सर्व बाजूंनी ठेवून नंतर बर्फ आठ इंच पेंदुळी = रुंद चरी करून व ती आठ ’’ तरी खोल असावी. त्यात बर्फ टाकून वर माती टाकावी. प्रत्येक झाडाला १’७१’७६’’ एवढा तरी बर्फ (लांबी, रुंदी, जाडी) घालावा. त्याने काहीही अपाय होणार नाही.
फायदा : धरतीच्या पोटातील उष्णता वाढत आहे. हे बर्फाचे पाणी खाली मुळांपर्यंत जाऊन मुळे थंड राहायला मदत होईल. त्यामुळे मोहोर फुलणार नाही. मोहोर उमलून, परागीभवन होऊन कणी धरणे आवश्यक असते.
कणी केव्हा धरते? मोहोर उमलणे-फुलणे ही नैसर्गिक क्रिया आहे. कळी उमलते, फुलते.. हे सर्व चालूच असते. मात्र परागीभवनासाठी आवश्यक असलेले कीटक तिथे आलेच नाहीत, तर परागीभवन कसे होणार? व ते सूक्ष्म कीटक अगोदरच्या प्रभावी फवारणीमुळे मरून गेले असतील. म्हणजे ज्यांनी अगोदर फवारणी केली ते चुकीचे होते.
परागीभवन : फलन प्रक्रियेसाठी ते जंतू आलेच नाहीत. म्हणजेच फवारणीची वेळ चुकली. पुढील वर्षी ही काळजी घेणे आवश्यक आहे. ते जंतू (चांगले जंतू) हे वाईट जंतूंबरोबर मरून गेले. कदाचित वाईट व चांगले जंतू निघालेच नसतील. त्यांचे ड१्रॠ्रल्लं३्रल्ल कोठे होते? धुके पडते, मळभ येते, त्याची हवाई पाहणी करून त्या हवेचे उंचावरील ३०० फुटांपर्यंत (नमुना) सँपल कोणी घेतले आहे का? मळभामध्ये येणारे जंतू या अकाली पावसाच्या पाण्यातील जंतू नाहीत ना? याचा कोणी शोध घेतला आहे का? याला संशोधन म्हणतात. फवारणी करणे हा बाह्येपचार झाला. त्याने रोग बरा होत नाही. गेल्या पन्नास वर्षांत यावर कोणत्या प्रकारचे संशोधन झाले? त्याची नोंद आहे का?
एका राजाची गोष्ट आठवते. राज्यात सगळीकडे धूळ होती. त्याच्या मुलाच्या पायाला धूळ लागून पाय खराब व्हायचे. एकाने त्यावर उपाय शोधून काढला. तो म्हणाला, ‘महाराज, राज्यातील धूळ काही आपण नष्ट करू शकत नाही. आपण आपल्यापुरता उपाय शोधून काढू.’ त्याने त्या राजाच्या मुलाच्या पायाचे संपूर्ण पोटरीपर्यंत असे चामडय़ाचे बूट बनवून घेतले. त्या मुलाच्या पायाला नंतर कधीच धूळ लागली नाही. याचा अर्थ काय? तर प्रत्येक झाडाला असे संरक्षक कवच हवे व ते संरक्षक कवच करण्यासाठी मी सुचवलेले उपाय करावेत-
एक म्हणजे वरील उपाय व दुसरे म्हणजे मोहोरावरील बिनरासायनिक द्रव्याची फवारणी.
सूचना : मोहोर आल्याशिवाय फवारणी करू नये. फवारणी फक्त त्या-त्या झाडापुरतीच करावी. कारण सध्याच्या निरीक्षणावरून संमीलनीकरण करण्यासाठी म्हणजे बीजारोपण करण्यासाठी कीटक येतच नाहीत ते अगोदरच मरून गेलेले असतात.
सूचना : प्रत्येक झाडाची फलनिर्मिती प्रक्रिया वेगळी असते. आंब्याच्या मोहोरावर प्रत्यक्षात काय घडते हे सर्व संबंधितांनी समजून घेणे जरूर आहे. त्यामुळे त्यांचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.
मार्च २०१४ रिपोर्ट : नुकतीच सांगली-विदर्भ-खानदेश-जळगाव इत्यादी ठिकाणी गारपीट होऊन शेतीचे व फळबागांचे नुकसान झाले. परंतु त्यामध्ये जंतूंचा संबंध नव्हता. ते अस्मानी संकट होते. ती गारपीट होती. इथले संकट हे जंतू व उष्ण हवामानाचे आहे. तेव्हा त्याचा सामना वेगळय़ा पद्धतीने करायला हवा.
महत्त्वाच्या सूचना :
१) या संशोधनासाठी मी फक्त १६ ते २० लिटर पाणी (एक बादली) घेतले आहे, मोठय़ा फवारणीसाठी मोठी पिंपे वापरताना गोडेतेल त्या प्रमाणात जास्त मिसळावे. पिवळा गंधकसुद्धा त्या प्रमाणात जास्त मिसळायला हवा. मात्र गॅमॅक्झिन (ॅें७्रल्ल) वापरू नये.
२) कीटकनाशके, भंगार, जळती शेगडी, रॉकेल, डिझेल, पेट्रोल, मीठ, कोणतेही अ‍ॅसिड, खताच्या गोणी कलमाच्या बुंध्याजवळ साठवू नये.
३) दरवर्षी कलमांच्या मुळात शेणखत, गांडूळखत हे तांबडय़ा मातीत मिसळून अवश्य घालावे. काहींनी १५:१५:१५ मिश्र खताचा वापर केलेला आहे. मात्र कोणतीही रासायनिक खते आम्ही सुचवीत नाही.
४) सर्व बागायतदारांनी पावसाळय़ानंतर आपल्या कलमांच्या बागा व आंब्यांची झाडे साफ करून ठेवणे आवश्यक आहे. बागेतील मोकळी जागा पूर्णपणे स्वच्छ ठेवावी.

आता तरी डोळे उघडतील?
सुहास बसणकर
कल्टार संस्कृतीचा बळी (लोकप्रभा, १६ मे) हा चर्चा सदरातील महेश पळसुले- देसाई यांचा लेख वाचनात आला. हापूस आंबा म्हणजे फळांचा राजा, पण याच राजावर सध्या युरोपमध्ये बंदी घातली आहे. यामुळे भारताच्या आर्थिक विकासाच्या नाडय़ा काही प्रमाणात आखडल्या गेल्या आहेत. आर्थिक नफा खुणवू लागल्यामुळे भारतात सध्या मोठय़ा प्रमाणावर आंब्याची लागवड केली जात आहे. कलमी आणि रायवळ असे आंब्याचे दोन मुख्य प्रकार पडतात. विविध प्रदेशांनुसार आंब्याच्या इतर प्रजातीही आढळतात. पायरी, केसर, लंगडा, बिटकी, तोतापुरी, दशहरी अशा प्रजातींपैकी आंब्याच्या जातींमध्ये देवगडचा हापूस आंबा सर्वोत्तम मानला जातो आणि ही जात मोठय़ा प्रमाणावर परदेशात लोकप्रिय आहे.
युरोप, अमेरिका, आखाती देश हापूस आंब्यालाच सर्वाधिक पसंती देतात, त्यामुळे आंबा हे फळ म्हणजे भारताला परदेशी चलन मिळवून देणारे एक उत्पन्नाचे फार मोठे साधन आहे. नेमकी हीच आर्थिक हाव आज हापूस आंब्याच्या परदेश वारीच्या आड आली आहे. युरोपमधील बहुतेक राष्ट्रे पर्यावरण आणि जनतेच्या आरोग्याच्या बाबतीत जागरूक आहेत. त्यामुळे त्यांनी आंब्यामध्ये आढळणाऱ्या फळमाशीकडे दुर्लक्ष केले नाही. गेल्या वर्षी आंबा उत्पादकांना याबाबत धोक्याची सूचना दिली होती. पण भारतीय आंबा उत्पादकांनी या सूचनेकडे गांभीर्याने पाहिले नाही आणि कल्टार पद्धतीने आंबा पिकविला. त्यामुळे आंब्याच्या आयातीवर बंदी आणली. निदान आंबा उत्पादक आता जागे होतील आणि सेंद्रिय पद्धतीने आंबा पिकवतील अशी अपेक्षा होती. पण इथेही ज्यांना कृषीसंबंधी काही गंध नाही अशा डोक्यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले.
युरोपात आंबा नाकारला म्हणून काय झाले भारतीय बाजारपेठेतच तो विकला जाईल अशी कल्पना केली गेली. मुळातच जे कारण युरोपने दाखवले तेच भारताच्या बाबतीतही लागू झाले पाहिजे. सध्या भारतात आंबा झाडावर पिकवला जात नाही. अवकाळी पडणारा पाऊस, गारपीट, वाढते तापमान याचा धोका असल्यामुळे कैऱ्याच झाडावरून काढून त्यावर रासायनिक प्रक्रिया करून पिकविला जातो. त्यामुळे रंग, आकार, गंध, चव या सर्वच बाबतीत हापूसची गुणवत्ता कमालीची घसरत चालली आहे.
आज जगभरातून ‘पेस्टिसाइड फ्री’ मालाची मागणी मोठय़ा प्रमाणावर होत असताना आपण जाणीवपूर्वक डोळेझाक करून रासायनिक पद्धतीने पिकविला जाणारा आंबा आणि भाजीपाला परदेशात पाठविला तर तो परदेशात कसा काय खपवून घेतला जाणार? तेथील देश शेतीसंबंधी नियम काटेकोरपणे पाळतात आणि भारतात नेमकी याच बाबतीत उदासीनता आढळते. वारंवार रासायनिक शेती केल्यामुळे जमिनीचा कसही कमी होऊ लागला आहे. रासायनिक शेती पद्धतीमुळे कितीतरी कीटकनाशकांचे अंश शेती उत्पादनांमध्ये सहज आढळतात. पण भारतीय जनता अन्न सुरक्षितता आणि जैव सुरक्षितता या गोष्टींकडे फारसे गांभीर्याने पाहात नाही आणि दुर्दैवाने कितीतरी विषारी घटक आपल्या शरीरात पोहचून आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी करतात. त्यामुळे हापूस आंबा हे केवळ आपल्यासाठी निमित्त आहे.
आज खरी गरज आहे ती शेती पद्धती सुधारण्याची. त्यासाठी नैसर्गिक शेती पद्धतीवर भर दिला पाहिजे. कीडनाशकांच्या वापरावर मर्यादा घातली गेली पाहिजे आणि आर्थिक नफा कमविण्यासाठी जनतेच्या आरोग्याशी खेळणे बंद केले पाहिजे. भारतात चांगल्या पद्धतीने शेती करून दर्जेदार शेतमाल निर्माण करण्याची क्षमता शेतकऱ्यांमध्ये आहे. परदेशातील बाजारपेठा काबीज करण्याची गुणवत्ता आहे. त्यामुळे भारतातील शेतकरी आणि कृषीतज्ज्ञांनी आंबा बंदीकडे खरोखरच गांभीर्याने बघण्याची वेळ आली आहे.

More Stories onआंबाMango
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mango production
First published on: 30-05-2014 at 01:29 IST