scorecardresearch

मातृत्व हेच स्त्रीत्व?

जोपर्यंत स्त्री आई होत नाही, तोवर वैयक्तिक आयुष्यात कितीही मोठं यशोशिखर गाठलं तरी ते अपूर्ण…

सानियाची,बोपन्नाची दुहेरीत विजयी सलामी

ऑलिम्पिकमध्ये यश मिळवणाऱ्या स्त्री खेळाडूचं कौतुक आपल्याला असतंच. पण ती विवाहित स्त्री असेल तर ते दुणावतं आणि बालबच्चेवाली असेल तर आपण तिला मानतोच.. थेट डोक्यावर घेतो! हे यशाचं परिमाण इतकं सहज पुरुषांच्या बाबतीत असतं कधी? जोपर्यंत स्त्री आई होत नाही, तोवर वैयक्तिक आयुष्यात कितीही मोठं यशोशिखर गाठलं तरी ते अपूर्ण… समाजात ही जाणीव किती खोलवर रुजली आहे हे टेनिसपटू सानिया मिर्झाच्या निमित्ताने नुकतंच उमजलं.

ऑलिम्पिकमध्ये आपल्याला पदकाच्या आशा किती, या बातम्यांना आता ऊत आलाय. येत्या आठवडय़ापासून अशा ‘आशावादी’ खेळाडूंकडे सर्व भारतीय प्रसारमाध्यमं आणि पर्यायाने आपण आस लावून बसू. या सगळ्यात एक गोष्ट अगदी नजरेत भरणारी आहे. यंदाच्या आस लावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत महिला खेळाडू आघाडीवर आहेत. सायना नेहवाल, पी. सिंधू, सानिया मिर्झा ही परिचित खेळांतली परिचित नावं तर यामध्ये आहेतच, शिवाय यांच्याबरोबर ललिता बाबर, कविता राऊत या अ‍ॅथलीट्सची नावं आहेत. एकुणात रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचा झेंडा फडकावत ठेवण्यात स्त्रियांनी आघाडी घेतलेली आहे. पण कुठल्याही यशस्वी स्त्री खेळाडूच्या संदर्भात लेख लिहिला जातो, तेव्हा ती विवाहित आहे की नाही, लग्न कधी करणार, लग्न झालेलं असल्यास ती आई आहे का नाही याचेही उल्लेख आवर्जून होतात. म्हणजे विवाहित स्त्री खेळाडूचं आपल्याला जास्त कौतुक. तिचं यश आपल्यासाठी आणखी मोठं. मेरी कोमचं यश आपल्याला अद्भुत वाटतं याच्या अनेक कारणांमध्ये तिचं आई असणं हे मोठं कारण नव्हतं का? बघा .. लग्न झालेलं असूनही ही किती आणि कसा वेळ देते खेळाला याचं आपल्याला अप्रूप. हे अप्रूप विवाहित पुरुषाबाबत असतं का? विचार करा. उत्तर नकारार्थी येणार. अर्थात यात गैर काही नाही. परिस्थितीची प्रामाणिक जाणीव असल्यामुळे आतून आलेलं ते अप्रूप असतं. बाईचं राज्य घरात. मूल जन्माला घालणंच नव्हे, तर त्याचं संगोपन ही स्त्रीची जबाबदारी, हीच जाणीव आपल्या सगळ्यांना भोवतालच्या परिस्थितीनं दिली आहे. ही जाणीव किती खोलवर रुजलेली आहे, हे पंधरवडय़ापूर्वी सानिया मिर्झामुळे उमजलं आणि त्यातूनच काही प्रश्न पडले.

आपल्याला कौतुक असणाऱ्या सगळ्या भारतीय महिला खेळाडूंच्या नावात पद्मभूषण सन्मानित सानिया मिर्झाची गोष्ट थोडी वेगळी आहे. तिच्या कामगिरीकडे सगळ्यांचं अंमळ जास्तच लक्ष आहे. तशी ही खेळाडू प्रथमपासूनच लक्षवेधी. टेनिससारख्या खेळात प्रथमच कुणी भारतीय महिला खेळाडू एवढय़ा वरच्या स्थानापर्यंत पोचलेली. पण सानियाच्या वाटय़ाला या कौतुकाबरोबर वादाला तोंड देणंही पहिल्यापासून आलेलं आहे. लक्षवेधी खेळाडूची वादग्रस्त खेळाडू कशी होते, याचं सानिया हे उदाहरण. सुरुवातीला चांगल्या कामगिरीच्या जोरावरच सानियाचं नाव पुढे आलं खरं. पण नंतर प्रसिद्धीच्या शिखरावर असताना तिनं केलेल्या खराब कामगिरीला तिच्या फॅशनेबल राहण्याचं कारण दिलं गेलं आणि टीका झाली. तिनं स्वीकारलेल्या जाहिराती, तिने दिलेल्या मुलाखती टीकेच्या धनी झाल्या. तिचं जेवढं कौतुक झालं, तेवढी टीकाही तिने झेलली. असं सेलेब्रिटी स्टेट्स क्रिकेट सोडता अन्य खेळाडूंना क्वचितच वाटय़ाला येतं. हे सेलेब्रिटी स्टेट्स सानियानं पुरेपूर अनुभवलं आहे. यावर कळस चढला पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकशी तिने केलेल्या निकाहचा. मी भारताच्या वतीनेच खेळत राहणार, हे सतत सांगत राहूनसुद्धा तिच्या भारतीयत्वावर शंका घेतल्या गेल्या. तिला वेगवेगळे पुरस्कार दिले गेले, पण त्या प्रत्येक वेळी तिचं मुस्लीम असणं, तिनं पाकिस्तानी खेळाडूशी लग्न केलेलं असणं या सगळ्याची सांगोपांग चर्चा झाली. सामान्य माणसाच्या हातातल्या सोशल मीडियापासून बडय़ा मंडळींच्या हातात असणाऱ्या अन्य मीडियापर्यंत सर्व माध्यमांमधून ही चर्चा झाली. गेल्या काही काळात मिश्र दुहेरीतून तिने पुन्हा मुसंडी मारली. मार्टिना हिंगीसबरोबर जोडी जमवत ती महिला दुहेरीत उतरली मात्र आणि सानियाच्या वाटय़ाला पुन्हा एकदा घवघवीत यश लागायला लागलं. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये पदकाची आशा तिच्यावर केंद्रित झालेली आहे.

आत्ताही गेल्या पंधरवडय़ात सानिया मिर्झानं वयाच्या २९ व्या वर्षी आत्मचरित्र प्रसारित केल्याचं नवं निमित्त तिच्याविषयीच्या वैयक्तिक चर्चेला मिळालं. त्याचं प्रकाशन झालं शाहरुख खानच्या हस्ते. पुस्तक प्रकाशनानंतर विविध वाहिन्यांना सानियानं मुलाखती दिल्या. त्यातली एक गाजली, ‘त्या’ एका प्रश्नामुळे आणि त्याला सानियानं दिलेल्या उत्तरामुळे. मगाशी म्हटलेली जाणीव किती खोलवर रुजलेली आहे हे समजायला याच मुलाखतीचं निमित्त झालं.

तू सेटल कधी होणार? आई कधी होणार? याबाबत आत्मचरित्रात कुठे उल्लेख नाही.. असं तिला त्या प्रसिद्ध टीव्ही पत्रकाराने विचारलं. विम्बल्डनचं विजेतेपद मिळालं, जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळालं.. ते सगळं ठीक आहे, पण आई कधी होणार म्हणजेच सेटल कधी होणार, असा या प्रश्नकर्त्यांचा सूर दिसल्यावर सानियाने तातडीनं उलटप्रश्न केला.. ‘म्हणजे काय, मी सेटल नाहीये असं तुम्हाला वाटतं का?’ जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी येऊनही हे असं विचारलं जातंय..स्त्रीचं लग्न आणि मातृत्व हेच महत्त्वाचं असतं? हे तिने बोलून दाखवलं. त्यावर त्या पत्रकारानेही तातडीनं माफी मागत, हा प्रश्न आपण पुरुष खेळाडूला विचारला नसता हे प्रामाणिकपणे मान्य केलं. हेच तर सत्य आहे. वाईट याचंच वाटतं की, सुधारणावादी, पुरोगामी विचारांचे म्हणवून घेणारेही किती नकळतपणे बाईचं सो कॉल्ड सेटल होणं गृहीत धरतात!

केवळ खेळाडूंच्या बाबतीत हे होतं असं नाही. कुठल्याही क्षेत्रात बाईच्या यशाचं परिमाण तिच्या वैवाहिक स्थितीवरून, तिच्या आई असण्यावरून ठरतं.

हे केवळ आपल्याच भारतीय समाजात होतं असं नाही, तर जगभर होतं. अगदी प्रगत देशांमध्येही. ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्या गळ्यात पंतप्रधानपदाची माळ पडण्यामागे हीच खोलवर रुजलेली जाणीव होती. त्यांच्याबरोबर पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत असणारीने (स्त्री उमेदवारानेच हे विशेष) थेरेसा यांच्यातलं वैगुण्य सांगताना त्यांना मातृत्वाचा अनुभव नसल्याचा जाहीर उल्लेख केला. पुन्हा तेच.. वैयक्तिक आयुष्यातल्या यशापयशाशी, कामाशी मातृत्त्वाचा काय संबंध? त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे, आपण हा संबंध लावून चूक केली आहे, हे आता उमजायला लागलंय. ते जाहीरपणे मान्य करण्यात येतंय. समाजमनही त्या दृष्टीने स्त्रीमधली ‘व्यक्ती’ शोधण्याइतकं मोठं होतंय. म्हणूनच थेरेसा मे पंतप्रधान होतात आणि सानियाला प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला ताबडतोब माफी मागूनदेखील सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.
अरुंधती जोशी – response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व मनमुक्ता ( Manmukta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Motherhood

ताज्या बातम्या