स्त्री-पुरुष समानता हा विषय जगभर इतकी र्वष लावून धरण्यात येतोय, पण तरीही त्याची गरज, त्यातलं नावीन्य जगात कुठेच संपलेलं नाही आणि हीच खरी शोकांतिका आहे. ‘समानतेच्या’ गजरात पुरुष वडाला फेऱ्या मारून व्रत करत असल्याचा फोटो व्हायरल होतो तेव्हा समानतेच्या चर्चा करायला अमेरिकन राष्ट्राध्यक्षापासून ते वटपौर्णिमेपर्यंत कुठलंही निमित्त चालतं हे कळतं आणि शोकांतिकेमागची कारणं उघड होत जातात.

स्त्री-पुरुष समानता हा विषय इतकी र्वष लावून धरण्यात येतोय, पण तरीही त्याची गरज, त्यातलं नावीन्य संपत नाही आणि हीच खरी शोकांतिका आहे. काहींच्या मते आता समाज बराच पुढे गेलाय आणि समानतेच्या गप्पा केवळ राजकारणापुरत्या राहिल्यात. गेल्या आठवडय़ातल्या महत्त्वाच्या बातम्या पाहिल्या तर या तथाकथित समानतेमधील विरोधाभास चटकन नजरेत भरतो. एकीकडे अमेरिकेसारख्या अतिप्रगत देशात अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एका प्रमुख पक्षाची उमेदवार म्हणून एक स्त्री पहिल्यांदाच उभी राहतेय. या अतिप्रगत देशाच्या इतिहासात अद्याप एकही स्त्री राष्ट्रप्रमुख बनू शकलेली नाही, ही बाब अधोरेखित करत असतानाच दुसरीकडे आपल्यासारख्या तुलनेनं अप्रगत देशात पहिली महिला पंतप्रधान झाल्याला पाच दशकं झाल्याचं लक्षात येतं. त्याच वेळी भारतीय वायुदलातील पहिली महिला लढाऊ वैमानिकांची बॅच सज्ज होत असल्याची बातमी येते. त्या तिघी वैमानिकांच्या कौतुकानं सोशल मीडियाच्या भिंती भरतात न भरतात त्याच्या दुसऱ्याच दिवशी वडाला फेऱ्या मारणाऱ्या ‘सुवासिनी’ या भिंतीवर अवतरतात. सोशल मीडियावर वटपौर्णिमेची टिंगल करणारे आणि त्याच्या धार्मिक, सांस्कृतिक अधिष्ठानाची पाठराखण करणारे यांच्यात जुंपते. ‘समानतेच्या’ गजरात पुरुष वडाला फेऱ्या मारून व्रत करत असल्याचा फोटो व्हायरल होतो तेव्हा मात्र समानतेच्या चर्चा करायला अमेरिकन राष्ट्राध्यक्षापासून ते वटपौर्णिमेपर्यंत अनेक निमित्तं (मात्र) मिळाली हे पटतं.

अमेरिकेच्या राजकारणात महिला नवीन नाहीत. पण अद्याप राष्ट्राध्यक्षपद महिलेकडे आलेलं नाही. हिलरी क्लिंटन यांचं नाव डेमोक्रॅटिक पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून निश्चित झालं, त्याच वेळी अमेरिकेच्या राजकीय इतिहासानं या विशेष घटनेची नोंद घेतली. आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या निकालानंतर अध्यक्षपद महिलेला मिळतं का हे कळेलच. पण एक स्त्री अध्यक्षपदाची प्रमुख दावेदार आहे, याचं अमेरिकेला फार अप्रूप नाही. केवळ स्त्री म्हणून अमेरिकन जनता हिलरी यांना मतदान करण्याची शक्यता सुतराम नाही. त्यांचं राजकारणात मुरलेलं व्यक्तिमत्त्व अनेकांना प्रभावी वाटेल, कुणाला त्यांचा कणखरपणा.. त्यांचं परराष्ट्रीय धोरण आणि आर्थिक धोरण कुणाला दाद द्यायला लावेल. पण त्यात ‘बघा, एक स्त्री किती खोलात जाऊन विचार करतेय..’ हा भाव नाही. आपल्याकडे नेमकं उलट घडतं. स्त्रीच्या यशाचं कौतुक करताना ‘एक स्त्री असूनदेखील..’ हा पहिला उल्लेख होतो आणि याचंच कौतुक आपल्याला आजही वाटतं. साक्षात आपल्या पंतप्रधानांनादेखील हे असंच कौतुक करण्याचा मोह आवरला नव्हता आणि शेवटी पुरोगाम्यांची टीका सहन करावी लागली होती हे अनेकांच्या स्मरणात असेल. एकूणच एक स्त्री (अबला)असूनही (संसार सांभाळून) हे सगळं करते.. यातल्या कंसातल्या शब्दांचं आपल्याला जास्त कौतुक आहे.. अजूनही आहे. याला समानता म्हणायची का?

अमेरिकेतल्या परिस्थितीकडे बघताना या न्यायाने किमान वैचारिक समानता दिसते. पण त्याच वेळी या अतिप्रगत देशातल्या महिलांनाही समान संधी मिळालेली नाही, हे हिलरी आणि त्यांच्या स्त्री समर्थकांच्याच काही वक्तव्यांमधून उघड झालंय. आपला देश स्वतंत्र झाला त्या क्षणापासून राजकारणात स्त्रीला समान स्थान देण्याची ग्वाही देण्यात आली. आपली घटना हा भेद मानत नाही. मात्र समाज अजूनही मानतो. अमेरिकेत ती परिस्थिती नव्हती. आता अध्यक्षपदाच्या शर्यतीत असणाऱ्या हिलरी यांच्या आजीला साधा मतदानाचा हक्कही या देशानं दिलेला नव्हता. सक्रिय राजकारणात नेतृत्त्व करणं ही तेव्हा किती दूरची गोष्ट होती हे लक्षात आलं असेल. हिलरी यांची एक कट्टर समर्थक सांगते, ‘अमेरिकन तरुण स्त्रियांना राष्ट्राध्यक्षपदी महिला असण्याचं कौतुक नसलं, तरी आपल्याला स्त्री म्हणून एक पाऊल मागे राहावं लागत असल्याची भावना अनेक स्त्रियांच्या मनात आहेच. त्यामुळे हिलरी यांच्या उमेदवारीला महत्त्व आहे.’ म्हणजे तिथेही हे ग्लास सििलग आहेच आणि हे वारंवार तोडावं लागतंय हेही खरं.

आपल्या देशात पहिली महिला पंतप्रधान होऊन अर्धशतक होऊन गेलं. पण सार्वजनिक जीवनात अमेरिकन स्त्रियांना मिळते तेवढी तरी संधी आहे का? संधी मिळवण्यासाठी अजूनही आरक्षणाची गरज लागते हे वास्तव आहे. आपली घटना समान हक्क देते पण समाज अजूनही स्त्रियांना समान न्याय, संधी द्यायला तयार नाही. धर्म, संस्कृती आणि परंपरा, रीतिरिवाज हे पाळण्याचं मोठं इतिकर्तव्य या समाजानं स्त्रीवर सोपवलंय. हे परंपरेचं जोखड स्त्रियांनी आपल्याच खांद्यावर पेललेलं आहे आणि कित्येक जणी त्या जोखडात अडकल्यामुळेच पुढे जाऊ शकत नाहीत, हे त्यांनादेखील कळत नाही आणि पटत नाही. परंपरा कुठल्या तर सात जन्म हाच पती मिळावा म्हणून उपास धरून वडाला फेऱ्या मारायच्या. पतीला परमेश्वर मानण्याच्या आणि अशा कित्येक. वटपौर्णिमेच्या सणात गैर काही नाही. हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. जिची श्रद्धा तिनं खुशाल करावं आणि नाही तिनं नाकारावं.. ही समानता अपेक्षित असताना आपण भलत्याच गोष्टींत समानतेच्या गप्पा मारायला सरसावतोय सध्या. पुण्यात पुरुषांनी म्हणे वटपौर्णिमेचं व्रत केलं आणि वडाला फेऱ्या घातल्या.. का तर आम्ही समानता मानतो हे सांगायला. म्हणजे यांचं सात जन्मांच्या बाबतीत एकमत आहे तर. वडाला सात फेऱ्या मारल्यानं आणि सूत गुंडाळल्यानं ही इच्छा पूर्ण होणार, हेदेखील या समानतेच्या गप्पा मारणाऱ्यांना खरं वाटतंय तर. वेगळी प्रथा पाडण्याच्या या प्रयत्नात आपण कुठल्या परंपरेचं आणि का अंधानुकरण करतोय याचा साधा विचारही नसावा याचं खरंच नवल वाटतं.

दुसरीकडे सात जन्म म्हणजे दीर्घायुष्य आणि ते कसं शास्त्रीयदृष्टय़ा बरोबर आहे याची आकडेमोड सांगत व्रतामागची भावना महत्त्वाची, असं सांगणारे परंपराप्रेमी सोशल मीडियावर सगळीकडे दिसत होते. भावना महत्त्वाची असेल तर उपाशीपोटी वडाला सात फेऱ्या घालायची काय आवश्यकता? वड मिळाला नाही, तर वडाच्या छाटलेल्या फांदीला दोरा गुंडाळायचा.. वा रे भावना! हल्लीच्या काळात अशा निर्थक बनलेल्या या बाष्कळ परंपरांना शास्त्रीय अधिष्ठान कसं आहे हे सांगण्याचंही हल्ली फॅड आलंय. कुंकू लावल्यानं पतीबरोबर स्त्रीला दीर्घायुष्य लाभतं, कारण कपाळावर दररोज अ‍ॅक्युप्रेशर केलं जातं म्हणे. मंगळागौरीचे खेळ म्हणजे सर्वागसुंदर व्यायाम आहे म्हणे. स्त्रियांना मोकळीक मिळावी आणि त्यांचा संगीताच्या तालावर व्यायाम व्हावा या उदात्त हेतूनं या परंपरा सुरू झाल्या म्हणे. मग ज्या स्त्रिया पती गेल्यानंतर एकटय़ा जगत आहेत त्यांच्यासाठी नाही असं काही करावंसं वाटलं तेव्हा? तथाकथित सुवासिनींनी करायची ही सगळी व्रतवैकल्यं. केवळ स्त्रियांसाठी असलेला एकही सण किंवा एकही व्रत अशा एकटय़ा स्त्रियांसाठी निषिद्ध असतं, हे विशेष.

या असल्या समाजात, तशाच वातावरणात वाढलेली एखादी स्त्री आकाशाला गवसणी घालते, तेव्हा तिच्या यशाचं मोल निश्चितच मोठं असतं. म्हणून मग स्त्री यशस्वी होते, तेव्हा ती स्त्री असल्याचं आपल्याला जास्त कौतुक वाटतं. कारण समान संधी नाही, हे मनात का होईना सर्वानी मान्य केलेलं असतं. मुलापेक्षा (किमान) एक पाऊल मागे राहण्याची भावना भारतीय मुलीच्या मनात जन्माला आल्यापासूनच पेरली जाते. तीच पुढे रुजून मोठी होते. म्हणूनच मग समानतेच्या नावाखाली चाललेल्या उपक्रमांतले विरोधाभास ढळढळीतपणे समोर येतात. मग वडाला सात फेऱ्या घालणारे पुरुष वाढवून समानता आणायची की राष्ट्रप्रमुख स्त्री आमचीच पहिली म्हणून धन्यता मानायची हे सगळंच गौण ठरतं. समानतेचं आमचं चर्चेचं गुऱ्हाळ मात्र पुन्हा नवा रस काढायला सज्ज होतं!
अरुंधती जोशी – response.lokprabha@expressindia.com