बाईचं चारित्र्य, शील, योनीशुचिता या गोष्टी तिच्यातील व्यक्तीपेक्षा अधिक महत्त्वाच्या असतात. त्याची परीक्षा घेण्याचा, त्याबाबत बोलण्याचा, अगदी पंचायतीत जाहीर चर्चा करण्याचा अधिकारही सर्वाना असतो. आजही आहे, हे ‘त्या’ घटनेमुळे अनेकदा सिद्ध झालं. गेल्या आठवडय़ातली एकीच्या कौमार्य परीक्षेची बातमी तशा कित्येक घटनांची आठवण करून गेली. आणखी काय लिहिणार-बोलणार या असल्या अग्निपरीक्षांबाबत आणि स्त्री-स्वातंत्र्याबाबत?

गेल्या आठवडय़ातली घटना.. स्थळ – नाशिक जिल्हा, महाराष्ट्र

लग्नानंतर काही तासांतच एक शिकलासवरलेला तरुण त्याच्या नवपरिणीत पत्नीला सोडून देतो. जातपंचायतच त्याच्या या निर्णयाला पाठिंबा देत पत्नीला घटस्फोट द्यायला सांगते. कारण असतं- त्याच्या पत्नीचं कौमार्य परीक्षेत नापास होणं. नववधूची ही तथाकथित कौमार्याची परीक्षा कोण घेणार- तर साक्षात पतिदेव आणि साक्षीदार जातपंचायत! बाईच्या चारित्र्याची ही घृणास्पद परीक्षा घेणाऱ्या या पतिमहाशयांचं हे दुसरं लग्न आणि यांना पत्नी कौमार्यभंग न झालेली हवी. बरं ते कसं ओळखणार? तर सगळी पंचायत बसलेली असताना एका खोलीत पतिपत्नीसाठी पलंगावर पांढरी चादर अंथरणार. चादरीवर लाल डाग लागला तर नाणं खणखणीत! आणि हे सगळं सुरू आहे रीतिरिवाज म्हणून बरं का.. नाही तर पतिमहाशयांचं मन तसं साफ आहे. (त्यानंच असं सांगितलंय. माध्यमांतून याविषयीच्या बातम्या आल्यानंतर, त्यावर चर्चा झाल्यानंतर प्रकरण पोलिसांत गेलं तर अंगाशी येईल हे जाणून पतीने माफी मागून टाकली आणि आता पती-पत्नीमध्ये समेट झालाय म्हणे.)

किती सोपंय ना बाईला असं परीक्षेला बसवणं..काही ठिकाणी ही पांढरी चादर तर काही ठिकाणी याहूनही लाजिरवाणा प्रकार, काही ठिकाणी तर थेट अग्निपरीक्षा! चारित्र्य : भयंकरच गंभीर आणि मोठ्ठा प्रश्न. बाईचं चारित्र्य स्वच्छच हवं. पुरुषाच्या कौमार्याचं काय हो मग.. ते भंगलंय किंवा काय.. कसं ओळखायचं? रामभरोसे!

* * * * *

गेल्या दोन-तीन महिन्यातली घटना.. स्थळ- मुंबई</strong>

एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि अभिनेता यांच्या प्रेमप्रकरणानंतर आता दोघेही एकमेकांच्या ‘चारित्र्या’वर शिंतोडे उडवताहेत. प्रकरण पोलिसांत गेलंय. दुसऱ्या एका माजी प्रसिद्ध अभिनेत्रीचा या सगळ्यासंदर्भातला लेख सध्या गाजतोय. यात तिने लिहिलंय की, काही वर्षांपूर्वीपर्यंत सिनेमात दिसणाऱ्या प्रत्येक नवीन जोडीबद्दल, त्यांच्या अफेअरच्या बातम्या पिकवल्या जायच्या. पद्धतच पडली होती जणू ती. या जोडीमधले बहुतेक पुरुष नट विवाहित असायचे आणि नटय़ा अर्थातच अविवाहित. कारण पूर्वी नटीनं विवाह केला की, संपायचंच ना तिचं करिअर! तर.. या अफेअरबाबत नेहमी नटीला दोष दिला जायचा आणि तिला याबाबत उलटसुलट प्रश्नही विचारले जायचे. सगळ्या प्रश्नांची तिनं (न चिडता) – ‘हे खोटं आहे’, अशी उत्तरं देणं आवश्यक असायचं. मग भले त्यातल्या काही अफेअर्समध्ये तथ्य असलं तरीही. कारण – पुरुष नटांच्या चारित्र्याला धक्का लागता कामा नये. सिनेमात काम करणाऱ्या बाईचं चारित्र्य हा तर चवीनं चर्चा करण्याचा विषय. पुरुष नट एक लग्न न मोडता अनेक नटय़ांशी प्रकरणं करू शकतो. यामुळे त्याच्या प्रतिमेला धक्का लागणार नाही. त्यानं एकपत्निव्रत सांभाळल्याशी मतलब.. हे सगळं सांगताना गेल्या जमान्यातल्या अभिनेत्रीनं ‘आता परिस्थिती सुधारतेय’ असं म्हटलंय. कारण आता असं वागणाऱ्या नटाला आजची अभिनेत्री उत्तर द्यायला शिकलेय म्हणे. खरं-खोटं कोण जाणे!

* * * * *

पाच वर्षांपूर्वीची घटना, स्थळ – लंडन

लग्नानंतर वर्षभरात आपल्या लाडक्या पत्नीला एका अनिवासी भारतीय पतीने अमानुष मारहाण केली. संशय कसला तर चारित्र्याचा. कामानिमित्त आपल्याला सतत फिरतीवर राहावं लागतं. बाहेरून फोन करतो तेव्हा पत्नी उचलत नाही. ती बाहेर जाते कुठे तरी. म्हणजे काहीतरी सुरू आहे तिचं. मग संशय तर येणारच! भारतीय पत्नीनं असं वागावं? तिला हे शोभणारं नाही. त्या पत्नीच्या बाबतीत ही मारहाण नियमित झाली. पत्नीला मार खाणं झेपेनासं झालं तेव्हा एकदा तिनं पोलिसांना फोन केला. इंग्रजी कायद्याने लागलीच घरगुती हिंसाचाराच्या गंभीर आरोपाखाली पतीला ताब्यात घेतलं. इकडे मुलीच्या घरी पंजाबात चिंता पसरली. का? पतीनं थोडं फार मारलं तर लगेच पोलीस बोलावले.. काय बाई आहे? परदेशातील वास्तव्यात असं संशयास्पद वागतात का? आता तिच्या आई-वडिलांना प्रश्न पडलाय. घरातल्या उरलेल्या मुलींची लग्नं कशी होणार? रामा रामा रामा!

* * * * *

पंधरा वर्षांपूर्वीची घटना. स्थळ- कोकण.

एक उच्चविद्याविभूषित तरुण जोडपं सरकारी नोकरीत होतं. कोकणातील एका तालुक्याच्या गावी दोघांची बदली होते. दोघेही अधिकारपदावर. काही महिन्यांनी पत्नीला थोडय़ा लांबच्या ठिकाणी ट्रेनिंगला जावं लागतं. रोजची तालुक्याच्या गावातून जा ये झेपणार नाही, म्हणून पत्नी सरकारने तिच्यासाठी दिलेल्या निवासात – ट्रेनिंग सेंटरच्या जवळच राहते. तिच्याबरोबर त्या गावात मोजके सहकारी. सगळे पुरुष. त्यातील एक तिच्याच कॉलेजमधला. रोज बरोबर ऑफिसमध्ये ये- जा, गप्पा. सगळं गाव बघतं ना! झालं.. तालुक्याच्या गावी असलेल्या नवऱ्याला खबर गेली. मग.. चारित्र्यावर संशय अन् काय! ‘हे माझ्याबाबतीत फारच पझेसिव्ह आहेत हो..’ उच्चविद्याविभूषित नोकरदार पत्नी आपल्या सरकारी ऑफिसर नवऱ्याबद्दल प्रेमाने तिच्या जुन्या शहरी सहकाऱ्यांना हे सांगत असते. वरिष्ठ पातळीवरून हालचाली होऊन पत्नीची तातडीनं बदली. थोडक्यात प्रमोशन हुकतं. पण नवऱ्याच्या प्रेमापोटी आणि पझेसिव्हनेसपोटी प्रमोशनचं कसलं आलंय कौतुक. हे चालायचंच.. असल्या बढतीत काही ‘राम’ नाही. मुलांची शिक्षणं अखेरच्या टप्प्यात आल्यानं बाई सध्या नोकरी सोडून पूर्ण वेळ समाजकार्य करण्यासाठी वेचत आहेत.

* * * * *

हजारो वर्षांपूर्वीची घटना… स्थळ अयोध्या – भारतवर्ष

चौदा वर्षांचा वनवास संपवून रावणाचा वध करून, सीतेला एकदा अग्निदिव्य करायला लावून श्रीरामचंद्र अयोध्येला परततात. राज्याभिषेक होतो आणि सर्व काही सुरळीत सुरू असतानाच पत्नी सीतेच्या चारित्र्याविषयी कुजबुज त्यांच्या कानावर येते. रावणाच्या लंकेत राहावं लागलेल्या सीतेला शेवटी अयोध्या सोडून जावं लागतं. ती गरोदर असताना पुन्हा एकदा वनवासाला निघते आणि तिथेच ऋषींच्या आश्रमात मुलांना जन्म देते. वाढवते. पुढे मुलांच्या निमित्ताने प्रभुरामचंद्र पुन्हा एकदा पत्नीला भेटतात. पुन्हा तिचा स्वीकार करायचा तर त्यावेळी तिनं अग्निपरीक्षा द्यायला हवी असं ठरतं. अग्निपरीक्षा अर्थात चारित्र्याची. त्यातून ती सीतामाई तावूनसुलाखून बाहेर येते. पण.. अखेर सर्व जाणणाऱ्या रामानं चारित्र्यावर संशय घेतला हे सहन न होऊन आत्मत्याग करत ती धरणीच्या पोटी जाते.

* * * * *

प्रत्येक बाईला अग्निपरीक्षेच्या दिव्यातून जावंच लागतं..  अग्निपरीक्षा कुणाला चुकलीये.. साक्षात सीतामाईलादेखील नाही. मग आपण कोण? राम जाणे.. तो बोलो सियावर रामचंद्र की जय!
अरुंधती जोशी – response.lokprabha@expressindia.com