स्त्रीचे कपडे हा सार्वजनिक चर्चेचा विषय कसा होऊ  शकतो? स्त्रीनं काय घालावं, काय घालू नये हे समाज ठरवतो आणि काय घालू नये यावर प्रशासन नियम लादतं. कारण त्यातून धार्मिक आणि धर्मनिरपेक्ष अस्मितांना धक्का बसतो म्हणे. कपडय़ांना चिकटलेली नीतिमत्तेची झालर स्त्रीच उसवून टाकत नाही, तोवर बुर्किनी, मॅक्सी बंदीसारखे विषय गाजत राहणार.

स्त्रीचे कपडे हा सार्वजनिक चर्चेचा विषय कसा होऊ  शकतो?  स्त्रीनं काय घालावं, काय घालू नये हे समाज (पुरुषप्रधान समाज हे महत्त्वाचं) ठरवतो, त्यापलीकडे जात आता स्त्रियांनी कसे कपडे घालू नयेत, याचे बंदी नियम जगभरातली लोकनियुक्त सरकारं, स्थानिक स्वराज्य संस्था, प्रशासनंदेखील घालू लागली आहेत. म्हणजे मुंबईसारख्या देशातल्या अत्याधुनिक, स्मार्ट, मेट्रोपॉलिटन वगैरे विशेषणं लावणाऱ्या शहराच्या अगदी लगतच्या एका उपनगरात स्त्रियांच्या ‘मॅक्सी’ घालण्यावर (मॅक्सी म्हणजे अगळ-पघळ आणि काहीसा ओंगळ नाइट गाउन) बंदी येऊ शकते. तर फ्रान्ससारख्या जगातल्या स्मार्ट, प्रगत, अत्याधुनिक, (आणि मुख्य म्हणजे सेक्युलर) वगैरे वगैरे देशात ‘बुर्किनी’वर बंदी घातली जाते. बुर्किनी म्हणजे बुरखा आणि बिकिनी या शब्दांना जोडणारा कपडय़ाचा नवा अवतार. पोहण्यासाठी योग्य असा.. स्विमिंग कॉच्युमच खरा, तरीही इस्लामी प्रथेनुसार बहुतांश अंग झाकून ठेवणारा. बुर्किनी बंदीचा हा विषय आतापर्यंत आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये एवढा चर्चिला गेलाय की, आता जगभरात स्त्रियांचे कपडे हाच एक ज्वलंत मुद्दा राहिलाय का अशी शंका यावी.

मुस्लीम स्त्रियांना हिजाबसारखे नियम पाळावे लागतात, त्यामुळे बीचवर समुद्रस्नान करण्यासाठी जाताना बिकिनी वगैरेंचा उच्चार करणंही दूर. यावर उपाय म्हणून एका लेबनीज डिझायनरनी ही बुर्किनी जन्माला घातली. पण त्यावरून एवढा गहजब होईल, असं तिला वाटलं नसेल. हा विषय धार्मिक अस्मिता आणि धर्मनिरपेक्ष अस्मिता या दोन्हीचं प्रतीक बनला आहे सध्या. फ्रान्समधील समुद्रकिनारा लाभलेल्या अनेक शहरांमध्ये तिथल्या स्थानिक प्रशासनाने बुर्किनीवर बंदी घातली. कारण फ्रान्सच्या धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येत ते बसत नाही. या मुक्त आणि आधुनिक देशात स्त्रियांना बिकिनी घालण्यास मनाई असं कुठेही म्हटलेलं नाही. मग ठरावीक समाजाच्या स्त्रियांनी धर्माच्या नावाखाली असा वेगळा पेहराव का करायचा? ज्या कारणासाठी फ्रान्समध्ये हिजाबवर बंदी घालण्यात आली होती, तीच कारणं पुढे करत, बुर्किनी हा देशाच्या धर्मनिरपेक्ष इभ्रतीचा प्रश्न केला गेला. याशिवाय स्त्रियांच्या या पेहरावामुळे देशाच्या सुरक्षेलादेखील धोका निर्माण झाला आहे म्हणे. या अशा एकतर्फी बंदीला अर्थातच विरोध झाला. या बंदीला विरोध करण्यात मुस्लीम देशच पुढे होते, हे उघड आहे. पण यातल्या अनेक देशांनी बुर्किनीसदृश वस्त्रप्रावरणांवर यापूर्वी बंदी घातलेली आहे. का? तर मुस्लीम स्त्रीनं कायम परदानशीन असलं पाहिजे, तिचं नखदेखील दिसता कामा नये, म्हणून. बुर्किनीत तुमचं सगळं तोंड दिसतं आणि असं चारचौघांत स्त्रियांनी पोहणं कदाचित धर्मविरोधीदेखील असेल. म्हणजे त्या बिचाऱ्या बुर्किनीला दोन्हीकडून विरोध होतोय. स्त्रीच एवढं अंग उघडं का दाखवते म्हणून आणि एवढं अंग का झाकते म्हणून.

बुर्किनीची जी अवस्था आहे, अगदी तशीच स्त्रीची आहे. म्हणजे तिने कसेही कपडे घातले तरी, समाजपुरुष तिला टीकेच्या भिंगातून बघणार. अंगभर कपडे घातले तर ती फारच बुरसटलेल्या संस्कृतीमधली मागास ठरणार, कदाचित कट्टरवादीही ठरणार आणि कमी कपडे घातले की, उच्छृंखल ठरणार, धर्मबुडवी ठरणार, तिच्या नीतिमत्तेवरही प्रश्नचिन्ह येणार. कपडय़ांमधून नीतिमत्ता ठरण्याचे हे नियम पुरुषांना लागू आहेत का हो? सहसा नाही. म्हणजे जीन्स घातलेला मुलगा तो आधुनिक आणि सलवार झब्बावाला तो नीतिमत्ता जपणारा किंवा पुरातन असं आपण (म्हणजे समाजपुरुषाने) अजिबातच ठरवून टाकलेलं नाही. कारण हा समाजपुरुष सगळे नियम स्त्रियांसाठीच करतो ना! स्त्रियांनी ते पाळायचे असतात, नाही तर समाजात अशांती पसरते, गुन्हे वाढतात. स्त्रीवर बलात्कार होतो, त्याला तिचे कपडे कारणीभूत असतात, असे अकलेचे तारे आपल्याकडे कमी वेळा तोडले गेलेले नाहीत. छेडछाड होते, अतिप्रसंग होतो तेव्हा स्त्रीच्या चारित्र्यावर आधी चर्चा करतो हा समाजपुरुष आणि चारित्र्य ठरवण्यात तिचे कपडे फार मोठी भूमिका ठरवतात. त्याचे ठोकताळे ठरलेलेच आहेत आपल्याकडे. साडी, अघळपघळ पंजाबी ड्रेस किंवा पारंपरिक (?) कपडे घालणारी ती साधी आणि पाश्चात्त्य कपडे घालणारी ती आधुनिक आणि उच्छृंखल. तोकडा स्कर्ट, जीन्सवर तोकडा टॉप घालणारी, नखं-ओठ रंगवणारी तर अत्याधुनिक, समाजानं ओवाळून टाकलेली.. आणि काही लोकांसाठी म्हणूनच ‘अ‍ॅव्हेलेबल’. हे ठोकताळे आणि निकषांची डिग्री यांत प्रांत, गाव, उपनगर, शहर यानुसार थोडे फार बदल होतात इतकंच. संस्कृतीच्या नावाखाली काही ना काही कपडय़ांचे ठोकताळे असतातच आणि स्त्रीचं सो कॉल्ड चारित्र्यही ते ठरवत असतात. हे ठोकताळे लहानपणापासून मुला-मुलींवर इतके बिंबवले जातात की, त्यातलं काळं-पांढरं न कळत्या वयातच ठरून गेलेलं असतं त्यांच्या मनात.. अगदी खोलवर. व्यक्तिस्वातंत्र्य, आवड, पसंती, कम्फर्ट या कारणांसाठी हे ठोकताळे तोडण्याची हिंमत फार कमी जणांना होते.

बुर्किनी बंदीला विरोध करणाऱ्यांमध्ये काही व्यक्तिस्वातंत्र्याचे भोक्ते होते. स्त्रीने काय घालावं हे ठरवण्याचा हक्क तिला आहे. तिनेच ते ठरवलं पाहिजे. तिथल्या न्यायालयानेदेखील असाच निर्वाळा देत बुर्किनी बंदी अवैध ठरवली, पण तरीही नीस आणि इतर शहरांनी हे बंदीचं खूळ सोडलेलं नाही. धर्मनिरपेक्ष-सेक्युलर म्हणवणारा देश असा एकतर्फी बंदी कशी घालू शकतो? केवळ स्वत:ची धर्मनिरपेक्षता सिद्ध करण्यासाठी स्त्रियांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला का घातला जातो? हे रॅशनल मनाला समजू शकत नाही, तसं केवळ धर्माचा आधार घेत स्त्रीने काय घालावं आणि काय घातलं म्हणजे ती धर्मबुडवी हे समाज कसा ठरवू शकतो? आणि आपल्या कपडय़ांवरून नीतिमत्ता ठरवणाऱ्या समाजाला कवटाळण्यात त्या स्त्रीला तरी नेमकं काय मिळतं?  हे समजण्याच्या पलीकडे आहे.

बुर्किनी वापरणाऱ्या किती स्त्रिया केवळ धार्मिक कारणासाठी असा स्विमिंग कॉस्च्युम निवडत असतील? त्यातल्या बहुतेक स्त्रियांना त्यांच्या धर्माने उद्या अचानक बिकिनी घालायला परवानगी दिली, तरी त्या या तोकडय़ा वस्त्रात कम्फर्टेबल असतील का? शक्यच नाही. कारण वर्षांनुवर्षांचं चारित्र्याचं कंडिशनिंग. असे तोकडे कपडे घालणं म्हणजे वाईट, हेच मनात बिंबवलं गेलेलं. या वैचारिक कंडिशनिंगमध्ये धर्म कोणता हे महत्त्वाचं नसतंच कधी. ते केवळ समाजपुरुषाच्या हाती लागलेलं निमित्त असतं. धर्माचा खुळखुळा वाजवला की, त्यावर कुणाचा आवाज चढतच नाही म्हणून शोधलेलं निमित्त. आपल्याकडच्या स्त्रियादेखील पोहताना ज्या पद्धतीच्या स्विमिंग कॉस्च्युमची निवड करतात, तो बुर्किनीपेक्षा काही फार वेगळा नसतो. व्यवस्थित बाह्य़ा असलेला, मांडय़ा, पाठ झाकली जाईल असाच हा वेश असतो. मुळात स्वीमिंग कॉस्च्युम घालणाऱ्या स्त्रियाच कमी. असे कमी कपडे चारचौघांत कसे घालायचे म्हणून नेसत्या वस्त्रानिशी पाण्यात उतरणाऱ्याच अधिक. आपल्या देशातल्या किती स्त्रिया बिकिनी घालून सार्वजनिक बीचवर समुद्रस्नानाला जातात? जाऊ शकतात? आणि इथे आपलं धार्मिक वैविध्य, पेहराव स्वातंत्र्य सगळ्याचा विचार केला तरी उत्तर – अगदी मोजक्या असंच येईल. गोव्याचा अपवाद वगळला (तेही परदेशी पर्यटकांचा) तर बिकिनीतली स्त्री फारशी कुठे दिसणार नाही. बिकिनीसारखा वेश आपल्याकडे रुळणारा नाहीच. तो इथल्या स्त्रियांनाच आवडणार नाही घालायला. कारण तशी त्यांना आणि समाजाच्या डोळ्यांना कधी सवयच नाही. बिकिनी घातलेली स्त्री म्हणजे संस्कृतीविरोधी आणि अश्लील. हे ठरवणारे समाजपुरुष मात्र राजरोस उघडय़ावाघडय़ा शरीरांनी समुद्रस्नान करत असतात. आपल्याकडच्या वॉटर पार्कनामक हैदोस घालण्यासाठी निर्माण केलेल्या सार्वजनिक हौदांमध्ये तर आजकाल ओंगळवाणं दृश्य दिसतं. साडी, पंजाबी ड्रेसच्या ओढण्यांसकट स्त्रियांचं सचैल स्नान सुरू असतं. शेजारी उघडीबंब पुरुषशरीरं नाचत असतात आणि बाजूला ही अशी नखशिखांत झाकलेली शरीरं लाजत उभी असतात. हे दृश्य मोहक नसतं, तेही तितकंच अश्लील म्हणायला हवं. पुरुषांच्या या अंगप्रदर्शनाला कुणी आक्षेप घेतल्याचं कधी ऐकिवात नाही. जगभरात कुठेही नाही, कुठल्याच धर्मात, प्रांतात पुरुषांच्या अशा अंगप्रदर्शनावर बंदी नाही किंवा पुरुषांच्या पेहरावाबद्दल नियम नाहीत. स्त्रीला मात्र साडी, पडदा, बुरखा, दागिने, कुंकू, गजरे याचे नियम लागू, पुन्हा ते त्यांच्या आयुष्यातल्या पुरुषाच्या अस्तित्वाला जोडलेले. हे नियम पाळले तरी कुणी तरी ठपका ठेवणार आणि मोडले तरी कुणाच्या तरी भावना दुखावणार.. म्हणजे कपडय़ांना लावलेली नीतिमत्तेची, धर्माची, चारित्र्याची झालर स्त्रीनेच आधी उसवून टाकली पाहिजे. तरच व्यक्तिस्वातंत्र्याच्या दिशेने एक पाऊल पुढे पडेल आणि बुर्किनी, मॅक्सी बंदीसारखे विषय चघळले जाणार नाहीत.

response.lokprabha@expressindia.com