‘प्रोजेक्ट मेघदूत’चा गट सध्या ईशान्येकडील राज्यांमध्ये फिरतो आहे. जिला नदी नाही तर नद असं म्हटलं जातं, त्या ब्रह्मपुत्रा नदीच्या काठाकाठाने फिरताना त्यांना या परिसराची कोणती वैशिष्टय़े जाणवली?

‘प्रोजेक्ट मेघदूत’ या२०११ मध्ये सुरू झालेल्या प्रकल्पाचं हे चौथं वर्ष. गेली तीन र्वष भारताच्या वेगवेगळ्या भागांत फिरून पावसाचा आणि मुख्यत: मान्सूनच्या पावसाचा आणि त्याबरोबर होणाऱ्या निसर्गातील बदलांचा, त्यावर आधारित समाज-अर्थकारणाचा वेध घेत हा गट भारताच्या विविध भागांत फिरतो आहे. या वर्षी ‘प्रोजेक्ट मेघदूत’च्या गटाने पावसाचा अभ्यास करण्यासाठी ईशान्य भारताची निवड केली आहे. ब्रह्मपुत्रा नदीच्या काठाकाठाने प्रवास करून ते अभ्यास करणार आहेत.
पाण्याच्या नियोजनाचा दुष्काळ
भारताच्या ईशान्य भागाचा दौरा सुरू करण्याच्या आधी प्रोजेक्ट मेघदूताचा गट काही काळ पुण्यामध्ये काम केलेल्या आणि सध्या गुवाहाटी येथे स्थायिक असलेल्या प्रांजल घोयार या पत्रकाराला भेटला. एकूणच ईशान्य भारतातल्या पाण्याच्या वापराविषयी त्याने काळजी व्यक्त केली होती. ‘प्रोजेक्ट मेघदूत’ मधील काही संशोधकांनी देखील अशीच काहीशी काळजी व्यक्त केली होती. पहिल्या वर्षी पश्चिम घाटामध्ये फिरताना त्यांनी मुबलक पावसाचा प्रदेश पाहिला होता. त्यानंतर गेल्या वर्षी पश्चिम भारतात, म्हणजे मान्सून जिथे सगळ्यात उशिरा पोचतो अशा भागात फिरताना त्यांना ही गोष्ट प्रकर्षांने जाणवली होती. या दोघांच्याही मते माणूस पाण्याच्या नियोजनात कमी पडतो आहे. पश्चिम घाटामध्ये, म्हणजे जिथे पाऊस अतिशय कमी पडतो तिथे पाणी निदान पावसाळ्यात मुबलक प्रमाणात मिळत असल्याने पाणी साठवण्यासाठी काही उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. इथल्या मातीच्या प्रकारामुळे इथे मोठय़ा प्रमाणात पाणी साठवून ठेवणं शक्यही नाही म्हणा; पण तरीही कोणत्याही प्रकारच्या संवर्धनाचा विचार होताना दिसत तरी नाही. त्यामुळे मुबलक पाऊस पडूनही केवळ पावसाळ्यातलं एकच पीक घेण्यात येतं.
दुसरीकडे पश्चिम भारतात पावसाचं पाणी अतिशय कमी पण काही नद्यांच्या प्रवाहामुळे भूगर्भातल्या पाण्याचा साठा तुलनेने चांगला आहे. इथे भूगर्भातलं पाणी उपसून खरीप आणि रब्बी अशी दोन्ही पिकं घेण्यात येतात. कदाचित पुढच्या काही पिढय़ांना अति वापरामुळे पाणी मिळणारही नाही. पण भविष्याचा कोणताही विचार न करता जमिनीच्या पोटामधला पाण्याचा उपसा अव्याहतपणे सुरू आहे.
आणखी एक गोष्ट अशी की ज्या भागांमध्ये पावसाचं पाणी खूप आहे, तिथे पावसाबद्दल एकूणच कमी माहिती असते. ईशान्य भारतातही पावसाच्या माहितीबद्दल आणि पाणी साठवण्याबद्दल ‘प्रोजेक्ट मेघदूत’च्या गटाला असाच अनुभव आला.

ईशान्य भारतात मान्सून
यावर्षी एल निनोच्या पाश्र्वभूमीवर मान्सूनची आतापर्यंतची प्रगती म्हणावी तशी समाधानकारक नाही. पावसाच्या प्रदेशातही पर्जन्यमानाचे आकडे सरासरीखालीच नोंदले जात आहेत. आसामच्या बहुतांश भागात आतापर्यंत पाऊस सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षाही कमी झाला आहे. मेघालय आणि अरुणाचलमध्येही परिस्थिती तशीच आहे. तांत्रिकदृष्टय़ा मान्सून या भागात पोचला असला तरी, पावसाला म्हणावी तशी सुरुवात झालेली नाही. चेरापुंजी आणि मोहसिंराम या सर्वाधिक पावसाच्या ठिकाणांचा समावेश असणाऱ्या पूर्व खासी हिल्समध्येही पाऊस सरासरीपेक्षा ४२ टक्के कमी झाला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत आसाम, मेघालयमध्ये पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ब्रह्मपुत्रा- नदी नव्हे, नद
ईशान्य भारताचा प्रवास गुवाहाटीपासून जून महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात सुरू झाला. पहिल्या दिवशी गटातल्या काही लोकांनी इकडच्या पाण्याची, नद्यांची माहिती घेण्यासाठी आणि ईशान्य भारतातील लोकांच्या पावसाशी निगडित प्रथांच्या अभ्यासाची सुरुवात करण्यासाठी काही स्थानिक पत्रकारांची भेट घेतली. तेव्हा ब्रह्मपुत्रा नदी ही इथल्या पाण्याचा मुख्य स्त्रोत असल्याचं कळलं. त्याबरोबरच तिला सांस्कृतिक महत्त्वही आहेच. पण तिच्या एकूणच आकारमानामुळे आणि पावसाच्या काही महिन्यातल्या विध्वंसक स्वभावामुळे तिचा उल्लेख पुिल्लगी करण्यात येतो. त्यामुळे बोली भाषेबरोबरच लेखनातही तिचा उल्लेख नदी नव्हे तर नद म्हणून करण्यात येतो.
ब्रह्मपुत्रा ही या भागातली बारमाही नदी. पावसाळ्यात या नदीला सर्वाधिक पाणी असतं. या नदीला, किंवा या नदाला शंभरहून अधिक उपनद्या आहेत. त्यामुळे आसाममध्ये, मेघालयात कुठेही पाऊस झाला तर त्याचं पाणी ब्रह्मपुत्रेमध्ये येतं. त्यामुळे याचं जे मूळ पाणी आहे त्याच्या कित्येक पटीने अधिक पाणी या नदामध्ये असतं. खरंतर या नदीच्या पाण्याचं व्यवस्थित नियोजन केलं तर संपूर्ण ईशान्य भारताच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकेल, त्यानंतर उरलेलं पाणी उत्तरप्रदेश आणि बिहारमधल्या काही भागांना देताही येईल, एवढं पाणी सध्या वापराविना समुद्रात वाहून चाललं आहे.
मुबलक पाण्याच्या या प्रदेशात या वर्षी मात्र पाण्याचा प्रश्न जाणवतो आहे. साधारण एप्रिल महिन्यापासून इथे पाऊस सुरू होतो, पण अजूनही जून अर्धा संपला तरी म्हणावा तसा पाऊस इथे झालेला नाहीये. म्हणूनच गुवाहाटीच्या नवीन भागामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते आहे. त्यामुळे पावसाच्या भरवशावर राहून नियोजन न केल्याचा परिणाम खेडय़ांबरोबरच शहरातील नवीन झालेल्या वस्तीलाही जाणवतो आहे.
ईशान्येमध्ये एवढा पाऊस का?
गंगा आणि ब्रह्मपुत्रा या दोन्ही नद्यांचे त्रिभुज प्रदेश या भागात आहेत. बंगालच्या उपसागराकडून येणारे जे वारे असतात ते या बांगलादेशाच्या मदानी भागांकडून येऊन थेट इथल्या गारो, खासी पर्वत रांगांवर धडकतात. त्यानंतर खासी रांगांमध्ये एका ठिकाणी ते एकदम वर चढतात. ९० अंशांनी वर चढतात. अशामुळे गारो खासी आणि मेघालय राज्यामध्ये तुफान पाऊस पडतो. मेघालयाचं नावच बघा ना. मेघांचा कक्ष! म्हणनू चेरापुंजीमध्ये जगातील सर्वाधिक पाऊस पडतो. चेरापुंजी नंतर जगात सर्वाधिक पावसाचा प्रदेश म्हणजे मोहसिंराम. चेरापुंजी आणि मोहसिंराममध्ये दर वर्षी पावसाची स्पर्धा असते. कधी चेरापुंजीमध्ये जास्त पाऊस पडतो तर कधी मोहसिंराममध्ये. हे दोन्ही प्रदेश खासी पर्वत रांगांमध्ये आहेत. त्यामुळे सगळ्या भागांमधील ढग इथे जमा होऊन मोठय़ा प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे या भागांत एवढा पाऊस पडण्याचं सर्वात मोठं कारण हे या प्रदेशातल्या पर्वतरांगा हे आहे. अशीच काहीशी परिस्थिती आपल्याला आपल्या महाराष्ट्रातल्या पश्चिमघाटामध्ये जुळून आलेली दिसते. इथे अरबी समुद्राकडून येणारे वारे पश्चिमघाटामुळे अडकतात आणि मोठा पाऊस पडतो. इथल्या स्थानिकांशी बोलताना हे लक्षात आलं की ईशान्य भारतातल्या पावसाच्या प्रदेशामधले तीन भाग पडतात. मेघालय आणि आसाम हा एक भाग असतो. मग अरुणाचल प्रदेश आणि त्यानंतर नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा. त्यापकी आत्ता ‘प्रोजेक्ट मेघदूत’चा प्रवास आसाम आणि मेघालयामध्ये असणार आहे.
इथल्या आकडेवारीनुसार इथे जवळजवळ ४२ टक्के कमी पाऊस झाला आहे. यावर्षी याभागामध्ये झालेला सर्वाधिक पाऊस हा खासीच्या पर्वत रांगांमध्ये झाला आहे. त्यामुळे इथला उत्तर भाग आणि आसामचा ब्रह्मपुत्रेचं खोरं जे आसामच्या भागांत आहे, या सर्व भागांमध्ये पाऊस नगण्य झाला आहे. इथे जर आपण जिल्हानिहाय आकडेवारी पाहिली तर काही ठिकाणी ४० टक्के कमी पाऊस आहे, काही ठिकाणी १८ टक्के कमी पाऊस आहे, असा प्रकार आहे. नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा या ४ राज्यांमध्ये मिळून या जूनपर्यंत ७६ टक्के कमी पाऊस झाला आहे. इथे एप्रिलपासून पाऊस सुरू होतो. त्यामुळे यावेळेला पावसाच्या कमतरतेमुळे इथे शेतीला मोठी हानी होणार असून शेतकऱ्यांचा प्रश्न निर्माण होणार आहे असं लक्षात आलं. असं इथले पत्रकार सुनीत दास म्हणतात.
इथल्या पावसाचं आणखी एक वैशिष्टय़ असं की इथे एकाएकी पाऊस सुरू होतो. आणि हा पाऊस रात्री येतो. हा पाऊस रात्री सुरू होऊन सकाळी आठ-नऊ वाजेपर्यंत सुरू असतो. दहा वाजता परत सूर्य उगवतो. दिवसभर आकाशात ढग नसून सूर्यच दिसतो. परत रात्री तोच प्रकार. धुवॉँधार पाऊस. त्यामुळे इथे रात्रीच्या वेळेत पावसाचं प्रमाण वाढलेलं दिसतं.
इथे एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पाऊस असल्यामुळे इथे त्या अनुषंगानेच पिकं घेतली जातात. म्हणजेच इथलं सर्वात महत्त्वाचं पिकं म्हणजे भात. इथले शेतकरी भाताचं पिकं हे विकण्यासाठी नसून ते स्वत:साठी पिकवतात. स्वत:च्या वापरानंतर अगदीच उरलं तर ते पीक विकलं जातं.
हा प्रदेश फिरून झाल्यावर प्रवास सुरू झाला हा जोराघाटच्या दिशेने. काझीरंगाच्या जवळ नागाव जिल्ह्यातून प्रवास सुरू होता. या प्रदेशात प्रवास करताना दुतर्फा मोठ-मोठी विस्तीर्ण मदानं दिसत होती. ही मदानं इथे तुरळक पाऊस पडून गेल्याची साक्ष देत होती. अनेक ठिकाणी जनावरं चरत होती. इथे उत्पन्नाची फारशी साधणे नसल्याने इथे खूप लोक मोठय़ा प्रमाणामध्ये जनावरे पाळतात. यांचा उपयोग दूध आणि मांस दोन्हीसाठी होतो. या भागांत एक मोठा राष्ट्रीय महामार्ग झाला आहे, या महामार्गावर ती बसलेली असतात. इथल्या गावकऱ्यांशी बोलल्यावर असं लक्षात आलं की इथे एप्रिलमध्ये पाऊस न पडल्यामुळे त्यांना पेरणीच करता आलेली नाही. लावायला रोपं आहेत, पण आता पाऊस न पडल्यामुळे ती रोपही वाया चालली आहेत. लागवडीला एक महिना उशीर झाल्यामुळे त्याचा आíथक फटका नक्कीच त्यांना सोसावा लागणार आहे. इथले शेतकरी इतके सधन नाहीयेत की ते हा फटका सहजासहजी सहन करू शकतील. त्यांच्या घरामध्ये असणाऱ्या धान्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. ते घराच्या शेजारच्या डबक्यामध्ये साचलेल्या पाण्यात भात लावण्याचा विचार करता आहेत.
तिथल्या आणि महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांमधलं साम्य इथे लक्षात येतं. आपल्या इथेही पाऊस उशिरा आला आणि पहिली पेरणी झाली नाही तर त्यांचं संपूर्ण आíथक गणित बिनसतं. आपल्याला वाटतं की सर्व पावसावर अवलंबून असल्यावर असं होतं. पण इथे पाऊस जास्त होत असला तरी अशी परिस्थिती आहे. इथे असंही लक्षात आलं की पाऊसच केवळ महत्त्वाचा नाहीये, तर पावसाच्या पाण्याची साठवण करणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. आजपर्यंत स्वातंत्र्यानंतर मोठय़ा नद्यांना जोडणारी कालव्यांची व्यवस्था राबवली गेली नाहीये. आणि त्यांचा फटका इथल्या स्थानिक, गरीब शेतकऱ्यांना बसतो आहे. (क्रमश:)