अभिनय क्षेत्रात चुणूक दाखवल्यानंतर मनवा नाईक आता वळतेय दिग्दर्शनाकडे. ‘पोरबाजार’ या सिनेमाच्या निमित्ताने ती दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करतेय. या सिनेमाच्या निमित्ताने सिनेमाचा विषय, कथा, कलाकारांची निवड अशा अनेक बाबींवर तिच्याशी मारलेल्या गप्पा.

अभिनय क्षेत्रात कलाकार रुळला, लोकप्रिय झाला की साधारणपणे तिथेच राहणं पसंत करतो. सिनेसृष्टीतच वेगवेगळ्या क्षेत्रांकडे सहसा कोणी बघत नाही. हे चित्र होतं काही काळापूर्वीचं. आता हे बदललंय. कलाकार आता निर्माता, दिग्दर्शक संगीत दिग्दर्शक, दिग्दर्शक कलाकार अशी अदलाबदली इंडस्ट्रीत आता होताना दिसते. सध्या मराठी सिनेवर्तुळात एका सिनेमाची चर्चा आहे. ‘पोरबाजार’. चर्चा होण्याचं मुख्य कारण म्हणजे याची दिग्दर्शिका. लोकप्रिय अभिनेत्री मनवा नाईक हिने या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. ‘न्यूयॉर्क फिल्म अकॅडमी’मध्ये मनवाने दिग्दर्शनाचं शिक्षण घेतलंय. अनेक र्वष अभिनय क्षेत्रात असूनही मनवाला रस होता तो तांत्रिक विभागांमध्ये. ‘हिंदी-मराठी मालिका, सिनेमांमध्ये काम करतानाच मला तांत्रिक गोष्टींची आवड होती. तेव्हाच मी दिग्दर्शनाकडे जायचं ठरवलं होतं. पण अभिनय करताना कॅमेरा कसा हाताळला जातो, त्यांचे अँगल्स, एडिटिंग अशा बऱ्याच तांत्रिक गोष्टी मी शिकून घेतल्या. त्यामुळे दिग्दर्शन करणार हे तेव्हाच ठरवलं होतं,’ असं मनवा सांगते.
मालिका, नाटक, सिनेमा अशा तिन्ही माध्यमांचा अनुभव असल्याने मनवाला वेगवेगळ्या माध्यमातल्या तांत्रिक गोष्टींचीही माहिती मिळाली. तसंच मराठी, हिंदी अशा दोन्हीकडे ती रुळलेली असल्यामुळे दोन्हीकडच्या तांत्रिक बाबींचं ज्ञान तिला होतं. त्यामुळे ‘पोरबाजार’साठी तिला हे फायदेशीर ठरलं. या सिनेमाची कथा मनवाला दोन वर्षांपूर्वीच सुचल्याचं ती सांगते. ‘एका पुरस्कार सोहळ्यासाठी मी परदेशी असताना मला या सिनेमाची कथा सुचली. तेव्हा एक मैत्रीण म्हणून सई ताम्हणकरला सहज ऐकवली होती. त्या वेळी यावर सिनेमा करायचा हे पक्कं केलं,’ ती सांगते.
सिनेमाच्या प्रोमोज आणि गाण्यांवरून सिनेमाबाबतची प्रेक्षकांमधली उत्सुकता वाढतेय. मनवा सांगते की, ‘माझी आई, मीना नाईक, नेहमी लहान मुलांसोबत काम करत असते. लहान मुलांच्या कार्यशाळा, शिबिरं असं मी आजवर बघत आले आहे. त्यामुळे अनेक मुलांचं मी तिथे निरीक्षण करत असते. मुलांना नेहमी वाटतं की, आपल्याला काही होणार नाही. आपण सुरक्षित आहोत. आपण बिनधास्त आहोत. असा दृष्टिकोन अनेकांचा असतो. पण, आपल्यासोबत अघटित काही घडलं तर आपण काय करू शकतो किंवा काय केलं पाहिजे, या सगळ्याभोवती सिनेमाची कथा फिरते.’ मुलांचं अपहरण करणं, त्यांना विकणं, त्यांचा छळ करणं असे प्रकार आजकाल होताना दिसतात. हाच विषय सिनेमातून मांडण्याचा प्रयत्न केला असल्याचं मनवाने सांगितलं. सिनेमा मनोरंजन करणारा, धमाल असा आहे, पण सिनेमा संपल्यावर मात्र विचार करायला लावणाराही आहे, असंही ती नमूद करते.
सत्य मांजरेकर, अनुराग वरळीकर, सखील परचुरे, धर्मज जोशी, स्वरांगी मराठे या यंग ब्रिगेड आणि नवोदित कलाकारांसोबत सई ताम्हणकर आणि अंकुश चौधरी हेही सिनेमात असतील. ‘सिनेमातल्या मुख्य व्यक्तिरेखांसाठी मला फार विचार करावा लागला नाही. कारण मी या सगळ्या मुलांना आधीपासून बघत आले आहे. त्यामुळे चित्रपटातल्या मुख्य व्यक्तिरेखांच्या स्वभाववैशिष्टय़ांनुसार त्या-त्या मुलांना निवडण्याचं मी ठरवलं होतं,’ मनवा सांगते. या सिनेमाचं शूट खऱ्या लोकेशन्सवर झालंय. लोणावळ्याच्या एका जंगलात काही सीन्सचं शूट झालं असून उर्वरित भाग मुंबईत जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, फिल्मसिटी, मुंबईतले रस्ते अशा ठिकाणी शूट केलंय. सिनेमात काही प्रसंगांमध्ये घरांमधली दृश्य आहेत. तीही कोणत्याही सेट किंवा स्टुडिओतली नसून बोरिवलीमधल्या अभिनव सोसायटीमधली घरं आहेत.
लोकप्रिय अभिनेते मनोज जोशी यांचा मुलगा धर्मजही या सिनेमात भूमिका वठवतोय. ‘पोरबाजार’च्या निमित्ताने तो आता मोठय़ा पडद्यावर पदार्पण करतोय. ‘मी बाबांना माझ्या लहानपणापासून रंगमंचावर, स्क्रीनवर बघत आलोय. त्यांच्यासारखं आपणही या क्षेत्रात काम करायचं असं नेहमी वाटायचं. मनवाताईने ‘पोरबाजार’साठी विचारलं. मला जमेल असं वाटलं नव्हतं. कारण माझं मराठी इतकं चांगलं नाही. पण, ऑडिशन दिल्यावर माझी निवड झाली. पहिला शॉट दिल्यावर वाटलं की, येस हे आपल्याला जमू शकतं. पण एक नक्की, स्क्रीनवर एखाद्याला बघणं सोपं असतं, पण त्यासाठी प्रत्यक्ष काम करणं तितकंच कठीण. प्रचंड मेहनत लागते. याची जाणीव मला झाली. माझा पहिला सिनेमा असल्यामुळे मी खूप उत्साही आहे. या सिनेमानंतर मात्र मी नाटकांकडे लक्ष देणार आहे. सिनेमांच्या आधी मला नाटकांत जास्त रस आहे,’ असं धर्मज सांगतो. तर अनुराग वरळीकर सिनेमाचा अनुभव सांगतो की, ‘सात वर्षांपूर्वी मी ‘मिशन चॅम्पियन’ हा सिनेमा केला होता. आता ‘पोरबाजार’च्या निमित्ताने मी पुन्हा सिनेमामध्ये येत असल्यामुळे मी खूप उत्सुक आहे. या सिनेमात खूप अॅडव्हेंचर्स करायला मिळाले, खूप शिकायलाही मिळालं.’ याशिवाय सिनेमात स्वरांगी मराठे, अभिनेते-दिग्दर्शक-निर्माता महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्य मांजरेकर, नृत्यदिग्दर्शिका सोनिया परचुरे यांची मुलगी सखील परचुरे अशांचा समावेश आहे.
मनवाला एक अभिनेत्री म्हणून तर प्रेक्षकांनी बघितलंच आहे. आता वेगळ्या विषयावरील सिनेमाच्या दिग्दर्शिकेच्या भूमिकेत तिला बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.