सृष्टी अबाधित राखण्यासाठी निसर्गाला सृजन हवं असतं, प्रत्येक सजीवातून नवा जीव. याच न्यायानं तारीकडूनही तीच अपेक्षा.

कोवळ्या उन्हाची नाजूक पावलं निर्धास्त थिरकत होती. इथं-तिथं, चुंबून घेत होती सारी सृष्टी, पण काही काळच, लवकरच वैशाखाची धग येऊन लपलपणाऱ्या जिभांनी सारं कोवळेपण गिळंकृत करेल अन् परवाच फुटलेले नाजूक फुटवे पाणी-पाणी म्हणत करपतील. हा-हा म्हणता या धगीचे तांडव सर्वत्र घुमेल.. मग मधूनच कधी तरी एखादी वळवाची सर रखखखीत जिवाला आस देऊन जाईल.
बघितलंत! आडोसा शोधणारी ती चिमणी पाखरं, पक्षी-पात्रातील पाण्याजवळ कशी घुटमळताहेत. घाम गाळणारी कामगार मंडळीही धग सोसत सावलीच्या आसऱ्याने शिदोरी सोडून बसलीए.. हे ऋतुबदलाचे अखंड वारे स्वीकारत जीवसृष्टीचं जीवन असंच चालणार, अव्याहत..
गाव चिमण्यांचा सृजनसोहळा बहुतेक मानवासारखाच बारमाही. तशीच त्यांनी घरटय़ासाठी निवडलेली माझ्या खिडकीतली जागाही! तिथं क्रमानं एकेक जोडी येते. अंडी फोडून पिल्लं बाहेर पडली की संगोपन, धावपळ, शेवटी भरारी घेत घर सुनं करून जाते. मग पुन्हा घरटं हसतं, दुसऱ्या जोडीच्या चिवचिवाटानं..
मी कुतूहलानं बघत होते, बैलबंडीच्या आकारासारख्या घरटय़ात दोन अंडय़ांपैकी एक घसरलं म्हणून शोक न करता त्यावर गवत झाकून चिमण्याचं ते चुकांतून शिकणं..! अशीच आमची तारी. मंदबुद्धी असली तरी निसर्गाचे सारे सोपस्कार अंगावर ल्यायलेली, जे आणि जसं आयुष्य वाटय़ाला आलं ते जगणारी, अर्धवयाच्या विधुराशी संसार करणारी टिनपत्राची इवलीशी झोपडी नवऱ्याच्या हाताला हात लावून बांधणारी..
घरटय़ातला त्या चिमण्यांचा हा संसार पिल्लांनी भरारी घेताच संपला. लगेच दुसरी जोडी डोकावली. चिमणा निरीक्षण करायला घरटय़ाच्या भुयारदारातून आत जाऊन आला आणि चिवचिवला. सारं ठिकंय राणी, थोडीशी डागडुजी केली की बस. पण तिला काही ते पटलेलं दिसेना. ती त्याच्या कसरती फक्त न्याहाळत होती. मग दोन-तीन दिवसांनी काय ठरलं कुणास ठाऊक, तो भुयारी मार्ग कापूस आणि पिसं लावून बंद केला गेला आणि थेट समोरून उघडला. मला काचेतून सारं दिसत होतं. घरटं आधीच उथळ. उद्या जर धडपडीत पिल्लाचा तोल गेला तर? नकळत मन गुंतत होतं. त्यांचं स्थापत्यशास्त्र त्यांना चांगलं अवगत असावं म्हणून मी विचार थांबवले. यथावकाश दोन अंडी दिसली.
तारीला आता नववा महिना लागला, तिला मी बाळंतपणाच्या सुट्टीवर पाठवलं. तारीला आता मागं-पुढं कुणीच नाही. तिचा सर्वेसर्वा नवराच. भाजी विकून दोघांची पोटं भरणारा. तसा दोन घरी भांडी घासून तारीचाही संसाराला हाताभार लागत होताच. आता त्यांच्या वेलीवर फूल येणार म्हणून मलाच कोण आनंद..! पण तारी? तिला आई होण्यामागचं सुख कळत होतं की नाही कोण जाणे? चेहऱ्यावरून तर विशेष काही जाणवत नसे.
सृष्टी अबाधित राखण्यासाठी निसर्गाला सृजन हवं असतं, प्रत्येक सजीवातून नवा जीव. याच न्यायानं तारीकडूनही तीच अपेक्षा. अशा या अवघडलेल्या स्थितीतही ती नेमून दिलेली कामं करी. नवरा वेळोवेळी दवाखाना वगैरे करीतच होता. तरीही पहिलटकरीण तारीची काळजी वाटायची. दोन-चार दिवसांत तारा बाळंत झाली. दोघेही सुखरूप पाहून हायसं वाटलं.
आता अंडी उबवायला चिमणे तासन्तास घरटय़ात बसत. मला उत्सुकतेबरोबरच धास्तीही होती. काही दिवसांतच दोन पिवळ्या चोची थरथरताना दिसल्या. आता जोडीची पळापळ, त्या पिल्लांपैकी एक जरा नाजूकच. जी चोच पुढे येईल त्यात पाखरं घास भरवतं. सृष्टीच्या कडक नियमात कमजोराला स्थान नाही. कारण अन्नसाखळीत कोण कुणाचं भक्ष्य ठरेल याचा भरवसा देता येत नाही. म्हणूनच स्वरक्षणाची जबाबदारी ज्याची त्याचीच.
दोन पिल्लं त्या उथळ घरटय़ात पायांवर बसण्याच्या प्रयत्नात ढकलाढकली करीत. ते बघताना इकडे माझा जीव गोळा होई. तिकडे बघायचं नाही असं ठरवलं तरी नजर जातच होती आणि आज घरटय़ात एकच पिल्लू..!
तारी बाळासह दवाखान्यातून घरी आली. मे महिन्याचं चटचट उन्ह आन ओकत होतं. पाण्याच्या दुष्काळाने या वर्षी कहर केला होता. साऱ्यांचाच जीव मेटाकुटीला आला होता. तारीच्या मदतीसाठी तिच्या शेजारणी ‘माय’ झाल्या होत्या. तिला बाळाचं संगोपन स्वानुभवातून शिकवीत होत्या. काही दिवसांतच तारी घरकामाला लागली. बाळाच्या संगोपनाला आता ती सरावली.
घरटय़ात आता एकच पिल्लू. चिमण्यांनी भुयाराचा बंद केलेला मार्ग थोडासा उघडला. कदाचित त्या पिल्लाच्या दुर्घटनेने ते सावरले असावेत. पिल्लाचं टुण-टुण उडय़ा मारणं, ऐसपैस नाचणं छान वाटत होतं. त्यांची सहजता, निसर्गाशी जवळीक आणि प्रामाणिक असलेले हे शुद्ध शेजारी जीवनातील क्लिष्ट गुंतागुंत अलगद सोडवत होते. त्यांचं आणि आपलं जग जरी वेगळं असलं तरी एकच साम्य जाणवलं निसर्गतत्त्वाचं. माझी छान तंद्री लागली होती.. इतक्यात..
‘‘बाईऽऽ बाईऽऽऽ’’
‘‘कोण आहे?’’ मी दार उघडलं.
‘‘तारी तू, एकटीच? ये ना आत ये, बाळ कसंय गं? तुझी तब्येत बरी आहे ना? आणि सारं जमतंय ना तुला? तुझा नवरा? बाळाला कुठं ठेवून आलीस?’’
ती नुसतीच माझ्याकडे बघत उभी, मी तिच्यासमोर प्रश्नांचा गुंताच टाकला होता. त्यामुळे ती भांबावली असणार, पण एकाही प्रश्नाचं उत्तर न देता म्हणाली, ‘‘मी उद्यापासून येते कामाले.’’
‘‘अगं अजून महिनाभर तरी आराम हवा तुला. आणि बाळासाठीही तू सध्या घरीच राहा.’’
ती शून्य चेहऱ्याने पाहत म्हणाली, ‘‘मेलं ते.’’
‘‘काऽऽऽय?’’ मी किंचाळलेच. डोळ्यांसमोर काजळ-टिकला लावलेला तो निरागस गोंडस चेहरा तरळला. अचानक झाकोळ उठावं अन् डोळ्यात धूळ झोकत ढगांनी चंद्राला झाकून टाकावं असं वाटून मी तिला हलवलं, ‘‘तारी काय बोलतेस, खरं सांगतेस का गं?’’ चेहऱ्यावरचं शून्य तसंच कायम ठेवत ती ‘हो’ म्हणाली.
‘‘कसं झालं गं असं अचानक, सारंच तर सुरळीत होतं ना.़?’’
‘‘काय माहीत, त्या दिशी बाल्याले न्हाऊ घातलो, दूध पाजली, मंग पारन्यात टाकलो, रड-रड-रडे, मी त्याले झुलवलो. यायी (नवरा) भाजी इकाले गेलतं. रोजच्यावानी झोपलं मनलं, मंग भांडे घासून घरात गेलो, पारन्यात पाहतो तं हाले नाही डुले नाही, काकीले आवाज देल्ला. काकी मने, ‘तारी बाल्या मेला तुवा.’’
मी नि:शब्द..!
घरटय़ाने याची पूर्वसूचना देऊन सावध केलं होतं? की स्वीकारायचं बळ शिकवलं होतं? डोक्यात विचारांचं थैमान माजलं. मला तिची टिनाची पेटलेल्या भट्टीसारखी झोपडी आठवली. कसा तरी छताला बांधलेला पाळणा, छतावरून येणाऱ्या झळा, तिथं क्षणभरही थांबवत नव्हतं मला. वैशाखाच्या जिभांचं लपलपणं इथंही पोचलं होतं.
मी आवेगानं तारीला जवळ घेतलं. तिच्या हदयात नक्कीच काही तरी हलल्याचं जाणवलं. तिच्या डोळ्यात वळवाच्या सरींचे मोती जमले होते. बाळाच्या कोवळ्या स्पर्शाला पान्हा आसुसला होता. आणि.. माळ ओघळली.. त्यातील एकेका थेंबाचा गरम स्पर्श माझ्या खांद्यावर जाणवत होता. तिच्या आईपणाच्या समजीचा आनंद साजरा करावा की बाळाच्या जाण्याचं दु:ख..!
आज पिल्लाच्या पहिल्या भरारीचा सोहळा घरटय़ात सुरू होता.. दुसरी जोडी नक्कीच भरारत असणार इथंच कुठं तरी..!

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो