lp30आपल्या आरोग्याच्या गुंतागुंतीच्या समस्या निर्माण झाल्या की आपण डॉक्टरांकडे धाव घेतो. अनेकदा डॉक्टरांशी केलेल्या चर्चेतून आपण वेळीच अमुक अमुक खबरदारी घेतली असती तर ती समस्याच निर्माण झाली नसती, एवढी गुंतागुंतही टाळता आली असती असे आपल्या लक्षात येते. अनेकदा आपल्याला आपल्या आवाक्यात असणाऱ्या गोष्टी करून आरोग्यदायी जीवन जगणे शक्य असते. मात्र बदलत्या आणि आजच्या वेगवान जीवनशैलीत आपण ते करायचे टाळून आपल्याच पायावर धोंडा मारून घेतो. ‘आरोग्याचे रहस्य’ मध्ये डॉक्टर डय़ूक जॉन्सन आपल्याला दीर्घ आरोग्यपूर्ण जीवनाची आपल्या आवाक्यातील गुरुकिल्ली देतात.
डॉक्टर डय़ूक जॉन्सन आपत्कालीन वैद्यक क्षेत्रात काम करत होते. ते काम त्यांच्या आवडीचे आणि आव्हानात्मकही होते. एक दिवस त्यांच्या आपत्कालीन कक्षात हृदय जवळ जवळ बंदच पडलेल्या केवळ अडतीस वर्षांच्या तरुणाला उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारानंतरही त्याचे हृदय योग्य प्रतिसाद देत नसल्याने त्याचा मृत्यू अटळ होता. डॉ. जॉन्सन त्या तरुणाच्या पत्नीचे आणि लहानग्या मुलीचे दुख पाहून हेलावून गेले. त्या तरुणाला हृदयरोगाविषयी योग्य ती माहिती असती आणि त्यावरच्या उपाययोजना माहीत असत्या तर त्याचा मृत्यू टाळता अथवा लांबवता आला असता हे डॉ. जॉन्सन यांच्या लक्षात आले आणि त्या एका क्षणाने त्यांना प्रतिबंधक वैद्यक क्षेत्राकडे वळवले. खूप उशीर झाल्यानंतर दीर्घकालीन रोगांवर उपचार करण्याचे प्रयत्न करण्यापेक्षा ते होऊ नयेत म्हणून त्यांनी प्रतिबंधात्मक जागरुकतेसाठी काम करायचे ठरवले.
डॉक्टरांनी प्रतिबंधक वैद्यकशास्त्राचा अभ्यास सुरू केल्यानंतर मानवाची बदलती जीवनशैली प्रामुख्याने कारणीभूत असल्याचे लक्षात आले. आरोग्यपूर्ण जीवनाची सुरुवात मातेच्या गर्भापासूनच सुरू होत असते. अनेकदा बालपणी, तरुणपणी आरोग्यपूर्ण जीवन जगता आले नसले तरी ज्या वेळी आपले आयुष्य दीर्घ आणि निरोगी व्हावे, आपले जीवन ऊर्जा आणि स्फूर्तिदायक असावे असे वाटते ती वेळही योग्यच असते, आरोग्यपूर्ण जीवनाच्या प्रारंभासाठी. आपल्याला उशीर झालाय असं समजण्याची आवश्यकता नाही, तर तो योग्य प्रारंभ आहे असं मानून वागलात तरी आपण त्या क्षणापासून पुढील आयुष्य आरोग्यपूर्ण जगू शकतो, हेच डॉक्टर या पुस्तकात सांगतात.
विज्ञानाने आज मोठी क्रांती केली आहे. मात्र अनेकदा वैद्यक शास्त्रातीलच काही लोक झटपट पैसा कमावण्यासाठी किंवा इतर काही कारणांसाठी रुग्णाला त्याचा चांगल्या वाईट परिणामांची कल्पना न देताच उपचारांची भुरळ घालतात. जसं झटपट वजन वाढवणे किंवा कमी करणे, एका दिवसांत चरबी कमी करणे किंवा त्वचेवरील सुरकुत्या काढून टाकणे. वेळ वाचून त्वरित परिणाम साधला जाणार असल्याने लोकही अशा गोष्टींना फशी पडतात. पण आपल्याला आरोग्यपूर्ण क्रांती घडवायची असेल तर विचारपद्धतीतच मूलभूत परिवर्तन झाले पाहिजे असे डॉ. जॉन्सन यांना वाटते. एका रात्रीत तुम्ही प्रत्येक गोष्ट बदलणे अपेक्षित नाही, मात्र आपल्यातील बदल ताण कमी करण्याबरोबरच दीर्घ आणि निरोगी जीवन जगण्याची उत्तम संधी निर्माण करू शकतो हेच डॉक्टर सोदाहरण सांगतात.
डॉक्टर जॉन्सन यांनी सुरुवातीला सर्व रोगांचे मूळ कारण दाह याची माहिती दिली आहे. दाह म्हणजे काय, तो होण्याची कारणे, त्याचे दीर्घकालीन परिणाम, तो कसा टाळावा आणि त्यासाठी आवश्यक असणारा जीवनशैलीतील बदल. पुस्तकाच्या सर्वच प्रकरणांमध्ये डॉक्टरांनी लिहिलेला खूळ निवारण हा भाग फारच महत्त्वाचा आहे. आपल्या मनात अनेक शंका किंवा गैरसमज असतात, डॉक्टरांनी प्रत्येक वेळी ते गैरसमज या खूळ निवारणमध्ये दूर केले आहे. मग हृदयरोगाविषयीचे प्रकरण असो अथवा मधुमेहाचे.
पुस्तकात प्रत्येक प्रकरणांमध्ये प्रत्येक रोगांची, त्यांच्या कारणांची, त्यांच्यावरील खूळ निवारणांची आणि उपचारांची सखोल माहिती दिली आहे. डॉक्टर जॉन्सन यांनी सर्वाना करता येण्याजोगे आणि परवडण्याजोगेच उपाय सुचवले आहेत. एवढेच नव्हे तर अनेकदा अनेक रोगांच्या निदानासाठी उपचार करणारे डॉक्टर काही आरोग्य चाचण्या करण्यास सांगतात.
कोणत्या रोगाच्या निदानासाठी कोणती चाचणी आवश्यक आहे. कोणत्या वयात कोणत्या चाचण्या कराव्यात. पुरुषासाठी आणि स्त्रियांसाठीच्या खास चाचण्या कोणत्या. त्याचे परिमाण काय असावे, त्या परिमाणांचे परिणाम आणि निष्कर्ष यांचीही विस्तृत माहिती पुस्तकात देण्यात आली आहे.
वेगवेगळ्या तक्त्यांचा वापर, योग्य उष्मांक देणाऱ्या आहाराचा तक्ता, अन्न पदार्थ साठवण्यासाठी पद्धती यांची माहितीही आपल्या ज्ञानात अधिकच भर घालते. संदर्भासाठी वापरलेली जवळपास ८७५ पुस्तके, संस्था, संस्थांचे निकष, निष्कर्ष, विज्ञान पत्रिका, नियतकालिके यांचीही माहिती आपल्याला येथे मिळते.
डॉक्टर डय़ूक जॉन्सन यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचा अनुवाद वृषाली देशपांडे यांनी केला आहे. पुस्तकाचा अनुवाद जशाचा तसा करताना बऱ्याच ठिकाणी देशपांडे यांनी केलेली वाक्यरचना इंग्रजी वाक्यरचनेप्रमाणे भासते. तिचे मराठीकरण वेगळ्या पद्धतीने किंवा बोलीभाषेप्रमाणे करणेही शक्य होते असे बऱ्याच वेळा जाणवते. एवढी गोष्ट वगळता सर्वच वयोगटातील लोकांनी वाचायला हवे असे हे पुस्तक आहे.

आरोग्याचे रहस्य – डय़ूक जॉन्सन
अनुवाद – वृषाली देशपांडे
साकेत प्रकाशन
पृष्ठ संख्या – ४००
मूल्य – ३५० रुपये
रेश्मा भुजबळ – response.lokprabha@expressindia.com

Baramati farmer commits suicide by drinking poisonous medicine Allegation of neglect of government agencies
बारामतीत शेतकऱ्याची विषारी औषध पिऊन आत्महत्या, शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे आत्महत्या केल्याचा आरोप
Pimpri chinchwad, Shocking Murder Unveiled, Drunk female friend Advantage, suicide, murder, suicide turn murder, murder in pimpri, crime in pimpri, police, marathi news, post mortem report
पुणे: मद्यधुंद मैत्रिणीचा गैरफायदा घेऊन ठेवले शारीरिक संबंध; मानलेल्या भावाने केली ‘त्याची’ हत्या
High class houses out of MHADA lottery Thinking of stopping construction of expensive houses from now on
म्हाडा सोडतीतून उच्च गटातील घरे बाद? यापुढे महागड्या घरांची निर्मिती थांबवण्याचा विचार
Pune, Woman, Commits Suicide, Over Property Dispute, Case Registered, Brother, Relatives, police, crime news, marathi news,
पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा