lp40राजन खान हे नाव मराठी लेखकांना कादंबऱ्या, कथा, वैचारिक लेखन, अक्षर मानव चळवळ या सगळ्यांमुळे चांगलंच परिचित आहे. वेगळ्या धाटणीच्या त्यांच्या कथा-कादंबऱ्यांनी मराठी वाचकाला बौद्धिक आनंद मिळवून दिला आहे. या पुस्तकात त्यांचं प्रेम-आमचं प्रेम, तरुणपण या लेखांमधून तारुण्य, प्रेमभावना, लैंगिकता या विषयांवर थेट चर्चा आहे. वास्तविक हे विषय बोलण्या-लिहिण्यासाठी तसे अवघड. निकोप चर्चा व्हायला हवी पण ती होत मात्र नाही असे. त्यामुळेच या विषयांवर केलेली संयत चर्चा महत्त्वाची ठरते. लेखकाच्या तरुणपणीच्या काळातल्या प्रेमाच्या संकल्पना आणि आताच्या पिढीच्या संकल्पना यांची चांगली चर्चा या लेखांमध्ये आहे. लोकशाहीचा लिलाव या लेखात केलेली लोकशाहीवरील दीर्घ चर्चा विचारप्रवृत्त करणारी आहे. त्याशिवाय आपण आपले महापुरुष, गरिबी कायम राहणार, माणसांबद्दल लिहिणं चूक, इतिहास आणि शेण, बिघाडीची आघाडी, सुख-दु:ख आणि मेंदू, तड आणि जोड हे लेखसुद्धा वाचनीय आहेत. या पुस्तकाच्या मलपृष्ठावर राजन खान म्हणतात, ‘‘मला नेहमी वाटतं, माणसं जन्मापासून मरणापर्यंत शांत आणि सुखी जगली पाहिजेत. तसं जगणं अवघडही नाही आणि अशक्यही नाही. सुख आणि शांतता या मेंदूच्या भावना आहेत. त्या भावनांपर्यंत जाण्यासाठी माणसांना ‘माणूस असण्याचं’ ज्ञान झालं पाहिजे. त्या ज्ञानापर्यंत लोकांनी जावं यासाठी मी हे लेख लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
संगत विसंगत
– राजन खान.
अक्षर मानव प्रकाशन
मूल्य-१५० रुपये.
पृष्ठे- १५२.

lp41ओवी गाऊ विज्ञानाची हा पंडित विद्यासागर यांचा एक वेगळा उपक्रम उद्याचा समाज घडवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. ओवी हा वास्तविक पारंपरिक काव्यप्रकार. दोन दोन ओळींची, छोटेखानी, सहज लक्षात राहू शकेल अशी गेय रचना म्हणजे ओवी. गेयतेमुळे लक्षात ठेवायला सहज सोपी. अशा ओवीच्या माध्यमातून डॉ. विद्यासागर यांनी विज्ञानाची महती सांगितली आहे. विज्ञानाची सुरुवात कशी झाली, विज्ञानाचा इतिहास काय सांगतो, सजीवांची उत्पत्ती इथपासून नोबेल पारितोषिके, भौतिक, रसायन, जीव तसंच वैद्यकशास्त्रातील संकल्पना, त्याबरोबरच संगणक, जैवतंत्रज्ञान, गणित, पर्यावरण या विषयांची ओळखही ओवीरूपात प्रभावीपणे करून दिली आहे. सोबत या ओवी स्पष्ट करणारी अधिकची माहितीदेखील सोबत आहे. आपल्यासारख्या अंधश्रद्धा, रूढी, अनिष्ट परंपरा यांचा पगडा असलेल्या समाजात विज्ञानवादी विचार रुजवणं, वाढवणं हे तसं आव्हानच आहे. त्यासाठी सोप्या पद्धतीने विज्ञान सांगण्याचा हा प्रयत्न निश्चितच वाखाणण्यासारखा आहे.
पदार्थ जेव्हा तापती, तेव्हा कणांना उत्सर्जिती
असे नियमांची बांधीलकी, दावी ओवेन विलान्स रिचर्डसन
किंवा
अणुमाजी केंद्रक, त्यात असती कण सम्यक
त्यातील न्यूट्रॉन एक, चॅडविके शोधिला
अशा या ओव्या समजायला आणि लक्षात ठेवायलाही सोप्या आहेत.
ओवी गाऊ विज्ञानाची
– डॉ. पंडित विद्यासागर
संपादन- प्रतीक पुरी
डायमंड पब्लिकेशन
पृष्ठे- २२१.
मूल्य- ३९५

lp42विजयनगरचं साम्राज्य म्हणजे तत्कालीन वैभवाचा, कला-तत्त्वज्ञानाच्या पातळीवरचा तत्कालीन समाजाचा कळसाध्याय. त्याच्यामागे भक्कमपणे जे राजे उभे होते त्यातला एक म्हणजे सोळाव्या शतकातला कृष्णदेवराय हा राजा. त्याच्या कारकीर्दीत विजयनगर साम्राज्याची आणखीनच भरभराट झाली. त्याचे साम्राज्य कर्नाटक, आंध्र, तमिळनाडू, केरळ असे पसरलेले होते. त्यामुळे कन्नड, तेलुगु, तमिळ, मल्याळम् या भाषांमध्ये त्याच्यावर भरपूर लिहिले गेले आहे. पण मराठीत मात्र त्याच्यावर फारसे लेखन झालेले नाही. हे लक्षात घेऊन मराठी वाचकांना कृष्णदेवरायाचा परिचय करून देण्यासाठी डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी ही कादंबरी लिहिली आहे. हा इतिहास नाही, पण इतिहासातल्या संदर्भाचा वापर करत केलेले कादंबरीलेखन आहे. ऐतिहासिक संदर्भाचा उपयोग करून घेत मांडलेले कृष्णदेवरायाचे चरित्र आहे. अल्लाउद्दिन खिलजीपासून सुरू झालेल्या मुस्लीम राजेशाहीपुढे हरिहर आणि बुक्क यांनी उभारलेल्या विजयनगरच्या साम्राज्याने आव्हान उभे केले होते. या साम्राज्यात कृष्णदेवराय एखाद्या सूर्यासारखा तळपला. त्याची तुलना इतिहासकारांनी राम, धर्म, चंद्रगुप्त मौर्य, विक्रमादित्य, पुलकेशी यांच्याशी केली आहे. ती सार्थ कशी आहे ते या कादंबरीतून जाणवते. कृष्णदेवरायाचा काळ मांडणारी ही कादंबरी वाचनीय झाली आहे.
कृष्णदेवराय
एका सम्राटाच्या दक्षतेची यशोगाथा
– डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली
मेहता पब्लिशिंग हाऊस
पृष्ठे- २६६.
मूल्य- २७० रुपये.
प्रतिनिधी – response.lokprabha@expressindia.com