इंग्रजी राजवटीत मुद्रणालय, वृत्तपत्रे व लेखन यांना जे स्वातंत्र्य होते, ते महाराष्ट्रातील निजामी राजवटीत अजिबात नव्हते. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभापासून निजामाची युद्धे संपल्यावर, राज्यकारभाराची घडी व्यवस्थित बसविण्याचा प्रयत्न सुरू झाला. सुभे, जिल्हे, तालुके असे प्रशासनिक विभाग तयार करण्यात आले. जमिनीची मोजणी करून त्याचे अभिलेख तयार करण्यात सुरुवात झाली. या निमित्ताने बरीच मराठी मंडळी संस्थानात येऊन स्थायिक झाली. 

हैदराबादची सत्ता ही इस्लामी सत्ता आहे ही गोष्ट राज्यकर्त्यांच्या मनात पक्की होती. ब्रिटिशांनी सर्व भारतातील मुस्लिमांसाठी एक विद्यापीठ स्थापन करण्याची कल्पना मांडली. त्यातूनच उस्मानिया विद्यापीठ साकार झाले. हैदराबाद संस्थानची राजभाषा उर्दू करण्यात आली. पुढील काळात सर्वसामान्य जनतेची संस्कृती व भाषा दडपण्याचा आणि राज्यकर्त्यांची भाषा व संस्कृती त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न सुरू झाला. स्वभाषेतील अभिव्यक्तीवर लादल्या गेलेल्या बंधनांमुळे मराठीत लिहिणे व मराठी गीते गाणे हा स्वातंत्र्य चळवळीचाच एक भाग होऊन गेला. वाङ्मय लेखनाला ज्या काळात स्वातंत्र्य चळवळीचे रूप मिळाले, त्या काळातील हे लिखाण असल्यामुळे मराठी वाङ्मयाच्या इतिहासात त्याचे विशेष महत्त्व आहे.
त्या काळी विझत आलेल्या मराठीला आपली पदे, रचना, काव्य, लघुनिबंध अशा प्रकारच्या साहित्यातून पुस्तकात उल्लेखिलेल्या लेखकांनी जणू ज्योतीसारखे तेवत ठेवले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आज आपल्यासमोर या दिव्यांचे एकत्रित संकलन करून ही दीपमाळ नरेंद्र चपळगावकरांनी साकारली आहे.
या पुस्तकात मराठीतील एकनाथ पंचक संबोधल्या जाणाऱ्या पाच संतकवींच्या साहित्याची माहिती तसेच संत एकनाथ व दासोपंतांच्या सर्व महाराष्ट्रात विख्यात असलेल्या दीर्घ रचना, जनीजनार्दनांची मराठी व हिंदीतील पदे तसेच विठा रेणुकानंद यांच्या ओवी छंदातील रचनांचा उल्लेख आहे. औरंगाबाद येथे बाहेरून येऊन स्थिरावलेल्या संतप्रभावळीतील मध्वमुनीश्वर, अमृतराय, अनंतनाथ यांच्या हिंदी मराठी रचनेची माहिती आहे. अमृतराय यांचा कवितासंग्रह १९१० साली मुंबईच्या निर्णयसागर प्रेसने प्रसिद्ध केला. त्यांची पदे आहेत.
हैदराबादेतील निजामी राजासारख्या असहिष्णू राजवटीत जेव्हा लोकांना आपापल्या धर्मश्रद्धेप्रमाणे आचरण करणेसुद्धा अवघड होते, त्या काळात आध्यात्मिक क्षेत्रात आपले धर्मपंथ विसरून एकमेकांशी स्नेहभाव राखत अरूपाचा शोध घेणारेही काही संत होते. केशवस्वामी भागानगरकर हे त्यांचेच एक प्रतिनिधी. त्यांच्या कवितांची माहिती आहे. समर्थ रामदासांच्या परंपरेतील मराठीतील एक महत्त्वाचे कवी शिवरामस्वामींनी प्रचंड ग्रंथरचना केली. त्याबद्दलची विस्तृत माहिती आहे. संत तुकारामांच्या परंपरेतील उद्धव चिद्घन यांच्या लिखाणाचे वर्णन, त्याचबरोबर ‘श्री समर्थप्रताप’ या नावाचे रामदासांच्या जीवनातील विविध प्रसंगांचे वर्णन करणारे गिरिधरांनी लिहिलेले पद्मचरित्र याचा आढावा घेतला आहे. पैठणच्या शिवदिन केसरींच्या भक्तीपर रचनांचा उल्लेख आहे. अहमदनगर जिल्हय़ातील दासगणूंची कीर्तनोपयोगी आख्याने, त्यांचे कीर्तनासाठीचे विषय आणि त्यांनी लिहिलेल्या खंडकाव्यांबद्दलची माहिती दिली आहे.
निजामी राजवटीत भाषा आणि संस्कृतीला आधार देण्याच्या दृष्टीने ‘शारदाश्रम’ या वाङ्मयसेवा करणाऱ्या संस्थेचा जन्म झाला. फारसे आर्थिक पाठबळ नसतानाही शारदाश्रमने काही कवितासंग्रह प्रकाशित केले. त्यांची माहिती दिली आहे. यशवंत सदाशिव कोरेकल यांनी लेखन क्षेत्रात अनेकविध विषय हाताळून आपले आगळेवेगळे कर्तृत्व सिद्ध केले. नांदेड जिल्ह्य़ात हद्गाव तालुक्यातील मनाठा गावचे सीतारामपंत मनाठकर यांनी दारिद्रय़ाशी झगडत संस्कृत विषय घेऊन उस्मानिया विद्यापीठातून बी.ए.ची. पदवी घेतली. सर्व शिक्षण शिष्यवृत्तीच्या बळावर घेतले. त्यांनी अवघ्या ४७ वर्षांच्या आयुष्यात भरपूर काव्यरचना व खंडकाव्ये लिहिली. त्याचे वर्णन या पुस्तकात आहे.
आनंद कृष्ण वाघमारे उर्फ दादा हे अर्वाचीन मराठवाडय़ाच्या राजकीय आणि सांस्कृतिक जीवनातील एक अनोखे व्यक्तिमत्त्व होते. परिस्थितीचे विश्लेषण करण्याची असाधारण क्षमता, भविष्याचा वेध घेण्याची ताकद, समाजाच्या प्रगतीसाठी करावयाच्या उपाययोजनेची नेमकी कल्पना आणि त्यासाठी स्वत:च्या हिताचा विचार मनात येऊ न देता धोरण आखण्याची तयारी अशा सर्व दुर्मिळ गुणांचा समुच्चय दादांच्या ठिकाणी होता. दादानी लोकशिक्षणासाठी प्रभावी साधन म्हणून वृत्तपत्र हवे हे लक्षात घेऊन ‘मराठवाडा’ वृत्तपत्र सुरू केले. अनेक अडचणींशी सामना करत त्यांनी नेटाने हे वृत्तपत्र कसे चालू ठेवले याची माहिती आपल्याला वाचायला मिळते.
याचबरोबर बी. रघुनाथ, कवी वा.रा. कांत, प्रसिद्ध कवी यशवंत कानिटकर, नाटककार श्रीपाद बेंडे, दिवाकर कृष्ण, नारायणराव नांदापूरकर, कृष्णमित्र पुरवार, कवी बापूराव हरसुलकर इत्यादी कवी व लेखकांच्या पद, रचना, कविता, लघुनिबंध आणि लेख यांची माहिती या दीपमाळेत संकलित केली आहे.
नेक बुद्धिमंतांच्या ज्योतीने तेवणारी ही दीपमाळ अतिशय विलोभनीय आणि वंदनीय आहे.
दीपमाळ
नरेंद्र चपळगावकर
प्रकाशक : जनशक्ती वाचक चळवळ; पृष्ठ संख्या : १९२
मूल्य : २००/-
रश्मी शशिकांत गोळे