lp54दिएगोचा संघर्ष
ही गोष्ट आहे अवघ्या बारा वर्षांच्या दिएगोची; पण त्याची गोष्ट सांगता सांगता लेखिका डेबोरा एल्विसने अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यांच्या जगाची झलकच वाचकांना दाखवली आहे. कोकेनची तस्करी केल्याचा आळ येऊन त्याचे आईवडील तुरुंगात जातात. दिएगोची रवानगीही आईबरोबर तुरुंगात होते आणि मग तिथे तो कैद्यांचे निरोप पोहोचवणे, वस्तू आणून देणे अशी कामे करायला लागतो. अशी कामे करणाऱ्याला तिथे टॅक्सी म्हणतात. खूप पैसे मिळवण्यासाठी तो एक दिवस काही माणसांबरोबर जंगलात जातो. तिथे त्याला आणि त्याच्या मित्राला कोकेनच्या भट्टीत काम करायला सांगितले जाते. तिथून सुटण्याचा दिएगोच्या प्रयत्नांविषयी हे पुस्तक सांगते. कोकेनचे उत्पादन, त्याची बाजारपेठ, अमेरिकी सरकारचा अमली पदार्थाविरोधी लढा आणि त्यात होत असलेली कोकच्या पानांचे पारंपरिकरीत्या उत्पादन घेणाऱ्या बोलेवियन माणसाची फरफट असा सगळा या कादंबरीचा पट आहे.
आय अ‍ॅम अ टॅक्सी; लेखक : डेबोरा एलिस, अनुवाद- मेघना ढोके, प्रकाशक- मेहता पब्लिशिंग हाऊस, पृष्ठे- ११६, मूल्य- रु. १२०

lp55प्रेरणादायी नोबेल कथा
जगात सर्वोच्च समजले जाणारे नोबेल पुरस्कार १९०१ पासून दिले जातात. २०११ पर्यंत ८२६ व्यक्ती आणि २० संस्थांना हा पुरस्कार मिळाला आहे. मात्र महिलांची संख्या आहे केवळ ४३. महत्त्वाचे म्हणजे २००० सालापर्यंत केवळ तीसच स्त्रियांना हा पुरस्कार मिळाला होता. पण २००० नंतर हे प्रमाण पुढील ११ वर्षांंतच वाढले आहे. २००४ साली तीन स्त्रियांना एकाच वेळी हा सन्मान लाभला. तर २००९ एकदम पाच स्त्रियांना आणि २०११ मध्ये तीन स्त्रियांना नोबेल देण्यात आले. थोडक्यात काय तर नव्या शतकात स्त्रियांना संधी मिळाल्यावर स्त्रियांच्या कर्तृत्वाने अनेक क्षेत्रांत आपली छाप उमटवल्याचेच हे द्योतक म्हणावे लागेल. कर्तबगारीची शिखरे गाठणाऱ्या या स्त्रियांची कहाणी ही सर्वासाठीच प्रेरणादायी आहे. विविध संदर्भग्रंथ आणि माध्यमांतून त्यांची माहिती मिळवून त्याची छाननी करून अतिशय सोप्या शब्दात लेखिकेने या साऱ्या कथा नव्या पिढीसाठी उलगडल्या आहेत.
– नोबेल ललना भाग २ (सन २००१..), लेखिका – मीरा सिरसमकर, मेहता पब्लिशिंग हाऊस, पृष्ठसंख्या १००, मूल्य – रु. १००/-