lp36लष्करी अधिकारी म्हणजे करारी, कडक शिस्तीचा, मृदुतेचं वावडं असणारा अशी एक सर्वसाधारण प्रतिमा असते. पण यालादेखील अपवाद ठरेल असा एकजिंदादिल अधिकारी होता. त्याच्याकडे कडक शिस्त तर होतीच, पण त्याच्यामध्ये एक ममत्व होतं, नम्रता होती, इतरांना मदत करायचा एक सहजभाव होता. फील्ड मार्शल या सर्वोच्च लष्करी पदावर जाऊनदेखील त्याचे पाय कायम जमिनीवरच राहिले. ‘फील्ड मार्शल सॅम माणेकशा, भारतीय लष्कराचा मानबिंदू’ या चरित्रात्मक पुस्तकात त्यांच्या या व्यक्तिमत्वाचे लोभस पैलू पानोपानी जाणवत राहतात.
फील्ड मार्शलांचे एडीसी म्हणून अनेक र्वष त्यांच्यासोबत वावरलेल्या मेजर जनरल शुभी सूद यांनी फील्ड मार्शलांच्या व्यक्तिमत्त्वाचे असंख्य पैलू या पुस्तकात उलगडले आहेत.
भारतीय सैन्याच्या बदलत्या काळाचे फील्ड मार्शल हे साक्षीदार. राजकारणात होणाऱ्या उलथापालथी, लष्करातील बदलाला असलेले राजकारणाचे कंगोरे, चाळीस वर्षांच्या काळात झेललेली पाच युद्धं, सैन्यात त्यांनी केलेले बदल, त्यांच्या खासगी आयुष्यातील वेचक प्रसंग आणि देशाच्या जडणघडणीतलं योगदान असा एक मोठा पट या पुस्तकाच्या निमित्ताने उलगडला आहे. हे लिखाण प्रेरणादायी तर आहेच, पण एका जिंदादिल व्यक्तिमत्त्वाची अनोखी ओळख करून देते.
एक उत्तम नेता कसा असावा याचं अगदी पुरेपूर प्रत्यंतर या पुस्तकातून येतं. १९७२ च्या बांगलादेश युद्धात सरकारला हवं म्हणून युद्ध करण्यास ठाम नकार देण्याचं धैर्य त्यांच्याकडे होतंच, पण पूर्ण तयारीनंतर केलेल्या युद्धात विजयच मिळेल म्हणून हे आव्हान घेण्याची धडाडी होती. यातून त्यांची निर्णयशक्ती तर दिसतेच पण जबाबदारीची जाणीवदेखील. काही काळ सैन्यदलाच्या प्रशिक्षण संस्थांमध्ये कार्यरत असताना त्यांनी केलेले बदल हे त्याच्या दूरदृष्टीचे द्योतक होते. तर सैनिक कल्याणासाठी त्यांनी घेतलेले निर्णय म्हणजे तर एकप्रकारे क्रांतीच होती. लग्न झालेल्या सैनिकांच्या घराचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी नव्याने विकसित केलेली कार्यप्रणाली हा त्याचाच भाग म्हणावी लागेल. युद्धात मरण पावलेल्या जवान आणि अधिकाऱ्यांच्या पत्नीला त्याच्या शेवटच्या पगाराच्या तीन चतुर्थाश पगार देण्याची योजनाही त्यांच्याच काळात अमलात आली.
फील्ड मार्शलांचे हजरजबाबीपण हा उत्तम गुण या पुस्तकातून उलगडला आहे. १९७१च्या युद्धातील एका ठाण्याबद्दलचा बराच काळ रेंगाळलेला वाद त्यांनी पाकिस्ताचे जनरल टिक्काखान यांच्याबरोबरच्या भोजनप्रसंगीच हजरजबाबीपणे मिटवण्याचा किस्सा हे त्याचं उत्तम उदाहरण होया.
त्यांच्या नेतृत्व गुणाचं विश्लेषण करणार एक स्वतंत्र प्रकरणच या पुस्तकात देण्यात आलं आहे. आवर्जून अभ्यासावं असे हे प्रकरण आहे. ‘‘प्रत्येक व्यक्ती जसजशी वरच्या पदावर जाते तसतशी ती अधिकअधिक प्रगल्भ आणि मोठय़ा मनाची बनली पाहिजे,’’ या त्यांच्या वाक्यातून नेतृत्वगुणाबद्दल त्यांची विचारसरणी स्पष्ट होते. त्याच वेळी ते सांगत, अधिकारी जेवढय़ा वरच्या पदावरचा असेल तेवढं त्यानं रणभूमीपासून दूर असलं पाहिजे. हे त्यांचं धोरण आपल्या सहकाऱ्यांवरील विश्वासाचं प्रतीक होतं. आणि त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीत त्यांनी ते कसोशीनं पाळलं. एकदा आदेश दिला की त्याच्या अंमलबजावणीच्या तपशिलाचं स्वातंत्र्य त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांवर सोडून दिलं होतं.
त्यांचं माणूसपणं, साधेपण दाखविणारे अनेक प्रसंग पुस्तकात येतात. ते २६ व्या इन्फन्ट्री डिव्हिजनचे प्रमुख असतानाचा एक धम्माल किस्सा घडला.
तेथील ट्रान्झिट ऑफिसर्स मेसवर अनेक अधिकारी युनिटवरून जाता येता थांबत असत. एके दिवशी दुपारी एक कॅप्टन तीन बॅगा सांभाळत येताना पाहून त्यांनी त्याची एक बॅग उचलली. मेसजवळ आल्यावर सर्व जण माणेकशांना सॅल्यूट करताना पाहून कॅप्टन गांगरला. आपण नेमकं कोणाला सामान उचलायला लावलं हे त्याला कळेना. तेव्हा माणेकशा म्हणाले, ‘‘मी इथे बहुतेक वेळ इतरांना मदत करत फिरत असतो आणि उरलेला वेळ या डिव्हिजनचं नेतृत्व करतो.’’
अर्थात एक करारी सेनापती या नात्याने त्यांच्यात स्वाभिमान पुरेपूर होता. पण त्याचं गर्वात रूपांतर झालेलं नव्हतं. त्यामुळे घटनाबाह्य़ कृत्य करायला नकार देताना ते कधी कचरले नाहीत, की कधी त्यांनी पदासाठी कसलाही लाळघोटेपणा केला नाही. किंबहुना सरकार मला जर लष्करप्रमुख करणार असेल तर ते माझ्या गुणांवर करेल. संरक्षणमंत्री आजारी आहेत म्हणून त्यांना भेटायला जाणं हे त्याच्यासाठी गरजेचं नाही, असं त्यांचं ठाम मत होतं.
१९७२ च्या युद्धात त्यांच्या सर्वच गुणांचा कस लागला होता. त्या ऐतिहासिक विजयानंतरही त्यांचे पाय जमिनीवर होते. पाकिस्तानच्या शरणागतीच्या करारावर सह्य़ा करण्याच्या प्रसंगी लष्करप्रमुख स्वत: उपस्थित राहतील असं अनेक नेत्यांना वाटत होतं. पण ही कारवाई लष्कराच्या पूर्व विभागाची होती, त्यामुळे पूर्व विभागानेच शरणागतीचा प्रसंग हाताळावा असं त्यांनी स्पष्ट केलं. माणेकशा हे भारताच्या संपूर्ण लष्कराचे प्रमुख होते. संपूर्ण पाकिस्तानचे लष्कर शरण येणार असेल तर मी जाणं उचित ठरलं असतं, असं त्यांचं मत एकंदरीतच विजयाला कसं सामोरं जावं याचं प्रत्यंतर देणारं आहे.
फील्ड मार्शल, सॅम माणेकशा
भारतीय लष्कराचा मानबिंदू
लेखक : मेजर जनरल शुभी सूद, अनुवाद : भगवान दातार
प्रकाशक : रोहन प्रकाशन
मूल्य : रु. २५०/-
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com