‘तळ्यात-मळ्यात’ हे रंगभूमीवरचं नवीन नाटक. गुंतवून ठेवणारं, विचार करायला प्रवृत्त करणारं, तरीही नावीन्याची अनुभूती देणारं, गूढविश्वात रमवणारं, अस्वस्थ करणारं आणि संपल्यावर अरे, आपल्याला हे आधी का सुचलं नाही, असं वाटायला लावणारं..

जादूचे प्रयोग साऱ्यांच्याच परवलीचे. जादूगाराने आपला प्रयोग सादर केल्यावर आपण आश्चर्यचकित होतो. हे असं कसं. जादूगारानं हे कसं केलं असावं, सारं काही मंत्रमुग्ध करणारं, याचा साऱ्याचा विचार करून आपण आश्चर्यचकित आणि अस्वस्थ होतो. पण जर जादूगार प्रामाणिक आणि त्याच्यामध्ये आपण जे काही केलं ते दाखवायचं धारिष्टय़ असेल तर त्याचा प्रयोग झाल्यावर तो आपल्याला हा प्रयोग कसा केला, याचं गुपित उलगडतो अन् हे गुपित उलगडय़ावर हे असं होतं का, हे आपल्या कसं लक्षात नाही आलं, अशी सल कायम राहते. कारण तो जादू करत असताना आपण त्यामध्ये तल्लीन झालेलो असतो. वास्तवातून तो एका स्वप्नविश्वात आपल्याला घेऊन जातो, रमवतो. म्हणूनच त्याची चलाखी आपल्याला जादू करताना दिसत नसते आणि हेच जादूगाराचे निव्वळ यश असते. माणूस हा नेहमीच स्वप्न आणि वास्तव या दोन्ही गोष्टींमध्ये जगत असतो. पण त्यामध्ये जगत असताना काही गोष्टी स्वत: समजायच्या असतात, तर काही गोष्टी स्वीकारायच्या असतात. असंच स्वप्नांच्या गूढ तळ्यात आणि वास्तवाच्या मोकळ्या मळ्यात वावरत असताना तुम्ही गोष्टी कशा स्वीकारता हे अप्रतिमपणे चकवा देत, पण कोणतीही प्रतारणा न करता, साऱ्या वास्तववादी गोष्टी सुरुवातीपासून तुमच्या समोरच ठेवून तुम्हाला एका अनोख्या, अशा स्वप्नवत विश्वात घेऊन जाणारं, क्षणोक्षणी विचार करायला भाग पाडताना नावीन्याची अनुभूती देणारं, गूढविश्वात रमवणारं, अस्वस्थ करणारं, ती अस्वस्थता डोक्यात जिरवणारं, असं रंगभूमीवर सिनेमा दाखवणारं नाटक म्हणजे तळ्यात-मळ्यात.
गोष्ट सुरुवातीला सोपी वाटणारी. नवरा-बायकोमधली. नवरा लेखक, पण बाजारात मागणी नसलेला. कायम घरी बसून राहणारा, लोकांच्या मते बायकोच्या जिवावर जगणारा आयतोबा. पण स्वभावाने सरळ, साधा, सालस, भोळा. बायकोचे सारे काही ऐकणारा. बायको नोकरी करून घर चालवणारी. पण आपल्या जिवावर नवरा मजा मारतोय, अशी मानसिकता नसलेली. अशात लोकांचे टोमणे सहन करूनही नवऱ्याला कामासाठी प्रोत्साहन देणारी. नवरा तन, मन, धन यापैकी कोणताही आनंद देत नसला तरी एका वेडय़ा आशेवर जगणारी. एक दिवस तू मोठा होशील, नाव कमवशील, माझ्यापेक्षाही जास्त पैसे कमवशील, असं म्हणत नवऱ्याला धीर आणि स्वत:ला स्वप्न दाखवणारी.
पण बायको घराबाहेर गेल्यावर मात्र अजब गोष्ट पाहायला मिळते. हा साधा-भोळा लेखक नवरा ‘आयबी’चा एजंट असल्याचे समोर येते. बायको कामावर गेल्यावर आपल्या सहकारिणीबरोबर तो देशाला ड्रग्सपासून धोका पोहोचवणाऱ्या स्मगलर्सना हेरणारा, त्यांचा बंदोबस्त करणारा एजंट म्हणून वावरत असतो. तो आणि त्याची सहकारी रॉबर्ट या स्मगलर्सला मदत करणाऱ्या एका माणसाला मारतात, त्याच्याकडून त्यांना काही ‘क्लू’ मिळतात. एखाद्या तारखेला काहीतरी होणार असं त्यांना कळतं, पण कुठे, कधी, काहीच समजत नसतं. असं सारं सुरू असताना एकदा दुबईहून नवीन, पण जालीम ड्रग्स आणणाऱ्या माणसाच्या मागावर असताना आपल्या नवऱ्याला त्याची बायको ओझरतं पाहते आणि हातातली बंदूक बघून ती किंचाळते. त्यानंतर घरीही तो एकदा त्या वेशात तिला दिसतो. आपल्यावर अतोनात प्रेम करणाऱ्या बायकोला सारं काही खरं सांगून टाकावं, असं त्याच्या मनात येतं आणि तो सांगणार इतक्यात त्याची चाणाक्ष सहकारिणी त्याला अडवते. आपली ओळख कोणालाही सांगायची नसते, ओळख पटल्यावर आपला जीव जाणार, हे विदारक वास्तव ती त्याला सांगते. पण तो तिच्या प्रेमामध्ये पुरता बुडालेला असतो. तिच्याशी प्रतारणा करताना त्याला अस होत असतं. पण दुसरीकडे त्याच्या बायकोचे दुबईहून आलेल्या स्मगलर्सशी जवळकीचे संबंध आहेत आणि ते दोघे त्याला मारण्याचा कट रचत असल्याचे त्याची सहकारिणी त्याला सांगते, त्याला धक्का बसतो पण विश्वासच बसत नसतो. सहचारिणीचे स्वप्नवत प्रेम आणि सहकारिणीने दाखवलेली वास्तवता, यामध्ये तो आकंठ बुडून जातो.
हे सारं सुरू असताना स्मगलर्सला मदत करणाऱ्या रॉबर्टच्या कुटुंबांतील व्यक्तीही नाटकामध्ये प्रवेश घेतात. रॉबर्टची बायको जेनी, त्यांचा लहान मुलगा लोबो आणि मोठा मुलगा रेमो, हेदेखील नाटकामध्ये एकाच बाजूला असतात. त्यामध्ये लोबोला आपल्या वडलांना राजनेच मारल्याचे कळते आणि तिथून पळण्याच्या नादात त्याचा खिडकीतून खाली पडून मृत्यू होतो. एकामागून एक गंभीरता, गूढता आणि चकवा वाढत जातो.
एकदा बायको आणि तिचा स्मगलर प्रियकर नवऱ्याला मारण्याचा कट रचतात. तो त्याच्या बायकोला दुबईहून आणलेलं जालीम ड्रग्स देतो, पण त्यांचा प्रयत्न फसतो. यानंतर त्या नवऱ्याला सहकारिणीच्या बोलण्यावर विश्वास बसायला लागतो. पहिला कट अयशस्वी झाल्यावर ती आपल्या स्मगलर प्रियकराला गावचा भाऊ म्हणून घरी आणते. त्या वेळी तो स्मगलर आणि नवरा, तळ्यात-मळ्यात खेळ खेळतात. हा स्मगलर आपल्याला फसवू पाहत आहे, हे समजताच तो येतो आणि आपली ओळखही सांगतो. तेवढय़ात त्याची बायको येते आणि तिच्यासमोर सारं काही उघडं होतं. आपला नवरा हा ‘आयबी’चा एजंट राज असल्याचं तिला समजतं. आपल्या सहकारिणीने दिलेले पिस्तूल तो आपल्या बायकोवर उगारतो, पण प्रेमापोटी तिला मारण्याचं धारिष्टय़ त्याच्यामध्ये नसतं. आपली बायको आपला जीव घेणार असल्याचं कळूनही त्याला वास्तवाचं भान राहत नाही. हे सारं घडत असताना डॉक्टर सतीश येतात, ते त्याला समजावतात, तो त्यांच्यावर पिस्तूल रोखतो, पण पिस्तुलामध्ये गोळीच नसते. त्यानंतर साऱ्या गोष्टींचा उलगडा होत जातो, तो नेमका कोण आहे, याची ओळख व्हायला सुरुवात होते. तो बायकोचा भोळा नवरा आहे की एजंट राज की अन्य कुणी, सारं गुपित उलगडत जातं. एकामागून एक गूढ गोष्टींची उकल होते आणि हे आपल्याला आधी का नाही कळलं, आपण तर हे पाहिलं होतं, तेव्हा आपल्या डोक्यात कसा नाही प्रकाश पडला, असे नानाविध प्रश्न प्रेक्षकांच्या डोक्यात पडतात. डोक्यामध्ये अनेक गूढ गोष्टींच्या मुग्यांचे वारूळ तयार होते आणि त्यामधील एक एक मुंगी बाहेर पडत असताना आपण अवाक्, चकित आणि अस्वस्थ होतो. गूढ कथेमध्ये काही वेळेला तर्कशुद्धता नसते, पण या कलाकृतीमध्ये साऱ्या गोष्टींचे तर्क समजावून सांगितले आहेत, फक्त ते तुमच्या सजग मनाला समजायला हवेत.
तुम्हाला ही सांगितलेली नाटकाची पूर्ण गोष्ट वाटेल, पण तसे नक्कीच नाही. कारण खरी गोष्ट यापुढे सुरू होते. एकामागून एक गोष्टींचा उलगडा होत असताना आपण त्या नाटकाकडे एवढे आकृष्ट होऊन जातो की आता अजून नवीन काय पाहायला मिळणार, याची वाट पाहतो आणि ती गोष्ट समोर आल्यावर आपल्याला ही गोष्ट पूर्वीच का नाही समजली, ती तर आपण पाहिली होती, अशी रुखरुख मनात कायम राहते. एकामागून एक धक्के तुम्हाला बसतात आणि आपण यापूर्वी विश्वास ठेवला ते नेमकं काय होतं, स्वप्न की वास्तव असा प्रश्न पडताना तुम्हीही तळ्यात-मळ्यात जाऊन पोहोचता आणि इथेच हे नाटक बाजी मारतं. आपल्याला प्रश्नांनंतर उत्तरं शोधायची सवय असते. पण हे नाटक तुम्हाला सुरुवातीपासूच उत्तर देतं, पण प्रश्न काय हे तुम्हाला नाटकाच्या शेवटी कळतं. नाटकाच्या शेवटी जो एक फलक येतो, तो सारं काही सांगून जातो आणि तिथेच अस्वस्थता वाढते.
हे नाटक तुम्हाला सिनेमाची अनुभूतीही देऊन जातं. नाटक तुम्हाला प्रत्येकक्षणी त्याच्याकडे ओढत नेतं, तर काही गोष्टी या नाटकाला सिनेमाचा दर्जा देऊन जातात. कोणतीही स्क्रीन किंवा अन्य कोणत्याही तांत्रिक गोष्टींमध्ये न अडकता एकाच वेळी नाटक आणि सिनेमा या दोन्ही गोष्टींचा अप्रतिम मिलाफ दाखवतं. एकाच वेळी नाटकामध्ये नवरा-बायको, राज आणि तिची सहकारिणी, बायको आणि तिचा स्मगलर प्रियकर आणि रॉबर्टच्या कुटुंबातील व्यक्तिरेखा असे चार ट्रॅक एकाच वेळेला नाटकात अप्रतिमपणे रोवण्यात आले आहेत.
सध्या रंगभूमीवर आलेली एक चकवणारी, पण नीटस, सुंदर, निखालस, तर्कशुद्ध, अस्वस्थ पूर्णाकाच्या जवळ जाणारी कलाकृती, असं या नाटकाचं वर्णन करता येईल.
अभिजीत गुरू या उमद्या, युवा लेखक-दिग्दर्शकाने नाटकाची उत्तम बांधणी केली आहे. गूढ, अस्वस्थ करणाऱ्या नाटकांमध्ये लेखक आणि दिग्दर्शक स्वत: कधीतरी फसताना आपण पाहतो, पण तसे या नाटकाबाबत म्हणता येणार नाही. लेखक तुम्हाला अगदी शेवटपर्यंत तळ्यात-मळ्यात ठेवतो, पण सारे काही तुमच्यासमोर प्रामाणिकपणे मांडतो हेदेखील खरे. दिग्दर्शन करताना अभिजीतने कल्पकतेने साऱ्या गोष्टी हाताळल्या आहेत. या नाटकामध्ये पाहिल्यास कुणी हिरो किंवा हिरोइन वगैरे नाही. पण असे नसतानाही नाटकाशी प्रेक्षकांना एकरूप करून ठेवणं आणि त्यामध्ये शेवटपर्यंत गुंतवणं यामध्ये लेखक-दिग्दर्शक यशस्वी झाला आहे. अश्विन देशपांडे (नवरा) आणि राज या दोन्ही भूमिका अभिजीतनेच साकारल्या असून उत्तम वठवल्या आहेत. भोळा अश्विन आणि चाणाक्ष राज या दोन्ही भूमिका त्याने उत्तम वठवल्या असून त्यांच्यातील कुतरओढ त्याने अप्रतिमपणे दाखवली आहे. आवाज, लकबी यांच्यामधला बदल त्याने अप्रतिमपणे केला आहे. अमृता संतने अश्विन देशपांडेच्या बायकोची भूमिका निभावताना चांगली मेहनत घेतली आहे. ‘आयबी’मधील स्वीटी म्हणजेच समिधी गुरू हिने आपले काम चोख निभावले आहे. राजू बावडेकर यांची स्मगलरची भूमिका संयत आहे. चिन्मय पाटसकरने रॉबर्ट, जेनी, लोबो आणि रेमो या चारही व्यक्तिरेखा वठवताना कुटुंबातील एकाच व्यक्तीची ढब कायम ठेवत समान एक धागा उत्तम पकडला आहे. या चारही व्यक्तिरेखांमध्ये साम्य नसून प्रत्येकाचा वेगळा पोत त्याने आपल्या अभिनयातून सादर केला आहे. निर्मात्यांनीही एक दर्जेदार, पण प्रायोगिकतेच्या अंगाने जाणारी कलाकृती व्यावसायिक रंगभूमीवर आणण्याचा प्रयत्न नक्कीच स्तुत्य आहे. एकंदरीत हे नाटक तुम्हाला एक अद्भुतानुभव देऊन जाईल आणि बऱ्याच दिवसांनी काहीतरी दर्जेदार पाहण्याचा अनुभवही.
प्रसाद लाड – response.lokprabha@expressindia.com