Ghost-1या जगात भूत आहे की नाही यावर अनादी काळापासून अनंत काळपर्यंत वाद होत राहिला तरी भूतांच्या कथा ह्या चवीनेच चर्चिल्या जातात. जरी त्या भीतिदायक वगैरे असल्या तरी. पण हीच जर कसलाही त्रास न देणाºया, उलट मदतच करणाºया भूताची गोष्ट असेल तर मात्र त्यातली भीती निघून जाते आणि ती फॅण्टसी ठरते. व. पु. काळे यांनी हेच कथाबीज घेऊन रचलेली ‘बदली’ ही कथा हादेखील अशाच फॅण्टसीचा भाग. ‘ए पेइंग घोस्ट’ ह्या चित्रपटात हीच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

चाळीतला मध्यमवर्गीय एकटा माधव, त्याच्या आयुष्यात आलेली माधवी आणि त्याच्याच परवानगीने त्याच्या घरात राहत असलेलं एकबोटेंच्या भूताचं कुटुंब यांच्याभोवती हे कथानक फिरते. माधवच्या एकटं असण्याचा, त्याच्या चांगुलपणाचा अख्खी चाळ फायदा उठवत असते. मात्र एकबोटेचं भूत कुटुंब माधवला पाठबळ देतं आणि त्याच्या अनेक अडचणी दूर होतात. हे भूत कुटुंब नेमस्त माधवला खंबीर तर बनवतेच, पण माधवीशी लग्नाला प्रवृत्तदेखील करते. आणि येथेच एक नवी अडचण निर्माण होते. घरात यत्रतत्र सर्वत्र संचार असणारी भूतं, त्यांच्याशी एकटाच संवाद करणारा माधव, भूतांच्या कुटुंबातली माधवची वाढलेली भावनिक गुंतागुंत, माधवीचा वाढलेला गोंधळ या पार्श्वभूमीवर काहीसा अवघड प्रसंग येऊन ठेपतो.

अख्खी चाळ आणि कधी कधी कार्यालयातील लोकदेखील माधवच्या चांगुलपणाचा फायदा उठवतात, हे पाहून एकबोटेंचं भूत कुटुंब ज्या काही धम्माल गोष्टी करते त्यावर चित्रपटाचा अर्धा भाग बेतला आहे. व्हिज्युअल इफेक्ट्सच्या माध्यमातून साकारलेले हे प्रसंग ब-यापैकी जमले आहेत. संपूर्ण एसी ऑफिसमध्ये फक्त माधवच्याच डोक्यावर पंखा दाखवणारा प्रसंग परिस्थितीशी विसंगत असला तरी फॅण्टसीची मजा देतो.

उत्तरार्धात मात्र चित्रपट फॅण्टसीचा ट्रॅक वारंवार सोडताना जाणवतो. माधव माधवीचं हनीमून, दहीहंडी वगैरे कथानकाची जोड म्हणजे केवळ लोकप्रिय घटनांचा मालमसाला वापरून चित्रपटाची लांबी वाढविण्याचा उद्योग म्हणावं लागेल. भूतांच्या भावभावना मांडणा-या घटना खूपच खेचल्यामुळे भावनाबंबाळ झाल्या आहेत. परिणामी पूवार्धातली फॅण्टसीची मजा कमी होते. मुळात ज्या थोडक्यात वपुंनी कथानक बेतलं आहे ते दृश्य माध्यमात उतरविताना अशी जोड दिली नसती तरी चालली असती. काळानुरूप चित्रपटात बदल केले असले, तरी काही ठिकाणी मात्र हे भान नसल्यामुळे एक तर अतार्किक वाटतं किंवा भान ओलांडल्यामुळे अतिरंजित वाटतं. अर्थात वपुंची कथा म्हटल्यावर जीवनविषयक असं तत्त्वज्ञान येणं अपेक्षितच असल्यामुळे जाताजाता अनेक प्रसंगांतून ख-या जगातील त्रुटींवरदेखील बोट ठेवण्याचं सूचक काम अनेक प्रसंगातून होताना दिसते.

लाडे ब्रदर्स फिल्म प्रा.लि निर्मित, आणि डॉ. अंबरीश बी. दराक प्रस्तुत
निर्माता – जयंत लाडे
सह निर्माता – रोहन शिंदे-नाईक व बाबासाहेब येलपाले
दिग्दर्शक – सुश्रुत भागवत
मूळ कथा – व. पु. काळे
कथा विस्तार – श्रावणी आणि सुश्रुत
संवाद – संजय मोने
गीते – वैभव जोशी
कलावंत – उमेश कामत, स्पृहा जोशी, पुष्कर श्रोत्री, श्रावणी पिल्लई, सनवी नाईक, समृद्धी साळवी, मॄणाल जाधव, सिद्धी कोळेकर, खुशबू कुलकर्णी, अतुल परचुरे व इतर.