Prime-Time-1गेल्या काही वर्षांत अनेकांचं भावविश्व व्यापून टाकणा-या टीव्हीच्या छोट्या पडद्यानं केवळ चार घटका करमणुकीच्या पलीकडे जाऊन एक पूर्णत: वेगळं आभासी जगच निर्माण केलं आहे. ह्या जगाने आपल्या नेहमीच्या जगण्याचा ताबाच घ्यायला सुरू केलं आहे. त्यातूनच तयार झालेली आजची आपली अवस्था मांडण्याचा प्रयत्न ‘प्राइम टाइम’ चित्रपटात दिसून येतो. पण मांडणी चुकल्यामुळे या वेगळ्या विषयाला न्याय देण्याबाबत चित्रपट तोकडा पडला आहे.

वैशाली आपटे ही एक टिपिकल मध्यमवर्गीय चाळकरी कुटुंबातली नेहमीच्याच तक्रारीच्या सुरात वावरणारी गृहिणी. परिणामी ती टीव्हीच्या आभासी जगात रममाण झालेली असते. तिचं ते आभासी जग आणि वास्तवातलं जग याभोवतीच हे कथानक फिरते. टीव्हीच्या जगात सारी सुखं सामावली आहेत असंच तिला वाटत असतं. आपण ही सुखं मिळवू शकलो असतो पण नाही मिळवता आली ह्याची खंत बाळगत, ती तिच्या आभासी जगातच मश्गूल होत असते. अर्थातच शाळा शिक्षक नवरा, हुशार होतकरू मुलगी आणि छोटा मुलगा या तिच्या ख-या विश्वाचा विसरच पडलेला असतो. पण जेव्हा तिची मुलगीच या आभासी विश्वाातलं स्थान मिळवण्याची शक्यता निर्माण होते, तेव्हा आपल्या सा-या स्वप्नांची पूर्तता करण्याने वैशाली पुरती भरकटत जाते. हे वाहत जाणं इतकं वेगवान असतं, की त्यातून तिच्या सांसारिक आयुष्यातील तेढदेखील वाढत जाते. आणि त्यातूनच अनेक अनवस्था प्रसंग निर्माण होतात.

Prime-Time-2विषय अत्यंत चांगला, म्हणजे आज या आभासी विश्वात पुरतं गढून गेलेल्यांना जाग करण्याची गरज मांडणारा. कलाकारांची निवडदेखील अत्यंत पूरक अशीच. आभासी जगाच्या आहारी जाण्याची मांडणी काहीशी वाढीव असली, तरी बºयापैकी जमलेली. पण हे ज्या सफाईदारपणे आणि टोकदारपणे यायला हवे ते मात्र झालेले नाही. कारण चित्रपटाचा आधार असणारी कथा आणि संवाद. अत्यंत निरर्थकपणे भरकटलेल्या संवादांवर कथासूत्र पुढे जात राहते, तेव्हा आपण त्या आभासी जगातली मालिकाच पाहत आहोत की काय असे वाटते. एखाद्या मालिकेत भरताड भरणा केल्यासारखे, मालिका लांबविण्यासाठीचे प्रसंग कसे घुसवले जातात तसेच येथेदेखील निरर्थक प्रसंगांचा भरणा झाला आहे. आणि सपाट संवादांमुळे त्यातलं गांभीर्यदेखील हरवलं आहे.

एखाद्याा विषयातलं वैगुण्य दाखविताना त्यात काही तरी लॉजिक असावं हे ध्यानात न घेताच केवळ स्टंटबाजी करणारे प्रसंग आले आहेत. त्यामुळे ह्या प्रसंगातून ना विषयावर भाष्य होते ना काही रंजन. पण भरकटणे मात्र जरूर होते. मुळात आज टीव्हीच्या छोट्या पडद्यााच्या ह््या आभासी विश्वाात वावरणाºयांचे असंख्य प्रश्न असताना एखादा टोकाचा प्रसंग अतिरंजित करून मांडण्यात नेमकं काय सांगायचं हेच हरवून गेलं आहे.

निर्माता – हिमांशू केसरी पाटील
दिग्दर्शक – प्रमोद कश्यप
लेखिका – शुभ्रज्योती गुहा
संवाद व गीते – प्रशांत जामदार
छायालेखक – सुमित सूर्यवंशी
संकलक – श्रीकांत केळकर
संगीत – निरंजन पेडगावकर
कलावंत – सुलेखा तळवलकर, किशोर प्रधान, मिलिंद शिंत्रे, कृतिका देव, स्वयम जाधव, निशा परुळेकर, अनुराग वरळीकर व अन्य.