sid-1कितीही नाही म्हटलं तरी आयुष्याचं गणित सोडवणं काहीसं कठीणच असतं. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर बेरीज-वजाबाकी, गुणाकार-भागाकार, वर्गमूळ, घातांक असं सारं काही येनकेनप्रकारेण आयुष्यात डोकावतच राहतं. नात्यातल्या गुंत्यानं तर ते गणित आणखीनच कठीण होत जातं. मग सिद्धांतावर बेतलेलं आयुष्य असेल तर, सिद्धांतामागचं गणित आणि आयुष्याचं गणित यांचं समीकरण काही जुळत नाही. आणि आयुष्याचं गणित आणखीनच किचकट होत जातं. मग हे गणित सोडवायचं कसं आणि उत्तर कसं मिळवायचं? अशी काहीशी तात्त्विकतेची डूब असलेला, नात्यांच्या गुंत्याचं गणित सोडविण्याचा प्रयत्न करणारा चित्रपट असं सिद्धांतचं वर्णन करावं लागेल.

थोर गणिती म्हणून नावलौकिक मिळवलेल्या अप्पा ठोसरांचा थोरला मुलगा गजानन मसाल्याच्या व्यापारात, तर थोर गणिती असणारा दुसरा मुलगा विश्वानाथ हा अपघातात गेलेला. विश्वानाथाचा थोरला मुलगा शेफ म्हणून नशीब काढायला क्रूझवर गेलेला, तर दहावीत असलेला धाकटा वक्रतुंड अप्पांच्याकडेच. ह््या वक्रतुंडला गणिताचं काहीसं वावडंच. त्याचं अपयश झाकावं, अप्पांच्या लौकिकाला बट्टा लागू नये म्हणून त्याचा गजाकाका काही खटपटी लटपटी करून वक्रतुंड वरच्या वर्गात जाईल असं पाहतो. आणि नेमका येथेच घोळ होतो. अप्पांना हे कळल्यावर त्या संपूर्ण कुटुंबाचंच गणित बिघडतं. बसलेल्या धक्क्याने नाजूक झालेली अप्पांची प्रकृती, त्यांची प्रतिष्ठा, त्यांनी सुरू केलेल्या संस्थेचं भवितव्य, वक्रतुंडाचं लौकिक शिक्षणात नसलेलं लक्ष, त्याचं वाढतं वय या सगळ्याचा इतका गुंता होतो, की थोर गणिती अप्पांनादेखील हे गणित सोडविण्यासाठी कोणता सिद्धांत वापरावा हे कळत नाही. अखेरीस क्रूझवर असलेला त्याचा मोठा भाऊ येतो आणि हे किचकट गणित सोडविण्याचा प्रयत्न करतो.

नेहमीच्या मेलोड्रामॅटिक अथवा प्रेमपटांच्या पलीकडे जाण्याचा मराठी सिनेमाचा हा आणखी एक स्तुत्य प्रयोग. हा चित्रपट गणित शिकवतो का, तर त्याचं उत्तर नाही अस आहे. पण तो गणितापायी तयार झालेला नात्यांचा तिढा मांडतो आणि जगण्याचं गणित सोडवण्याचा प्रयत्न करतो. गणित या आपल्या पारंपरिक अप्रिय विषयावर कथासूत्र बेतत सिनेमाकर्त्यांनी संपूर्ण कुटुंबाच्या नात्याची उसवणारी वीण जोडण्याचा प्रयत्न केला. पहिल्याच दिग्दर्शनात असा ऑफबीट विषय हाताळणं हे नक्कीच धाडसाचं म्हणावं लागेल.

अर्थात हा प्रयत्न वेगळा असला, तरी चित्रपटाचं गणित मात्र काही ठिकाणी चुकलं आहे. कमी शब्दात खूप काही मांडणारे अत्यंत बोलके आणि प्रभावी प्रसंग, बालकलाकार अर्चित देवधरचं उत्कृष्ट काम, ज्येष्ठ गणितीची भूमिका समर्थपणे पेलणारे विक्रम गोखले, सूचक गणित गाणं, पालकत्त्वावरचं भाष्य हे सारं चित्रपटाच्या जमेच्या बाजू. तर काही अनावश्यक लांबलेली दृश्यं, घुसडल्यासारख्या वाटाव्यात अशा काही फ्रेम्स आणि शेवटाला वापरलेला पारंपरिक मेलोड्रामॅटिक प्रसंग अशा काही उणिवा. या दोहोंच्या बेरीज वजाबाकीच्या गणितातली उणी बाजू खटकते. त्यामुळे एखाद्या समीकरणाची उकल करताना सर्वसामान्यास येणारा कंटाळा येथे काही ठिकाणी जाणवू पाहतो. काही प्रसंगांना कात्री लावली असती, तर हा सिद्धांत मांडणं आणि तो पटणं आणखीन सोपं झालं असतं.

कथानक ज्यांच्याभोवती फिरते त्या वक्रतुंड आणि अप्पा या दोन्ही व्यक्तिरेखांचं काम ही चित्रपटाची सर्वात प्रभावी बाजू म्हणावी लागेल. सर्वच सहकलाकारांच्या पात्रनिवडीचं गणित बरोबर जमलं आहे. आईवडिलांच्या अपघाताने आणि गणिताच्या गुंत्यांनं पौगंडावस्थेतल्या मुलाचं बोलकं अबोलपण अर्चितनं अगदी पुरेपूर उतरवलं आहे.

नेहमीच्या यशस्वी गणितावर आधारेल्या चित्रपटांच्या गर्दीत सिद्धांतचं गणित थोडंसं जड वाटलं तरी सोडवायला प्रेक्षकांना काहीच हरकत नाही.

निर्माते – नीलेश नवलखा, विवेक कजारिया, अमित अहिरराव
दिग्दर्शक – विवेक वाघ
लेखक – शेखर ढवळीकर
छायालेखक व संकलक – मयूर हरदास
संगीत – शैलेंद्र बर्वे
गीते – सौमित्र
कलावंत – बालकलाकार अर्चित देवधर, विक्रम गोखले, स्वाती चिटणीस, गणेश यादव, माधवी सोमण, सारंग साठ्ये, नेहा महाजन, किशोर कदम व अन्य.