News Flash

म्हशीने रांधले…

आपल्या आसपास असणारे-नसणारे पशू-पक्षी आपल्या भावविश्वाचाच भाग असतात. त्यामुळे मराठी भाषेने आपल्या विश्वात त्यांनाही सामील करून घेतले आहे.

| October 3, 2014 01:13 am

आपल्या आसपास असणारे-नसणारे पशू-पक्षी आपल्या भावविश्वाचाच भाग असतात. त्यामुळे मराठी भाषेने आपल्या विश्वात त्यांनाही सामील करून घेतले आहे.

पशु-पक्षी शिकवणीचा आज दुसरा दिवस होता. नाश्त्याच्या टेबलवर बसलो असताना सवयीप्रमाणे बाल्कनीमध्ये येणाऱ्या कावळ्याला मी खाणे ठेवले. त्याच वेळी वर्तमानपत्रामध्ये मला एक हेडलाइन दिसली. त्यात लिहिले होते- आप पार्टी दिल्ली विधानसभेच्या यशाने प्रेरित होऊन लोकसभेसाठी गरुडझेप घ्यायला सज्ज होत आहे. मी पद्मजाला म्हटले, ‘‘गरुड म्हणजे ईगल व गरुडझेप घेणे म्हणजे मोठा पल्ला गाठण्यासाठी तयार होणे.’’
मी गरुडावर दुसरी म्हण सांगणार इतक्यातच रस्त्यावरून कधी नव्हे ते गाढवाचे ओरडणे येऊ लागले. पद्मजा म्हणाली, ‘‘हा डॉन्की ओरडत आहे ना?’’ मी म्हटले हो, ‘‘या प्राण्याला गाढव असे म्हणतात. यावरून आपल्या मराठीमध्ये खूप म्हणी आहेत. जसे की, ‘गाढवापुढे वाचली गीता अन् कालचा गोंधळ बरा होता’ किंवा ‘अडला हरी गाढवाचे पाय धरी’ किंवा ‘गाढवही गेले अन् ब्रह्मचर्यदेखील’, ‘गाढवाला गुळाची चव काय’ वगैरे वगैरे.’’
पद्मजा म्हणाली, ‘‘गाढवावरून इतक्या म्हणी?’’ मी म्हटले, ‘‘मुळात गाढवासारखा मेहनती प्राणी नाही, पण आपणच त्याला बदनाम केले आहे. गाढवापुढे वाचली गीता अन् कालचा गोंधळ बरा होता, याचा अर्थ होईल मूर्ख माणसाला कितीही चांगला उपदेश करा, तो घालायचा तो गोंधळ घालतोच व तो गोंधळ आधीच्या गोंधळापेक्षा भयंकर असतो. अडला हरी गाढवाचे पाय धरी म्हणजे कधी कधी हुशार माणूसही इतक्या विचित्र अडचणीत सापडतो की त्याला मूर्ख माणसाची मदत घेतल्याशिवाय पर्यायच राहत नाही.’’
गाढवही गेले अन् ब्रह्मचर्यदेखील, याचा अर्थ सांगायला माझ्या सासूबाई पुढे सरसावल्या. त्या म्हणाल्या, ‘‘कधी कधी आपण असे चुकीचे निर्णय घेतो की, ज्यामुळे ज्याच्यापाठी आपण धावत असतो तेसुद्धा मिळत नाही व त्यापायी आपण हातचेदेखील गमावून बसतो.’’
गाढवाला गुळाची चव काय, याचा अर्थ सांगताना सासूबाईंनी चित्रपट समीक्षकांचे उदाहरण दिले. ‘‘पैसे घेऊन केवळ गल्लाभरू चित्रपटांचे समीक्षा करणारे समीक्षक जेव्हा उत्तम कलात्मक समांतर चित्रपटाला नावे ठेवतात तेव्हा ही म्हण उपयोगी ठरते.’’
गाढवपुराण संपल्यावर मी पुढच्या बातमीकडे वळलो. भ्रष्टाचाररूपी अजगराचा विळखा भारतीय समाजाला पडला आहे व तो सोडविण्याची नितांत गरज आहे, अशी ती बातमी होती. मी पद्मजाला म्हटले, ‘‘अजगरावरून आठवले, ज्याला तू इंग्रजीमध्ये स्नेक म्हणतेस, त्याला मराठीमध्ये साप म्हणतात व सापावरून मराठीमध्ये खूप म्हणी आहेत.’’ सौमित्रदेखील एव्हाना नाश्त्यासाठी आम्हाला जॉइन झाला होता. तो म्हणाला, ‘‘पद्मजाताई, मी सांगतो या म्हणी.. ‘पाहुण्याच्या काठीने साप मारणे’, ‘साप म्हणू नये धाकला, नवरा म्हणू नये आपला’, ‘साप-मुंगुसाचे वैर असणे’, ‘साप साप म्हणून भुईला धोपटणे’.
पाहुण्याच्या काठीने साप मारणे, म्हणजे परस्पर दुसऱ्याच्या मदतीने आपल्या शत्रूचा काटा काढणे व साप-मुंगुसाचे वैर असणे म्हणजे म्हणजे पराकोटीच्या शत्रुत्वाचे नाते असणे हे अर्थ मी तुला सांगितले, बाकीचे दोन तू शोधून काढ गृहपाठ म्हणून.’’
सापावरून सौमित्रला आठवला तो बेडूक. बेडूक म्हणजे फ्रॉग, असे सांगून त्यानेच पद्मजाची शिकवणी पुढे सरकवली. त्याने दोन वाक्प्रचार पद्मजाला सांगितले- ‘उडाला तर पक्षी, बुडाला तर बेडूक’ व ‘बेडकी कितीही फुगली तरी बैल होऊ शकत नाही’ या दोन म्हणींचा अर्थ मी पद्मजाला सांगून आंघोळीला जायचे ठरविले. पद्मजाला म्हटले की लिहून घे तुझ्या डायरीमध्ये.. पहिला अर्थ, कोणताही ठोस अंदाज काढता येणे जेव्हा शक्य नसते तेव्हा अंदाजपंचे भाकीत करणे व दुसरा अर्थ होईल स्वसामर्थ्यांविषयी कितीही गमजा मारल्या तरी एका मर्यादेबाहेर त्याचे ता*++++++++++++++++++++++++++++र्*क समर्थन होऊ शकत नाही.
बेडकावरून आमची गाडी थेट कोल्ह्य़ावर घसरली. मी पद्मजाला म्हटले, ‘‘कोल्हा हा खूप कनिंग प्राणी आहे, त्यामुळे त्याच्यावरून पण खूप वाक्प्रचार आहेत. फॉक्स म्हणजे कोल्हा यावरून चटकन आठवणारी म्हण म्हणजे ‘कोल्ह्य़ाला द्राक्षे आंबट’.’’ त्यावर माझी सौ. पटकन म्हणाली, ‘‘पद्मजा, आपल्याला हवी असलेली गोष्ट जेव्हा खूप प्रयत्न करूनदेखील मिळत नाही तेव्हा ती गोष्टच खराब होती. आपल्या लायकीचीच नव्हती, असे मनाला समजावून स्वत:ची फसवणूक करून घेणे, असा याचा अर्थ होतो. ’’
कोल्ह्य़ावरून आठवणारी दुसरी म्हण म्हणजे ‘अघटित वार्ता, कोल्हे गेले तीर्था’. याचा अर्थ सांगताना मी पद्मजाला म्हटले की, बऱ्याचदा असे होते की काही अविश्वसनीय गोष्टी घडतात, ज्याचा आपण स्वप्नातही विचार केलेला नसतो. उदाहरण द्यायचे झाल्यास एखादा दुष्ट प्रवृत्तीचा माणूस अचानक चांगला वागतो.. तेव्हा आपण ही म्हण वापरतो.
‘कोल्हेकुई करणे’ अशी तिसरी म्हण मला माझ्या आईने देवघरातून सुचवली. मी पद्मजाला म्हटले की, बघ आजी पोथी वाचत आहे, पण अर्धे लक्ष आपल्या शिकवणीकडे आहे. मराठी तितुकी फिरवावी या क्लबचे अनेक विद्यार्थी आहेत. त्यावर पद्मजा म्हणाली, ‘‘होयच मुळी.’’ मी म्हणालो, ‘‘या म्हणीचा अर्थ उगाचच एखाद्या माणसाबद्दल ठरवून गलका करणे.’’
एवढय़ात माझी मुलगी राशिभविष्य वाचत आली. ती मला म्हणाली, ‘‘वृश्चिक म्हणजे विंचू ना?’’ मी पद्मजाला म्हटले, ‘‘म्हणजेच स्कॉर्पियो. यावरून आपण दोन म्हणी बघू व आजची शिकवणी आवरती घेऊ. पहिली – ‘विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर’. याचा अर्थ होणार- असा माणूस जो केव्हाही आपला संसार गोळा करून एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जायला सदैव तयार असतो.
दुसरी म्हण आहे ‘पिंडीवर बसला म्हणून विंचवाची गय करून चालत नाही’. याचा अर्थ होणार- दुष्ट माणसाची गय किंवा त्यावर दया कोणत्याही परिस्थितीमध्ये करून चालत नाही. असे केल्याने आपलेच नुकसान होऊ शकते.’’
पद्मजा डायरी बंद करत असताना मी म्हटले, ‘‘काल आपण म्हैस या प्राण्यावर बोलत होतो. काल सुचली नाही, पण आज अजून एक म्हण सुचली- ‘म्हशीने रांधले व रेडय़ाने खाल्ले’. याचा अर्थ होईल की बायकोने कितीही वाईट स्वयंपाक बनविला आणि जर तिचा नवरा पण निर्बुद्ध असेल तर तो काहीही न बोलता मुकाटपणे खाईल.’’ यावर माझी आई म्हणाली, ‘‘सासू घरात असेल तर सुनेची अशी हिम्मतच होणार नाही.’’ या वाक्यामुळे हास्यस्फोट झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2014 1:13 am

Web Title: marathi language 2
Next Stories
1 चोरावर मोर आणि पोपटपंची
2 जर आणि तर
3 भूत आणि काळ
Just Now!
X