News Flash

दंड थोपटणे, कोपराने खणणे!

मराठी भाषेने आपल्या शरीराच्या बऱ्याच अवयवांना कामाला लावलं आहे. त्यामुळे एखाद्या माणसाला दुसऱ्याच्या खांद्याला खांदा लावून उभं राहावं लागतं. कुणाला तरी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपावं लागतं...

| June 20, 2014 01:16 am

मराठी भाषेने आपल्या शरीराच्या बऱ्याच अवयवांना कामाला लावलं आहे. त्यामुळे एखाद्या माणसाला दुसऱ्याच्या खांद्याला खांदा लावून उभं राहावं लागतं. कुणाला तरी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपावं लागतं…

‘‘काका, काल हात झाला. आज कशाबद्दल सांगणार?’’ पद्मजाने विचारले. मी म्हटले, ‘‘हात म्हणजे खांद्यापासून सुरू होऊन बोटांपाशी संपतो, तेव्हा आज हाताच्या प्रत्येक पार्टविषयी मी तुला सांगणार आहे.’’
पद्मजा गोंधळल्यासारखी वाटली. मी म्हटले, ‘‘खांदा म्हणजे शोल्डर व बोट म्हणजे फिंगर. हाताच्या प्रत्येक भागावरून पण मराठीमध्ये खूप वाक्प्रचार व त्यामुळे विविध अर्थ आहेत. जसे की खांदेपालट करणे म्हणजे बदल करणे, खांद्याला खांदा देऊन उभे राहणे म्हणजे एकसमान जबाबदारी अंगावर घेऊन दुसऱ्याच्या मदतीला खंबीरपणे तयार होणे.’’
एवढय़ात सकाळच्या बातम्यांमध्ये वृत्त होते की जुन्या जमान्यातील एका प्रसिद्ध नटाच्या अंत्ययात्रेला नवीन जमान्यातील कोणीही मान्यवर खांदा द्यायला उपस्थित नव्हते. मी म्हटले, ‘‘पद्मजा, इथे अर्थ होतो स्मशानात नेण्यासाठी कोणी आले नव्हते.’’
मी पद्मजाला म्हटले की, आता वळूया खांद्यावरून काखेकडे. शोल्डरच्या खालच्या बाजूस काख किंवा बगल असे म्हणतात. मी चहाचा घोट घेत असल्याचे बघून सौ.ने पद्मजाला सांगितले की, ‘‘या शब्दांवरूनचे वाक्प्रचार मी तुला सांगते. काखेत कळसा व गावाला वळसा म्हणजे आपण एखादी शोधत असलेली गोष्ट आपल्या जवळपासच असते, पण आपण मात्र ती उगाचच लांब, दुसरीकडे शोधत असतो. कधी कधी एखाद्या नकोशा विषयाला बाजूला सारण्यासाठी आपण जे प्रयत्न करतो त्याला बगल देणे असे म्हणतात. बगलबच्चा असाही एक शब्द मराठीमध्ये आहे. त्याचा अर्थ तू शोधून आम्हाला सांग.’’
उपमा खाता खाता मी पद्मजाला म्हणालो की काखेनंतर नंबर लागतो तो दंडाचा. दंड म्हणजे अपर आर्म. दंडावरून सर्वप्रथम आठवतो दंड थोपटणे हा वाक्प्रचार. याचा अर्थ आहे अन्यायाविरुद्ध लढाईचा निर्धार करणे.
दंडानंतर येतो तो भाग म्हणजे कोपर. ज्याला म्हणतात एल्बो. या कोपराबद्दल तुला सांगून मी आंघोळीला व नंतर ऑफिसला पळणार असे मी पद्मजाला आधीच सांगितले. ‘‘कोपराला गूळ लावणे किंवा मऊ लागले म्हणून कोपराने खणणे असे दोन अर्थ मी तुला सांगणार आहे. पहिला अर्थ, पूर्ण करण्यास अशक्य असे आश्वासन देणे व दुसरा अर्थ म्हणजे एखाद्या माणसाचा किंवा गोष्टीचा गैरवाजवी फायदा उपटण्याचा प्रयास करणे.’’
इतक्यात सौ म्हणाली की, बगलबच्चाप्रमाणेच कोपरखळी मारणे याचा अर्थ तू सवडीने शोधून ठेव.
घडाळ्याच्या काटय़ाप्रमाणे माझी नित्य कामे आटोपून मी पटापट ऑफिसला पळालो.
मोबाइलवरूनच पद्मजाला गृहपाठ दिला. गृहपाठ होता, मनगट व मुठीवर. तिला मी या दोन शब्दांवर संशोधन करायला सांगितले अर्थातच प्राजक्ताच्या मदतीने.
ऑफिसमधल्या एका सहकाऱ्याने मी बारीक झाल्याचे प्रशस्तिपत्रक दिले. मी लगेच म्हटले, ‘‘धन्यवाद, पण या स्तुतीमुळे माझ्या अंगावर मूठभर मांस वाढेल त्याचे काय!’’ माझा सहकारी व मी जोराने हसलो. त्याला माझे बोलणे बहुधा पटले असावे. मी हे बोललो खरे, पण मला एकदम जाणवले की पद्मजासाठी एक अर्थ विनासायासच मिळाला व तो म्हणजे स्तुतीमुळे खूप आनंद वाटणे.
संध्याकाळी पद्मजा चहा व झाकल्या मुठीत काही तरी घेऊन सामोरी आली. मी सौला म्हटले, ‘‘झाकली मूठ सव्वा लाखाची हे शिकविलेले दिसत आहे.’’ पद्मजा म्हणाली, ‘‘ही मूठ झाकलेली असली तरी त्यात तुझा आवडता बेसनचा लाडू आहे.’’ मी हसतच म्हटले, ‘‘म्हणजे खरोखरच माझ्यासाठी सव्वा लाखाचीच मूठ आहे.’’
पद्मजा म्हणाली, ‘‘झाकली मूठचा अर्थ मी तुला सांगत नाही. पण अजून काही वाक्प्रचार मी तुला सांगते जसे की मुठीत ठेवणे. काका, तू प्राजक्ता काकूच्या मुठीत आहेस बरोबर ना?’’
मी पद्मजाला म्हटले, ‘‘हे पण काकूने सांगितले की काय तुला?’’ तेव्हा सौ व पद्मजा दोघीही दिलखुलास हसल्या. दुसरा अर्थ वज्र मूठ करणे म्हणजे एकत्र येऊन अभेद्य असा बचाव करणे. तिसरा वाक्प्रचार आहे, मूठमाती देणे म्हणजे एखादा विषय कायमचा संपविणे
मी म्हटले, ‘‘बरं, आता सांग मनगट या शब्दाविषयी.’’ पद्मजा म्हणाली, ‘‘मनगटशाही म्हणजे ताकदीच्या जोरावर आपल्याला हवे तसे करून घेणे.’’
पद्मजाने माझ्या तळहातावर ठेवलेला बेसनचा लाडू केव्हाच पोटात स्थिरावल्याने माझा हात मोकळा होता. तो मोकळा हातच पद्मजासमोर दाखवत मी म्हणालो, ‘‘याला म्हणतात तळहात. हाताचा हा भागदेखील खूप काही बोलतो जसे की तळहातावरील फोडाप्रमाणे जपणे म्हणजे अतिशय काळजी घेणे. तळहातावर शीर घेऊन लढणे म्हणजे प्राणाची पर्वा न करता बहादुरीने लढणे.’’
इतक्यात नूपुरचे आगमन झाले. ती म्हणाली, ‘‘ताई काय हस्त पुराण संपले की नाही?’’
पद्मजा म्हणाली, ‘‘आता फक्त फिंगर उरले आहे.’’
नूपुर म्हणाली, ‘‘ते मी तुला समजावते. फिंगर म्हणजे बोट. हे बोट आहे छोटेसे, पण त्याद्वारे अर्थ मात्र खूप मोठे-मोठे सांगता येतात. उदाहरणादाखल पाचही बोटे तुपात असणे म्हणजे सर्व काही आपल्या मनाप्रमाणे मिळाल्याने खूप समाधानी असणे. या बोटावरची थुंकी त्या बोटावर करणे म्हणजे एका क्षणात आपले म्हणणे बदलणे व समोरच्याला अडचणीत आणणे. हाताची पाचही बोटे सारखी नसणे म्हणजे प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो हे सांगणे.’’
खरे तर बोट या शब्दावर शिकवणी संपणार होती, पण सौमित्रने आम्हा सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला. तो म्हणाला, ‘‘पद्मजाताई, बोटावर नख असते. ज्याला तू नेल म्हणतेस, त्यावरही वाक्प्रचार आहेतच की, जसे की नखाची सर नसणे म्हणजे किंचितही बरोबरी करण्याची लायकी नसणे, नखशिखांत भिजणे म्हणजे पूर्ण शरीर भिजणे वगैरे वगैरे.’’
सौमित्रचे हे बोलणे म्हणजे आम्हा सर्वानाच पद्मजाच्या शिकवणीमुळे एक प्रकारचे व्यसनच लागल्याचा पुरावा होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2014 1:16 am

Web Title: marathi language 20
Next Stories
1 हातसफाई हातघाई…
2 उचलली जीभ…
3 नाकपुराण
Just Now!
X