19 February 2020

News Flash

वेगळ्या विषयांची जुगलबंदी

मराठी चित्रपटांची संख्या यंदाच्या वर्षी भरपूर वाढली आहे हे एव्हाना मराठी प्रेक्षकांना चांगलेच ठाऊक झाले आहे. संख्या वाढण्याबरोबरच आतापर्यंत निर्माते-दिग्दर्शकांनी स्पर्श न केलेले विषय नव्या

| June 26, 2015 01:10 am

मराठी चित्रपटांची संख्या यंदाच्या वर्षी भरपूर वाढली आहे हे एव्हाना मराठी प्रेक्षकांना चांगलेच ठाऊक झाले आहे. संख्या वाढण्याबरोबरच आतापर्यंत निर्माते-दिग्दर्शकांनी स्पर्श न केलेले विषय नव्या पॅकेजिंगमध्ये नवनवीन कलावंत, तंत्रज्ञ, दिग्दर्शक-निर्मात्यांसह प्रेक्षकांसमोर येत आहेत ही नमूद करण्याजोगी बाब म्हणावी लागेल.
दर शुक्रवारी हिंदी चित्रपटांबरोबरच किमान दोन ते तीन मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत.
३ जुलैच्या शुक्रवारीसुद्धा ‘ऑनलाईन बिनलाईन’ आणि ‘ढोल ताशे’ असे दोन मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत.
एकाचा विषय शहरी असला तरी ग्रामीण भागांतील लोकांनाही परिचयाचा आहे, तर दुसऱ्या चित्रपटाच्या शीर्षकावरून चित्रपट ग्रामीण तरुणाईला आकर्षित करणारा वाटत असला तरी मुंबई-पुण्यासारख्या शहरांमधील तरुणाईलाही ‘अपील’ करू शकणारा असा आहे.
‘ऑनलाईन बिनलाईन’ या चित्रपटामध्ये मोबाइल, इंटरनेटचे अॅडिक्शन असा विषय हाताळण्यात येणार आहे. तर ‘ढोल ताशे’मध्ये ढोल पथकांतील तरुणाईची मानसिकता, ढोल पथकांचे कॉपरेरेटायझेशन करण्याचा प्रयत्न करणारा नायक, राजकारण, संस्थांत्मक राजकारण अशा स्वरूपाचा सामाजिक विषय मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
‘ऑनलाईन बिनलाईन’ या चित्रपटाचा यूटय़ूबवरील ट्रेलर तरुणाईला आकर्षित करणारा आहे. हेमंत ढोमे आणि सिद्धार्थ चांदेकर हे आजचे आघाडीचे तरुण कलावंत यात असून ऋतुजा शिंदे ही नवोदित अभिनेत्री या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण करतेय.
दिग्दर्शक आणि छायालेखक केदार गायकवाड म्हणाले की, ‘ऑनलाईन बिनलाईन’ हा चित्रपट रोमॅण्टिक कॉमेडी जॉनरचा चित्रपट आहे. आजच्या तरुणाईला सोशल मीडिया, व्हॉटस्अॅप, कायम ऑनलाईन राहणे याची खूप दांडगी हौस असते. आपण कायम ऑनलाईन असलो की तरुणींवर ‘इम्प्रेशन’ मारणेही सोपे ठरते, असाही एक समज असतो. म्हणूनच आमच्या चित्रपटाचा नायक सतत इंटरनेटवर असतो. सिद्धार्थ चांदेकर-हेमंत ढोमे हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यांच्या मैत्रीची ही केमिस्ट्री या चित्रपटातील प्रेमत्रिकोणाद्वारे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे, असे केदार गायकवाड यांनी सांगितले.
हेमंत एदलाबादकर यांच्या संकल्पनेतून चित्रपटाची गोष्ट तयार झाली असून निर्माते श्रेयस जाधव आणि दिग्दर्शक केदार गायकवाड यांचाही हा पहिलाच चित्रपट आहे.
एका वाक्यात सांगायचे तर
‘ई-मोशन म्हणजे इंटरनेट मोशनपासून ते ‘इमोशन्स’पर्यंत नायकाचा प्रवास असे वर्णन या चित्रपटाचे करता येईल, असेही केदार गायकवाड यांनी नमूद केले.
‘ढोल ताशे’ या शीर्षकावरून हा चित्रपट ग्रामीण वाटत असला तरी तो केवळ ग्रामीण नक्कीच नाही. या चित्रपटातही अभिजीत खांडकेकर, जितेंद्र जोशी, हृषिता भट, शेखर फडके, विजय आंदळकर, प्रदीप वेलणकर, विद्याधर जोशी, इला भाटे अशी दमदार कलावंत मंडळी आहेत.
‘ढोल ताशे’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अंकुर काकतकर म्हणाले की, ढोल ताशे पथकांमध्ये सहभागी होण्याचे तरुणाईला प्रचंड आकर्षण असते. अनेकदा अहंकारामुळे नवनवीन ढोलताशे पथके स्थापन केली जातात, परंतु सुपारीवरून त्यांच्यात वाद उद्भवण्याची शक्यता असते. हे पाहिल्यानंतर आपल्या चित्रपटाचा नायक ढोल ताशे पथके, त्यांच्यातील वैमनस्य यापलीकडे जाऊन ढोल ताशे पथकांना स्वत:ची ओळख मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो. त्यासाठी प्रत्यक्ष राजकारण न करता राजकारणी व्यक्तीची नकळत मदत घेतो. एक प्रकारे ढोल ताशे पथकांना ‘कॉपरेरेट आयडेंटिटी’ मिळवून देण्याचा प्रयत्न नायक करतो. नायक स्वत: आयटी क्षेत्रातील आहे. त्याचं आयटीचं ज्ञान आणि मार्केटिंगची कुवत या जोरावर तो ढोल ताशे पथकांमध्ये सहभागी होतो. अभिजीत खांडकेकर प्रमुख भूमिकेत असून जितेंद्र जोशीचीही निराळी भूमिका यात पाहायला मिळणार आहे.
‘मणी मंगळसूत्र’ या २०१० साली आलेल्या मराठी चित्रपटात पदार्पण केल्यानंतर अभिनेत्री हृषिता भट ‘ढोल ताशे’द्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येतेय.
दोन्ही चित्रपटांमध्ये एक योगायोग घडून आला आहे. ‘ऑनलाईन बिनलाईन’ हा दिग्दर्शक केदार गायकवाड यांचा पहिलाच चित्रपट असून ‘ढोल ताशे’ या चित्रपटाचे छायालेखन त्यांनी केले असून दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत. केदार गायकवाड यांनी हिंदीतील ‘हेट स्टोरी टू’ या चित्रपटांचे छायालेखन केले आहे. तर ‘असा मी अशी ती’ या मराठी चित्रपटाचेही छायालेखन केले आहे.
दोन्ही चित्रपटांचे विषय आतापर्यंत मराठी प्रेक्षकांसमोर आले नसून विषयवैविध्य, तरुण कलावंतांची फौज हे सामथ्र्य आहे. तर त्याचबरोबर एकाच दिवशी प्रदर्शित होणार असल्याने बॉक्स ऑफिसवर जुगलबंदीही पाहायला मिळणार आहे.
सुनील नांदगावकर – response.lokprabha@expressindia.com

First Published on June 26, 2015 1:10 am

Web Title: marathi movie
टॅग Marathi Movie
Next Stories
1 रिमेकदृश्यम
2 दोन भागांतील भव्य चित्रपट ‘बाहुबली..’
3 ‘हमारी अधुरी कहानी’
Just Now!
X