शूटिंगमुळे कलाकार नेहमीच बिझी असतात. पण, वेळात वेळ काढून ही मंडळी हमखास हजेरी लावतात ती किचनमध्ये. साधंसुधं जेवण करण्यापेक्षा काहीतरी वेगळा प्रयोग करण्यात त्यांना जास्त आनंद मिळतो. असेच काही कलाकार सांगताहेत त्यांच्या भन्नाट प्रयोगांविषयी..

lp110चिकनवरचे प्रयोग आणि मी
मी चांगलाच खवय्या आहे. वेगवेगळे पदार्थ खाऊन बघायला आणि करायलाही खूप आवडतं. माझी आई सतत काही ना काही नवनवे पदार्थ करत असते. तिची ही सवय काहीशी माझ्याकडे आली आहे असं म्हणायला हरकत नाही. आजकाल टीव्हीवर एकेक भन्नाट कुकिंग शोज लागतात. ते बघून प्रेरणा मिळते आणि पावलं वळतात ती किचनकडे. हे करून बघू, ते करून बघू असं सुरू होतं. चिकन हा माझा सगळ्यात आवडता पदार्थ आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या पदार्थासोबत प्रयोग करणं जास्त सोयीचं आहे असं मला वाटतं. म्हणून मी चिकन करताना वेगवेगळ्या पद्धती, त्यात नव्या गोष्टींचा समावेश अशा अनेक गोष्टी करत असतो. एकदा असंच रात्री खूप उशिरा मला काहीतरी करण्याची हुक्की आली. मी चिकनचाच एखादा पदार्थ करायचं ठरवलं. बॉर्बेक्यू सॉस, स्प्रिंग ऑनिअन्स, चिपोटले सॉस, मीठ, तिखट असं सगळं चिकनमध्ये घातलं. फ्राइंग पॅनवर टाकून ते शिजवलं. मस्त वास सुटला होता त्याला. ते खाणार तितक्यात रेड चिली फ्लिक्स घरात असल्याचं आठवलं. या सुगंधी डिशवर ते टाकले तर पदार्थाला चार चाँद लागतील. म्हणून मोठय़ा उत्साहात ते मी चिकनवर पसरवले. पण, नंतर माझ्या लक्षात आलं की ते फ्लेक्स खूप जुने आणि खराब झाले होते. त्यामुळे झालं असं की, तो सुगंधी पदार्थही खराब झाला. माझ्या मेहनतीवर पाणी फिरलं. पण, मीही मागे हटलो नाही. रागाने पुन्हा तोच पदार्थ केला. असे किचनमधले उद्योग माझे सुरू असतात. माझ्या बायकोला, ऊर्मिलाला माझ्या किचनमधल्या प्रयोगांचा फायदा होतो. पण, मी केलेले सगळे पदार्थ तिला बिचारीला खावे लागतात हेही तितकंच खरंय.
आदिनाथ कोठारे


lp111करपलेली खिचडी अनुभवली

किचनमध्ये आवडीने मी काही करत असेन तर ते अनेकदा कॉफीशी संबंधितच असतं. म्हणजे अगदी साधी कॉफीही माझ्या हातून मस्त होते. त्यामुळे माझ्या कॉफीचे बरेच फॅन्स आहेत. मित्रमंडळी किंवा नातलग एकत्र जमलो की माझ्या हातची कॉफी नाही असं कधीच झालं नाही. अगदी साध्या कॉफीपासून ते त्यात वेगवेगळ्या गोष्टी घालून त्यात प्रयोग करण्यापर्यंत कॉफीचे अनेक प्रकार होत असतात. माझ्या स्वयंपाकघराबाबत काही अटी असतात. स्वच्छ, सुंदर असं स्वयंपाकघर मला नेहमी हवं असतं. वेगवेगळ्या रंगांनी सजलेलं स्वयंपाकघर मला आवडतं. पण, मी स्वयंपाकघरात गेलो आणि एखादा पदार्थ करायचा म्हटला की माझ्या आईला प्रचंड टेन्शन येतं. म्हणजे मी पदार्थ वाईट बनवतो म्हणून नाही तर खूप पसारा करतो म्हणून. त्यामुळे ती सहसा मला स्वयंपाकघरात येऊ देत नाही. आता शूटमुळे मी मुंबईत राहतोय. त्यामुळे कधी वेळ आलीच तर मला माझं करून घ्यावं लागतं. असंच एकदा शूटवरून घरी आल्यावर मला खूप भूक लागली होती. पटकन होईल अशी एकच गोष्ट होती, खिचडी. मी आईला फोन केला. ती सांगत होती तसं करत गेलो. भूक इतकी लागली होती की ती कशी करतोय किंवा कशी होतेय यापेक्षा ती कधी खायला मिळते याकडे लक्ष होतं. भुकेची तीव्रता इतकी होती की, कुकर जरा गार झाल्यावर त्याचं झाकण उघडावं याचंही भान राहिलं नाही. मी ते तसंच उघडलं. त्यामुळे झालं असं की, झाकण उघडताच बाजूच्या भिंतीवर ती थोडी उडाली. त्यात तिखट, मिठाचा अंदाजही चुकला होता. सगळं बिघडलं. आता पुन्हा हा प्रपंच करण्याची ताकद नव्हती. त्यामुळे सरळ उठलो. बाहेर हॉटेलमध्ये जाऊन बुर्जी पाव खाल्ला. या दिवसामुळे करपलेली खिचडी मी अनुभवली.
सुयश टिळक

lp109आंब्याचे ऑमलेट
मला स्वयंपाकातले वेगवेगळे प्रयोग करण्याची आवड आहे. मुळात मी मालवणी असल्यामुळे मांसाहाराचे सगळे पदार्थ मला येतात. मालवणी लोकांच्या मांसाहाराची चव वेगळी असते. त्यामुळे आई हे सगळे पदार्थ घरी करत असताना मी बघत बघतच शिकले. आई घरी नसताना आपलं आपल्याला काही बनवून खाता आलं पाहिजे म्हणून मी आणि माझी बहीण भन्नाट प्रयोग करायला लागलो. खरंतर शिकतानाच अनेक प्रयोग होत असतात. भरपूर चुका होत असतात. कधी मीठ जास्त पडतं तर कधी तिखट, तर कधी साखर. पण, कालांतराने अंदाज येऊ लागतो. आपण तयार केलेला पदार्थ दुसऱ्यांना खाऊ घालायचा आहे ही जबाबदारी वाटत असल्याने विशिष्ट पदार्थ करताना त्यातल्या घटकांचा अंदाज येऊ लागतो. मला शेंगदाणे खूप आवडतात. त्यामुळे आमच्या घरी सहसा ज्या भाज्यांमध्ये दाण्याचे कूट घालत नाही त्याही भाज्यांमध्ये मी ते घालायला लागले. सगळ्यांना तशा भाज्या आवडायलाही लागल्या. ऑमलेट हे अनेकजण अनेक प्रकारे करतात. मीही एकदा एक भन्नाट प्रयोग केला होता. आधी पोळी तव्यावर ठेवून ती भाजून घेतली. नंतर फेटलेलं अंड त्या पोळीवर पसरवलं. ते थोडं शिजू दिलं. त्यामुळे ते आम्लेट पोळीला चिकटतं. मग सरबत करताना रसनाची पावडर मिळते ती थोडी त्या आम्लेटवर टाकली. ती पावडर आंब्याच्या फ्लेवरची होती. त्यामुळे असं मस्त आंब्याचं आम्लेट तयार झालं होतं. एरवी आम्लेटसोबत आपण सॉस वगैरे घेतो. पण, यात तशी विशेष गरज नव्हती. कारण त्याला मुळातच त्या पावडरमुळे आंबट चव होती. त्यामुळे तिखट, आंबट अशा चवीचं आंब्याचं आम्लेट हा नवा प्रकार मी तेव्हापासून करायला लागले.
पूजा सावंत