हिरॉइनची बहीण ही तशी दुय्यमच भूमिका. पण ‘कॉफी आणि बरंच काही’ या सिनेमात आभाच्या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून ही भूमिका साकारणाऱ्या नेहा महाजनने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिनेमा प्रदर्शित होण्याआधी त्याचं भरपूर प्रमोशन केलं. त्याच्या जाहिरातींवरून सिनेमा आकर्षकही वाटला. ठरलेल्या दिवशी सिनेमा प्रदर्शित झाला आणि हाऊसफुलचे बोर्ड लागले. तरुण मंडळी सिनेमाच्या प्रेमात पडली आणि सिनेमा हिट झाला. त्या सिनेमाचे संवाद, भाषा, विषय याबद्दल कॉलेज कट्टय़ांवर चर्चा होऊ लागली. हा सिनेमा म्हणजे महिन्याभरापूर्वी प्रदर्शित झालेला ‘कॉफी आणि बरंच काही.’ कट्टय़ांवर होणाऱ्या चर्चेत एक गोष्ट मात्र हमखास असायची. सिनेमात बहिणीची, आभाची भूमिका साकारलेल्या नेहा महाजन हिच्या अभिनयाची. संपूर्ण सिनेमा लक्षात राहतो. त्यातले मुख्य कलाकारही आठवणीत राहतात. पण, आभा ही कमी वेळात मनात घर करून जाते. खरं तर या भूमिकेची लांबी फारशी नाही. तरी आभा सिनेमात लक्षात राहिली आहे. सिनेमातल्या चेहऱ्यांपैकी नेहा महाजन हिचा चेहरा तसा प्रेक्षकांसाठी नवखा आहे. त्यामुळे या अभिनेत्रीविषयी जाणून घेण्याचं कुतूहल प्रेक्षकांना नक्कीच होतं. एएफएस म्हणजे अमेरिकन फिड सव्‍‌र्हिस ही संस्था अमेरिकेतल्या लोकांना भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी यासाठी काम करते. या संस्थेकडून विद्यार्थी सांस्कृतिक देवाणघेवाणी अंतर्गत ती अमेरिकेत गेली. मूळची तळेगावची असलेली नेहा अकरावीच्या मध्यावर अमेरिकेत गेली. त्यामुळे अकरावीचं र्अध वर्ष आणि बारावी ती अमेरिकेत शिकली आहे. तिचे बाबा सतारवादक असल्यामुळे लहानपणापासूनच ती कला क्षेत्राकडे खेचली जायची. पुढे फग्र्युसन कॉलेजमधून बीए आणि पुणे विद्यापीठातून फिलॉसॉफी विषयात एमए तिने केलं. लहानपणापासूनच नेहाला या क्षेत्राचं आकर्षण होतं. पण, त्याचा करिअर म्हणून तिने कधी विचार केला नव्हता. एमए झाल्यानंतर मात्र अभिनय क्षेत्रातच करिअर करायचं तिने पक्कं ठरवलं.
बारावी झाल्यानंतर भारतात आल्यानंतर नेहाला पहिला ब्रेक मिळाला तो सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्या ‘बेवक्त बारीश’ या सिनेमात. राजस्थानी हिंदी असलेला हा सिनेमा करताना भरपूर काही शिकायला मिळाल्याचं नेहा सांगते. ‘पहिल्या सिनेमानंतर यामध्येच करिअर करायचं मी ठरवलं नव्हतं. नाटक, सिनेमा याची आवड होती पण, ते करिअर म्हणून निवडावं हा निर्णय मी तेव्हा घेतला नव्हता. एमए करताना दीपा मेहता यांच्या ‘मिडनाइट्स चिल्ड्रन’ या सिनेमात काम करायची संधी मिळाली. हा सिनेमा माझ्यासाठी खऱ्या अर्थाने मोठा ब्रेक ठरला. शबाना आझमी, अनुपम खेर, सोहा अली खान, राहुल बोस अशा बडय़ा कलाकारांसोबत मला काम करण्याची संधी मिळाली. या सिनेमादरम्यान असंख्य गोष्टी शिकता आल्या. याच सिनेमानंतर मी अभिनय क्षेत्राकडे करिअर म्हणून बघायला सुरुवात केली’, नेहा सांगते. ‘बेवक्त बारीश’, ‘मिडनाइट चिल्ड्रन’ अशा वेगळ्या धाटणीचे सिनेमे करूनही नेहाला ‘कॉफी..’ या सिनेमाने खुणावलं. ती सांगते, ‘सिनेमाचा दिग्दर्शक प्रकाश कुंटे याला माझ्याबद्दल कुणीतरी सांगितलं. त्यामुळे त्याने मला फोन केला. आम्ही भेटलो. मी सिनेमाची स्क्रिप्ट वाचली. मला खूप आवडली. आभा ही भूमिकाही मला खूप आवडली. सिनेमा करण्यासाठी मी लगेच माझा होकार कळवला.’ एकाच पठडीतले सिनेमे करण्यापेक्षा कलाकाराने वेगवेगळ्या वाटाही आजमावून बघाव्या. तोच प्रयत्न करण्यासाठी तिने ‘कॉफी..’ हा सिनेमा केला. तो करताना तिच्यातलं वेगळं काही शोधण्याची, सादर करण्याची संधी तिला मिळाली, असंही ती सांगते. ‘आजोबा’, ‘संहिता’ या मराठी तर ‘जीबून संदेश’ या आोरिया फिल्ममध्ये नेहाने भूमिका केल्या आहेत.
सिनेमात नायक-नायिकांवरच जास्त भर दिला जात असला तरी सिनेमातल्या काही साहाय्यक व्यक्तिरेखाही लक्ष वेधून घेतात. तसंच झालं आभा या व्यक्तिरेखेचं. थिएटरमधला प्रेक्षकवर्ग आभा असलेल्या प्रत्येक प्रसंगावर प्रतिसाद देत होता. मग तो सुरुवातीचा आई-बाबांसमोर जाई चिडचिड करत असताना तिला ‘गप्प रहा’ असा फक्त खुणेनेच सल्ला देण्याचा प्रसंग असो, जाई आभाला निषादबद्दल पहिल्यांदा सांगते तो प्रसंग असो किंवा जाई आणि आभामध्ये व्हाईट टॉपवरून सुरू झालेला प्रसंग असो, आभा भाव खाऊन जाते. नेहालाही तिच्या कामाबद्दल खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं ती सांगते. ‘माझ्या कामाचं प्रेक्षक खूप कौतुक करताहेत, याचा आनंदच आहे. इंडस्ट्रीतल्या काही लोकांनीही कामाचं कौतुक केलंय. भूमिका कमी वेळाची असूनही कामाची दखल घेतल्यावर अशी पावती मिळणं कोणत्याही कलाकारासाठी सुखकारक असतंच. तळेगावात ज्या परिसरात मी राहते, तिथल्या थिएटर्समध्ये चार-पाच आठवडे तो हाऊसफुलचा बोर्ड लागला होता. ज्या भागात माझं बालपण गेलं, त्या भागात माझं पोस्टर होतं. ते बघून ओळखीचे, नातलग, शिक्षक यांना कौतुक वाटायचं. हा सगळा अनुभव कायम आठवणीत राहणारा आहे’, नेहा सांगते.
आभा ही व्यक्तिरेखा आजच्या मुलीचं प्रतिनिधित्व करते. पण आभा आणि नेहामध्ये किती साम्य आहे, असं विचारल्यावर नेहा सांगते, ‘आभा पूर्णपणे नक्कीच माझ्यासारखी नाही. तिच्यातलं काही तरी माझ्यासारखं आहे. ती जर पूर्ण माझ्यासारखीच असती तर मला अभिनय करताना काहीच आव्हानात्मक वाटलं नसतं. मी ज्या ज्या भूमिका करते त्यातलं माझ्यासारखं काय आहे हे शोधण्याचा मी प्रयत्न करते. एखादी गोष्ट माझ्यासारखी नसली, पण चांगली असली तर मी त्याचा विचार करते.’ सिनेमातली आभा जशी प्रेक्षकांना भावली तसा तिचा ड्रेसिंग सेन्सही आवडला. वास्तविक ‘गर्ल नेक्स्ट डोअर’ वाटावं अशीच तिची फॅशन आहे. तरी तीही फॅशन लक्षात राहते. खऱ्या आयुष्यात नेहा मात्र फॅशन फार फॉलो करत नाही. ‘मला कपडय़ांमध्ये प्रयोग करायला आवडतात. पण मी फार ट्रेंडी नाही. मुळात मला त्यात फार वेळ घालवायला आवडत नाही. मला ज्या कपडय़ांमध्ये सहज वावरता येतं तसे कपडे मी घालते’, असं ती सांगते.
नेहामध्ये एक संगीतप्रेमीही दडलेली आहे. गेली नऊ र्वष ती तिच्या बाबांकडे म्हणजे पंडित विदुर महाजन यांच्याकडे सतारवादनाचं शिक्षण घेतेय. ‘मला संगीताची फार आवड आहे. बाबांकडे प्रशिक्षण घेत असतानाच त्यांच्यासोबत मैफिलींमध्ये त्यांना साथ करण्याचा अनुभवही मी घेत असते. तेही एक प्रकारचं शिक्षणच आहे. सतारवादनासह मला गाण्याचीही आवड आहे. आनंदात असेन तेव्हा गात असते’, नेहा तिच्या संगीताच्या आवडीबद्दल बोलत होती. गाण्याची आवड असल्यामुळे पाश्र्वगायनाची संधी मिळाली तर ती नक्की त्याचा विचार करील, असं ती नमूद करते. नेहाला विविध भाषांमध्येही खूप रस आहे. तिची आवड तिने सिनेमांमध्येही जपली आहे. मल्याळम, बंगाली, हिंदी, मराठी अशा सिनेमांमध्ये तिने काम केलंय. ज्या ठिकाणी जाऊ तिथल्या लोकांशी त्यांच्याच भाषेत बोलण्याकडे तिचा कल असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करण्याची नेहाची इच्छा आहे. ‘अभिनय क्षेत्रात असं सगळं ठरवून काही होत नाही. त्या त्या वेळी आलेल्या संधीचा त्या त्या वेळीच गंभीरपणे विचार करायला हवा. मला मिळत असलेल्या ऑफर्सबाबत मी त्याच वेळी विचार करते आणि निर्णय घेते. त्यामुळे विशिष्ट फॉम्र्युला ठेवून काम करता येत नाही. वर्षांतून एकच काम करावं अशा मताची मी नाही. मला खूप काम करायला आवडतं. जे काम करेन ते चोख करण्याचं धोरण मात्र मी स्वत:पुरतं आखून घेतलंय.’
एखादा कलाकार सिनेमात झळकला आणि त्याच्या कामाचं कौतुक झालं की तो कलाकार त्याची लोकप्रियता टिकून राहावी किंवा वाढावी म्हणून अनेक कार्यक्रमांमध्ये दिसू लागतो. हे ‘दिसणं’ त्यांच्यासाठी महत्त्वाचं असतं. कारण तुम्ही अशा कार्यक्रम, पार्टीना असलात, दिसलात तरच तुमचा संपर्क वाढू शकतो, तुमच्या आधीच्या कामामुळे पुढची कामं मिळू शकतात असे काही समज आहेत. त्यामुळेच अनेकदा सिनेमा प्रदर्शित झाल्यावर त्यातला एखादा कलाकार वारंवार ‘दिसू’ लागतो. पण नेहा याबाबत अपवाद ठरतेय. ‘कॉफी..’ हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरही नेहा फारशी कोणत्या सोहळ्यांमध्ये किंवा चॅनल्सवर झळकताना दिसली नाही. तिच्या कामाचं कौतुक होऊनही तिचं असं ‘दिसणं’ अनुभवलं नाही. त्यावर तिचं स्पष्ट मत आहे, ‘कुठेच जायचं नाही असं मी ठरवलेलं नाही. पण कामांचा प्राधान्यक्रम असतो. तो मी मोडू शकत नाही. माझ्या बाबांना त्यांच्या मैफिलींमध्ये मी साथ करते, त्यामुळे त्या कार्यक्रमांच्या वेळेत मी दुसरं काही ठरवू शकत नाही. दुसरं म्हणजे, मला वाटतं की, प्रेक्षकांना मी माझ्या कामातून दिसावी. मी नेहा म्हणून कशी आहे त्यापेक्षा मी नेहा अभिनेत्री म्हणून कशी आहे हे प्रेक्षकांना कळणं हे महत्त्वाचं आहे.’ अभिनय आणि संगीत याव्यतिरिक्त नेहाला स्विमिंग, वाचन, खेळ यात रस असतो. ‘सिद्धांत’ आणि ‘नीळकंठ मास्तर’ हे मराठी, तर ‘फिस्ट ऑफ वाराणसी’ हा ब्रिटिश असे तिचे आगामी सिनेमे आहेत. ‘कॉफी..’च्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांना एका सुंदर, साध्या आणि हुशार अभिनेत्रीची ओळख झाली. नेहाच्या चोख कामामुळे तिचा विशिष्ट चाहता वर्ग तयार झाला आहे. तो वाढायला फारसा वेळा लागणार नाही.

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi movie coffee ani barach kahi
First published on: 29-05-2015 at 01:19 IST