25 February 2021

News Flash

नवनवीन प्रयोगांचा ‘हायवे’

उमेश कुलकर्णी आणि गिरीश कुलकर्णी या दिग्दर्शक आणि लेखक-अभिनेता जोडीचे चित्रपट म्हणजे चित्रपटप्रेमी प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरते हे एव्हाना प्रेक्षकांना चांगलेच ठाऊक झाले आहे.

| August 14, 2015 01:05 am

lp43उमेश कुलकर्णी आणि गिरीश कुलकर्णी या दिग्दर्शक आणि लेखक-अभिनेता जोडीचे चित्रपट म्हणजे चित्रपटप्रेमी प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरते हे एव्हाना प्रेक्षकांना चांगलेच ठाऊक झाले आहे.
उमेश कुलकर्णी दिग्दर्शित आणि गिरीश कुलकर्णी लिखित ‘हायवे : एक सेल्फी आरपार’ हा नवीन मराठी सिनेमा २८ ऑगस्ट रोजी देशभर प्रदर्शित केला जाणार आहे. चित्रपटाच्या शीर्षकावरूनच हा रोड मूव्ही प्रकारातला चित्रपट असा अंदाज बांधायला हरकत नाही. या चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर पाहूनच प्रेक्षकांमध्ये कुतूहल जागे झाले नाही तरच नवल.
एका मुलाखतीत लेखक आणि अभिनेता गिरीश कुलकर्णी यांनी असे सांगितले की, स्वत:शी संवाद साधण्याचा अनुभव हा सिनेमा प्रेक्षकांना नक्कीच देऊ शकेल.
सरस कलावंत हे या ‘हायवे’वरून प्रवास करणार आहेत. रेणुका शहाणे, किशोर चौगुले, श्रीकांत यादव, छाया कदम, विद्याधर जोशी, मुक्ता बर्वे, किशोर कदम, सुनील बर्वे, सतीश आळेकर, सविता प्रभुणे, ओम भुतकर, उमेश जगताप अशी अनेक कलावंतांची फौज या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
हा चित्रपट ‘रोड मूव्ही’ प्रकारातला आहे, असे दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी सांगितले. ते म्हणाले की, विविध सामाजिक- राजकीय-आर्थिक स्तरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक व्यक्तिरेखा यात आहेत. महानगरांत राहणाऱ्या लोकांची मानसिकता एक प्रकारे टिपण्याचा प्रयत्न चित्रपटांतून केला जाणार आहे, असेही ट्रेलर पाहताना जाणवते.
नवनवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न लेखक-दिग्दर्शक कुलकर्णी जोडी नेहमीच आपल्या चित्रपटांतून करीत असते. या चित्रपटातील हिंदीतील कलावंत प्रथमच मराठी चित्रपटात दिसणार आहेत. त्याचबरोबर ‘देव डी’ या सिनेमासाठी सवरेत्कृष्ट संगीताचे पारितोषिक मिळविणारे संगीतकार अमित त्रिवेदी यांनी पहिल्यांदा मराठी सिनेमाला संगीत दिले आहे. त्रिवेदींची निवड करण्यामागचे कारण विचारले तेव्हा उमेश कुलकर्णी म्हणाले की, शहरी, महानगरी अस्तित्वाचा सांगीतिक आवाज नक्की कुठला आहे याचा आम्ही गेल्या काही काळापासून शोध घेत आहोत. ‘देऊळ’ आणि ‘वळू’ या सिनेमांच्या संगीताची जातकुळी माझ्या परिचयाची होती; परंतु आताच्या आपल्या मॉडर्न जगण्याशी जोडले जाणारे विशिष्ट संगीत या सिनेमासाठी असायला हवे असे जाणवले. अमित त्रिवेदी यांच्या संगीतामध्ये भारतीयत्व आहेच, तरुण जगण्याचा काही तरी अंश आहे असे मला जाणवले. त्याचबरोबर मी आणि गिरीश आम्ही दोघेही सतत प्रयोगशील असतो. आमच्या प्रत्येक चित्रपटात निराळे, नवीन काही तरी करण्याचा जसा प्रयत्न आम्ही करतो त्याच पद्धतीने संगीतात निरनिराळ्या पद्धतीचे प्रयोग अमित त्रिवेदी करीत आहेत. मॉडर्न जगण्यात फक्त पाश्चिमात्य ध्वनि-संगीताचा प्रभाव आहे असे मला जाणवत नाही, तर ते उलट भारतीय तर आहेच, पण त्याचबरोबर तरुण जगण्याशी त्याचा संबंध आहे, म्हणूनच अमित त्रिवेदी यांना घेतल्याचे उमेश यांनी स्पष्ट केले.
टिस्का चोप्राने एका मुलाखतीत सांगितले होते की, हा सिनेमा केवळ मराठी नाही, तर ग्लोबल सिनेमा आहे. त्या संदर्भात उमेश कुलकर्णी म्हणाले की, होय. हा भारतातील महानगरांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या जगण्याशी संबंधित सिनेमा आहे. हा सिनेमा मराठी आहेच, कारण अनेक व्यक्तिरेखा मराठी बोलणाऱ्या आहेत, परंतु आपल्या आजूबाजूला आपण पाहिले तरी दिवसभरात आपण अनेक भाषांतील लोकांशी संवाद साधत असतो. मराठी-हिंदी-इंग्रजीबरोबरच तामिळ, तेलुगू बोलणाऱ्या व्यक्तिरेखाही आहेत. त्या अर्थाने सिनेमा भारतीय आहे, असेही त्यांनी नमूद केले. एका अर्थाने विविध स्तरांतून आलेल्या व्यक्तिेरखांचे कोलाज या सिनेमात पाहायला मिळणार आहे.
सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे आपण डिजिटलवर चित्रण केलेला हा आमचा पहिला सिनेमा आहे. आतापर्यंत आम्ही सर्व चित्रपट फिल्म कॅमेऱ्यावर चित्रित केले होते. फिल्म कॅमेऱ्याने ‘हायवे’ हा सिनेमा चित्रित करणेच शक्य नाही. कलात्मकदृष्टय़ा डिजिटलचे बलस्थान हेरून कलासौंदर्याचे सादरीकरण रुपेरी पडद्यावर करणे हा विचार त्यामागे आहे आणि या सिनेमाचा विषयही प्रामुख्याने डिजिटलच्या वापरासाठी पूरक असाच आहे, असे उमेश कुलकर्णी यांनी नमूद केले.
‘सिंक साऊण्ड’चा वापर करण्याबरोबरच पात्र निवड, संगीत, कलावंत निवड, विषय-आशय वैविध्य असे अनेक प्रयोग या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येणार आहेत.
सुनील नांदगावकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2015 1:05 am

Web Title: marathi movie highway
टॅग Marathi Movie
Next Stories
1 ‘माऊण्टन मॅन’चा बायोपिक
2 स्टार व्हॅल्यू तारणार?
3 ऑगस्टमध्ये तीन मराठी सिनेमे…
Just Now!
X