‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘देऊळ’, ‘बालक पालक’, ‘दुनियादारी’, ‘टाइमपास’ आणि आता ‘लय भारी’ अशा मराठी चित्रपटांनी तिकीटबारीवर अटकेपार झेंडे रोवून मराठी चित्रपटही भरपूर मार्केटिंग केले तर पैसा कमावून देतात, असा विश्वास मराठी चित्रपटनिर्मिती करणाऱ्या लोकांना देत आहेत. त्याचबरोबर ‘तप्तपदी’, ‘भातुकली’, ‘फँड्री’ आणि यांसारखे अनेक चित्रपट आशय-विषयदृष्टय़ा संपन्न आणि वेगवेगळ्या पद्धतीची मांडणी करणारे चित्रपटही आले आहेत, येत आहेत. सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होणार असलेला ‘जाणिवा’ हा चित्रपटही याच पद्धतीचा असेल, असा कयास करायला हरकत नाही.
‘जाणिवा’ या आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाबद्दल सांगताना कथालेखक-निर्माते-दिग्दर्शक राजेश रणशिंगे म्हणाले की, काही वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेचा वर्तमानकाळात संदर्भ जोडून एक तरुण भ्रष्टाचाराच्या विरोधात झगडा देतो, असे थोडक्यात कथानक आहे. समीर देशपांडे हा तरुण या चित्रपटाचा नायक असून महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर या भूमिकेद्वारे प्रथमच रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे.
मी महाराष्ट्रीय आहे. हिंदी टीव्ही मालिका क्षेत्रात २० वर्षांपासून काम करतोय. आहट, सीआयडी, अदालत अशा अनेक मालिकांचे लेखन-दिग्दर्शन केलेले आहे. २०१० साली गाणेविरहित ‘रूक’ हा हिंदी चित्रपटही दिग्दर्शित केला आहे. पण मायबोली मराठीत चित्रपट करण्याची खूप इच्छा होती. ती इच्छा ‘जाणिवा’ या चित्रपटामुळे पूर्ण होणार आहे, असे राजेश रणशिंगे म्हणाले.
हा तरुणाईला मध्यवर्ती ठेवून केलेला चित्रपट आहे. सत्या मांजरेकर आपल्या चित्रपटाद्वारे पदार्पण करीत असून त्याच्या जोडीला साहाय्यक भूमिकांमध्ये देवदत्त दाणी, संकेत अग्रवाल, अनुराधा मुखर्जी, वैभवी शांडिल्य अशी नवोदित तरुण कलावंतही या चित्रपटाद्वारे झळकणार आहेत. पाचही तरुण व्यक्तिरेखा अतिशय सकारात्मक असून ‘कुछ कर दिखाना है’ असा त्यांचा निश्चय असतो.
या पाच नवोदित कलावंतांबरोबरच रेणुका शहाणे प्रथमच पडद्यावर एका वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याशिवाय किशोर कदम, किरण करमरकर, उषा नाडकर्णी असे अनेक कलावंत प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ‘युथफूल’ चित्रपट असला तरी रेणुका शहाणे व अन्य सर्वच कलावंतांच्या संपूर्ण लांबीच्या भूमिका यात पाहायला मिळतील, असेही रणशिंगे यांनी नमूद केले.
‘युथफूल’ चित्रपट म्हटल्यावर ‘युथफूल म्युझिक’ही असणारच म्हणून त्याबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की तरुणाईच्या ओठांवर सहज रुळतील आणि लोकप्रिय ठरतील अशी गाणी या चित्रपटात आहेत. ‘आय लव्ह यू फक्त’, ‘टिमटिमत्या’ आणि गणपती उत्सवातील ‘मोरया मोरया’ ही गाणी लोकांना आणि त्यातही तरुणाईला खूप आवडतील.
आपल्या पहिल्याच मराठी चित्रपटात राजेश रणशिंगे यांनी प्रमुख भूमिकेतील नव्या दमाच्या कलावंतांबरोबरच संगीतकार म्हणून हर्षवर्धन दीक्षित या नव्या दमाच्या संगीतकारालाही लोकांसमोर आणले आहे. दलेर मेहंदीने यातले एक गाणे गायले आहे. या चित्रपटाच्या संगीताच्या सीडीचे लवकरच प्रकाशन केले जाणार आहे, असे रणशिंगे यांनी सांगितले.
एखाद्या हिंदी चित्रपटाप्रमाणेच ‘जाणिवा’ची निर्मिती केली गेली आहे, असे सांगताना राजेश रणशिंगे म्हणाले की, गाण्याच्या चित्रीकरणासाठी दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये सेट लावला होता तेव्हा एक गंमत घडली. ठरल्याप्रमाणे सगळे बुकिंग आधीच केले होते. सेट लावल्यानंतर चित्रनगरीचे संबंधित लोक सेटवर आले आणि त्यांनी निर्माते-दिग्दर्शक खोटे बोलत असल्याचे सूतोवाच केले. माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना सांगितले की हा मराठी चित्रपटच आहे. मराठी चित्रपटासाठी बुकिंग करून हिंदी चित्रपट करीत नाहीये. म्हणजे या पद्धतीचे भव्य सेट्स केवळ एका गाण्यासाठी लावला म्हणून चित्रनगरीवाल्यांना हा मराठी चित्रपट नाही असे वाटले. यावरून मराठी चित्रपटासाठीही उच्च निर्मितीमूल्ये, भव्यता प्रेक्षकांना पडद्यावर नक्कीच पाहायला मिळेल, याची खात्री बाळगावी, असे रणशिंगे यांनी आवर्जून नमूद केले. मराठीतला हा महागडा चित्रपट असेल असे मानायला हरकत नाही, असेही रणशिंगे यांनी आवर्जून नमूद केले.

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
Devendra Fadnavis after Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…”