31 May 2020

News Flash

अस्सल धनगरी भाषेचा सिनेमा

मराठी सिनेमामध्ये सध्या वेगवेगळे प्रयोग होताना दिसत आहेत. धनगरी समाजाचं जगणं मांडणारा ‘ख्वाडा’ हा भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित सिनेमा सध्या महोत्सवांमधून गाजतो आहे.

| February 6, 2015 01:14 am

मराठी सिनेमामध्ये सध्या वेगवेगळे प्रयोग होताना दिसत आहेत. धनगरी समाजाचं जगणं मांडणारा ‘ख्वाडा’ हा भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित सिनेमा सध्या महोत्सवांमधून गाजतो आहे. त्यानिमित्त ‘ख्वाडा’विषयी-

नुकत्याच झालेल्या १३व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘ख्वाडा’ या मराठी चित्रपटाचे बरेच कौतुक झाले. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे उत्कृष्ट दिग्दर्शकाचे पारितोषिक या चित्रपटाने पटकावले. पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी काम नेईल तिकडे माणूस जातो. स्थलांतर कोणी आपल्या मर्जीने, खुशीने करीत नसते ती त्यांची गरज असते. त्यातूनच पुढे स्थानिक विरुद्ध स्थलांतरीत असे वाद जगभरात सगळीकडे निर्माण होत गेले आहेत. राजकीय हेतू ठेवून अनेकदा या समस्येला खतपाणी घातले जाते, लोकांना चिथावले जाते परंतू स्थानिक विरुध्द स्थलांतरीत असा रंग या परिस्थितीला प्रत्येक वेळेस देणे योग्य आहे का? हा मुद्दा अधोरेखित करणाऱ्या ‘ख्वाडा’ या सिनेमाचे दिग्र्दशक भाऊराव कऱ्हाडे सांगतात ‘‘ख्वाडा चे वेगवेगळे अर्थ आहेत -अटकाव / अडथळा येणे. कुस्तीचा डाव जो सोडविता येणे मुश्किल आहे आणि एक अर्थ मुळापासून उखडून टाकणे. सिनेमाभर या कलावंताना वेगवेगळया अडचणींना तोंड द्यावे लागले आहे. आणि शेवटी त्यांचा विजय होऊनही त्यांच्या हाती काही लागत नाही. त्यांना कायमच विस्थापित व्हावं लागतं. भाऊराव सांगतात, ते जेव्हा संघर्ष करीत हेते तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, विदर्भ, मराठवाडयातून, पूर्ण महाराष्ट्रातून लोक पुण्या-मुंबईत रोजी-रोटीसाठी येत असतात. ते येतात कारण स्थलांतरामागे त्यांच्या समस्या असतात. जगभरच वेगवेगळया कारणांसाठी असे स्थलांतर होत असते. अशा स्थलांतरीतांच्या बाबतीत काहीतरी करायचं डोक्यात होतं. त्याच वेळेस मी माझ्या गावाकडे मेंढपाळ लोकांचे आयुष्य जवळून बघत आलो आहे. त्यांना जनावरांसाठी रोजच स्थलांतर करावे लागतं, पण त्यातही ते समाधानी असतात. त्यांची त्यांची जगण्याची अशी एक रीत असते. त्यातही निरागसता असते, त्यांचे काही नियम असतात आणि ते त्यात खूष असतात. अशा वेळी अशा काही घटना किंवा प्रवृत्तीमुळे त्यांना कायमचं स्थलांतर करावं लागलं तर .. कायमचं उखडून फेकल्यासारखं होतं. स्थलांतरीतांबद्दल खूप संवेदनशीलतेने व सूचकतेने हा चित्रपट भाष्य करतो. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत आहे का यावर ते सांगतात, हा चित्रपट सत्यघटनेवर आधारीत नाही, परंतु पूर्णत: वास्तववादी आहे. आजही आपल्याकडे विविध ठिकाणी अशा प्रकारच्या घटना समोर येत आहेत. त्याचा कुठे तरी संदर्भ या चित्रपटाला आहे. त्याचबरोबर एका बाजूला प्रस्तापिताविरूध्द सामान्य माणूस हा संघर्ष ही, अन्यायाविरूध्द फार मोठा लढा वगरे असा आव न आणता सहजपणे दर्शविला आहे.
धनगर ही महाराष्ट्रातील एक भटकी जमात. शेळ्या-मेंढय़ा पालन हा त्यांचा मुख्य व्यवसाय. पालातील जनावरांसाठी चारा शोधत ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत असतात. जिथे हिरवं रान तिथे त्यांचा मुक्काम. जनावरांवर पोटच्या पोरांइतकंच त्यांचं प्रेम. त्यांच्या रोजच्या सवयी, त्यांचं भरणपोषण, त्यांचे आजार अगदी घरातील लहान मुलाप्रमाणे ते त्यांचं करत असतात. जनावरांभोवती त्यांचं अवघं आयुष्य भिरत असतं. त्यांच्या चालीरीती, लग्न समारंभ, अनेक रिवाज, कोर्ट-कज्जे, जगण्याची पद्धती यांचं सहज व अत्यंत वास्तवदर्शी चित्रण ख्वाडामध्ये करण्यात आलं आहे. २०१४ मध्ये झालेल्या ‘मामि’ चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचं स्क्रीिनग होणार होतं. प्रेक्षकांनाही या चित्रपटाची बरीच उत्सुकता होती. त्याबद्दल भाऊराव यांना विचारलं असता कळलं की, फायनल िपट्र तयार न झाल्यामुळे तसेच काही आíथक अडचणींमुळे हा चित्रपट या वेळेस प्रदíशत होऊ शकला नाही.
भाऊराव कऱ्हाडे यांचा हा पहिला चित्रपट. पहिलवानकीचा शौक असलेला बाळू हा चित्रपटाचा नायक. कसरत करणं हा त्याचा आवडता उद्योग. कष्ट करत तरीही वाडवडिलांसारखं सतत या मुलखातून त्या मुलखात वणवण करत आयुष्य काढण्यापेक्षा कुठेतरी एकाच ठिकाणी स्थायिक व्हावं, लग्न करावं, चारचौघांसारखं सरळ आयुष्य काढावं अशी त्याची माफक इच्छा. मोटरसायकल, मोबाइल यांसारख्या जगणं सुकर, स्टायलिश करणाऱ्या शहरी सुखवस्तूपणाचं आकर्षण…आणि का नसावं? आणि या साध्या सरळ आयुष्यात गावच्या मुजोर पुढाऱ्याने आपल्या अहंकारापोटी घातलेला ‘ख्वाडा’ – खोडता.
चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच धनगरी समाजातील विविध रूढी परंपरांचं दर्शन, कमी संवाद तरीही मोठय़ा वहिनीचा फक्त वावर, पालातील शेळ्या मेंढय़ांची काळजी घेणं, नव्या नवरीचं नवखेपण, आल्या आल्या कुटुंबात सामावून जाणं, शेवटी नवऱ्याला खंबीरपणे दिलेली साथ एक खरं धनगरी कुटुंब उभं करतं. बाळूचं लग्न ठरल्यानंतर त्या धुंदीत स्वप्नरंजनात त्याचं वावरणं, ठरलेल्या लग्नाबद्दल इतकी स्वप्नं रंगवूनही अचानक दुसऱ्याच मुलीशी लग्न होतं तेव्हा कोणतीही खळखळ न करता संसाराला लागणं… त्यातही स्वत:साठी काही क्षण शोधणं, कुस्तीचा उलटवलेला डाव, शेवटचा संघर्ष यांसारख्या घटना एका कुटुंबाच्या आयुष्यातील प्रवास दर्शवितात. भाऊराव सांगतात की ‘‘ही जमात तशी निरुपद्रवी ….आपण परक्या मुलखात आहोत याची जाण त्यांना असते. ते त्यांच्या आयुष्यात समाधानी आनंदी असतात.’’ म्हणूनच चित्रपटात कुठेही नायकाची हिरोगिरी आपल्याला दिसत नाही. आली परिस्थिती तो निमूटपणे स्वीकारतो, पण त्यांच्या जनावरांवर, कुटुंबावर त्या गावातल्या पुढाऱ्याकडून होणारा अन्याय, अडवणूक सहन करत करत शेवटी त्याचा संयम संपून ‘‘आम्ही काय बांगडय़ा भरल्यात का?’’ असं म्हणत त्याला संपवून टाकतो.
सहदिग्दर्शक वैशाली केंदळे सांगतात, चित्रपटात वास्तविकता साकारताना अनेक अडचणी आल्या. चित्रपटाचं लोकेशन निवडताना प्रत्यक्ष धनगरवाडय़ावर शूटिंग करण्यात आलं. त्या त्या दुर्गम भागात सर्व कलाकारांसहित सर्व साधने नेणं फार अवघड होतं. धनगरी स्त्रियांचे जुन्या धाटणीचे दागिने पुण्यात तुळशीबागेत वगरे फिरून कुठेही मिळत नव्हते. सगळीकडे लेटेस्ट फॅशनचे दागिने, त्यामुळे एका धनगरी कुटुंबाचे दागिने नेऊन तसे दागिने घडविण्यात आले. चित्रपटात जे प्राणी (शेळय़ा, मेंढय़ा, घोडे) दाखविण्यात आलेत ते प्रत्यक्ष त्या त्या गावांतील वाडे पाहून एखाद्या धनगराचा वाडा पूर्ण दीड-दोन महिने दत्तक घेतला आहे. त्या लोकांकडून प्राण्यांच्या सवयी, त्यांना हाकारण्याच्या विशिष्ट पद्धती शिकून घेतल्या. रात्रीच्या वेळेस प्राण्यांना शांत करताना, कळपात चालत असताना, विशिष्ट दिशेला वळविण्यासाठी शिवाय कळपातील फक्त कोकरांना हाकारतानाही विशिष्ट प्रकारे वेगवेगळे आवाज केले जातात. तशा प्रकारचे आवाज कलाकारांनी शिकून घेतले. त्या प्राण्यांचा मालक तेवढा काळ युनिटसोबत होता. सर्वाचं भरण-पोषण युनिट पाहत होतं, शिवाय प्राण्यांच्या चाऱ्याच्या वेळा, विश्रांतीच्या वेळा सांभाळून त्यांच्या सवयी कोठेही डिस्टर्ब न होता शूटिंग झालं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे चित्रपट पूर्ण करण्यास माणसांपेक्षा जास्त सहकार्य मुक्या प्राण्यांचं मिळालं. कधी नसíगक तर कधी आíथक अडचणी चित्रपट पूर्ण करताना आल्या, परंतु प्राण्यांमुळे एकही अडचण कधी आली नाही. चित्रपटाच्या जवळजवळ प्रत्येक दृश्यामध्ये प्राणी आहेत, परंतु प्राण्यांमुळे एकही रिटेक झाला नाही.
सिनेमात लग्नाच्या वेळी तसेच खंडोबाच्या दर्शनाच्या वेळी जो गुलाल व हळद उधळलेली आहे तो संपूर्ण स्क्रीन व्यापून टाकते. आपण त्या दृश्याचा एक भाग आहोत असं वाटावं इतक्या नसíगकपणे त्याचं चित्रीकरण झालं आहे.
शशांक िशदे हे एक मुरलेले कलाकार सोडता बाकी सारे नवे चेहरे यात अभिनय करताना दिसतात. खरे पाहता प्लॅन ए व बी नुसार ज्या कलाकारांची निवड झाली होती, काही कारणांमुळे त्या कलाकारांऐवजी प्लॅन सी च्या कलाकारांनी काही भूमिका केल्या आहेत. भाऊराव सांगतात, कोणत्याही मेकअपशिवाय कलाकार दोन महिने आधी लोकेशनवर जाऊन राहिले आहेत. धनगरी कुटुंबासारखेच उन्हातान्हात उघडय़ावर राहून कलाकारांचे चेहरे, त्वचा रापले गेले होते. त्यामुळे त्यांना धनगरी कुटुंब जसं दिसावं, चित्रपटातील वातावरण जसं राखायचं होतं, हे त्यामुळे तसंच्या तसं उतरलं आहे.
चित्रपटातील भाषा अस्सल धनगरी आहे. त्यांच्या शिव्या, त्यांच्या सवयी, भाषेचा लहेजा, उतार-चढाव हे प्रत्यक्ष त्या लोकांकडून कलाकारांनी शिकून घेतलं आहे.
या चित्रपटात कुठेही सुरुवात-मध्य-शेवट अथवा एखादे सूडनाटय असा टिपीकल प्रवास आढळणार नाही. तर आयुष्य जसे आहे तसे मांडले आहे. विस्थापित ज्या ठिकाणी जातो तेथे तो स्वत:चा विकास साधण्याचा प्रयत्न करीत असतो. ज्या साधन संपत्तीच्या कमतरतेमुळे त्याला त्याच्या मूळ ठिकाणाहून विस्थापित व्हावे लागलेले असते तिचा तो स्वत:च्या विकासाकरिता उपयोग करीत असतो. त्या साधनसंपत्तीचा उपयोग स्थानिकांनीही कधी केलेला नसतो. त्यांचेही त्याकडे दुर्लक्ष झालेले असते. अशा वेळी केवळ बाहेरुन आलेत म्हणून त्यांना उपरे समजणे, त्यांना अपमानित करणे हे कितपत योग्य आहे, हा प्रश्न हा चित्रपट उपस्थित करतो.
वनिता शेळके

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 6, 2015 1:14 am

Web Title: marathi movie khwada
Next Stories
1 मराठी सिनेमांना ‘अच्छे दिन?’
2 नीओ-नॉईर चित्रपट ‘बदलापूर’
3 छोटा पडदा : खलनायिका हूं मैं..
Just Now!
X