29 February 2020

News Flash

‘किल्ल्या’तलं जगणं…

मोठमोठी पारितोषिकं आणि आंतरराष्ट्रीय महोत्सव सर करणारा किल्ला हा सिनेमा ‘खूप आवडला’ आणि ‘अजिबात आवडला नाही’ अशा दोन टोकाच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. अशा वेळी किल्ला

| July 17, 2015 01:14 am

मोठमोठी पारितोषिकं आणि आंतरराष्ट्रीय महोत्सव सर करणारा किल्ला हा सिनेमा ‘खूप आवडला’ आणि ‘अजिबात आवडला नाही’ अशा दोन टोकाच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. अशा वेळी किल्ला कसा बघायला हवा याविषयी-
आत्ता मराठी सिनेमा मस्त टप्प्यावर आलेला आहे. दृश्यमाध्यमाची अचूक जाण असणारे तरुण दिग्दर्शक सध्या मराठी सिनेमा बनवत असल्याने या सिनेमांचा लूकच बदलून गेलेला दिसतो. उदा. एलिझाबेथ एकादशी, कॉफी आणि बरंच काही, त्या आधीचा फँड्री. त्याच कडीतला पुढचा सिनेमा म्हणजे किल्ला. या सिनेमातून अविनाश अरुण या अठ्ठावीस वर्षांच्या दिग्दर्शकाने जबरदस्त प्रगल्भता दाखवलेली आहे. असं म्हणण्याचं कारण फक्त त्याला दृश्यमाध्यमाचं तंत्र अवगत झाल्याचं दिसतं म्हणून नव्हे. एखादं स्टेटमेंट करायचं म्हणून सिनेमा रचलेला नाही या दिग्दर्शकनं. त्याच्या सिनेमातून आपोआप हळूहळू त्याचं स्टेटमेंट उलगडत जातं. किल्ला सिनेमाची गंमत छोटय़ा शाळकरी मुलाचं व्यक्तिमत्त्व अलगदपणे प्रेक्षकांसमोर उलगडत जाण्यात आहे. त्या मुलाच्या मनाची कवाडं हळूहळू उघडत जाणं आणि त्याला समाजाच्या विशालतेची जाणीव होणं, त्याच्याशी आपल्याला जुळवून घेतलं पाहिजे याचं भान येणं, हे किल्ल्याच्या सबंध प्रवासात होत जातं. पण, सुरुवात आणि शेवट असणारी गोष्ट या सिनेमात नाही. मला हे हे असं असं म्हणायचंय, असंही बाळबोधपणे दिग्दर्शक सांगत नाही. किल्ला उजवा (चांगला या अर्थाने) ठरतो तो त्याच्या हाताळणीत.
कोणी म्हणेल या सिनेमात काही घडतच नाही. एका अर्थाने ते खरं आहे. टॉम क्रुझच्या सिनेमात प्रेक्षकांना विचार करायलाच वेळ मिळणार नाही इतक्या वेगाने संपूर्ण सिनेमाभर सतत घडामोडींची साखळीच दाखवलेली असते. तसं असेल तर किल्ल्यात काहीच घडत नाही. दहा-अकरा वर्षांचा चिन्मय काळे नावाचा मुलगा, त्याची सरकारी कचेरीत काम करणारी विधवा आई आणि मुलाचे शाळकरी चार मित्र. त्यातही गंमतजंमत करणारा, हसवणारा एकच. आईची बदली झाली म्हणून चिन्मय पुणे सोडून गुहागरला येतो. पण, इथे येऊन त्याच्या आयुष्यात घडामोडी घडतच नाही. खर ंतर पुण्यापेक्षाही संथ आयुष्य तो जगायला लागतो. चिन्मय चार-सहा महिनेच गुहागरमध्ये राहतो, तेवढाच कालावधी सिनेमात दाखवलेला आहे. त्यामुळे सिनेमा आणि त्यातील पात्रं संथपणे पुढं पुढं जात राहतात. काही घडामोडीच नसतील तर सिनेमात बघायचं काय, असं विचारता येईल. पण, सामान्य माणसाच्या आयुष्यात घडामोडी फारशा होतंच नसतात. त्या व्हायला लागल्या तर त्याच्या ताणाने जगणंच अशक्य होईल. छोटय़ा मुलाच्या आयुष्यात तरी काय अचंबित करणारं सतत घडत राहणार?.. मग, किल्ल्यात काय बघायचं? एखाद्याच्या आयुष्यातला-जगण्यातला एखादा तुकडा दुर्बिणीतून मोठा करून दाखवल्यावर तो कसा दिसेल? तो अधिक स्पष्ट, त्यातील बारकावे अधिक ठळक, अधिक खोल, अणकुचीदार दिसू लागतील. तेव्हाच आपल्याला काही तरी घडलंय याची जाणीव होते. हे घडणं घडामोडींचं नसतं ते आतलं स्वत:तलंच असतं. किल्ल्यामध्ये चिन्मयच्या आयुष्यातला छोटय़ासा तुकडा सिनेमाच्या दुर्बिणीतून मोठा करून दाखवलेला आहे. त्याच्या आतला बदल दाखवणारा. हेच किल्ल्यातलं जगणं. हीच किल्ल्यातली घडामोड. असं तुकडा बाजूला काढून दाखवणारे सिनेमा विरळाच. किल्ल्याने ती उणीव थोडी तरी भरून काढली आहे.
फार मोठय़ा घडामोडी न होताही माणूस छोटय़ा छोटय़ा घटनांमधून नकळत बदलत असतो, त्याला फारशी गती असतेच असं नाही पण, ते वळण पक्कं असतं. किल्ल्याचंही असंच आहे. या सिनेमातल्या पात्रांच्या आयुष्यात काही घडत नाही वा ते काही घडवत नाहीत, पण प्रत्येक पात्र बदलत जरूर जातं. हा बदल दिग्दर्शक सिनेमात मांडतो पण, तो प्रेक्षकांना चमच्यानं भरवत नाही. शब्दबंबाळ संवादफेकीतून स्पष्टीकरण देत नाही. फारसं काही न घडवणाऱ्या पात्रांमधील बदल तुम्हीच टिपा, असं प्रेक्षकांना दिग्दर्शकानं म्हणावं हे कौतुकास्पद आहे. हे करत असताना त्यानं कसलाही आव आणलेला नाही. प्रेक्षकांची समजून घेण्याची क्षमता असते असं तो मानतो. सिनेमाही चित्रकलेसारखाच असतो. चित्रं समजून घ्यावी लागतात, शब्दाविना. सिनेमाही शब्दांपेक्षा दृश्यातूनच समजून घ्यायचा असतो! एवढंच तो सांगतो. म्हणूनच नाटकाच्या प्रभावातून बाहेर पडून दृश्यमाध्यमाचा स्वतंत्रपणे विचार केल्याचं किल्ल्यात नीट दिसतं.
आतला बदल होत असल्यानं अर्थातच पात्रं एकमेकांशी कमी आणि स्वत:शी जास्त बोलताना दिसतात. किल्ल्यात चिन्मय. दहा-अकरा वर्षांचा मुलगा स्वत:शीच संवाद साधताना दाखवलेला आहे. छोटी मुलंही स्वत:शी बोलतात. ती संवेदनशील असतात. त्यांच्या जगण्याचा अन्वयार्थ लावायला ती शकतात. त्यांची ही संवादाची प्रक्रिया सिनेमांमधून क्वचितच पाहायला मिळते हा एक भाग. आणि कुटुंबात वडीलधाऱ्यांचं सतत ऐकायचं असतं आणि त्याचं अनुकरण का हा प्रश्न न विचारता करायचा असतो हे सतत त्यांच्या मनावर बिंबवलं जात असल्यानं छोटी मुलं स्वत:शी बोलतात असं मानलं जात नाही. त्यामुळंच सिनेमातून ही प्रक्रिया दाखवली जाते तेव्हा चमत्कारिक वाटायला लागतं. स्वत:शी संवाद साधणं ही प्रक्रियाच पूर्ण व्यक्तिवादी असते. आपल्याला व्यक्तिवादी असणं जमतं कुठं? सगळा गोतावळा जमवून त्यातच स्वत:ला विसरायला जास्त आवडतं. सतत बडबड करत किल्ल्यातला चिन्मय मात्र आपला गैरसमज दूर करतो. हाच तर किल्ल्याचा पाया आहे. पण, किल्ला पाया रचून थांबलेला नाही हे अधिक महत्त्वाचं.
स्वत:शी संवाद साधताना चिन्मयच्या बदलाची प्रक्रिया अलगद होत जाते. चिन्मय पुण्याच्या मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात राहणारा मुलगा. सुरक्षित आयुष्य. कसलीच तोशीश नाही. अचानक वडील जातात. आई गुहागरला नोकरीच्या गावाला घेऊन येते आणि सुरक्षित आयुष्याचं दार पहिल्यांदा तुटतं. हा बदल त्याला आवडत नाही. कारण सवयच नसते अशा बदलांची. त्यांना सामोरं जाणार कसं? शाळेतला बडबड करणाऱ्या मित्राचेही आईवडील अपघातात गेलेत, त्यानं बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेतलेलं आहे. कारण तो कधी सुरक्षित चौकटीत जगलेलाच नाही. चिन्मयला हे का जमलेलं नाही? पुण्याला परत जाण्याचा धोशा त्यानं आईमागं लावलेला आहे. त्याला सतत मामेभावाची आठवण येत राहते. कोकणातल्या भाज्या त्याला आवडत नाहीत. पुण्यात मिळतात त्याच भाज्या करून घाल असं त्याचं आईला सांगणं असतं. बिगर ब्राह्मण घरात तो जेवत नाही. असं का होतं? ब्राह्मण समाजा पलीकडचा समाज त्यानं कधी पाहिलेलाच नाही. पुण्यातही ब्राह्मणी पगडा असलेल्या शाळेतच जातो. त्याच्यावर संस्कारही तेच होतात. गुहागरमधल्या शाळेतील शिक्षिका हजेरी घेताना बिगरब्राह्मणी मुलांमध्ये तोच फक्त ‘उपस्थित’ असं म्हणतो. छोटय़ा प्रसंगांमधून दिग्दर्शकानं ही सगळी पाश्र्वभूमी उभी केलेली आहे.
या ब्राह्मणी वागण्यातून तो बाहेर पडत जातो. त्याला त्याचे मित्र आवडायला लागतात. ते त्याला खेकडा पकडायला, मासे पकडायला, भटकायला शिकवतात. त्यांच्यातलं असणं चिन्मय एन्जॉय करायला शिकतो. दारूडय़ा मच्छीमाराची भीती मोडते. त्याच्याबरोबर खोल समुद्रातून परत आल्यावर भाजलेल्या खरपूस मच्छीची त्याला चव लागते. कोकणातल्या भाज्यांना नाकं मुरडणारा चिन्मय मासेही चविष्ट वाटू लागतात. किल्ल्यात एकटय़ाला सोडून गेलेल्या मित्रांशी तो जळवून घेतो. त्याच्यातला हा बदल अजाणतेपणी होत नाही. त्याला आपण बदलतोय हे समजतंय. सुरक्षित, आत्मकेंद्रित आयुष्यात न रमता बाहेरच्या जगामध्ये शिरण्याचं आत्मभान त्याला येत जातं. म्हणूनच आईबरोबर साताऱ्याला बदलीच्या नव्या गावी जायला त्याची आता हरकत नाही. बदली रद्द होणार नाही का, आपण परत पुण्याला जाऊ या असं म्हणणारा चिन्मय आता पुण्याचं नाव नाही घेत. ही बदली रद्द नाही का होणार असं पुन्हा विचारतो खरा पण, आधीच्या विचारण्यात आणि आत्ताच्या विचारण्यात फरक आहे. त्याला संरक्षित कडं मोडून पडल्याची आता भीती नाही वाटत. तो साताऱ्याला जाणारच आहे पण, कोकणात थोडा काळ आणखी घालवला तर? एवढंच त्याच्या मनात येतं.
चिन्मयचं हे बदलणं त्यांचं एकटय़ाचं आहे, तो दुसऱ्याला बदलायला जात नाही. बदलणं आपापलंच आहे. आपापलं बदलणं आणि ते समजणं त्या व्यक्तिचं स्वत:चंच असणार. ते तिला स्वत:शी बोलल्याशिवाय कसं उमजणार? मग, ते शब्दबंबाळ, नेगेटिव्ह कसं असेल? हे न बोलणाऱ्या असंख्य प्रसंगातून प्रेक्षकांना समजूनच घ्यावं लागतं. व्यक्तिवादी असणं संवेदनशीलतेतून येतं, पण त्याचा नकारात्मक परिणाम आपल्याच विश्वात रमण्यात होतो. सकारात्मक परिणाम जगाकडं मनाची आणि बुद्धीची कवाडं उघडी करणारा असतो. त्यातून जबाबदार नागरी समाज उभा राहात असतो. चिन्मयवर झालेला परिणाम सकारात्मक आहे, नागरी समाजाची बिजं त्याच्यात रोवली जाताना दिसतात. हा किल्ल्यानं बांधलेला कळस आहे!
लहान मुलाच्या जडणघडणीचा प्रवास अत्यंत मोजक्या पात्रांतून, मोजक्या शब्दांत, सिनेमाभर पेरलेल्या छोटय़ा छोटय़ा दृश्यांमधून समोर येत राहतो. प्रेक्षकांना स्वत:शी बोलायला शिकवतो. जे बोलणार नाहीत त्यांना समजून सांगण्याच्या भानगडीत तो पडत नाही. सिनेमातील काही चाणाक्ष मंडळी म्हणतात, भारतीय प्रेक्षक बाल्यावस्थेतच आहेत, त्यांना बोळ्यानं दूध पाजवावं लागतं. किल्ल्यानं भारतीय प्रेक्षकांना बाल्यावस्थेतून बाहेर पडायला भाग पाडलं आहे. किल्ल्याचं हे मोठं योगदान आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कारांच्या रूपानं मिळालेली दाद यथार्थच म्हणावी लागेल.
रसिक डोळे – response.lokprabha@expressindia.com

First Published on July 17, 2015 1:14 am

Web Title: marathi movie killa 2
टॅग Cinema
Next Stories
1 पार्थच्या प्रेमात अमिताभ
2 ‘दगडू’ बॉलिवूडच्या वाटेवर…
3 भांडारकरांच्या ‘कॅलेण्डर गर्ल्स’
X
Just Now!
X