06 August 2020

News Flash

वैशिष्टय़पूर्ण लोकमान्य

लोकमान्य टिळक हे तडफदार व्यक्तिमत्त्व अनेकांनी केवळ पुस्तकांमध्येच अनुभवलं असेल; पण आता हेच व्यक्तिमत्त्व अनेक नव्या आणि वैशिष्टय़पूर्ण गोष्टींसह ‘लोकमान्य..

| December 26, 2014 01:01 am

लोकमान्य टिळक हे तडफदार व्यक्तिमत्त्व अनेकांनी केवळ पुस्तकांमध्येच अनुभवलं असेल; पण आता हेच व्यक्तिमत्त्व अनेक नव्या आणि वैशिष्टय़पूर्ण गोष्टींसह ‘लोकमान्य.. एक युगपुरुष’ या सिनेमातून रुपेरी पडद्यावर लवकरच येत आहे. नव्या गोष्टी आणि वैशिष्टय़ांसह नवोदित दिग्दर्शक ओम राऊत आणि लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे प्रेक्षकांसाठी टिळकांचं व्यक्तिमत्त्व रुपेरी पडद्यावर आणत आहेत.

‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’, ‘बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्य़ात चिखली या गावी झाला’, ‘मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही’, ‘लोकांनी एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करावी यासाठी टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती हे सार्वजनिक उत्सव सुरू केले’ अशी अनेक वाक्यं ओळखीची आहेत. अनेकांनी शाळेत असताना वक्तृत्व स्पर्धामध्ये टिळकांच्या भाषणामध्ये ही वाक्यं वापरली असतील. हीच सगळी वाक्यं आता प्रेक्षक रुपेरी पडद्यावर बघू शकतील. ओम राऊत दिग्दर्शित आगामी ‘लोकमान्य.. एक युगपुरुष’ या सिनेमामध्ये लोकमान्य टिळक हे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. नवीन वर्षांची अनोखी भेट या सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना मिळत आहे. लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे, नवोदित दिग्दर्शक ओम राऊत, वीएफएक्सचा वापर, सिनेमाची आकर्षक पहिली झलक अशा अनेक गोष्टींमुळे सिनेमाबाबत कुतूहल निर्माण झालेलं आहे.

ओम राऊतचं या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शक म्हणून इंडस्ट्रीत पदार्पण होतंय. टिळकांचा काळ दाखवण्यासाठी सिनेमात अद्ययावत पाश्चिमात्य तंत्रज्ञानही वापरलं गेलं. तो काळ रंगवताना वीएफएक्स इफेक्ट्सचा वापर केला आहे. सिनेमात टिळकांचा काळ असला तरी पाच टक्के सिनेमा हा आताच्या काळातला आहे. आजच्या काळाचा, परिस्थितीचा संदर्भ जोडण्यासाठी सिनेमात हा प्रयोग केला आहे. सात दिग्दर्शकांचा अभिनय हे सिनेमाचं आणखी एक वैशिष्टय़. ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस्’ या नाटकाचा दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर, हिंदी-इंग्लिश नाटकांचे दिग्दर्शक भरत दाभोळकर, ‘टाइमप्लीज’ या सिनेमा आणि ‘छापा काटा’ या नाटकाचा दिग्दर्शक समीर विद्वंस, ‘सौ. शशी देवधर’ या सिनेमाचे दिग्दर्शक अमोल शेटगे, ‘असा मी अशी ती’ आणि आगामी ‘बाळकडू’ या सिनेमाचे दिग्दर्शक अतुल काळे, गुजराती नाटकांचे दिग्दर्शक दीपेश शहा आणि आगामी ‘कटय़ार काळजात घुसली’ या सिनेमाचा दिग्दर्शक स्वत: सुबोध भावे अशा सात दिग्दर्शकांचा अभिनय यात बघायला मिळणार आहे. या दिग्दर्शकांना एकत्र एका सिनेमात अभिनेत्यांच्या भूमिकेत बघणं ही मेजवानी असल्याचं ओम सांगतो.

टिळकांचं जहाल व्यक्तिमत्त्व होतं. त्यांचे विचार आक्रमक असले तरी त्यामागे स्वराज्य मिळवण्यासाठीची धडपड होती.  ‘टिळकांचे विचार आजच्या तरुणांपर्यंत पोहोचावे हा सिनेमाचा मूळ हेतू आहे. स्वातंत्र्योत्तर काळात आपल्याला टिळकांसारखा सामाजिक-राजकीय नेता लाभलेला नाही. ते स्वराज्यासाठी लढले. त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य यासाठी दिलं. त्यामागचे त्यांचे विचार हे तरुणांपर्यंत पोहोचावेत असा माझा प्रयत्न आहे. त्यांनी आपल्याला ‘स्वराज्य’ मिळवून दिलंच आहे. आजच्या तरुणांनी ‘सुराज्य’साठी प्रयत्न करायला हवेत. ‘‘स्वत:बरोबर देशाच्या प्रगतीचाही विचार केला पाहिजे, असा टिळकांचा  विचार होता. असा प्रयत्न आजच्या तरुणांनी करणं गरजेचं आहे,’’ असं ओम सांगतो. दहा र्वष अमेरिकेत, न्यूयॉर्कमध्ये चित्रपटविषयक शिक्षण घेऊन एका चॅनलमध्ये लेखक-दिग्दर्शक म्हणून काम करणारा ओम सिनेमा करायचा म्हणून भारतात परतला. खरं तर परदेशात शिक्षण आणि नोकरी केलेल्या तरुणाचं स्वप्नं हॉलीवूडकडे जाणारं असतं; पण ओमला एका मराठी सिनेमाने खुणावलं. तसंच त्यासाठी त्याचा टिळकांवर सिनेमा करण्याचा विचार कौतुकास्पदच. ‘‘मी न्यूयॉर्कमध्ये एका चॅनलसाठी लेखन-दिग्दर्शन करत होतो. मराठी सिनेमाचं दिग्दर्शन करायचं ठरवलं आणि दहा वर्षांनी भारतात आलो. एका पत्रकाराचा मुलगा असल्याने टिळकांविषयी मला बाळकडू दिलं गेलंय. याआधी अनेक मोठय़ा लोकांनी टिळकांविषयी काही पुस्तकं लिहिली आहेत; पण करमणुकीच्या माध्यमातून तरुणांपर्यंत टिळकांचे विचार समजण्यास सुसह्य़ होतील असा सिनेमा करण्यामागे माझा विचार होता,’’ सिनेमासाठी टिळकांच्या निवडीबाबत ओम सांगतो.
सुबोधही टिळकांच्या जीवनाचा अभ्यास करत होता. त्याच्या अभ्यासाबाबत तो सांगतो, ‘‘या सिनेमाची खऱ्या अर्थाने सुरुवात ही ‘बालगंधर्व’पासून झाली. टिळकांनीच त्यांना ‘बालगंधर्व’ ही पदवी दिली. या सिनेमानंतर मी टिळकांविषयीची पुस्तकं वाचली. तेव्हा शाळेतल्या धडय़ाच्या बाहेरचे टिळक मी अनुभवले. अनेक नव्या गोष्टींची माहिती मिळाली. त्याच वेळी सिनेमा करण्याचे विचार मनात आले.’’  

आणि चंद्रप्रकाश मिळाला
शूट करताना अनेक अडचणी येत असतात; पण त्यावर तोडगा काढणं हे कौशल्य. दिग्दर्शक ओम आणि त्याच्या टीमलाही अशा अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. तो सांगतो, ‘‘त्या काळात वीज नव्हती. त्यामुळे शूट करताना वास्तवदर्शी चित्र रेखाटायचं होतं. त्यात रात्रीचे बाहेरचे काही सीन्स होते. ते केवळ चंद्रप्रकाशात करणं आवश्यक होतं; पण नैसर्गिक चंद्रप्रकाश असताना शूटची वेळ जमणं जरा कठीण असायचं. पण नेहमीसारखे लाइट्स वापरून ते सीन्स शूट करायचं नव्हतं; कारण ते खरं वाटणं गरजेचं होतं. म्हणून आम्ही कृत्रिम चंद्रप्रकाश तयार केला. आठ बाय आठ बाय बारा फूट लोखंडी पिंजरा तयार केला. त्यावर ८० अल्फा लाइट्स लावले. १४० फूट क्रेन आणली होती. त्या क्रेनने तो पिंजरा गरजेनुसार वर-खाली न्यायचो. अशा प्रकारे आम्हाला चंद्रप्रकाशात शूट करता आलं.’’  

‘लोकमान्य’ या सिनेमाची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होतीच; पण या सिनेमाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली तेव्हा ही उत्सुकता अधिकच वाढली. सिनेमाच्या पोस्टरवरचा सुबोधचा रागीट चेहरा, डोळ्यांमधला जहालपणा, स्वराज्य मिळवण्याचा हक्क समोऱ्याच्याला ठणकावून सांगणारी देहबोली असं सारं काही प्रेक्षकांना भुरळ पाडणारं होतं. चित्रपटाचं काम प्रेक्षकांसमोर येऊ लागलं तसतसं त्यांची उत्सुकताही वाढत गेली. सुरुवातीला टिळकांची टोपी आणि मिशी असलेलं  एक चित्र प्रसिद्ध झालं होतं. त्यामुळे प्रेक्षकांचं कुतूहल आणखी वाढलं होतं आणि अखेर सिनेमाचा पहिला प्रोमो झळकला. प्रेक्षकांच्या पसंतीसही पडला. सुबोधच्या निवडीबाबत ओम सांगतो की, ‘‘टिळकांवर सिनेमा करावा अशी सुबोधची इच्छा होती. त्याच दरम्यान माझ्याही डोक्यात या सिनेमाविषयी विचार सुरू होते. आम्ही एकत्र भेटलो आणि सिनेमा करायचं हे निश्चित केलं. सुबोधच टिळकांची भूमिका करेल याचा मात्र त्याने अजिबात विचार केला नव्हता. सुबोधने रेखाटलेले टिळक उत्तम आहेत. मुळात सुबोधचे डोळे कोमल आहेत. टिळकांच्या डोळ्यात जहालपणा होता. त्यामुळे आपल्या स्वभावाच्या विरुद्ध एखादी गोष्ट साकारणं हे आव्हानात्मक असत आणि हे आव्हान सुबोधने उत्तमरीत्या पेललंय.’’

मित्र झालो
lk43ओम आणि मी या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदा भेटलो. काही माणसांशी नातं जोडायला फार वेळ लागत नाही, असं म्हणतात. माझ्या आयुष्यात अशा माणसांपैकी ओम एक आहे. एकच विचार दोघांच्याही मनात आल्यामुळे एका कलाकृतीच्या माध्यमातून आम्ही एकमेकांना भेटलो आणि कधी एकमेकांचे चांगले मित्र झालो हे कळलंच नाही. आम्हाला एकमेकांच्या अनेक गोष्टी न सांगताच कळतात. ओमचा नेमकेपणा, स्पष्ट विचार या गोष्टी कौतुकास्पद आहेत. मी जे टिळक साकारत होतो ते केवळ त्याच्यामुळेच. केवळ दिग्दर्शक-अभिनेता हे एवढंच आमचं नातं नाही, तर ते नातं मैत्रीचं झालं आहे.
सुबोध भावे

टिळकांच्या डोळ्यांबद्दल सुबोधही सांगतो, ‘‘कुठल्याही व्यक्तिरेखेचं सौंदर्य हे त्याच्या डोळ्यांमध्ये असतं. ही भूमिका करायची म्हणून मी वाचन, व्यायाम, अभ्यास करत होतोच; पण सहा-सात महिने मी टिळकांच्या डोळ्यांचाही अभ्यास करत होतो. त्यांचे डोळे आक्रमक, भेदक, जहाल वाटले तरी त्यामध्ये देशावरचं प्रेमही दिसत होतं. जितके ते जहाल वाटतात तितकेच ते विलक्षण शांत वाटतात. टिळकांवर सिनेमा करण्याचं माझ्या डोक्यात होतं, पण त्यात मीच काम करेन असा माझा विचार नव्हता. ओमने मला या भूमिकेविषयी विचारलं. सुरुवातीला मी याबाबत साशंक होतो. मला जमेल का या भावनेपेक्षाही मी तसा दिसेन का, याचीच मला खात्री वाटत नव्हती. पण आमचे मेकअप आर्टस्टि विक्रम गायकवाड यांनी जादू केली. त्यांच्या त्या जादूनंतर मला स्वत:बद्दल विश्वास वाटू लागला. पहिला सीन झाला आणि मग मला थोडं हायसं वाटलं.’’ नाटक, सिनेमा, मालिका अशा तिन्ही क्षेत्रांत नावाजलेला अभिनेता सुबोध भावे आणि नवोदित तरुण दिग्दर्शक ओम राऊत अशी अनोखी जोडी या सिनेमाच्या निमित्ताने बघायला मिळते. साधारणत: नाव मिळवलेला अभिनेता असेल तर त्याच्या अनेक मागण्या असतात. सिनेमात काही बदलही तो सुचवत असतो. त्याला एखादी गोष्ट पटली नाही, की तो त्या करण्यास नकारही देतो; पण याला अपवाद ठरलाय तो सुबोध भावे. टिळकांवर सिनेमा काढायचा विचार मनात असतानाच सुबोधनेही त्यांच्याविषयी अभ्यास करायला सुरुवात केली होती; पण जेव्हा ओम आणि सुबोधने एकत्र या सिनेमाचं काम सुरू केलं तेव्हा मात्र सुबोधने त्याचा अभ्यास थांबवला. ‘‘ओमचं व्हिजन खूप वेगळं आहे. त्याने खूप वेगळ्या प्रकारे टिळक अनुभवले आहेत. म्हणूनच ओमला दिसलेले टिळक मी सिनेमातून साकारले आहेत. अनेक सीन करताना चटके बसत होते. टिळक गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, कवी, लेखक, पत्रकार, शिक्षक, राजनीतीमध्ये द्रष्टेपणा असलेले, लढवय्ये असं सगळंच होतं; पण या भूमिका साकारताना त्यांनी कुठेही गल्लत केली नाही हे अभिनय करताना सतत जाणवत होतं.’’

‘त्या’ व्यासपीठावर जाऊन भारावलो
lk42शनिवार वाडय़ावर ‘लोकमान्य’ची पहिली झलक दाखवली गेली. त्यासाठी भव्य-दिव्य सोहळा केला होता. तिथल्या व्यासपीठावर गेल्यावर मनात ज्या भावना आल्या त्या विलक्षण होत्या, कारण त्याच व्यासपीठावरून टिळकांनी भरपूर भाषणं केली होती. त्या काळी माइक, स्पीकर असं काहीच नव्हतं. त्या व्यासपीठावरून दिसणारा मॉब हा जवळपास अडीच ते तीन हजार इतका होता. टिळकांच्या काळातही इतकाच असेल. मी माइक वापरून तिथे माझं मनोगत व्यक्त करत होतो; पण त्याच वेळी विचार आला की, टिळक माइकशिवाय इतक्या लोकांसमोर कसे बोलत असतील. प्रत्येक माणसाला त्यांचं भाषण ऐकू यायचं. यावरून त्यांच्या आवाजाच्या क्षमतेबाबत विचार करणं हे कल्पनेपलीकडचं आहे.
ओम राऊत

नव्या गोष्टी, वैशिष्टय़, सिनेमाचा विषय, संगीत, कलाकार अशा सगळ्यामुळे या सिनेमाविषयीची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये प्रचंड वाढली आहे. टिळक या व्यक्तिमत्त्वाबाबत असलेल्या सिनेमातून ओम राऊतचं दिग्दर्शनातलं पदार्पण आणि सुबोध भावे याने साकारलेली टिळकांची भूमिका, त्या काळातलं चित्रीकरण अशी अनेक कारणं सिनेमा बघण्यासाठी प्रेक्षकांच्या मनात तयार आहेत.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2014 1:01 am

Web Title: marathi movie lokmanya
टॅग Marathi Movie
Next Stories
1 गेम थिअरी!
2 कव्हरस्टोरी : कॅण्डीक्रश का खेळतात?
3 उपक्रम : लोकांकिका – तरुणाईसाठी नाट्यपर्वणी
Just Now!
X