वृत्तपत्रछायाचित्रकार अशी ओळख असणारे संदेश भंडारे गेल्या काही वर्षांत ‘पुणेरी ब्राह्मण’, ‘तमाशा-एक रांगडी कला’, ‘वारी-एक आनंदयात्रा’, ‘असाही एक महाराष्ट्र’ या पुस्तकातून लोकांना माहीत झाले आहेत. महाश्वेतादेवी यांच्या ‘म्हादू’ या मूळ कथेवर आधारित याच नावाच्या चित्रपटाद्वारे आता चित्रपट निर्माता, पटकथा लेखक आणि दिग्दर्शक अशी त्यांची एक वेगळी ओळख निर्माण होते आहे..

मराठीत सध्या वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट तयार होत असून त्याला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. निखळ मनोरंजनाबरोबरच सामाजिक आशय असणाऱ्या चित्रपटांना राजमान्यतेबरोबरच रसिकमान्यता मिळत आहे. सामाजिक आशय असलेले चित्रपट आता महोत्सवापुरते मर्यादित न राहता प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहेत, ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी दिलासादायक बाब आहे.
चित्रपटनिर्मिती आणि संबंधित गोष्टींकडे वेगवगेळ्या क्षेत्रातील मंडळी उतरत आहेत. ‘वृत्तपत्रछायाचित्रकार’ अशी ओळख असणाऱ्या संदेश भंडारे यांनी गेल्या काही वर्षांत एक विषय निवडून छायाचित्रे आणि त्याचे पुस्तक असेही काम केले आहे. यात ‘पुणेरी ब्राह्मण’, ‘तमाशा-एक रांगडी कला’, ‘वारी-एक आनंदयात्रा’, ‘असाही एक महाराष्ट्र’ आदी पुस्तकांचा समावेश आहे. या सर्व पुस्तकांचे खूप चांगले स्वागत झाले आहे. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांच्या ‘म्हादू’ या मूळ कथेवर आधारित याच नावाच्या चित्रपटाद्वारे आता चित्रपट निर्माता, पटकथा लेखक आणि दिग्दर्शक अशी त्यांची एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे.

आदिवासींचे जीवन जवळून पाहायला मिळाले
प्रायोगिक नाटक आणि चित्रपटातून मी यापूर्वी काम केले आहे. त्यामुळे या चित्रपटात काम करणे हे माझ्यासाठी पठडीबाहेरचे नव्हते. ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ या वर्गातील संघर्ष प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा होता. या चित्रपटाच्या निमित्ताने मला आदिवासींचे जीवन जवळून पाहता आणि प्रत्यक्ष अनुभवता आले. माझ्यातील कलाकारासाठी तो अनुभव खूप महत्त्वाचा होता. या चित्रपटात मी ‘डॉक्टर’ची भूमिका करतोय. 
– सारंग साठे (अभिनेता)

वृत्तपत्रछायाचित्रकार म्हणून काही वर्षे नोकरी केल्यानंतर भंडारे यांनी काही काळ ‘मुक्त छायाचित्रकार’ म्हणूनही काम केले. आता छायाचित्रकार म्हणून अल्पविराम घेऊन ते सध्या ‘म्हादू’ या चित्रपटाच्या निर्मितीत व्यग्र आहेत.
छायाचित्रकारितेतून चित्रपटनिर्मिती, पटकथा लेखन आणि दिग्दर्शनाच्या प्रवासाविषयी ‘लोकप्रभा’शी बोलताना संदेश म्हणाले गेली २५ ते ३० वर्षे मी छायाचित्रण क्षेत्रात आहे. काहीतरी वेगळे करावे, असे मनात होते. २०१० मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापनेला पन्नास वर्षे पूर्ण झाली. त्या वेळी सर्वसामान्य माणसाचे जीवन कसे आहे याचा शोध घेणारे आणि पन्नास वर्षांतील महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक परंपरेचा शोध घेणारे माझे ‘असाही एक महाराष्ट्र’ हे शब्दछायाचित्रांचे पुस्तक ‘ग्रंथाली’ने प्रकाशित केले होते. यात मी ‘नाही रे’ वर्गाचे लोक ‘आहे रे’ वर्गाकडे जेव्हा पाहतात तेव्हा मोठा उद्रेक होतो, असे वाक्य लिहिले होते आणि तेथेच या चित्रपट निर्मितीची बीजे रोवली गेली.
या विषयावर काहीतरी करावे, असा विचार मनात सुरू झाला. या दरम्यान आदिवासी भागात काम करणारे डॉ. गणेश देवी यांची भेट झाली. महाश्वेतादेवी यांनी मिथकाच्या स्वरूपात अशाच प्रकारची एक कथा लिहिली आहे. भूक विरुद्ध हव्यास असा तिचा मूळ गाभा असून कुपोषित आदिवासींचे जीवन आणि ‘आहे रे’ व ‘नाही रे’ वर्गाचा संघर्ष त्यात असल्याचे त्यांनी सांगून महाश्वेतादेवी यांची भेट घेण्यास सुचविले. महाश्वेतादेवी यांना भेटायला जाताना त्यांच्या कथेवर चित्रपट करायला त्या परवानगी देतील का, मानधन किती घेतील, अशा अनेक प्रश्नांची मनात धाकधूक होती. मी त्यांना भेटायला जाताना ‘तमाशा-एक रांगडी गंमत’, ‘असाही एक महाराष्ट्र’ही माझी पुस्तके घेऊन गेलो होतो. ती पुस्तके त्यांनी पाहिली आणि माझे ते काम पाहून त्या खूश झाल्या. तुम्ही जे काही कराल ते चांगलेच कराल, असा माझ्यावर विश्वास टाकून त्यांनी मानधनासाठीही कोणती अडवणूक न करता तुम्ही द्याल ते माझे मानधन, असा मनाचा मोठेपणा दाखविल्याचेही भंडारे यांनी गप्पांच्या ओघात सांगितले.
परवानगी तर मिळाली पण चित्रपट तयार करण्यासाठी पैसे उभे करण्याचे मोठे आव्हान समोर होते. मित्रांकडून पैसे गोळा केले. आरती किर्लोस्कर यांनीही पाच लाख रुपयांची देणगी या चित्रपटासाठी देऊन कामाला सुरुवात कर, म्हणून आश्वासक पाठिंबा दिला. पुढे परिमल चौधरी यांच्याकडे देणगी मागण्यासाठी गेलो. काय मदत करू असे त्यांनी विचारले. चित्रपटाच्या निर्मात्या म्हणून यात सहभागी होण्यास त्या तयार झाल्या आणि मोठा आर्थिक भार त्यांनी उचलला. चित्रपटातील पात्रे वास्तव वाटावी म्हणून भूमिकांसाठी कलाकार म्हणून ‘ओळख’ असलेले चेहरे मुद्दामहून घेतले नाहीत, अशी माहितीही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.
चित्रपटाचे खास वैशिष्टय़ सांगताना ते म्हणाले, चित्रपटात प्रेक्षकांना ‘थ्री डी’ इफेक्ट पाहायला मिळतील. चित्रपट अन्य भाषकांपर्यंत पोहाचावा म्हणून इंग्रजी सबटायटल्सही देण्यात आली आहेत. येत्या ६ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘म्हादू’ची ही कथा आदिवासी विरुद्ध शहरवासी अशी नसून ती भूक आणि हव्यास अशी आहे. आपल्या हव्यासापोटी आपण गरीब आणि शोषितांच्या भुकेचा सौदा करत आहोत आणि त्याची आपल्याला जाणीवही नाहीये, ही खंत आहे. ‘म्हादू’ची भूक ही फक्त पोटाचीच नसून आर्थिक, शिक्षण आणि एक नागरिक म्हणून शासनाकडून मिळणाऱ्या त्याच्या अधिकाराचीही आहे. अशा ‘नाही रे’ वर्गातील लोक जेव्हा ‘आहे रे’ यांच्याकडे पाहतात तेव्हा कसा उद्रेक होतो, ते या चित्रपटात आम्ही प्रामुख्याने मांडले असल्याचेही त्यांनी सांगितले.