मराठी सिनेमाचे वेगळे वळण मुक्काम पोस्ट धानोरी

अमेरिकेत जाऊन आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या दोन मराठी तरुणांनी इथे परत येऊन एक मराठी सिनेमा बनवणं ही अगदी जगावेगळी गोष्ट!

अमेरिकेत जाऊन आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या दोन मराठी तरुणांनी इथे परत येऊन एक मराठी सिनेमा बनवणं ही अगदी जगावेगळी गोष्ट! महेश राजमाने आणि सुदर्शन वराळे यांनी ‘मुक्काम पोस्ट धानोरी’च्या माध्यमातून ती करून दाखवली आहे.

सिनेमा हा व्यवसाय असला तरी कला आणि कारागिरी यांच्या संयोगातून चांगली कलाकृती निर्माण केली जाते. विज्ञानाधिष्ठित तंत्र माध्यम असल्यामुळे फक्त सिनेमा माध्यमातील कलात्मक बाजूच नव्हे तर त्याचबरोबरीने मुख्यत्वे तांत्रिक अंगांवर असलेली हुकमत उत्तम सिनेमा बनविण्यासाठी अतिशय अपरिहार्य ठरते. नेमके हेच ओळखून महेश राजमाने-सुदर्शन वराळे या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दोन तरुणांनी येऊन सिनेमा हे आपले ‘पॅशन’ प्रत्यक्षात आणण्याचे ठरविले. ठरीव पठडीत एकच एक गोष्ट करण्यापेक्षा चाकोरीबाहेर जाण्याचा प्रयत्न विविध क्षेत्रांतील मराठी तरुण मंडळी अलीकडे मोठय़ा प्रमाणावर करीत आहेत, असे प्रकर्षांने सर्वानाच जाणवते आहे. अशाच चाकोरीबाहेरचा विचार करून महेश राजमाने-सुदर्शन वराळे यांनी ‘मुक्काम पोस्ट धानोरी’ हा त्यांचा पहिला चित्रपट बनविला आहे.
‘मुक्काम पोस्ट धानोरी’ या शीर्षकावरून हा मराठी चित्रपट असल्यामुळे विनोदी असावा असा समज होण्याचा संभव आहे; परंतु हा हॉलीवूड स्टाइलने बनविलेला शुद्ध अ‍ॅक्शन-थ्रिलरपट आहे, असे महेश राजमाने यांनी सांगितले. पूजा, रघू आणि समीर हे तिघे कॉलेजमधील मित्र-मैत्रिणी एक पुरातत्त्व खजिना शोधण्याच्या निमित्ताने धानोरी नावाच्या गावी जातात आणि तिथे कोणकोणत्या घडामोडी घडतात, खजिना त्यांना मिळतो का, घडत जाणाऱ्या अनेक घटनांमुळे तिघांच्या मैत्रीवर विपरीत परिणाम होतो का अशी साधारण गोष्ट आहे. एक तरुणी आणि दोन तरुण असे मित्र असल्यामुळे साहजिकच पठडीबद्ध मराठी-हिंदी चित्रपटांप्रमाणे यात प्रेमत्रिकोणाचा मसाला असेल असा समजही होण्याचा संभव आहे. याबाबत विचारले असता महेश राजमाने म्हणाले की, सिनेमाच्या सरधोपट गोष्टींविषयीच्या चाकोरीबद्ध कल्पना आम्ही वापरलेल्या नाहीत. खरे तर आम्ही दोघांनीही प्रेक्षकाच्या भूमिकेतून आपल्याला काय पाहायला आवडते, हॉलीवूडपटांची मोहिनी आपल्याला का पडते, या प्रश्नांची उत्तरे स्वत:कडूनच घेतली आणि त्यानुसार आमचा पहिला चित्रपट बनविला आहे. कथा-पटकथेचा विचार आणि आखणी व त्यानुसार लिखाण या सगळ्या प्रक्रियेला जवळपास चार-पाच वर्षांचा कालावधी लागला, असेही राजमाने यांनी नमूद केले.
पूजा ही पुरातत्त्वशास्त्राची विद्यार्थिनी आपल्या दोन मित्रांसमवेत धानोरी या गावी खजिन्याच्या शोधार्थ पोहोचते आणि तिथे एकामागून एक धक्कादायक, आव्हानात्मक गोष्टी घडतात. पहिलाच चित्रपट असूनही एकदम नवीन कलावंत मंडळी घेण्याची जोखीम पत्करलीत, असे विचारताच महेश राजमाने यांनी यामागचे कारण स्पष्ट केले. ते म्हणाले की, पूजा ही मुख्य व्यक्तिरेखा सर्वसामान्य मराठी तरुणींसारखी दिसणाऱ्या कॉलेज तरुणीची आहे; परंतु त्यासाठी प्रतिमेत अडकलेल्या अभिनेत्री घेण्यापेक्षा पूर्णपणे नवा चेहरा आम्ही घेतला. नियती घाटे या नवोदित अभिनेत्रीने ही मुख्य भूमिका साकारली असून ती तायक्वांडो शिकलेली आहे हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असल्याने पूजा घाटे हिची निवड केली, कारण चित्रपटात भरपूर हाणामारीची दृश्ये पूजा या प्रमुख व्यक्तिरेखेला करावी लागतात.
स्पेशल इफेक्ट्स मोठय़ा प्रमाणावर केल्यामुळे चित्रपटाचे बजेट वाढले का, या प्रश्नावर राजमाने म्हणाले की, साधारण ६० लाख रुपये निर्मितीचा खर्च झाला आहे. स्पेशल इफेक्ट्समुळे चित्रपट महागडा ठरतो. म्हणून आम्ही स्पेशल इफेक्ट्स शिकलेल्या परंतु काही नवे आव्हानात्मक करण्याची इच्छा असलेल्या कॉलेज तरुणांना एकत्र करून त्यांच्या मदतीने स्पेशल इफेक्ट्स केले आहेत. त्यामुळे तुलनेने खर्च आटोक्यात राहिला आहे.
प्रकाश धोत्रे या चित्रपटात दुहेरी भूमिका साकारत असून योगेश शिंदे (रघू) आणि स्वराज कदम (समीर) यांनी पूजाच्या मित्रांच्या व्यक्तिरेखा रंगविल्या आहेत. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्टय़ सांगताना ते म्हणाले की, संत एकनाथांचे भारूड आणि रॅप असे एकत्र करून त्याचे धमाल गाणे केले असून ते आजच्या पिढीला नक्कीच आवडेल.
फेसबुक पेजवरील ट्रेलरला जवळपास २५ हजार हिट्स मिळाले असून तरुणाईकडून चित्रपटाला नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा निर्माता-दिग्दर्शक-पटकथा लेखक अशी तिहेरी जबाबदारी सांभाळणारे महेश राजमाने आणि सुदर्शन वराळे यांना आहे. प्रकाश धोत्रे आणि प्रिया गमरे या दोनच कलावंतांनी यापूर्वी चित्रपटांतून काम केले आहे. प्रिया गमरे यांच्यावर चित्रित झालेली लावणी लोकप्रिय ठरेल, असा विश्वास महेश राजमाने यांनी व्यक्त केला.
हॉलीवूडपटांमधील एखादा थ्रिलर-अ‍ॅक्शन चित्रपट पाहण्याचा अनुभव ‘मुक्काम पोस्ट धानोरी’ हा चित्रपट मराठी तसेच अमराठी प्रेक्षकांना नक्की मिळणार असून
२७ जून रोजी चित्रपट सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे, अशी माहिती महेश राजमाने यांनी दिली.
मराठी चित्रपटांना ‘श्वास’ने सुवर्णकमळ मिळवून नवसंजीवनी दिली. मराठी चित्रपटाला आता चांगले दिवस आले आहेत हे वाक्य चावून चोथा झाले आहे. राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये गेली २-३ वर्षे मराठी चित्रपट सातत्याने बाजी मारत आहेत; परंतु आता आणखी नवे वळण आगामी काळात मराठी सिनेमा घेण्याची शक्यता दाट आहे. श्रीहरी साठे दिग्दर्शित ‘एक हजाराची नोट’ या चित्रपटाने हे सिद्ध झाले आहे. आता ‘मुक्काम पोस्ट धानोरी’ हा चित्रपट या नव्या वळणावरचा असेल असे म्हणण्याला जागा आहे, कारण मराठी चित्रपट हॉलीवूड स्टाइलने बनविण्याचे धाडस माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील महेश राजमाने आणि सुदर्शन वैराळे या नव्या दमाच्या दुकलीने केले आहे.
चित्रपटाच्या निर्मितीबरोबरच कथा-पटकथा-दिग्दर्शन अशी तिहेरी जबाबदारी पेलून निखळ अ‍ॅक्शन-थ्रिलर त्यांनी बनविला आहे. स्पेशल इफेक्ट्स मोठय़ा प्रमाणावर यात असून मध्यवर्ती व्यक्तिरेखा एका तरुणीची आहे हेही मराठी चित्रपटाचे वैशिष्टय़ म्हणावे लागेल. कौटुंबिक, विनोदी किंवा सामाजिक आशय-विषयाच्या चित्रपटांचा मराठीत सुकाळ असल्यामुळे अतिशय निराळ्या विषयाला हात घालण्याचा प्रयत्न दिग्दर्शक द्वयीने करावा हे मराठीतील दुसरे ‘नवे वळण’ ठरावे.
म्हणूनच चित्रपटाच्या फेसबुक पेजला आणि त्यावरील ट्रेलरला मोठय़ा संख्येने हिट्स मिळाल्या असाव्यात, कारण मराठीत अभिनेत्री अ‍ॅक्शन दृश्ये करताना फारशी दाखवली जात नाही. यात प्रमुख अभिनेत्री नियती घाटे हिचे अनेक अ‍ॅक्शन सीन्स ट्रेलरमध्ये दाखविले आहेत.
महेश राजमाने सांगलीतील कवठे पिरात या गावचे असून सुदर्शन वैराळे कोल्हापूरचे आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अमेरिकेत कार्यरत असूनही चित्रपट बनविण्याच्या ध्येयासाठी त्यांनी अमेरिका सोडून पुन्हा मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आणि मायभाषेतील हॉलीवूड स्टाइलचा अ‍ॅक्शन थ्रिलर बनविण्याचा ध्यास घेतला ही बाबच ‘नवे वळण’ आगामी काळात मराठी चित्रपटांमध्ये येऊ शकते असा विश्वास देणारी आहे.

प्रिया गमरे या अभिनेत्रीवर चित्रित झालेली अस्सल बैठकीची लावणी हेही या चित्रपटाचे वैशिष्टय़ ठरणार आहे, असे महेश राजमाने यांनी सांगितले. युगंधर देशमुख हे संगीतकार असून यावत गावाजवळील चौफुला येथे जाऊन निर्माते-दिग्दर्शक-संगीतकार-गीतकार यांनी जवळपास ८-९ बैठकींमधल्या लावण्या ज्येष्ठ लावणी गायिकेकडून ऐकल्या. नंतर त्यांनी काही बैठकांच्या लावणीवर आधारित गाणे तयार केले असून हे गाणे बेला शेंडे यांनी गायले आहे.
भुताखेताच्या गोष्टींचा आधार चित्रपटाच्या कथानकाला असून याबद्दल छेडले असता राजमाने म्हणाले की, ‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’मध्येही फॅण्टसीचा मोठा आधार घेतला आहे. तसाच तो आम्ही आमच्या या चित्रपटात भुताच्या गोष्टींचा आधार घेतला आहे, परंतु त्याद्वारे अंधश्रद्धा पसरणार नाही याची काळजी आम्ही घेतली आहे, असेही त्यांनी नमूद केले. अमराठी प्रेक्षकांसाठी इंग्रजी उपशीर्षकांसह चित्रपट प्रदर्शित केला जाणार असून कॉलेजच्या तीन मित्र-मैत्रिणींची गोष्ट असे स्वरूप ठेवल्यामुळे आजच्या कॉलेज तरुणाईला तसेच शहरी व ग्रामीण प्रेक्षकांनाही चित्रपट ‘अपील’ होईल असा प्रयत्न करण्यात आला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Marathi movie mukkam post dhanori