lp76शाळकरी मुलांना घेऊन अनेक मराठी चित्रपट आले आणि गाजलेही आहेत. प्रेक्षकांनी आणि सिनेमा क्षेत्रातील लोकांनीही या सिनेमांचे भरभरून कौतुक केले आहे. पार्थ भालेराव या बालकलाकाराला अमिताभ बच्चनसमवेत केलेल्या ‘भूतनाथ रिटर्न्‍स’साठी राष्ट्रीय पारितोषिक मिळाले. त्यामुळे बालकलाकार हे आजच्या मराठी तसेच हिंदी सिनेमांमधील महत्त्वाचे कलावंत बनले आहेत. यापूर्वीही ‘धग’ चित्रपटातील भूमिकेसाठी बालकलाकाराचा गौरव झाला होता. ‘शाळा’, ‘फँड्री’, ‘एलिझाबेथ एकादशी’ यांसारख्या चित्रपटांतून बालकलाकारांनी बाजी मारली होती. आता २९ मे रोजी ‘सिद्धान्त’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित होत असून यातही वक्रतुंड ही शाळकरी वयातील प्रमुख व्यक्तिरेखा आहे. अर्चित देवधर या बालकलाकाराने ही भूमिका साकारली असून आगामी ‘किल्ला’ या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गाजलेल्या चित्रपटातूनही अर्चित देवधर प्रेक्षकांसमोर येणार आहे. 

‘सिद्धान्त’ या चित्रपटाद्वारे कार्यकारी निर्माता-सहनिर्माता विवेक वाघ दिग्दर्शनात पदार्पण करीत आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरवरून गणित-भूमितीमधील सिद्धान्तांशी या चित्रपटाचा संबंध काय हे सांगताना विवेक वाघ म्हणाले की, आयुष्यात अनेकदा जगण्यात येणाऱ्या समस्या वाढल्या, अपयश आले की आपण म्हणतो गणित चुकलेय. गणितातील प्रश्न, सिद्धान्त बरोबरच आला पाहिजे त्यासाठी आवश्यक त्या पायऱ्या पूर्ण केल्या की सिद्धान्त नीटपणे मांडता येतो असे गणिताचे शिक्षक शाळेत शिकवितात. त्यावेळी हे सिद्धान्त सिद्ध केव्हाच झालेले आहेत हे मात्र शिक्षक सांगत नाहीत, असे आपल्याला आढळून येईल. या सिनेमात गणिताची गोडी नसलेला गणितज्ज्ञाचा नातू प्रमुख भूमिकेत आहे. गणितात तो नापास होतो. त्याचे आणि आजोबांचे नाते हा विषय चित्रपटातून मांडण्यात आला आहे. नात्यांची चुकलेली गणितेही सिनेमात मांडली आहेत. आजोबांच्या भूमिकेत विक्रम गोखले आहेत तर नातवाच्या भूमिकेत अर्चित देवधर आहे. सारंग साठय़े यांनी वक्रतुंडच्या मोठय़ा भावाची भूमिका केली आहे तर आजीच्या भूमिकेत स्वाती चिटणीस आहेत.
गणित या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित करण्याचाही चित्रपटकर्त्यांचा प्रयत्न या चित्रपटातून दिसणार आहे. संपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण रेवदंडा परिसरात करण्यात अले असून दिवेआगार येथेही काही चित्रीकरण करण्यात आले आहे. गणितासारखा बहुतांश विद्यार्थ्यांना कठीण वाटणारा विषय सोपा करून सांगण्याचा प्रयत्नही हा चित्रपट करू शकेल असे दिसते.
गणित-भूमितीतील प्रमेय-सिद्धान्त म्हणजे एखाद्या समस्येचा विश्लेषणात्मक विचार करून एकेक पायरी ओलांडत समस्या सोडवायचा हा विचार त्यात असतो, असे सांगून विवेक वाघ म्हणाले की आयुष्यातल्या समस्याही याच पद्धतीने एकेक पायरी पार करत सोडवायच्या असतात हे गणित विषयातून आपल्याला शिकायला मिळते. समस्येचे विश्लेषण करून त्याचे निराकरण करण्याची सवय त्यामुळे लागू शकते. या चित्रपटात आम्ही समुद्रकिनारी गणिताची एक प्रयोगशाळा उभारली आहे. सेट म्हणून उभारलेली ही प्रयोगशाळा चित्रपट प्रदर्शित झाला की आम्ही एका शाळेला चालवायला देणार आहोत.
ट्रेलरवरून ‘सिद्धान्त’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेतील बालकलाकाराची धमाल अनुभवायला मिळणार असेही दिसते. इथे पुन्हा एकदा मुलांच्या नजरेतून, त्यांच्या भावविश्वाद्वारे एखाद्या गहन-मोठय़ा विषयाचा वेध घेण्याचा प्रयत्न केलेलाही पाहायला मिळू शकतो.
या सिनेमाचे पटकथा-संवाद लेखन शेखर ढवळीकर यांनी केले असून किशोर कदम, नेहा महाजन, गणेश यादव, माधवी सोमण, चंद्रशेखर कुलकर्णी, सूरज सातव, प्रशांत तपस्वी, कांचन जाधव, बाबा आफळे आदी कलावंतांच्या भूमिका आहेत. संकलनाची जबाबदारी मयूर हरदास यांनी सांभाळली असून, संगीतकार शैलेंद्र बर्वे यांचे संगीत लाभले आहे.
सुनील नांदगावकर