News Flash

कविता : पाऊस

ढगांचा मृदंग नाही विजेची टाळी नाही बेडकाचा आर्जव नाही

| July 25, 2014 01:10 am

कविता : पाऊस

ढगांचा मृदंग नाही
विजेची टाळी नाही
बेडकाचा आर्जव नाही
ना खळाळते झरे.
दवांचे मोती नाहीत हल्ली
ओल्या पानांवर..
पहुडलेले..
हसरी फुलं, देहभान विसरून
नाहीच पहात आता माना वर करून
धरतीच्या कुशीतून अलवारपणे..
वृक्ष-वेलीचे झोपाळे झुलतच नाहीत
पक्षी तरी कुठे, कसे घेणार झोके..?
हिरव्यागार सृष्टीचं स्वप्न वस्त्र
सदोदित ठिगळ लावलेलं इथे-तिथे,
कसा फुलणार वसंत तरी..?
नाहीच गाणार मल्हार पण..!
सगळेच कसे सुस्तावलेले
गरज नसल्यासारखे..
आलास तर ये..
नाही तर नको येऊ ..
(सरकारी खजिन्यातला पैसा
पुन्हा दुष्काळावर मात..
अन् फाटक्या झोळीत
टाकलेली भीक.. किती पुरणार?)
नको रे नको..!
नाही म्हटलं तरी असतेच गरज.
पोटाच्या मागे लागलेल्यांना
तुझ्या विनवण्या करायला
नसते सवड..!
तेव्हा ये बाबा.
नको रुष्ट होऊ इतका.
विनिता लक्ष्मण पाटील (कुलकर्णी)

असेही दिवस होते…

असेही दिवस होते
काव्य जेव्हा स्फुरत होते
मनामध्ये स्वप्ने होती
ओठांवरती गीत होते

स्पर्धेचे हे जग नव्हते
निराशेची ओळख नव्हती
जगण्याची एक मस्ती होती
मित्रांशी एक नाते होते

सकाळ तेव्हा भेटत होती
संध्या जीवास सुखवत होती
संगीताची मेहफील होती
वाचनाचे वेड होते

आता फक्त पळायचे
सुखामागे धावयाचे
कसले काव्य, गीतही कसले
‘स्टेटस’साठी झुरायचे.
रवींद्र शेणोलीकर

बिनशब्दांची कविता

बिनशब्दांची कविता माझी
सुरांशिवायच गाणी
जऊळ माथ्यावर येऊनही
बरसत नाही पाणी

धुमसून ज्वालामुखी कोंडला
लाव्हा तरी ना वाही
लाल निखाऱ्यांच्यावर घुमटी
अग्निशिखांची लाही

उधाणली जरी किती भावना
ओलांडत नाही वेस
आठवलीस की बाहेर पडतो
फक्त एक उच्छ्वास

आवडले का गाणे असले
सूर ज्यात ना शब्द
तुझा उसासा सांगून जाईल
नको वेगळी दाद
प्रसाद निकते

सत्य

स्वप्न आणि वास्तवाच्या सीमारेषेवर
तळ्यात-मळ्यात चालू आहे
दोलायमान अवस्थासुद्धा
वास्तवाचा काठ धरू पाहे

भूत आणि भविष्याची भयाण पोकळी
वर्तमानाचा करते घात
आठवत राहतात पुन्हा-पुन्हा
हाती धरले.. सुटले हात

अंधारलाटा पुन्हा-पुन्हा
गिळतात स्वप्ने, सुटते भान
गोल-गोल रिंगणात फिरता-फिरता
आयुष्याची होते धूळधाण

आभासांवर जगता-जगता
चालू राहतो नुसता श्वास
रित्या मनातील रितीचे स्वप्ने
उरते अंतिम सत्य भकास
अशोक कुळकर्णी

मंतरलेली वाट

ऐल तटावर वाट वाकडी
आठवणीतील एक झोपडी
पैल तटावर एक दिवाणे
खुलते रात्री मंजूळ गाणे.

चांदण्यातुनी लकेर उठते
खुळे पाखरू उगा बावरते
दव भिजलेल्या रातीला त्या
पहाट धुक्याचे स्वप्न वेढते

मंतरलेली वाट वाकडी
रविकिरणांनी जागी होते
खुळ्या कळीच्या उरात तेंव्हा
स्वप्न रातीचे उगी मोहरते.
चंद्रशेखर सप्रे, गडहिंग्लज.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2014 1:10 am

Web Title: marathi poem 4
टॅग : Marathi Poem,Poem
Next Stories
1 साठवण : असे होते गदिमा!
2 चित्रपट : ‘अयोध्येचा राजा ते ‘टाइमपास’
3 मी, ती आणि मामा