lp48भरजरी साडय़ा नेसून, भरगच्च दागिने घालून, भपकेबाज मेकअप करून झोपणाऱ्या, जेवणाऱ्या, रडणाऱ्या टीव्हीवरच्या मालिकांमधल्या स्त्रिया, त्यांची ती आलिशान घरं, डिझायनर फर्निचर यांनी आपले डोळे विस्फारले जातात. त्यातच टीआरपीच्या नावाखाली कथानक पुढे नेण्यासाठी केलेला येडपटपणा तर विचारूच नका..

नेहमीच्या वेळेत मालिका सुरू झाली. नायिका नायकाचं घर सोडून तिच्या घरी आली आहे. पण, ती गरोदर आहे. त्यामुळे साहजिकच तिची आई गरोदर स्त्रीची सगळी हौसमौज पुरी करतेय. त्यात आलं डोहाळेजेवण. तिची आई हा सोहळा करायचं ठरवते. त्यामुळे मालिकेचा अर्धा एपिसोड यात जात असतो. तितक्यात तिथे नायिकेचे मानलेले बाबा हजर होतात. मग त्या नायक आणि नायिकेत गैरसमज झाले आहेत, नायकाने कायमचं अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतलाय, त्याला थांबव वगैरे सल्ले सुरू असतात. नायिकेवर या सगळ्याचा परिणामही होतो बरं. आता पुढे सगळा आनंदी आनंदच होणार असं वाटू लागतं. पुढे त्याप्रमाणे गोष्टी घडतातही; पण.. पण, या सगळ्या सीनमध्ये एक गडबड झालेली दिसते. ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ या मालिकेच्या दोन आठवडय़ांपूर्वीच्या एका एपिसोडमध्ये अशीच एक गंमत झाली. हा वरचा सीन सुरू असताना एक गोष्ट वारंवार दृष्टीस पडली. ती म्हणजे ईश्वरीच्या बाबांच्या मागचं कॅलेंडर..! आता तुम्ही म्हणाल याचा काय संबंध. तर संबंध आहे. मालिका आजच्या काळातली आहे. साधारणपणे सणांचं त्या-त्या वेळीचं सेलिब्रेशनही मालिकेत दाखवलं जातं. त्यामुळे कॅलेंडर हे नोव्हेंबर महिन्याचं असायला हवं. ते नोव्हेंबर महिन्याचंच आहे; पण पुढे आणखी एक गंमत. ते २०१४ च्या नोव्हेंबर महिन्याचं नाही. या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्याची १ तारीख शनिवारी होती. एपिसोडमध्ये दाखवलेला नोव्हेंबर महिना हा रविवारपासून सुरु होतो. तसंच एपिसोडमधल्या कॅलेंडरमध्ये नोव्हेंबर महिन्याच्या बाजूला असलेला वर्षांचा आकडा आणि त्यावरचा मोठा भागही गायब आहे. त्याजागी पॅच लावलेला स्पष्टपणे दिसत आहे. ते कॅलेंडर एपिसोडमध्ये त्या सीनमध्ये किमान चार ते पाच वेळा दिसतंय. त्यामुळे ही गडबड स्पष्टपणे दिसून आली. lp52अशा चुका न पटणाऱ्या, खटकणाऱ्या गोष्टी असंख्य असतात. भन्नाट काही तरी दाखवण्याच्या धुंदीत अशा बारीक पण महत्त्वाच्या गोष्टी मालिकेत नजरेआड केल्या जातात; पण चाणाक्ष प्रेक्षकांच्या नजरेतून मात्र ते कधीच सुटत नाही.

मालिका म्हणजे अनेकांच्या रुटीनचा एक भागच झाला आहे. ‘‘आज जान्हवी श्रीला आय लव्ह यू म्हणणार आहे’’, ‘‘तिकडे ‘रुंजी’चाही आज महत्त्वाचा एपिसोड आहे’’, ‘‘‘दिया और बाती हम’ मी चुकवत नाही अजिबात’’ अशी चर्चा सकाळी ऑफिसला जाताना ट्रेन, बसमध्ये होत असते; पण या चर्चेचं स्वरूप आता काहीसं वेगळं झालं आहे. मालिकेत हे असं होणार आहे, तसं होणार आहे याहीपलीकडे ही चर्चा पोहोचली आहे. अमुक मालिकेत हे पटलं नाही, असं कधी होतं का, कोणतीही मुलगी असं करणार नाहीच हा, अशा चर्चानी आता जागा घेतली आहे. प्रेक्षक आता सरावलाय या मालिकांच्या जाळ्याला. त्यामुळे नायिकेच्या डिझायनर साडीसोबतच मालिकेत काही गडबड तर होत नाहीये ना याकडेही बारीक लक्ष ठेवून असतो. अशाच काही खटकणाऱ्या, न पटणाऱ्या गोष्टींचा सध्या मालिकेत भरणा सुरू आहे. ‘समाजात घडतं तेच दाखवतो’ असा दावा करणाऱ्या मालिकेमध्ये अनेक अतार्किक गोष्टी दाखवल्या जातायत.

या सगळ्यात पहिला नंबर लागतो तो ‘का रे दुरावा’ या मालिकेचा. मालिका सुरू झाली तेव्हा तिचं फार कौतुक झालं, अजूनही होतं; पण ते कलाकारांच्या अभिनयाचं, दिग्दर्शनाचं, संवादांचं. कथा वेगळी आणि गुंतागुंतीची असल्यामुळे पटकथेला वाव आहेच; पण वाव आहे म्हणून वाहवत गेलात की हशा होतोच. यात अदिती एमबीए झालेली दाखवली आहे. एमबीए झालेली मुलगी इतकी बुजरी, भोळसट कशी, हा पहिला प्रश्न. दुसरं lp49असं, मुंबईत फक्त एकच ऑफिस आहे का जिथे त्या दोघांना नोकरी करावी लागतेय. गरज असते ही सबब पुढे सरकूनही हे पटणारं नाही. चला, हे असं दाखवलं नाही, तर मालिका पुढे सरकणार कशी, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर असेल म्हणून त्यांना या एका गोष्टीबद्दल माफ करू या. पुढे आणखी एक गंमत. ऑफिसातल्या शिपायांना किती महत्त्व द्यावं हे विचार करण्यासारखं आहे. अदिती तिच्या बॉसला घाबरत नाही तितकी ती त्या तांगडेला घाबरते. फक्त तीच नाही, तर तिचा नवरा जयही त्याला घाबरतो. या शिपायामुळे सगळ्या ऑफिसेसमधल्या समस्त शिपाई वर्गाचा ऊर अभिमानाने भरून आला असेल. तांगडेला बघून त्यांनीही गुप्तहेरगिरी करण्याचा साइड बिझनेस केला नाही म्हणजे मिळवलं. त्याला सडेतोड उत्तर द्यायला आता या प्रेमी जोडप्याला कोणाची परवानगी लागणार की काय, असा प्रश्न प्रेक्षकांना भेडसावत आहे. त्यातच तिच्या वहिनीच्या नाटकांना ती कशी फसते हे तिचं तिलाच ठाऊक. हे जोडपं राहतं वांद्रय़ाला. त्यांची वहिनी शोभा राहते विरारला. ही वहिनी अदितीला फोन करून तिला बरं नसल्याचं सांगते आणि कामं करायला तिकडे बोलावून घेते. या अति भोळ्या मॅडम तिचा आणि जयचा डबा करून वांद्रय़ाहून विरारला जाणारी पहिली ट्रेन पकडून जातात. तिथली सगळी कामं करून मग ऑफिसला येतात. ही अशी सर्कस आजची कोणती मुलगी करेल?

‘होणार सून मी ह्य़ा घरची’मध्ये तर नुसता सावळा गोंधळ. जान्हवीचा अपघात, मग तिचा स्मृतिभ्रंश, तिच्यापासून हे लपवणं वगैरे वगैरे सगळा खेळ संपला एकदाचा; पण आता तिला सगळं समजलंय, लग्न झाल्याचंही आणि पुन्हा नव्याने श्रीच्या प्रेमात पडल्याचंही. या नव्याने पडलेल्या प्रेमाची कबुली द्यायलाही तिला मुहूर्त सापडत नव्हता; पण असो. एकदाचं घोडं गंगेत न्हालं. शेवटी बोलली ती ‘आय लव्ह यू’. आता मिशन एकत्र राहणं. आता त्यांना एकत्र राहायचं असेल आईआजी, ही आई, ती आई अशा सगळ्यांना सांगावं लागणार म्हणे. कशासाठी? देवाब्राह्मणांच्या साक्षीने लग्न झालंय. नवरा-बायको आहात. एकत्र राहणार नाही तर काय? त्यासाठी हे चर्चासत्र कशाला? मालिका लांबवण्यासाठी केलेले हे सगळे प्रयत्न. मुळात जान्हवीची अशी अर्धवट स्मृती जाणंच अनेकांना पटलं नाही. ‘‘असं कसं तिला तिचं लग्न तेवढं आठवत नाही. बाकी सगळं बरं आठवतं’’ अशा प्रतिक्रिया उमटत होत्या.

हिंदी मालिकांचं अनुकरण हा मराठी मालिकांचा जन्मसिद्ध हक्क. तरी तुलनेने याचं प्रमाण आता काहीसं कमी झालं. ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ ही त्यापैकीच एक मालिका. हिंदीतल्या ‘उतरन’ या मालिकेच्या संकल्पनेवर आधारित ही मालिका. सुरुवातीचे काही एपिसोड्स मालिका रुळावर होती; पण त्यात जसजसा प्रेमाचा त्रिकोण, द्वेष या सगळ्यांनी जागा घेतली तसं मालिका रुळावरून घसरली. ईश्वरी, अंकिता, त्यांचं प्रेम, लग्न याभोवती मालिका गुंतत गेली. आधी अंकिताचं एकाशी लग्न, मग आता दुसऱ्याशी. ईश्वरीचं तसंच काहीसं. संशय, भांडणं यातून ईश्वरी आणि आरवची झालेली ताटातूट इथवर मालिका येऊन पोहोचली आहे. नंतर ईश्वरी तिच्या आईसोबत एका छोटय़ा घरात राहत होती. तिची परिस्थिती फार चांगली नाही. भरजरी, डिझायनर साडय़ा रोज घालण्याइतकी नाहीच नाही; पण ईश्वरीच्या डिझायनर साडय़ा काही तिची lp50पाठ सोडत नव्हत्या. मॅचिंग बांगडय़ा, नेकलेस, कानातले हे सगळं कसं जमवून आणलं होतं तिने हे शोधायला ‘अस्मिता’ला बोलवावं लागेल असं वाटतंय.

काही मालिकांमध्ये खलनायिकांच्या येण्या-जाण्याची परंपराच आहे. ‘पुढचं पाऊल’ या मालिकेचं नाव त्यात नंबर वनवर येईल. ठरावीक दिवसांनी या अक्कासाहेब सरदेशमुखांच्या घरात कोणा ना कोणा खलनायकाची एंट्री होते. मग तो या अख्ख्या कुटुंबाला त्रास देतो, शेवटी अक्कासाहेब त्याला दणका देतात. अखेर, अर्थात सत्याचा विजय होतो. अगदीच दुसरा कोणी खलनायक मिळाला नाहीच तर त्यांचा हक्काचा खलनायक आहेच. अर्थातच रुपाली. या मालिकेचे हजारहून अधिक भाग पूर्ण झालेत. यामध्ये रुपालीचेच असंख्य गुन्हे झाले असतील. एवढं सगळं होऊनही तिला मात्र अक्कासाहेबांनी घरातच ठेवलंय. अक्कासाहेबांचा जोर तिथे कसा चालत नाही हे न सुटलेलं कोडं. मालिकेत असं सारखं कोणी तरी चुकीचं वागलेलं दिसायला हवं म्हणा, तरच ते मनोरंजक होईल आणि तरच टीआरपी खिशात पडेल. यातलीच ती कल्याणी कधी शहाणी होणार हे चॅनलच्या टीआरपीवरच ठरेल बहुधा.

‘जुळून येती रेशीमगाठी’ ही मालिका बघून तर अनेकांना मधुमेहाचा आजार सुरू झाला. गोडपणाचा कळस..! मालिका कौटुंबिक असली, विषय चांगला असला तरी काही बाबतीत टोक गाठते. याचं ताजं उदाहरण म्हणजे चित्रा. देसाई वाडी चित्रामय झाली आहे. तिचं वाडीत येणं, तिच्या लग्नाचा खटाटोप करणं, मग तिचा नकार सहन करणं, तिचं आजारपण, आता नोकरी करण्याचा विचार असं लांबलचक चित्रापुराण अजूनही सुरूच आहे. नोकरी मिळवण्याचं कौतुक तर फारच. नोकरीसाठी मुलाखत देताना त्यासंदर्भातली अभ्यास करण्यासाठी आदित्य काही पुस्तक आणून देतो. आजच्या घडीला अशी पुस्तकं वाचून मुलाखत देणारी तरुण पिढी शोधावीच लागेल. दिवाळीच्या आधीपासून आलेली ही चित्रा आणखी किती दिवस देसाई वाडीत मुक्काम ठोकते याचं उत्तर अजूनही अंधारातच.

‘रुंजी’ ही मालिका मध्यमवर्गीय कुटुंबात घडते. या मालिकेत नायिकेला, रुंजीला लग्न झाल्यावर तिचं मूळ नाव बदलायचं नसतं. त्या वेळी तिची सासू अक्षताचं ताट पायाने तुडवते असा प्रोमो दाखवला होता. मुळात असे प्रकार मध्यमवर्गीय कुटुंबात घडत नाहीत. ज्या गोष्टी पटत नाहीत त्यांच्याबाबत आजच्या काळातल्या तरुणी स्पष्ट बोलतात. त्यांच्या स्पष्ट बोलण्याला काही वेळा विरोधही होतो. पण, अशा प्रकारे पायाने ताट तुडवण्याचा प्रकार अगदीच चुकीचा वाटतो.

मालिकेतून व्यक्तिरेखा गायब करण्याची तर सवयच लागली आहे टीव्हीला. ‘माझे मन तुझे झाले’ या मालिकेत शेखरचा धाकटा भाऊ गायबच झालाय. यामागे त्या कलाकाराच्या डेट्स, दुसऱ्या कामाची व्यग्रता अशी कारणं असतात हे समजण्याइतका प्रेक्षक सुज्ञ झालाय. पण, कोणत्याही उल्लेखाशिवाय तो मालिकेत दिसेनासा झालाय. तसंच ‘पुढचं पाऊल’मध्ये घडलं होतं. यातल्या रोहितची व्यक्तिरेखा अनेक महिने गायब lp51होती. त्यामागच्या कारणाचा उल्लेख केला असला तरी तो पुसटसाच होता. ही भूमिका सुयश टिळक, आताच्या ‘का रे दुरावा’मधला जय करत होता. तिकडे हिंदीत तर असे प्रकार सर्रास होत असतात.

‘मेरी आशिकी अब तुमसे ही’ या मालिकेत सगळा सावळा गोंधळ. मालिकेतला नायक गरीब तर नायिका श्रीमंत. दोघं एकमेकांचे चांगले मित्र असतात. मग काही कारणांमुळे शत्रू होतात. एका दिवसात तो श्रीमंत होतो तर ती गरीब होते. मग त्याचं एकतर्फी प्रेम. शेवटी त्यांचं लग्न होतं. लग्न राजीखुशीने होत नाही. अशा घडामोडी मालिकेत घडल्या आहेत. असं एका दिवसात गरीब-श्रीमंत होता येत असेल तर ते कसं होऊ शकतं याचे क्लासेसच घ्यावे लागतील मालिकेला. ‘दिया और बाती हम’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘बालिका वधू’, ‘ससुराल सिमरन का’ अशा अनेक मालिकांमधल्या नायिका मेकअप आणि भरजरी, डिझायनर साडय़ा नेसून झोपतात. उठल्यावरही त्या तशाच सुंदर, देखण्या कशा दिसतात ही फार पूर्वीपासून असलेली शंका. ही प्रथा सुरू झाली ती ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ आणि ‘कहानी घर घर की’ या मालिकांपासून. ‘जोधा अकबर’ ही मालिका ऐतिहासिक कमी आणि प्रेमकथाच जास्त असं झालंय. ‘महाराणा प्रताप’मध्ये अनेक गोष्टी ताणल्या जातायत. प्रताप आणि त्याच्या बायकोमधले गैरसमज टोकाला गेलेत. हे सगळं घडतंय त्याच्या वयाच्या पंचविशीत. त्यामुळे पुढची सगळी कथा ते कशी दाखवणार हा प्रेक्षकांना पडलेला प्रश्न कायमचाच.

थोडक्यात काय, आपण बघतो म्हणून आपल्याला येडे बनवतात ना!