करियर, आर्थिक स्थैर्य, व्यक्तिस्वातंत्र्य याबद्दल सतत सजग असणाऱ्या आजच्या तरुणाईला पंचवीस हे वयसुद्धा लग्नासाठी जरा कमीच वाटत असतं. या प्रश्नाकडे नेमकं बघायचं कसं?

‘अगं, पण आयुष्यात काही गोष्टी वेळच्यावेळीच व्हायला हव्यात.’
‘तेच तर म्हणतेय मी! फक्त आपल्या प्रायॉरिटीज वेगवेगळ्या आहेत. लग्न, संसार, मुलं या माझ्या प्रायॉरिटीज नाहीयेत आई! मला अजून पाच वर्षं तरी लग्न करायचं नाहीये! आत्ताशी इंजिनीयर झालेय. अजून मास्टर्स, मग जॉब, स्वतंत्र फ्लॅट, गाडी हे सगळं मिळवायला तेवढा वेळ हवाय मला!’
‘चांगली मुलं खपून जातील तोवर!’
‘मला चांगली वाटणारी मुलं नाही खपणार. आणि खपलीच, तर राहू दे ना लग्न! एखादं छानसं बाळ दत्तक घेईन. आयुष्य एकदाच मिळतं. ते मी माझ्या मनासारखंच जगणार.’
श्रुतीच्या घरी चाललेला हा संवाद हल्ली अनेक घरी ऐकायला मिळतो.
लग्नसंस्थेबद्दल हल्लीच्या तरुणाईची मतं कशी आहेत ते समजून घ्यायला २००७ साली एक आंतरराष्ट्रीय सर्वेक्षण झालं. ते ए सी नील्सन या मार्केटिंगमध्ये संशोधन करणाऱ्या नामांकित डच संस्थेने केलं. त्यातून काही नवलाईच्या गोष्टी कळल्या. त्यातली मुख्य म्हणजे, लग्न वयाच्या तिशीलाच होणं उत्तम असं भारतातल्या ७९ टक्के तरुणांना ठामपणे वाटतं.
उच्च पदव्युत्तर शिक्षण घेतल्यामुळे मुलांमुलींचं लग्नाचं वय तर वाढतंच पण आर्थिक-वैयक्तिक स्वातंत्र्यही मिळतं आणि त्याची चटक लागते. लग्न करून ते स्वातंत्र्य गमावायचं तर जोडीदार मनासारखा आणि स्वत:च निवडलेला हवा असतो. तो मिळाला नाही तर सध्याच्या तरुणाईचं लग्नाशिवाय काहीही अडत नाही. त्या बंधनाशिवाय त्यांना हवी ती सुखं मिळू शकतात. पाऊ ल वाकडं न टाकताही, विज्ञानाच्या मदतीने संततीही मिळवता येते.
त्याहून अधिक काय मिळतं लग्नाने? मग लग्न करायचंच कशाला?
लग्नामुळे वंशाची जपणूक करण्याखेरीज इतरही फायदे होतात. लग्नामुळे पुरुषांचं काम सुधारतं, त्यांना बढत्या मिळतात आणि पगारवाढही होते असं अमेरिकन नौदलाच्या आणि व्हर्जिनिया विद्यापीठाच्या संशोधनात आढळून आलं आहे. पण त्याहून मोठा फायदा मिशिगन आणि सिनसिनाटी विद्यापीठांत झालेल्या अभ्यासावरून समजला : सुखीसमाधानी लग्नामुळे पुरुषांमधलं मृत्यूचं प्रमाण ८० टक्क्य़ांनी तर बायकांमध्ये ते ५९ टक्क्य़ांनी घटलं; अर्धांगवायूने किंवा बायपास सर्जरीने होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी घट झाली.
शास्त्रज्ञांनी त्या फायद्यांमागची कारणं शोधली आणि त्यांना प्रेमाचं रसायनशास्त्र गवसलं. एका ऑस्ट्रेलियन युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांना आढळलं की मदनबाणाच्या टोकाला पीईए नावाचं रसायन माखलेलं असतं. प्रथमदर्शनी प्रेमाने घायाळ होणाऱ्यांच्या मेंदूत पीईएचं प्रमाण एकाएकी वाढतं. तो उत्कट आनंद, ती पहिल्या प्रेमाची झिंग हे त्याचेच परिणाम असतात. प्रेम व्यक्त करायचा आत्मविश्वसही पीईए देतं.
हेलन फिशर नावाच्या मानववंशशास्त्रज्ञ बाईंनी तर प्रेमाच्या विज्ञानावर एक ग्रंथच लिहिला.
प्रेमाचा मार्ग पोटातून जातो म्हणतात ते खोटं नाही. प्रीतीची पहिली ओळख पटते ती अगदी आतडय़ातच पाझरणाऱ्या सीरोटोनिन नावाच्या दुसऱ्या एका रसायनामुळे.
तरीही ‘ती माझी अन् तिचा मीच’ ही खात्री पटेपर्यंत मनावर प्रचंड ताण असतो. त्या ताणामुळे रक्तातलं दुसरं एक रसायन वाढतं. वाघ पाठी लागल्यासारखी धडधड वाढते, थरकाप होतो, हातापायाला घाम फुटतो, तोंडाला कोरड पडते.

लग्न हा जीवशास्त्र आणि संस्कृती यांचा मिलाप आहे. जन्मभराचं बंधन स्वीकारणं हा संस्कृतीचा भाग आहे. जीवशास्त्राच्या दृष्टीने त्यातून निकोप वंशवृद्धीचा मूळ हेतू सफल होणं अपेक्षित असतं.

ते तळ्यात-मळ्यात संपून प्रीतिखुणा पटल्या की आणखी एक रसायन स्रवतं. ते म्हणजे डोपामीन. प्रणयाच्या आनंदोत्सवाला त्याचा पाठिंबा असावाच लागतो. प्रेमाची ओढ, आवडत्या व्यक्तीच्या सहवासासाठी होणारी कासाविशी, प्रेमापोटी उद्भवणारी असूयाही त्याच्यामुळेच निपजते. एखाद्या आनंददायी गोष्टीची चटक लागते ती डोपामीनमुळेच. मद्याचं, इतर अमली पदार्थाचं व्यसन लागायलाही तेच कारणीभूत असतं.
पण ही सारी रसायनं चार दिवसांच्या प्रेमप्रकरणामुळेही वाढतात. खऱ्या शाश्वत नात्याची साक्ष पटते ती ऑक्सिटोसिन आणि व्हासोप्रेसिन या दोन वेगळ्याच रसायनांमुळे. बाळंतपण सुखरूप व्हावं, आईला वात्सल्याने पान्हा फुटावा आणि तिची तान्हुल्यावर माया जडावी ह्यची जबाबदारीही तीच दोन रसायनं पेलतात. आयुष्याचा मनाजोगा भिडू लाभला की त्याच्याशी रतिRीडा केल्याने किंवा आलिंगनानेसुद्धा ही रसायनं पाझरतात आणि नातं अधिकाधिक पक्कं होत जातं. त्यांनी स्त्रीच्या मनात मायाममता तर जागतेच पण पुरुषांमध्येही कुटुंबवात्सल्य वाढतं. त्यामुळे त्या दोघांमधली वैवाहिक वीण अधिक दृढ होत जाते. एरवी ताणतणावांमुळे बळावणाऱ्या प्रRि या त्या रसायनांमुळे शमतात.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात रोजचे ताणतणाव अनेक असतात. सततच्या ताणामुळे रक्तदाब वाढतो, हृदयावर भार पडतो. शिवाय शरीराची रोगप्रतिकारक शक्ती घटते आणि सर्दीपडशापासून कॅन्सरपर्यंत अनेक आजार व्हायची शक्यता वाढते. पण मनासारखा जोडीदार जन्मभरासाठी, मणिमंगळसूत्रासारख्या पवित्र बंधनाने लाभून आनंदाचा संसार सुरू असला की आश्वस्त वाटतं. त्या निर्धास्त नात्यामुळे ऑक्सिटोसिन—व्हासोप्रेसिनचा पाझर वाढतो. त्या स्रावाचा परिणाम होऊ न ताणतणावाचे दुष्परिणाम घडवून आणणाऱ्या रसायनांचा पाझर कमी होतो. मोठय़ा आजारांचं प्रमाण घटतं आणि आयुष्याची दोरी अधिक बळकट होते.
लग्नामुळे प्रकृतीला जर इतका फायदा होतो तर लग्न लवकरात लवकरच करावं ना! शुभस्य शीघ्रम्!
तिथेच तर खरी गोम आहे. वैवाहिक जीवन सुखी—समाधानी असलं तरच त्याच्यापासून सगळे फायदे होतात. अठरा वर्षांच्या मुलीचं शिक्षण पुरं झालेलं नसतं. त्यामुळे नोकरी करणं, स्वत:च्या पायावर उभं रहाणं शक्य नसतं. जगात स्वतंत्रपणे वावरायचा आत्मविश्वासही नसतो. ती पूर्णपणे नवऱ्यावर अवलंबून असते. तिला तिची स्वत:चीच पुरती ओळख पटलेली नसते. मनाजोगा जोडीदार निवडण्याइतकी ती सुजाण नसते. त्यामुळे जो मिळेल तो कुंकवाचा धनी तिचा पतिपरमेश्वर होतो. तरीही मनं जुळल्यामुळे तसे काही विवाह सुखाचे होतातही. पण बहुतेक वेळा चूल आणि मूल यांत गुंतलेल्या मुलींच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतच नाही. कित्येकदा तर त्यांना खऱ्या शरीरसुखाचीही ओळख लाभत नाही. त्यांच्या स्वप्नातल्या प्रियकराबद्दलच्या अपेक्षा धुळीला मिळतात. त्यांच्यामध्ये नैराश्याचं प्रमाण मोठं असतं. लवकर लादली गेलेली बाळंतपणं, अविश्रांत काम आणि खाण्यापिण्याची हेळसांड यांमुळे त्यांची प्रकृती लवकर ढासळते आणि आयुर्मर्यादाही घटते. अशा लग्नांतून त्या मुलींना आणि त्यांच्या नवऱ्यांनाही आवडत्या जोडीदाराचा आश्वस्त करणारा सहवास आणि त्याच्यापासून होणारे फायदे क्व चित मिळतात.
व्यवस्थित शिक्षण घेतलं तर वयाच्या पंचविशीला स्वत:च्या पायावर उभं रहाण्याइतकी पात्रता आलेली असते. तिथून पुढेही शिकत राहिलं तर शैक्षणिक, आर्थिक आणि वैयक्तिक विकास होतच रहातो. तोवर जगाचा अनुभवही भरपूर पदरात पडतो. काही अहंमन्य लोक सोडले तर बाकीच्यांना इतरांशी जुळवून घ्यायची सवय होते. जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा अधिक व्यवहारी स्वरूपाच्या होतात. आर्थिक स्वास्थ्यामुळे ओढगस्तही नसते. एकमेकांबद्दल प्रेमासोबत आदरही वाटतो. सासरची माणसंही शिकल्यासवरल्या सुनेला अधिक मान देतात.
आंतरजालावरच्या वधूवरसूचक मंडळांमुळे तोलामोलाच्या मुलांची गाठ पडू शकते. त्यामुळे ‘चांगली मुलं खपतात,’ हा श्रुतीच्या आईचा आक्षेप थोडा लंगडा होतो. शिक्षणामुळे जातिभेदाचाही बाऊ होत नाही. सध्याच्या काळात तर उच्च शिक्षणासाठी परदेशी वास्तव्यही घडतं. देशोदेशींच्या अनेक समवयस्क मुलांशी मैत्री होते. आंतरदेशीय लग्नांना वडीलधाऱ्यांकडून बऱ्याचदा मान्यताही मिळते. पूर्वी अगदी पोटजातींचेही रीतिरिवाज, जेवणखाणाची पद्धत काटेकोरपणे पाळायला जवळची, नात्यातली सून बघितली जाई. आता हॅम्बर्गर, हॅरी पॉटर आणि फेसबुक—ट्विटरची समान जागतिक संस्कृती झाल्यामुळे कुठलंही मानवी रोपटं कुठेही सहज रुजतं. आंतरजालावर वैश्विक स्वयंवर मांडून जिवाभावाला पटणारा जोडीदार निवडता येतो. त्याच्याशी हवा तेवढा काळ स्काइपवरून गप्पा मारल्या की शारीरिक आकर्षणाचा धोका वगळून त्याचं व्यक्तिमत्त्व नीट जोखता येतं. मोठय़ा वयात लग्नं झाली की घटस्फोटांचं प्रमाण कमी होतं. पारखून घेतलेल्या रेशमाच्या गाठी अधिक भक्कम असतात. लग्न टिकतं. त्याचे फायदेही अधिक मिळतात. काही फारच पुढारलेली जोडपी तर एचआयव्ही, हेपॅटायटिस बी वगैरेच्या चाचण्या करून घेऊ न, डेटिंग, लिव्हिंग—इन रिलेशनशिप वगैरे रंगीत तालीम करून, छत्तीसच काय, तीनशेसाठ गुण जुळणारा भिडू निवडून, निवांतपणे लग्नाचा निर्णय घेतात.
म्हणजे लग्न जेवढय़ा उशिरा होईल तेवढं चांगलं का? परदेशातली काही जोडपी आयुष्यभर बॉयफ्रेंड—गर्लफ्रेंड म्हणून रहातात आणि केवळ कायदेशीर फायद्यांसाठी वयाच्या नव्वदीनंतर लग्नबंधन स्वीकारतात. ते योग्य आहे का?
लग्न हा जीवशास्त्र आणि संस्कृती यांचा मिलाप आहे. जन्मभराचं बंधन स्वीकारणं हा संस्कृतीचा भाग आहे. आश्वस्तपणा त्यातूनच येतो. शिवाय जीवशास्त्राच्या दृष्टीने त्यातून निकोप वंशवृद्धीचा मूळ हेतू सफल होणं अपेक्षित असतं. शरीरशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर विशी ते तिशी हा काळ आई होण्यासाठी उत्तम असतो. जसजसं वय वाढतं तसतसे स्त्रीपुरुषांच्या डीएनएमधले दोषही वाढत जातात. आईच्या पस्तिशीनंतर निकोप बाळ जन्मण्याची शक्यता कमी होत जाते. म्हणून शक्यतो पस्तिशीच्या आत मुलं व्हावी.
असा सर्वागीण विचार केला तर पंचविशीपासून निदान लग्नाचा विचार तरी करायला हवा. वैश्विक स्वयंवराचे सगळे सोपस्कार पार पाडायलाच दोन—तीन वर्षं सहज निघून जातील. शिवाय तीनशेसाठातले तीनशेचाळीस गुण जमले आणि दोन भिडूंना कामानिमित्त दोन ध्रुवांवरच रहायला लागणार असलं तर त्या अंतराच्या वीस गुणांनी सारंच फिसकटू शकतं हेही ध्यानात ठेवायला हवं. तशी सगळी अडथळा—शर्यत जिंकायला अठ्ठाविशी—तिशी उजाडते. त्या वयानंतर काहीजणींना गर्भारपणासाठीही तपश्चर्या करावी लागते. वेळापत्रक अगदी कटोकटी सांभाळलं तरच सारं पस्तिशीच्या आत जमवता येतं. पण त्यावेळी आर्थिक, सामाजिक, व्यावसायिक स्थैर्य मिळालेलं असतं. प्रगल्भ विचारांच्या जोडीदारांना ते पाच वर्षांंचं वेळापत्रक जमवून आणायला विज्ञानाची साथही घेता येते.
सध्याच्या तरुणाईला बहुतेक सल्लागार हेच सांगतात. पण आयुष्याकडून प्रत्येक व्यक्तीच्या अपेक्षा वेगवेगळ्या असतात. त्यानुसार विशीलाच, दोघांचं शिक्षण चालू असतानाच संसारही पेलायचा ठरवला तर तारेवरची कसरत करावी लागते खरी! पण तोल सांभाळायला वेळोवेळी एकमेकांना आधार दिला तर कसरत संपल्यावरही हात गुंफलेलेच रहातात.
जीवशास्त्राच्या दृष्टीने विशी ते तिशी हे लग्नासाठी योग्य वय. त्या दहा वर्षांंच्या मुहूर्तकाळात आपल्या मनाच्या पंचांगाप्रमाणे आपला खास मणिकांचनयोग घडवून आणला तर प्रेमाने मंतरलेल्या त्या दागिन्याने आयुष्याचं रुपडं देखणं तर होईलच पण जीवनाला कधी दृष्टही लागणार नाही.